ते एकत्र जगायला नाही तर एकत्र मरायलाच जन्माला आले होते! पंचाहत्तर मजली एमराल्ड इमारतीच्या गच्चीच्या कठड्यावर ते उभे होते. हातात हात होते. समोर सूर्यबिंब अस्ताच्या लाल रंगाने लकाकत होते. त्या सूऱ्याच्या अस्ताबरोबरच दोन प्रेमी जीवांचा आज अस्त होणार होता. दोघांनी एकमेकांकडे हसून पाहीले. एकमेकांना डोळ्यात साठवून घेतले. डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. हातांची पकड़ घट्ट झाली. दोघांनी आनंदाने, शांतपणे डोळे मिटून घेतले. एकच झटका. दोन्ही देह चिंधड्या होऊन कायमचे एकरूप होण्याच्या प्रवासाला तरंगत निघाले!
त्या काही क्षणांच्या फ्री फॉलमध्ये त्यांनी गेल्या सदतीस वर्षांचा स्वतःचा आयुष्यपट आठवला! साधारण १९८० चा काळ. तो सत्तावीस अठ्ठावीस वर्षांचा, ती बावीशीची. तो त्यांच्या चाळीत नातेवाईकांकडे आश्रित म्हणून राहायचा. अनाथच होता तो. शिक्षण संपवून किडुक मिडुक नोकरी करत होता. ती कॉलेज संपवून सरकारी नोकरीत नुकतीच चिकटली होती. तिचे बाबा मोठे सरकारी ऑफिसर. त्या काळी त्यांना न्यायला रोज ऑफिसची गाडी यायची! तिच्या आईला साहेबीण असल्याचा किती गर्व होता. अश्या श्रीमंत घरातील ती एकुलती एक मुलगी. सुंदर, हुशार. बाबांच्या वशिल्याने चिकटली सरकारी नोकरीत.
चाळीत येता जाता दोघांची नजरानजर होई. ह्याला आपल्या आश्रित, अनाथ आणि गरीब असल्याचा प्रचंड न्यूनगंड! तिला तिच्या रूपामुळे आणि परिस्थितिमुळे तितकाच आत्मविश्वास. तिच्या मागे मजनू बनून गोंडे घोळणाऱ्या गुलछबु मजनूंपेक्षा तिला तो भावला! अकर्षणातून प्रेम, प्रेमतून तिच्या पुढाकाराने अफेयर सुरु झाले. ते वर्षभर लपून छपून भेटत होते. शेवटी तिच्या आईला कळलेच. मग तीच ऐशीच्या दशकातील आणखी एक फसलेली प्रेम कहाणी! तिला घराबाहेर पडायला मनाई. ह्याचा जीव तीळतीळ तुटत. मित्र मैत्रिणींच्या करवी निरोपांची देवाण घेवाण. त्या दरम्यान १९८१ साली कमल हसन आणि रती अग्निहोत्रीचा एक दूजे के लीये प्रदर्शित झाला. तो पाहून अनेक प्रेमी युगुलांनी टाकीवर वासू सपना लिहून जीव दिले. त्या दोघांनी पाहिलेला तो शेवटचा चित्रपट! त्यातील “कोशीश करके देख ले” हे गाणे त्यांच्यासाठीच लिहिले आहे असे वाटून ते थेटराच्या अंधारात हातात हात घेऊन खूप रडले होते! त्यांनीही तेच ठरवले होते. एकत्र जागता आले नाही तर एकत्र मरायचे!
पण तिची आई खमकी होती. तिने महिन्याभरात तिचे लग्न उरकून टाकले. जावई खाजगी नोकरीत उच्च पदस्थ. पार्ल्यात स्वतःचा ब्लॉक. मुलगी सेट झाली होती. हा विरहाने वेडा झाला. कामात झोकून देऊन जगापासून वेगळा झाला. काही वर्षात कॉम्प्युटरचे युग आले. ह्याने लक्षणीय प्रगती करत अमेरिका गाठली. तिला मनाने वरले असल्याने ह्याचे लग्नकार्य काहीच नाही. सिलिकॉन व्हॅलीने अमाप पैसा दिला. स्थैर्य दिले. दृष्ट लागण्यासारखे करियर दिले. पण हा त्या गर्दीत मनातून एकटाच होता. तिच्यासारखाच! तिचा नवरा तिला वैवाहिक सुख देऊ शकत नाही हे लग्नाच्या पहिल्या रात्रीच कळले. त्या भयानक फसवणुकीच्या साक्षात्काराने ती अतिशय सुखावली! कारण ती मनानेच नाही तर तनानेदेखिल फक्त त्याचीच रहाणार होती…आयुष्यभर! तिचे लग्न तिला नव्या आडनावा पलीकडे काही देऊ शकले नाही! ती नवरा नामक पुरुषाबरोबर एक समांतर आयुष्य जगत राहीली…एकत्र असून कधीच न मिळणाऱ्या दोन रेषांसारख!
सालाबाद प्रमाणे दोन महिन्यापूर्वी ती नवऱ्याबरोबर नणंदेकडे अमेरिकेला गेली होती. घरात, कुटुंबात ती कधीच रमली नाही. अमेरिकेला गेल्यावर नवरा बहिणीच्या गोकुळात रमल्यावर हीचे अमेरिकेच्या स्वच्छ, विस्तीर्ण रस्त्यांवर स्वच्छंदीपणे फिरणे कुणालाही नवीन नव्हते. दर वर्षी ती अशीच दिवसभर अमेरिका पायी तुडवत फिरत असे. एकटीच! ही बहुधा तिची शेवटची ट्रिप! गेल्याच वर्षी डिटेक्ट झालेल्या कॅन्सरने शरीर पोखरायला सुरुवात केली होती! त्या दिवशी ती तशीच बाहेर पडली. दिशाहीन फिरायला. काही तास भटकल्यावर दमून ती एका लहानश्या रेस्टोरंट मधे शिरली. काहीतरी ऑर्डर देऊन एका टेबलावर बसली. इतक्यात तिला काहीतरी जाणीव झाली. तिथे उगाच काहीतरी ओळखीचे वाटू लागले. काहीतरी खूप जुन्या तारा छेडल्या सारखे! तिला काहीच कळत नव्हते. पण मनाला अचानक खूप छान वाटू लागले होते!
ती तिचा बर्गर घ्यायला उठली. तो घेऊन परत येताना तिला पालिकडल्या टेबलावर तो दिसला! हातातील आयपॅडवर काहीतरी करत बसलेला. केस बरेच पिकले होते, अंगावर मस्त ब्लेझर घातला होता, नाकावर ठेवलेल्या चष्म्यातून वाचत तो काहीतरी लिहित पण होता. खूप रुबाबदार, कॉन्फिडेंट, यशाच्या तेजाने झळकणारा तो…तोच तो एके काळी तिने अनेकदा सांगून देखिल मान खाली घालून, बुजत चालणारा, आत्मविश्वास नसलेला तिचा सखा होता? हातातील ट्रे सांभाळत ती चालत त्याच्यासमोर जाऊन उभी राहीली. त्याने नजर वर करून पाहीले. हो…तेच ते डोळे…ती तिथेच थिजली! त्याने डोळे बारीक करून तिच्याकडे पाहीले! त्याचा डोळ्यावर विश्वास बसत नव्हता! ती तीच होती! तशीच सुंदर, तेजस्वी…पण आता वय दिसू लागले होते…तेजस्वीपणाला जणू ग्रहण लागले होते…कँसरचे ग्रहण! तो उठून उभा राहीला! ओळख पटली होती! आज पस्तीस वर्षांनी मुंबईत दुरावलेले ते अमेरिकेत भेटले होते! मग पस्तीस वर्षांची दोघांची कहाणी संपेपर्यंत सूर्य त्याच रेस्टॉरंट मध्ये मावळला!
दुसऱ्या दिवशी ते परत तिथेच भेटले! आज तो निर्धार करून आला होता. तो सांगू लागला,
तो: हे बघ तुझे काही महिनेच उरले आहेत. मी तर तू सोडून गेलीस तेव्हाच मनाने मेलो आहे. तू भेटली नव्हतीस तोवर तू कुठेतरी आहेस ह्याचे एक समाधान होते. आता काही महिन्यांनी तू नसणार हे कळले आहे. मग माझ्या असण्याला समाधानचा आधार देखिल उरणार नाही. आता तर तू गेल्यावर दुसऱ्या क्षणी मी जाणार. मग एकत्र जाऊया ना. वासू सपना सारखे! एकत्र जगलो नाही तर एकत्र मरूया पस्तीस वर्षांपूर्वी ठरवल्यासारखे!
ती: (अविश्वासाने) अरे वेडा आहेस का? तुझी इतकी मोठी कंपनी, पसारा, इतके छान आयुष्य सुरु आहे. चांगला ठणठणीत आहेस. अजूनही तरुणी वळून पहातील इतका उमदा दिसतोस. मग हा वेडेपणा कशासाठी? माझे आयुष्य फुकटच गेले. आता फक्त ते संपणार आहे. मनाच्या आणि शरीराच्या वेदनांसह!
तो: (तिचा हात हातात घेऊन शांतपणे) मी फक्त तुझा होतो, आहे आणि राहीन! आपण खंडाळ्याच्या त्या लॉजमध्ये घालवलेल्या त्या एका दिवसाच्या आठवणी हृदयाशी जपून ठेवत मी अमेरिकेत एकटा, यशस्वी असूनही एकाही बाईकडे साधे पाहीले नाही. बाकी माझी कंपनी, पैसा हा तुझ्या आठवणीतून बाहेर पडून मन रमवायला केलेला एक प्रयत्न आहे. आता तूच समोर आहेस. मला कंपनी, पैशाची गरज नाही आणि आता तू नसशील त्या दिवशी स्वतःचीही गरज स्वतःला उरणार नाही! माझा निर्णय ठाम आहे! तू ठरवायचे आहेस!”
ती: अरे पण लोक काय म्हणतील? म्हातारा म्हातारी ह्या वयात…
तो: (तिला मधेच थांबवत) ते आपल्याला ऐकू येणार आहे का? पस्तीस वर्षांपूर्वी लोक काय म्हणतील हा विचार करून पळून जाऊन एकत्र जगण्याचा निर्णय आपण रद्द केला. तेव्हा लोकांनी आपल्याला एकत्र मरूही दिले नाही. आता तू पुढल्या आठवड्यात इंडियात परत जाणार. काही महिन्यात जग सोडून जाणार. ते मला कळले की मी पण जग सोडणार. मग एकत्र का नाही? आपण एकत्र मरायलाच जन्माला आलोय. अन्यथा आपण असे परत भेटलोच नसतो. विधात्याची तीच इच्छा आहे. बाकी तू ठरव!
दोघे उठले. दिवसभर त्याच्या गाडीतून फिरले. थेटरात बसून हातात हात धरून चित्रपट पाहीला. मग संध्याकाळी एमराल्ड बिल्डिंग मधील त्याच्या ऑफिसमध्ये आले. त्याने तासाभरात आपले सर्व शेयर आणि मालमत्ता दान करायचे पेपर्स साईन करून त्याच्या टेबलावर ठेवले. दोघे लिफ्टमधून टॉप फ्लोरवर निघाले! एकमेकांचा हात घट्ट धरून. टेरेसवर प्रचंड वारा होता. दोघेही इमारतीच्या कठड्याजवळ आले. एकमेकांना घट्ट मीठी मारली आणि कठड्यावर उभे राहीले……हातात हात होते. समोर सूर्यबिंब अस्ताच्या लाल रंगाने लकाकत होते. त्या सूर्याच्या अस्ताबरोबरच दोन प्रेमी जीवांचा आज अस्त होणार होता. दोघांनी एकमेकांकडे हसून पाहीले. एकमेकांना डोळ्यात साठवून घेतले. डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. हातांची पकड़ घट्ट झाली. दोघांनी आनंदाने, शांतपणे डोळे मिटून घेतले. एकच झटका. दोन्ही देह चिंधड्या होऊन कायमचे एकरूप होण्याच्या प्रवासाला तरंगत निघाले! मन पस्तीस वर्षांपूर्वीच्या रॉक्सी थेटरात गेले! एक दूजे के लिए सुरु होता…दोघांच्या मनात तेच गाणे भरून राहीले होते….
कोशीश कर के देख ले, दरिया सारे, नदियां सारी
दिल की लगी नहीं बुझती, बुझती है हर चिंगारी!!!
