गुंतता हृदय ही मराठी दीर्घकथा मंदार जोग

मुग्धा थंड पाण्याच्या शॉवरखाली बसून रडू लागली. थंड पाण्याने तिच्या अंगावर काटा आला. इतक्यात शॉवरमधून गरम पाणी येऊ लागलं. आपण गिझर न लावताही पाणी गरम कसं झालं ह्या विचारात मुग्धा होती आणि अचानक तिला प्रशांतने मिठीत घेतल्याची जाणीव झाली. तो नेहमी शॉवरमध्ये असताना तिला मिठीत घ्यायचा तशीच मिठी. मुग्धाने डोळे मिटून घेतले. मुग्धा प्रशांतच्या स्पर्शात न्हाऊन निघत होती. बाथरूमच्या आरशावर जमलेली वाफ संपूर्ण बाथरूममध्ये पसरली होती. तेजसला त्याच वेळी तो आणि मुग्धा शॉवरमध्ये एकत्र असल्याचं स्वप्न पडत होतं!

मैत्रिणीचा नवरा आज लवकरची फ्लाईट असल्याने पहाटेच निघाला होता. अमेय शाळेत गेल्यावर मुग्धा आणि मैत्रीण ब्रेकफास्ट करत बसल्या होत्या. मुग्धा तिच्या विचारात हरवली होती.

मुग्धा- आज अमेय शाळेतून आला की आम्ही आमच्या घरी जातो.

मैत्रिणीला हे ऐकून आश्चर्य वाटलं.

मैत्रीण- तुझ्या घरी? का अचानक?

मुग्धा- असंच. हे माझं battle आहे आणि ते मला लढायला हवं. असं पळून जाऊन चालणार नाही.

मैत्रीण- पण हे अचानक आज का सुचतंय? काय झालं काल रात्री?

मुग्धा- (दचकून) काल रात्री? क…काही नाही.

मैत्रीण- मुग्धा, काल रात्री बाथरूममधून येणारा शॉवरचा आवाज मला ऐकू आला. आणि मी बाथरूमकडे येत असताना आमच्या खोलीबाहेर तुझी ही केसांची क्लिप माझ्या पायाखाली आली.

मैत्रीण तिला क्लिप देते. मुग्धाला शरमल्यासारखं होतं. ती खाली बघते.

मैत्रीण- मुग्धा, मला वाटतं तू लग्न करायला हवं. परत नव्याने आयुष्य सुरू करायला हवं. असं किती दिवस मन आणि शरीर मारून राहणार तू? आणि ह्या कुचंबणेत अनेकदा एखाद्या धोकादायक प्रलोभनात पाय घसरून आयुष्यभर पस्तावायची वेळ येऊ शकते.

मुग्धा काही बोलली नाही.

मैत्रीण- मुग्धा, मला सगळं कळतंय पण मी फक्त सल्ला देऊ शकते ना? निर्णय तुलाच घ्यायचा आहे आणि तो खूप कठीण आहे हे पण मला माहित आहे.

मुग्धाला रडू फुटलं.

मुग्धा- का? माझ्या बाबतीतच हे का? कोणाचं काय बिघडलं होतं मी आणि प्रशांतने की आमच्या वाट्याला हे भोग यावे?

मैत्रीण उठून मुग्धाच्या शेजारी बसली. तिने मुग्धाच्या पाठीवर थोपटलं.

मैत्रीण- मुग्धा, ह्या ‘का’चं उत्तर जर सापडलं असतं ना तर आयुष्यात कोणीच दुःखी राहिलं नसतं. जे व्हायचं होतं ते होऊन गेलं. आता पुढे काय व्हायला हवंय तुला त्याचा विचार कर. तुझ्यापुढे तुझं आणि अमेयचं अख्खं आयुष्य आहे मुग्धा. आधार म्हणून नाही तर साथीदार म्हणून तुला आयुष्यात एका चांगल्या माणसाची गरज आहे. पटतंय का तुला?

मुग्धा- हम्म…

मैत्रीण- नुसतं हम्म म्हणून नाही चालणार. एक काम कर. Matrimony sites वर आजच रजिस्टर कर तुझं नाव. तिथे खूप प्रोफाईल असतात.

मुग्धा- मला प्रोफाईल नकोय. माणूस हवाय हाडामांसाचा. मी गमावलेल्या माझ्या प्रशांतसारखा हाडामांसाचा माणूस. मला माणूस म्हणून माहित असलेला.

मैत्रीण- ही खूप मोठी अपेक्षा नाहीये का आयुष्याकडून?

मुग्धा- माझ्या अपेक्षा खूप छोट्या होत्या. त्या पण पूर्ण नाही होऊ दिल्या ना आयुष्याने. मग आता माझा हट्ट आहे. एकतर आयुष्याने माझ्या मोठ्या अपेक्षा पूर्ण कराव्या नाहीतर आहे ते पण संपवून टाकावं.

मैत्रीण- मुग्धा, हा वेडेपणा आहे.

मुग्धा- असेल. पण आता जे आहे ते हेच आहे. नशिबाने माझा विश्वास गमावला आहे. तो परत मिळवणं ही नशिबाची जबाबदारी आहे. माझी नाही. मी बॅग भरते आणि अमेयला शाळेतून पिकअप करून घरी जाते.

मैत्रीण- ठीक आहे. काहीही लागलं तर केव्हाही फोन कर.

मुग्धा- हम्म…

त्या दिवशी मुग्धा अमेयला घेऊन तिच्या घरी रहायला गेली. तिने आता नोकरी शोधायला जोरात सुरुवात केली होती. काही इंटरव्ह्यू पण झाले. पण यश आलं नाही. तेजस तिच्या आयुष्यातून जणू गायब झाला होता. असाच एक आठवडा गेला. मुग्धाच्या मनात विचारांचं वादळ सुरू होतंच. पण नोकरी मिळवणे ह्या ध्येयापुढे बाकी सर्व गोष्टी कमी महत्त्वाच्या झाल्या होत्या.

तेजसच्या रूममध्ये पुतळा बनवायचा आजचा शेवटचा दिवस होता. आर्या आज पहाटे पाचला आली होती. तिच्या मते सकाळची वेळ कोणतंही काम चांगल्या पद्धतीने करायला उत्तम वेळ असते. तेजस उठून तयार होईपर्यंत आर्याने तिथेच तिचा योगा आणि बाकी व्यायाम आटोपून घेतले. तेजस बाथरूममधून बाहेर आल्यावर आर्या म्हणाली-

आर्या- मी पटकन शॉवर घेऊ का? Can I use your bathroom?

तेजस- हम्म… ओके…

तेजसने टीव्ही लावला. पहाटे सव्वापाचला इतर काहीच नसल्याने तो online web series बघू लागला. त्यात दाखवत असलेली प्रणय दृश्यं पाहून त्याला मुग्धा आठवत होती. पण त्याने इतके दिवस निग्रहाने तिला contact करणं टाळलं असल्याने त्याने मनावर ताबा ठेवत फोनकडे जाणारा हात मागे घेतला. तेवढ्यात मागून त्याच्या खांद्यावर आर्याच्या हातांची मिठी पडली. आत्ताच आंघोळ करून आलेल्या आर्याच्या लिक्विड सोप आणि शाम्पूचा सुगंध त्याच्या नाकात शिरला. आर्या त्याच्या कानाला आपले मऊ ओठ लावत कुजबुजली-

आर्या- हे वय romantic scenes फक्त बघायचं आहे का? आणि ते पण तुझ्यासारख्या handsome मुलाने?

तेजसला हा प्रसंग त्याच्या आयुष्यात आधी घडला असल्याची जाणीव झाली. अमेय शाळेत गेला होता. टीव्हीवर सुरू असलेल्या web series मध्ये प्रणय प्रसंग सुरू होता. तेवढ्यात मुग्धा बाथरूममधून बाहेर आली. तिने त्याच्या खांद्याला मागून मिठी मारली. ती त्याच्या कानाला हलकेच चावली. त्याने रिमोट बाजूला ठेवला आणि वळून मुग्धाचा टॉवेल ओढला. मुग्धाला हे अपेक्षित असल्याने तिने टॉवेल घट्ट धरून ठेवला होता.

मुग्धा- (त्याची अवस्था बघून लाडात हसत) किती हा धसमुसळेपणा? घाई कसली आहे इतकी?

त्याने तिचे ओले केस डाव्या हातात धरले आणि तिच्याकडे बघू लागला. मुग्धाने डोळे मिटून घेतले.

मुग्धा- I love you प्रशांत…..

तेजसला त्या प्रसंगात अचानक त्याच्या जागी प्रशांत दिसला. त्याची आर्याच्या केसांवरची आणि टॉवेलवरची पकड अचानक ढिली झाली. तो तिला मागे ढकलून लांब गेला. काचेतून दिसत असलेला विशाल समुद्र बघू लागला. आर्याने डोळे उघडले. ती प्रेमाच्या वर्षावात न्हायच्या तयारीत थरथरत उभी होती. तेजसला अचानक लांब गेलेला पाहून तिला आश्चर्य वाटलं. ती त्याच्या मागे जाऊन उभी राहिली. त्याला बिलगून म्हणाली-

आर्या- काय झालं तेजस?

तेजस- काही नाही.

आर्या- मग असा मध्येच का थांबलास?

तेजस- Leave it. Please…

आर्या- पण का तेजस? काय होतं अचानक तुला? प्रत्येक वेळी….

तेजस- मी नाही सांगू शकत तुला मुग्धा….

त्याच्या तोंडून मुग्धा ऐकून आर्याला प्रचंड धक्का बसला.

आर्या- मुग्धा? तेजस, मी आर्या आहे, आर्या. मुग्धा नाही. तुला माझ्यात ती मुग्धा का दिसते तेजस? तिचा काय संबंध आहे आपल्यात? मी वेगळ्या स्वभावाची, वेगळ्या आकाराची, वेगळ्या विचारांची एक वेगळी मुलगी आहे. आणि तू मला एका लग्न झालेल्या, मुल झालेल्या, नवरा मेलेल्या मुलीबरोबर कशी compare करू शकतोस? तुला बाईमध्ये फरक समजत नाही का? कुठे मी, मी लग्न न झालेली modern chick आणि कुठे ती तुझ्या ऑफिसात काही हजार कमावणारी तुझी employee असलेली aunty.

हे ऐकून तेजस सर्रकन वळला आणि त्याचा हात उगारला गेला.

तेजस- Enough, आर्या…

तेजसने स्वतःवर संयम ठेवत आपला हात खाली घेतला.

आर्या- तू माझ्यावर हात उगारलास तेजस? अरे, लग्न व्हायच्या आधी हे आहे तर लग्न झाल्यावर काय करशील तू? मावशीने मला भरीस पाडलं म्हणून मी लग्नाच्या भानगडीत पडले. मला पुरुष मिळवायला लग्नाची गरज नाहीये. एक शिट्टी वाजवली ना तर लाईन लागेल. तुझ्याहून श्रीमंत आणि तुझ्याहून देखण्या मुलांची. तू काय समजतोस स्वतःला? आणि त्या मुग्धावर इतकं प्रेम आहे ना तर मग घाबरतोस का? जा. सांग तुझ्या घरात. नाही पटलं त्यांना तर सोड घर. आहे हिंमत? नाही ना? अरे, माझ्यासारख्या बिनधास्त मुलीबरोबर झोपायला किंवा मुग्धासारख्या मुलीशी लग्न करायला हिंमत लागते हिंमत. तुझ्याकडे तीच नाहीये तेजस. त्यामुळे तुला दोन्ही जमत नाही. Anyway, आज माझं काम पूर्ण होणार आहे. ते झालं की मी जाते. हे लग्न मलाच मान्य नाहीये आणि मी ते मावशीला सांगणार आहे. तू तुझ्या घरी काय सांगायचं ते बघ.

इतकं म्हणून आर्या जायला वळली. वळताना तिच्या टॉवेलचं टोक खुर्चीच्या कोपऱ्यात अडकल्याने तिचा टॉवेल खाली पडला. ती तेजसकडे बघत तशीच उभी राहिली. तेजस पुढे झाला. त्याने तो टॉवेल उचलला आणि आर्याभोवती लपेटला. आर्या कोलमडली. त्याच्या गळ्यात पडून रडू लागली. तेजस तिच्या केसातून हात फिरवत तिला धीर देत होता.

आर्या- तेजस, हा जन्म मी तुला जाऊ देते. पण पुढल्या जन्माचं advance booking केलं आहे हा मी. तेव्हा आपल्या मध्ये कोणीही चालणार नाही मला. साला प्रेमात पडू नये हे जगाला सांगणारी मी कुठेतरी तुझ्या प्रेमात पडले. मला मिळवायला माझ्या मागे लागणाऱ्या टिपिकल मुलांमध्ये मिठीत असलेल्या मला रिजेक्ट करणारा तू मला आवडून गेलास. मला रिजेक्ट करून तू माझा इगो कुठेतरी दुखावला होतास. त्यामुळे तुला मिळवणे ही ईर्ष्या मनात निर्माण झाली असावी. पण नाही. We are not destined to meet in this birth. चल, कामाला लागूया. मी आले चेंज करून.

आर्या चेंज करायला गेली. तेजसने हळूच डोळ्यात आलेले दोन अश्रू पुसले.

मुग्धा अमेयला घेऊन घरी आली. घरात आल्यावर तिला खूप बरं वाटलं. तिने पटकन किचनमध्ये जाऊन अमेय आणि तिच्यासाठी वरणभात करायला कुकर लावला. मग घर जरा आवरून तिने अमेयला जेवायला घातलं. मग अमेयला झोपवून ती नोकरीची application पाठवू लागली. डोक्यात विचारांचं काहूर होतं. इतक्यात दाराची बेल वाजली. मुग्धाने दार उघडलं. दारात रोहित होता. त्याला समोर पाहून मुग्धा प्रचंड घाबरली. ती दार लावणार इतक्यात रोहितने हातात असलेली काठी दाराच्या मध्ये घातली आणि म्हणाला-

रोहित- मुग्धा, मी फक्त माफी मागायला आलो आहे. हवं तर तू हे दार उघड ठेव. मी इथूनच माफी मागतो. मी आता हे शहर सोडून जाणार आहे. त्याआधी तू मला माफ करावंस इतकीच इच्छा आहे म्हणून इथे आलोय मी. Please ऐकून घे माझं.

मुग्धा दार तसंच सोडून आत गेली. रोहित दार ढकलून लंगडत आत आला. त्याच्या पायाला आता प्लास्टर नसलं तरी चालताना त्याला काठीचा आधार लागत होता. रोहित आत आला. मुग्धा पाठमोरी उभी होती.

रोहित- मुग्धा, मला माफ कर इतकंच सांगायला आलोय मी. मी संध्याकाळच्या फ्लाईटने Bangalore ला जातो आहे कायमचा. मी जे काही वागलो त्याचा मला पश्चात्ताप आहे. पण मी तसा वागलो हे पण सत्य आहे. So, जमल्यास मला माफ कर. तुझं आयुष्य सुखी असू दे मुग्धा. निघतो मी.

मुग्धा काहीही न बोलता तशीच उभी होती. रोहित दारापर्यंत गेला आणि थांबला. मागे वळून पाहिलं तर मुग्धा तशीच उभी होती.

रोहित- मला थोडं पाणी मिळेल का? माझं ह्या घरात प्यायलेलं कदाचित शेवटचं पाणी असेल ते.

हे ऐकून मुग्धा मागे न वळता किचनमध्ये गेली. ती गेल्यावर रोहित धावत पुढे आला आणि त्याने मुग्धाच्या पर्समध्ये असलेलं अमेयच्या शाळेचं parent कार्ड काढून पर्स बंद करून जागेवर ठेवलं. मुग्धा पाण्याचा ग्लास घेऊन आली. ती त्याच्याकडे अजिबात बघत नव्हती. पण रोहित तिला नखशिखांत न्याहाळत होता. पाण्याचा ग्लास घेताना त्याने त्याचा हात तिच्या हातावर ठेवला. मुग्धाने लगेच आपला हात काढून घेतला आणि ग्लास पडता पडता राहिला. रोहित पाणी प्यायला आणि मुग्धाला म्हणाला-

रोहित- निघतो मी मुग्धा. आणि सॉरी. आत्ता पाणी घेताना चुकून तुला टच झाला.

इतकं बोलून रोहित निघून गेला. तो गेल्यावर मुग्धाने त्याला दिलेला ग्लास dustbinमध्ये टाकला आणि त्याने स्पर्श केलेला हात साबण लावून खसाखसा धुतला. ते केल्यावर तिला खूप भरून आलं. मुग्धा सिंकचा आधार घेऊन ढसाढसा रडू लागली.

तेजसच्या रूममध्ये संध्याकाळ झाली. तेजसचं अंग दिवसभर एकाच जागी बसून आखडून गेलं होतं. आज पुतळ्याला शेवटचे टच देताना आर्याने सिगारेटचं अर्धं पाकीट संपवलं होतं. त्या सेंट्रल एसी खोलीत धूर भरून राहिला होता. आर्या कामात हरवून गेली होती. तेजस पण तिचं dedication बघून तिला साथ देत बसून होता. शेवटी आर्याने पुतळ्यावरून शेवटचा हात फिरवला. दोन मिनिटं पुतळा निरखून खुश झाली. तिने पुतळा नेहमीच्या ओढणीने झाकला आणि एक सिगारेट शिलगावून तेजसला म्हणाली-

आर्या- Your Highness, आपला पुतळा तयार आहे. कसा झालाय सांगा.

तेजस उत्सुकतेने उठून पुतळा बघायला गेला. आर्याची गेल्या अनेक दिवसांची मेहनत आज पूर्ण झाली होती. तेजस पुढे आल्यावर आर्याने त्याला छान मिठी मारली आणि म्हणाली-

आर्या- Thanks for being patient with me…. सगळ्याच बाबतीत…

आर्या एक गोड हसली. तेजसने तिच्या डोक्यावर हात फिरवून तिचे केस विस्कटले आणि म्हणाला-

तेजस- तू अशी शांत बरी नाही वाटत. तू wild आहेस आणि तशीच छान वाटतेस.

आर्या- त्यासाठी पुढला जन्म ठेवला आहे ना आपला? मग काय. सध्या पुतळा कसा वाटतोय सांग. मी तुझ्या चेहऱ्यावरची प्रत्येक रेष इथे उमटवायचा प्रयत्न केला आहे.

तेजस पुढे आला. आजवर काम सुरू असताना आर्याने त्याला पुतळा अजिबात बघू दिला नव्हता. काम करून घरी जाताना ती पुतळ्यावर एक ओढणी झाकून जात असे. तेजसने देखील तिच्या विश्वासाला जागत ती ओढणी कधीच बाजूला केली नव्हती. पण आज तिच्याच परवानगीने त्याने पुतळ्यावरून ओढणी बाजूला केली आणि समोर जे दिसलं ते पाहून तेजस प्रचंड हादरला. त्याला समोर प्रशांतचा पुतळा दिसत होता. ते बघून तेजसच्या पायातले त्राण गेले. तो पुतळ्याकडे अविश्वासाने बघत खाली बसला!

क्रमश:
© मंदार जोग

पुढील भागाची लिंक- गुंतता हृदय….(भाग ३०)

सर्व भाग एकत्र- गुंतता हृदय – सर्व भाग

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. MandarJOG.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!