मृगजळ मंदार जोग मराठी दीर्घकथा

दुसऱ्या दिवशी सौरभने म्युच्युअल फंड एजन्सीसाठी नाव नोंदवलं. परीक्षेची तारीख ठरवली. दिवसभर तो विषयाचा अभ्यास करत होता. मानसी तिच्या ऑफिसमध्ये बिझी होती. तिला तिच्या बहिणीचा, माधवीचा फोन आला.

मानसी – बोल ताई.

माधवी – तुला एक विचारायचं होतं.

मानसी – काय?

माधवी – आपल्या बाबांच्या घरातल्या दोन रूम्स भाड्यावर देऊया का? स्टुडंट्सना?

मानसी – दे की. त्यात मला का विचारतेस?

माधवी – का म्हणजे? तू पण मालकीण आहेस त्या घराची.

मानसी – ताई, प्लीज. मी ती NOC दिली ना तेव्हाच त्या घरावरचा हक्क सोडला.

माधवी – पण आम्ही तो घेतलेला नाही. तू पैसे परत केलेस तेव्हा आम्ही तो तुला परत दिला. म्हणूनच बाबांनी घर तुझ्या आणि माझ्या, दोघींच्याही नावावर केलं आहे. त्यामुळे मालकीणबाई, परवानगी द्या.

मानसी – ताई, तू आणि जीजाजी जे ठरवाल ते मला मान्य आहे. सही कुठे करायची ते सांगत जा.

माधवी – सही नको. तुझी Power of Attorney आहे माझ्याकडे. त्याने रजिस्ट्रेशन करू आम्ही. आणि रेंटचे अर्धे पैसे तुझ्या खात्यात भरेन मी दर महिन्याला.

मानसी – ए ताई, बस ना यार.

माधवी – नाही मनू. तुझे जीजाजी चिडतील माझ्यावर. ते नेहमी म्हणतात की व्यवहार आणि नाती ह्यात गल्लत करू नये. अन्यथा दोन्हीची वाट लागते. तुला पैसे दिले तेव्हा NOC लिहून घेतल्यावर पण ते हेच म्हणाले होते आणि रेंट तुझ्या खात्यात जमा व्हायला उशीर झाला तरी हेच म्हणतील.

मानसी – बरं बाई… तुला हवं ते कर.

माधवी – तुझा डिव्होर्स काय म्हणतोय? यतीन…

मानसी – बहुतेक रोज पीत असेल हल्ली. जाऊ दे. मला फरक पडत नाही. दीड-दोन महिन्यांचा प्रश्न आहे. डिव्होर्स झाला की मी बाहेर पडेन… formally.

माधवी – हम्म… आयुष्यातल्या काही चुका खूप मोठी किंमत वसूल करतात. असो… मग डिव्होर्सनंतर पुढे काय?

मानसी – पुढे काय म्हणजे? Life goes on. ते थांबत नाही ना? माझी नोकरी, आदित्य हेच माझे प्रायोरिटी असतील.

माधवी – ते असेलच. पण तू चाळीशीची आहेस फक्त. तुझ्या पुढे अर्धं आयुष्य आहे अजून.

मानसी – मग?

माधवी – मग दुसरा कोणीतरी चांगला बघ आणि लग्न कर.

मानसी – ए ताई, अजून माझा डिव्होर्स झाला नाही आणि तू आतापासून दुसऱ्या लग्नाच्या गोष्टी करते आहेस. आणि मला नाही करायचं लग्न वगैरे. मला मस्त फ्री जगायचं आहे. आदित्यव्यतिरिक्त इतर कोणीही पुरुष नको आता मला माझ्या आयुष्यात.

माधवी – ते तुझ्या हातात नाहीये. यतीन आला तेव्हाही ते नव्हतं आणि आजही नाहीये. तू “कोणी नको” म्हणत राहशील आणि येणाऱ्याने तुझ्या आयुष्यात हळूच प्रवेश केला देखील असेल, जो तुझ्या लक्षातही आला नसेल.

मानसी काही बोलणार इतक्यात तिला सौरभचा कॉल येत असल्याचं लक्षात आलं.

मानसी – ताई, मला महत्त्वाचा कॉल येतोय. मी नंतर फोन करते तुला… बाय…

असं म्हणत तिने फोन कट केला आणि घाईत सौरभचा फोन घेतला.

मानसी – हेलो…

सौरभ – हाय… आजचं नक्की आहे ना, विचारायला फोन केला मी… Hope I am not disturbing you…

मानसी – Yes yes… ठरलं की ठरलं.

सौरभ – ओके… भेटू…

मानसीने फोन कट केला. ती कामाला लागली. पण तिला काहीतरी जाणीव झाली. तिने सौरभला फोन केला.

सौरभ – काय गं?

मानसी – तू ठीक आहेस ना सौरभ?

सौरभ – हो… का?

मानसी – मला तुझा आवाज थोडा टेन्स वाटला. बरं वाटत नाहीये का? घरी काही…

सौरभ – छे… सगळं ठीक आहे.

मानसी – नक्की ना? I mean, आपण भेटायचं नसेल तरी…

सौरभ – (घाईत) ए, काहीही काय? All is well… आपण भेटतोय…

मानसी – ठीक आहे… मी फक्त जे वाटलं ते विचारलं… बाय…

तिने फोन कट केला. सौरभ ज्या घाईने “ए, काहीही काय? All is well… आपण भेटतोय…” म्हणाला, ते आठवून तिला गंमत वाटली. तिने कामाला सुरुवात केली.

इथे सौरभला आश्चर्य वाटलं की मानसीने त्याच्या आवाजावरून तो थोडा टेन्स असल्याचं ओळखलं होतं. सौरभला आता पैसे कसे कमवायचे? अंकिताबरोबर ह्यापुढे संसार कसा होणार? हे प्रश्न सतत त्रास देत होते. त्याचा त्याच्या झोपेवरही परिणाम झाला होता. कदाचित ते त्याच्या बोलण्यातदेखील कुठेतरी येत असावं. सौरभने सगळे विचार झटकले आणि तो परत अभ्यास करू लागला. संध्याकाळी मानसीला भेटायचं आहे हा विचार मात्र त्याच्या नकळत त्याच्या मनाला हळुवार फुंकर घालत होता.

संध्याकाळी ठरल्यानुसार दोघे भेटले. मानसी नेहमीप्रमाणे उत्साही होती आणि सौरभ मात्र थोडा टेन्स. मानसी भरभरून बोलत होती आणि सौरभ तिच्या सुंदर चेहऱ्याकडे बघत ऐकत होता. आता जे ऐकत होता त्यातलं त्याच्या डोक्यात किती पोहोचत होतं, हे त्याचं त्यालाच कळत नव्हतं. पण मानसी बोलता खूप छान दिसत होती म्हणून तो तिला डिस्टर्ब न करता ऐकत होता. बोलताना मानसीच्या ओठांची होणारी हालचाल खूप लोभस होती. तिच्या तोंडापेक्षा तिचे डोळे जास्त बोलके होते. कधी ते मोठे होत, कधी बारीक होत तर कधी विचार करत… तिच्या तोंडून वाक्य बाहेर पडण्याआधी डोळे बोलून जात. बोलणारे डोळे हे चांगल्या मनाचा आरसा असतात. जे लोक मनाने स्वच्छ आणि पारदर्शक असतात, त्यांचं मन डोळ्यांतून व्यक्त होतं.

दोघांचीही दोन-दोन ड्रिंक्स झाली होती. दोघेही बऱ्यापैकी relax झाले होते. मानसी भरभरून बोलत होती आणि एका क्षणी तिच्या लक्षात आलं की सौरभ तिच्या चेहऱ्याकडे एकटक बघतो आहे. तिने त्याच्या डोळ्यांसमोर टिचकी वाजवली आणि सौरभ भानावर आला.

मानसी – कुठे हरवला होतास?

सौरभ – न.. नाही.. हरवलो नाही. ऐकत होतो. तू जे काही बोलत होतीस ना, ते ऐकत होतो.

मानसी – श्या.. मला वाटलं की तू म्हणशील, “मानसी, मी तुझ्या सुंदर डोळ्यांत हरवलो होतो. बोलताना होणारी तुझ्या ओठांची हालचाल पाहून वेडा झालो होतो…” पण श्या… तसं काहीच झालं नाही.

सौरभ – आणि समजा मी म्हणालो की तू म्हणते आहेस तसंच झालं होतं तर?

मानसी – तर मला माझी आणि यतीनची पहिली date आठवेल. तेव्हाही मी बोलत होते आणि तो ऐकत होता. मी विचारल्यावर तो हेच म्हणाला होता आणि मी फसले. But not anymore… तू जरी हे म्हणालास तरी मी फसणार नाही. आपलं लफडं फक्त अदितीच्या मनात असेल. प्रत्यक्षात ते होणार नाही. I just don’t trust men. माझ्या आयुष्यात आता कोणताही पुरुष कधीच येणार नाही and that is final.

हे म्हणून तिने सिगरेटचा एक कश ओढला. सौरभ मात्र दुसरीकडे बघत हसला. त्याला हसलेला पाहून मानसी म्हणाली,

मानसी – हसायला काय झालं?

सौरभने तिच्या हातातून सिगारेट घेऊन एक कश घेतला आणि तो म्हणाला,

सौरभ – तू जे बोललीस ना, त्यावर हसू आलं.

मानसी – का? माझा निर्णय पक्का आहे.

सौरभ – असे निर्णय घेणं आपल्या हातात असतं. पण ते टिकवणं नियतीच्या हातात असतं. तू आयुष्यात आणखी कोणी नको म्हणत राहशील आणि येणाऱ्याने तुझ्या आयुष्यात हळूच प्रवेश केला देखील असेल, जो तुझ्या अजून तरी लक्षात आला नसेल. So leave it to the destiny.

हे ऐकून चकित झालेली मानसी म्हणाली,

मानसी – बापरे. हे भयानक आहे. आज ताईचा फोन आलेला आणि ती पण सेम हेच म्हणाली. पण माझा त्यावर विश्वास नाहीये. आता तो जो कोणी तुम्ही म्हणताय, तो माझ्या आयुष्यात येणार आहे. Right?

सौरभ – येणार आहे नाही… तो आला असेल, असं आम्ही म्हणतोय.

मानसी – तेच… आला असेल. पण आयुष्य माझं आहे ना? आता तो आला असेल तर काय मिस्टर इंडिया सारखा अदृश्य तर नसेल ना? मला दिसत तर असेल ना? And I guarantee you, मला माझ्या आजूबाजूला दिसणाऱ्या कोणत्याही पुरुषाबद्दल असं काहीच वाटत नाही. त्यामुळे अजून तरी तो आलेला नाही.

सौरभ – हे जे तसं काही वाटणं आहे ना, मानसी, तो एका क्षणाचा खेळ आहे. तो एक क्षण आयुष्यात येतो, आपल्या मनात त्या व्यक्तीबद्दल प्रेम नावाचं एक बीज सोडतो आणि बघता बघता त्या बीजाचा वृक्ष मनात तयार होतो… आपल्याही नकळत. तो क्षण तुझ्या आयुष्यात आला ना, की तो माणूस कोण आहे हे पण तुला जाणवेल.

मानसी – अरे हो, मी विसरलेच. तो माणूस तू आहेस, सौरभ…

सौरभ – (shocked) काय?

मानसी – हो. आता आपलं इतकं मोठं लफडं आहे. त्या लफड्यामुळे तुझी बायको चिडली, तुझी नोकरी गेली, माझा नवरा मला मारायला आला. इतकं सगळं आपल्यात झालं म्हणजे तो पुरुष तूच आहेस ना?

हे बोलून ती जोरजोरात हसू लागली. सौरभलाही हसू आलं. दोघे बराच वेळ हसत होते.

इतक्यात मानसीला तिच्या lawyer चा फोन आला. मानसीने तो घेतला.

मानसी – हेलो…

वकील – मानसी… तुझ्या डिव्होर्सच्या फायनल हिअरिंगची डेट मिळाली आहे. तू सांगितल्यानुसार मी रिक्वेस्ट केली आणि परवाची तारीख मिळाली आहे. परवा डिव्होर्स ग्रांट होईल. ओके?

मानसी – (अचानक गंभीर होत) हम्म… ठीक आहे. Thanks.

मानसीने फोन कट केला आणि एक सिप घेऊन ती त्या टेरेस रेस्टॉरंटच्या वर आकाशात दिसणारा चंद्र बघू लागली. सौरभने हळूच विचारलं,

सौरभ – Any problem? If I may ask…

मानसी – नाही… प्रॉब्लेम नाही… जाणीव…

सौरभ – कसली?

मानसी – एका प्रवासाचा शेवट जवळ आल्याची… वकीलबाईंचा फोन होता. परवाची डेट घेतली आहे तिने. परवा डिव्होर्स ग्रांट होईल.

सौरभ – Wow… congrats…

हे ऐकून मानसीने त्याच्याकडे पाहिलं. सौरभला त्याची चूक लक्षात आली.

सौरभ – I mean… तू… तू मोकळी होशील ना… तूच डिव्होर्स फाईल केला आहेस ना? ही legal battle संपेल… एक chapter close होईल म्हणून मी congrats म्हणालो. बाकी वाईट वाटणारच…

मानसी – नाही… वाईट वगैरे अजिबात वाटत नाहीये मला. खरं सांगायचं तर काहीच वाटत नाहीये. माझं आणि यतीनचं नातं आमच्या वयाच्या दुप्पट वेगाने म्हातारं झालं. त्याला जणू वेगवेगळ्या व्याधी लागल्या आणि शेवटी मी त्या नात्याला कोर्ट नावाच्या हॉस्पिटलमध्ये admit केलं. परवा जज त्या नात्याचा ventilator काढून त्याला संपवायची formality करतील, इतकंच. त्यामुळे yes… congrats to me for my upcoming freedom. Cheers…

असं म्हणून तिने समोर असलेला ग्लास एका घोटात संपवला आणि डोळ्यांत आलेलं पाणी लपवायला ती उठून कठड्याजवळ जाऊन उभी राहिली.

मागून आलेल्या सौरभने तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिने मागे वळून त्याला घट्ट मिठी मारली आणि ती मनापासून रडत राहिली. तिच्या अश्रूंनी सौरभचा खांदा भिजला. तो तिच्या पाठीवर हात फिरवत तिला शांत करत होता.

त्या टेरेसच्या वर आकाशात दिसत असलेला चंद्र आज जरा जास्तच शीतल भासत होता.

क्रमशः

पुढील भागाची लिंक- मृगजळ भाग ८

मृगजळ सर्व भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा- मृगजळ- सर्व भाग

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. MandarJOG.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

2 thoughts on “मृगजळ – भाग ७”
  1. उत्तरोत्तर उत्सुकता वाढत जाणारी कहाणी आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!