…..त्याच्या तोंडून मोहिनी ऐकून मुग्धाने आपले दोन्ही हात त्याच्या गळ्यात टाकले आणि ती त्याच्या दोन्ही पावलांवर उभी राहिली. त्याचे केस मागून धरून तिने त्याच्या ओठांवर आपले ओठ टेकले. तेजसला तो स्पर्श ती चव ओळखीची वाटत होती. मुग्धाला ती प्रशांतच्या मिठीत असल्याची गोड जाणीव होत होती. भिंतीवरच्या फोटो मधून प्रशांत आशीर्वाद देत होता. इतक्यात दाराची बेल वाजली. मुग्धा दचकून भानावर आली. तेजसच्या मिठीतून सुटायचा प्रयत्न करू लागली. तेजस तिच्यात हरवला होता.
मुग्धा- तेजस कोणीतरी आलंय….
तेजस- मग जे कोणी आहे ते जाईल.
मुग्धा- अस काय करता तेजस?
तेजस- मुग्धा येऊन परत गेलेला माणूस परत येऊ शकतो पण ही वेळ परत येणार आहे का?
हे वाक्य ऐकून मुग्धाला प्रचंड आश्चर्य वाटलं. कारण अगदी थेट असाच प्रसंग तिच्या आणि प्रशांतच्या बाबतीत घडला होता. त्यावेळी प्रशांतने देखील हेच वाक्य म्हटलं होत. इतक्यात बेल परत वाजली. मुग्धा दाराकडे निघाली. तेजसने तिचा हात धरला. बेल परत वाजली. तेजसने तिचा हात सोडला. मुग्धा क्षणभर जागीच उभी राहिली. मग मागे वळून म्हणाली-
मुग्धा- तेजस, तुम्ही म्हणालात तेच खरं आहे. माणूस येईल परत पण ही वेळ नाही. ती आवेगाने परत येऊन तेजसच्या मिठीत विसावली. चुंबनाचा भर ओसरल्यावर तेजस हळूच तिच्या कानात बोलला-
तेजस- कॉफी थंड झाली बहुतेक. मला काही गोष्टी हॉट असतानाच आवडतात.
मुग्धा त्याच्या मिठीतून स्वतःला ओढून काढत म्हणाली-
मुग्धा- आणते गरम करून. बसा.
मुग्धा आत गेली. तेजस प्रशांतच्या फोटोकडे बघू लागला. त्यात त्याला स्वतःच प्रतिबिंब दिसलं.
ऑफिसात राधिका तिचा रीडिंग चष्मा नाकावर खाली सरकवून समोर बसलेल्या आर्याकडे बघत होती. आर्या मोबाईल मध्ये काहीतरी जोक वाचून हसत त्याला रिप्लाय देत होती.
राधिका- आर्या तू आयुष्यात सिरीयस कधी होणार ग?
आर्या- (मोबाईल मध्ये बघत) मावशी. सिरीयस होणं म्हणजे टेन्शन घेणं, वाईट वाटून घेणं असं तुला वाटत असेल तर मी आयुष्यात कधीच सिरीयस नाही होणार. कारण मला एक गोष्ट माहित आहे ती म्हणजे एखाद्या प्रॉब्लेमचा त्रास करून घेतला की फक्त त्रास वाढतो. आपला प्रॉब्लेम सुटत नाही. सो त्रास का करून घ्यायचा? त्यापेक्षा सोल्युशन शोधण्यावर भर असतो माझा.
राधिका- मग काय सोल्युशन आहे तुझ्याकडे ह्या सध्याच्या तुझ्या आणि तेजसच्या स्टेटसवर?
आर्या- स्टेटस नाहीये ते मावशी. तो फक्त माझा तर्क आहे. तर्क चुकीचा देखील असू शकतो. आणि तो बरोबर असला तरी निदान आपल्याला त्याची आधीच कल्पना होती ह्याचा आनंद आहेच ना?
राधिकाने रागाने तिच्या हातातला मोबाईल काढून टेबलवर आदळला.
आर्या- मावशी आपटतेस काय माझा फोन. कुछ तो इज्जत करो. यार तो लेटेस्ट आयफोन आहे. स्लीक, सेक्सी, एक्सक्लुझीव्ह, दिसायला नाजूक पण कणखर….. just like me.
आपल्या ह्या वाक्यावर आर्या मनसोक्त हसली.
राधिका- झाला का तुझा बालिशपणा? आता जरा महत्वाचं बोलायचं का?
आर्या- बालिश नाही आत्या. बालिश म्हणजे childish. मी childish नाहीये. हां मला तू childlike म्हणू शकतेस.
राधिका- ओह come on आर्या. तुला काहीच का वाटत नाही?
आर्या- वाटतं ना.
राधिका- काय?
आर्या- हेच की तेजस खूप हॉट आहे आणि he will be great in bed.
राधिका- अग पण त्यासाठी तुमचं लग्न नको का व्हायला? त्यासाठी तू काय करणार ते सांग.
आर्या- मावशी माझं तेजसशी लग्न ही तुझी priority आहे. माझी नाही. इन जनरल पण लग्न ही माझी priority नाहीये आयुष्यात. पण like I said लग्न जर तेजसशी असेल तर I dont mind it. मला तेजस हा पुरुष म्हणून आवडला आहे. मग तो माझा नवरा झाला किंवा नाही झाला ह्याने मला फरक पडत नाही.
राधिका- मग काल रात्री त्याच्या तोंडून मोहिनी ऐकल्यावर तू का मागे झालीस? काल तर तुला हवा असलेला चान्स होताच ना?
आर्या- मावशी फरक आहे ना माझ्यात आणि पैशासाठी झोपणाऱ्या एखाद्या बाईमध्ये? त्यांना फरक नाही पडत त्यांच्या बरोबर असलेला पुरुष त्यांनाच उपभोगतोय की ते करत असताना त्याला डोळ्यासमोर कथारीना कैफ किंवा त्याची आवडती शेजारीण दिसते आहे. मला पडतो ना पण? माझ्या बरोबर असलेला पुरुष त्या क्षणात सर्वस्वी माझा असणं माझ्या दृष्टीने आवश्यक आहे मावशी. आता काल त्याला माझ्यात मोहिनी दिसली किंवा जाणवली तर मग मी असूनही नव्हतेच ना तिथे? सोड तू मावशी. माझे विचार तुला नाही पटणार.
राधिका- तू पूर्ण वेडी आहेस आर्या. ओके ऐक. वाद नको. मी सांगेन ते करशील का?
आर्या- काय?
राधिका- मी मुग्धाला त्याच्या मनातून उतरवते पण तू त्याच्या मनात स्वतःची जागा निर्माण करणार का?
आर्या- हम्म…मी प्रयत्न करते.
राधिका- कसा करणार तू प्रयत्न?
आर्या- तू मुग्धाला त्याच्या मनातून कशी उतरवणार?
राधिका- तू ते माझ्यावर सोड.
आर्या- मग त्याच्या मनात मी माझी जागा कशी निर्माण करायची हे पण तू माझ्यावर सोड. आपण आपापली कामं नीट करूया. तुझं टार्गेट माझं आणि तेजसचं लग्न आहे आणि माझं टार्गेट तेजस आहे, लग्न करून किंवा लग्नाशिवाय…फक्त त्याला माझ्यात मीच दिसायला हवी ही माझी अट आहे…नाही तो माझा हट्ट आहे.
दोघी आपापल्या प्लानच्या विचारात हरवल्या.
मुग्धाच्या घरी अमेय शाळेतून आला होता. आज काय झालं होतं काय माहित पण अमेय खूप दिवसांनी खूप खुश होता. तो तेजसशी खेळत होता. त्याच्याशी मारामारी करत होता. त्याच्या डोक्यावर काय चढून बसत होता. आणि तेजस पण ते सगळ खूप एन्जॉय करत होता ते पाहून मुग्धाला खूप बर वाटत होतं. तेजस बरोबर भरपूर खेळून, मस्ती करून अमेय त्याच्या खोलीत अभ्यासाला गेला. मुग्धाने तेजसला अजून एक चहा आणून दिला आणि दोघं बोलत बसले.
मुग्धा- तेजस, तुम्ही अमेयशी इतके छान वागलात, त्याच्याशी खेळलात हे बघून मला आनंद झाला. प्रशांत गेल्यानंतर आज इतक्या दिवसांनी अमेय मला इतका खुश आणि मजेत दिसला. त्यासाठी तुमचे जितके आभार मानेन तितके कमी आहेत.
तेजस- आभार कसले मानतेस मुग्धा. अग तो लहान मुलगा आहे. मी फक्त त्याच्या मनासारखा वागत गेलो. त्याला जे हवं होतं ते करत गेलो. त्याला कशालाच नाही म्हणालो नाही. म्हणून तो इतका फ्री होऊन माझ्याशी खेळला ना.
मुग्धा- ह्म्म्म….
अचानक मुग्धा शांत झाली. खाली बघत विचारात गढून गेली. ते तेजसच्या लक्षात आल्यावर तेजस म्हणाला-
तेजस- काय झालं अचानक?
मुग्धा काहीच बोलली नाही. तेजसने पुढे होऊन तिचा हात हातात घेतला आणि तो म्हणाला-
तेजस- मुग्धा जे काही मनात आहे ना ते बोल. अगदी काहीही असू दे.
मुग्धाच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. एक आवंढा गिळत मुग्धा बोलू लागली.
मुग्धा- तेजस तुम्हाला काय सांगू. प्रशांत आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम होत…आहे! मी प्रशांत आणि अमेय इतकं आमच तिघांचं एक लहान, खूप सुंदर असं जग होतं. पण त्याला कोणाचीतरी दृष्ट लागली आणि प्रशांत अकाली, अचानक आम्हाला सोडून गेला. आमचे सर्व नातेवाईक दुरावलेले असल्याने मला कोणाचाच सपोर्ट नव्हता. मग रोहितने आधार द्यायच्या निमित्ताने आमच्या आयुष्यात प्रवेश केला. तो खरं तर प्रशांत आणि माझा जुना मित्र. आणि प्रशांत गेल्यावर मी इमोशनली इतकी vulnerable झाले होते की रोहितच्या मनात असं काही असेल ह्याची मला पुसटशी देखील शंका आली नाही.
तेजस- हम्म…मी समजू शकतो.
मुग्धा- पण त्याच इतकं भयानक खरं रूप आज समोर आल्यावर मला स्वतःला खूप अगतिक वाटू लागलं. नवरा गेलेली तरुण, सुंदर बाई म्हणजे समस्त पुरुष जमातीची सोय किंवा संधी असते का? आपण तिला केलेल्या मदतीच्या बदल्यात तिने तिचं शरीर आपल्याला द्याव अशी अपेक्षा बहुतेक पुरुष का करतात? किंबहुना त्याच अपेक्षेने ते मदतीचा हात पुढे करून तिचा हात धरायचा प्रयत्न का करतात? आज सकाळी झालेल्या प्रकाराने मी उद्विग्न झाले होते. त्याच विचारात ऑफिसला आले. आणि मग तुम्ही रोहितला जी शिक्षा दिलीत ना ते पाहून मला तुमचा खूप आधार आणि आदर वाटला. मी जगात एकटी नाहीये. मला समजून घेणारा एक मित्र माझ्या बरोबर आहे असं वाटून गेलं. एका खूप मोठ्या भावनिक संघर्षातून तुम्ही मला बाहेर काढलंत आणि मग त्यामुळेच एका स्त्रीची भावनिक किंवा नैसर्गिक प्रतिक्रिया म्हणून आपल्यात जे घडलं ते घडलं. तुम्ही इतके मोठे आहात की ह्या उपकाराच्या बदल्यात मी तुम्हाला काय देणार असं कुठेतरी वाटत होतं. मग माझ्याकडे असलेली सर्वात मौल्यवान आणि पवित्र गोष्ट…माझं शरीर तुम्हाला समर्पित करायचा विचार एक स्त्री म्हणून subconsciously माझ्या मनात आला असावा आणि म्हणून मग तो कीस…..
मुग्धा बोलायची थांबली. तिला हुंदका आला. तेजस तिचा हात हातात घेऊन बसला होता. त्याने तिचा हात थोपटला.
मुग्धा- तेजस प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. आपण दोघंच घरात आहोत म्हणून एकांताचा फायदा घेऊन मी तुमच्याशी जवळीक साधायचा प्रयत्न केलेला नाही. माझा प्रशांत, त्याच अस्तित्व त्याच्या फोटोच्या रूपाने ह्या घरात आणि माझ्या मनात टिकवून आहे. जे झालं ते एका भावनिक क्षणात घडलेली गोष्ट आहे. मला तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाहीये. हवं तर तुम्ही मला नोकरीवरून काढून टाका. पण माझ्या हेतूवर किंवा चारित्र्यावर संशय घेऊ नका. प्लीज….
तेजसने तिचा चेहरा दोन्ही हातात धरून वर केला. त्याच्या रुमालाने तिचे डोळे पुसले. तेजस म्हणाला-
तेजस- मुग्धा, एक लक्षात ठेव. मला बाईच हवी असेल ना तर मी फक्त टिचकी वाजवायची गरज आहे. ह्या शहरातील अनेक सुंदऱ्या, नट्या माझ्या पैशावर भाळून माझ्या घराबाहेर लाईन लावतील. त्यासाठी मला नवरा गमावलेल्या, समाजाच्या दृष्टीने सोय किंवा संधी असलेल्या एका मुलीला इम्प्रेस करून तिच्या घरात येऊन तिचा कीस घ्यायची काहीच गरज नाहीये. सो तुझ्याबद्दल माझं तस काहीही मत होऊ शकत नाही हे तू लक्षात घे. मला तुझ्याबद्दल काय वाटतं हे आत्ता तरी मला सांगता येणार नाही. पण इतकं नक्कीच सांगेन की ते जे काही आहे ते मैत्रीपेक्षा खूप जास्त आहे. निदान माझ्यासाठी तरी We are NOT just good friends. पुढे काय होईल ते माहित नाही. बर मला जे वाटतंय ते तुलाही वाटावं अशीही अपेक्षा नाहीये माझी. तू आणि तुझं हे सुंदर जग खूप सुंदर आहात. तुझा प्रशांत देखील ह्या विश्वाचा भाग आहे हे पण मला माहित आहे. सो आज जे झालं तो अपघात होता असं समजून तू विसरून जा. आपण चांगले मित्र आहोत आणि राहू. उद्यापासून Life normal असेल आपलं. पण मी वाट बघेन तुझे विचार बदलायची. तुलाही आपली मैत्री मैत्रीच्या पलीकडे काहीतरी वाटायची.
तेजसने चहाचा कप ठेवला आणि तेजस उभा राहिला. मुग्धा पण उठली.
तेजस- येतो मी मुग्धा.उद्या ऑफिसात भेटू. आणि हो आज जे झालं त्यासाठी सॉरी.
मुग्धा- तुम्ही प्लीज सॉरी नका म्हणू. प्लीज तेजस…
तेजस पुढे झाला. त्याने मुग्धाचा चेहरा आपल्या हातात धरला. दोघं एकमेकांच्या डोळ्यात बघत होते. मुग्धाचे ओठ आणि अंग थरथरत होतं. तिने डोळे मिटून घेतले.
तेजस- मुग्धा आज एका साध्या कीस वरून मी सांगू शकतो की तुझा प्रशांत खूप लकी नवरा होता. तू खरच मोहिनी आहेस….पण फक्त तुझ्या प्रशांतची….
इतकं बोलून तेजस तिथून निघून गेला. मुग्धा थरथरत तशीच उभी होती. तिला समोर भिंतीवर प्रशांतचा फोटो दिसत होता.
मुग्धा- प्रशांत मी काय करू? तूच सांग ना प्रशांत मी काय करू? मुग्धा ढसाढसा रडत बथारून मध्ये जाऊन थंड shower खाली बसली.
रात्रीचे अकरा वाजले होते. तेजस त्याच्या प्रशस्त बेडरूम मध्ये काहीतरी वाचत बसला होता. त्याला अर्याचा मेसेज आला.
आर्या- हाय handsome झोपलास की माझ्या आठवणीत जागा आहेस?
तेजसला तो मेसेज पाहून मजा वाटली.
तेजस- आहे जागा आहे. बोल सेक्सी गर्ल.
आर्या- आय लाईक धिस रिप्लाय.
तेजस- आय नो.
आर्या- उद्या ऑफिसात आहेस का?
तेजस- हो. का?
आर्या- मी येते उद्या. भेटून सांगते. ओके?
तेजस- मग आत्ता कुठे आहेस?
आर्या- तुझ्या घरापासून फक्त वीस किलोमीटर वर आहे? येऊ का सांग फक्त. दहाव्या मिनिटाला हजर होते.
तेजस- नको. ऑफिसात बोलू उद्या.
आर्या- का रे? घाबरलास का?
तेजस- तू बरोबर असलीस ना की मला तुझी नाही माझी स्वतःची भीती वाटते.
हे ऐकून आर्या जोरात हसली.
आर्या- खूप आवडलं हे.
तेजस- उद्या भेटू. बाय.
आर्या- बाय.
तेजसने फोन बाजूला ठेवला. तो परत वाचू लागला. इतक्यात त्याला मुग्धाचा मेसेज आला.
मुग्धा- झोपलात का?
तेजस- नाही.
मुग्धा- का?
तेजस- तुझी आठवण येत होती…
मुग्धा रिप्लाय करत नाही.
तेजस- मी खरं कारण सांगितलं. आवडलं नसेल तर ह्यापुढे खोट बोलेन मी.
मुग्धा- नाही…तसं नाहीये.
तेजस- काय तसं नाहीये? मी खोट बोलू नये की तुला आवडलं नाही हे खोटं आहे?
मुग्धा काहीच रिप्लाय करत नाही.
तेजस- झोपलीस वाटतं. बाय.
मुग्धा- ……..
तेजस- ही कुठली लिपी आहे? मला वाचता येत नाहीये.
मुग्धा- काही नाही.
तेजस- सांग ना काय ते.
मुग्धा- तेजस आज मला खूप बर वाटलं. मी कदाचित हे परत सांगितल्याने तुम्हाला कंटाळा येईल. पण आज तुम्ही रोहितला दिलेली शिक्षा एक स्त्री म्हणून मला किती आनंद देऊन गेली ते मी शब्दात नाही सांगू शकत.
तेजस- तरीही मला कळलंय ते. जे आणि जसं तुला वाटतंय ते आणि तस्सच लक्षात आलंय माझ्या.
मुग्धा- ते कसं काय?
तेजस- तुझ्या किसच्या intensity वरून….
मुग्धा बेडवर झोपून chat करता करता लाजली. तिने रिप्लाय दिला नाही.
तेजस- काय झालं?
मुग्धा- काही नाही. गुड नाईट.
तेजस- गुड नाईट.
तेजसने दिवे बंद केले.
दुसऱ्या दिवशी तेजस त्याच्या केबिन मध्ये काम करत असताना राधिका तिथे आली.
राधिका- हाय तेजस. गुड मॉर्निंग.
तेजस- गुड मॉर्निंग राधिका. बोल.
राधिका- काल काय झालं? तू आणि मुग्धा अचानक कुठे गेलात?
तेजस- प्रशांतच्या वडिलांना जरा बरं वाटतं नव्हतं. म्हणून मी मुग्धा बरोबर गेलो. शेवटी मित्राचे वडील आहेत ना आणि आता प्रशांत पण नाहीये सो…
राधिका- हम्म…आणि आर्या कशी वाटली तुला?
तेजस- ओह…ती स्मार्ट आहे. हुशार आहे. She will go places.
राधिका- If you take her along.
तेजस- म्हणजे?
राधिका- म्हणजे तेजस मी काही दिवसांपूर्वी दांडेकर सरांना भेटायला गेले होते तुमच्या घरी. काही सह्या हव्या होत्या. तेव्हा ते म्हणाले मला की he is worried about your marriage. सर मला म्हणत होते की ओळखीत कोणी चांगली मुलगी असेल तर सांग आम्हाला. सो…
तेजस- सो तू अर्याला पीच करते आहेस का?
राधिका- तेजस प्लीज. आर्या माझी भाची आहे. मी तिला पीच वगैरे करत नाहीये. पण ती एक चांगली मुलगी आहे. म्हणून माझ्या मनात आलं. In fact मी आजच दांडेकर सरांना देखील सांगितलं की आर्या and you get along really well.
तेजस- ए राधिका हे का केलंस तू?
राधिका- (त्याच्या डोळ्यात बघत) तेजस, आर्या मला सगळं सांगते.
हे बोलताना तिने सगळं ह्या शब्दावर दिलेला जोर तेजसच्या लक्षात आला.
राधिका- एनी वे. आपल्या पुणे ब्रांच मध्ये एका एच आर एक्झीक्युटीव्हची गरज आहे. मी मुग्धाला तिथे पाठवते आहे.
तेजस- what?
राधिका- हो. काही महिन्यांचा प्रश्न आहे. आपल्या गेस्ट हाऊस मध्ये राहील. जेवणाची सोय तिथेच आहे. वरून तिला आउट स्टेशन अलाउन्स मिळेल. तेवढीच आर्थिक मदत पण होईल ना तिला?
तेजस- पण तिच्या मुलाचं काय? त्याची शाळा वगैरे?
राधिका- ते तिने बघावं. जमत नसेल तर दुसरी नोकरी बघावी. माझ्या नेटवर्क मध्ये मी तिला उद्या प्लेस करू शकते.
तेजस- मला हे पटत नाहीये राधिका.
राधिका- तेजस ती केवळ तुझ्या मित्राची बायको आहे म्हणून आपण corporate hr policy चेंज करणं कितपत योग्य ठरेल? आणि हे दांडेकर सरांच्या प्रिन्सिपल्सच्या विरोधात असेल. You know what i mean. any way. Have a good day ahead.
राधिका इतकं बोलून निघून गेली. तेजस वैतागला होता. इथे खाली लॉबी मध्ये मुग्धा लिफ्टच्या लायनीत उभी होती. इतक्यात सगळ्या सिक्युरिटी गार्डची लगबग सुरु झालेली तिच्या लक्षात आली. तिने वळून बघितलं तर दांडेकर काका इमारतीत शिरत होते. मुग्धा त्यांना दिसल्यावर ते थांबून तिच्याशी बोलले. ती आपल्याच ऑफिसात जात असलेली ऐकून त्यांनी तिला त्यांच्या बरोबर यायला सांगितलं.
लॉबीच्या मागच्या बाजूला असलेल्या दोन प्रशस्त लिफ्ट्स पैकी एका लिफ्टच दार धरून एक सिक्युरिटी गार्ड उभा होता. दांडेकर काकांना बघून त्याने कडक salute मारला. मुग्धा आणि काका लिफ्ट पर्यंत आले. काकांनी हाताने तिला पुढे जायची विनंती केली. मुग्धा लिफ्ट मध्ये आली. काका पण आत आले. लिफ्ट निघाली. मुग्धाला लिफ्टच्या बाहेर लिहिलेला Directors only हा बोर्ड आठवत होता. दांडेकर काका तिच्याकडे कौतुकाने बघत होते. “विधिलिखित” नावाची एक अदृश्य गोष्ट लिफ्टमध्ये लपून स्मित करत होती!!!!
क्रमश:
© मंदार जोग
पुढील भागाची लिंक- गुंतता हृदय….(भाग २३)
सर्व भाग एकत्र लिंक- गुंतता हृदय – सर्व भाग
