आम्ही आमच्या काका आणि आत्या बरोबर मिनर्व्हाला शोले पाहिला. सिनेमा अंगावर आला होता. फार काही कळत नव्हतं तेव्हा कारण वय खूप लहान होतं. पण काहीतरी भव्य दिव्य पाहिल्याचा अनुभव घेतला होता. त्यातील प्रत्येक पात्र मनात कोरल गेलं होतं. ठाकूर बिचारा, जय शांत आणि दिलदार, विरु मास्तीखोर, बसंती बडबडी, जेलर आणि सुरमा भोपाली विनोदी अशी वर्गवारी झालो होती मनात. पण मनात खोलवर रुतला होता क्रूरकर्मा गब्बर. दाढी वाढलेला, धातूचे दात असलेला, लहान मुलांना गोळी मारणारा, ठाकूरचे हात कलम करणारा, बसंतीला काचांवर नाचवणारा, डोक्यावर पन्नास हजारांच इनाम असलेला, आपण झोपलो नाही तर आई ज्याची भीती घालेल असा घोड्यावर स्वार झालेला बंदुकवाला दुष्ट गब्बर! पुढे शोलेची ऑडिओ कॅसेट लाखो वेळा ऐकली. सिनेमाचे संवाद आजही तोंडपाठ आहेत. मला प्रत्येक वेळी वाटायचं की गब्बर नसता तर ठाकूरचे हात आणि कुटुंब वाचले असते. जय हकनाक मेला नसता! तो सिनेमा होता आणि ही सलीम जावेदाची पात्र होती हे कळण्याचं वय नव्हतं ते. जे पडद्यावर दिसतं ते खरं वाटायचं!

पुढे मी बच्चन भक्त झालो. धर्मेंद्रचे अगदी अनिल शर्माने बनवलेले टुकार सिनेमे देखील माझ्यातील फिल्लमबाजाने बघितले. हेमा अनेक सिनेमात पाहिली. संजीव कुमार आपलं स्थान राखून होता आणि गब्बर करणारा अमजद खान पुढे सतत भेटत राहिला. शोले नंतर काही वर्षे मी अमुक सिनेमात अमिताभ, विनोद खन्ना, नितु सिंग आणि गब्बर सिंग आहे असं म्हणायचो. गब्बर अमजदची ओळख झाला होता काही वर्षे. ती भूमिका आणि तो सिनेमा इतके ओव्हर पावरिंग होते की त्यातून बाहेर पडण सामान्य नटाला सोपं नव्हतं. पण अमजद ने ते केलं. काही काळ ‘आणि गब्बर सिंग’ म्हणणारा मी ‘आणि अमजद खान’ म्हणू लागलो. त्याच्यातील नटाचा तो विजय होता असं मला वाटतं!

त्याचे इन्कार, मिस्टर नटवरलाल, परवरीश, सुहाग, नसीब, कसमे वादे, मुकद्दर का सिकंदर, कालिया, सत्ते पे सत्ता अश्या अनेक चित्रपटातील व्हिलन लक्षात राहतील असे तरीही वेगळे आहेत. त्यात गब्बर डोकावत नाही. लावरीस, याराना मधील भावुक भूमिकेत तो भाव खाऊन जातो. हम से बढकर कौन, कुर्बानी पासून अगदी दादा कोंडकेच्या अंधेरी रात में पर्यंत अनेक विनोदी भूमिका समरसून करतो. हे तर त्याच्या करकीर्दीतले काही उल्लेखनीय चित्रपट आहेत. नाहीतर त्याच्या चित्रपटांची लिस्ट खूप मोठी आहे. पण टाकाऊ चित्रपट असला तरी अमजद त्यात ठसा उमटवत होता. तो कोणत्याही भूमिकेत लोकांना खरा वाटत होता, आवडत होता. 

शोले त्याचा पहिला सिनेमा. शोले मध्ये तो आणि संजीव कुमार दोघेही तिशीत होते. तेव्हा कोणी म्हणालं असतं की संजीव कुमार अजून सात वर्षांनी जग सोडून जाईल आणि त्या नंतर दहा वर्षात अमजद पण जाईल तर कोणीच विश्वास ठेवला नसता. पण तेच झालं. संजीव कुमार १९८२ साली गेला अन्मइ आजच्या दिवशी १९९२ ला अमजद गेला. दुसऱ्या दिवशी तो गेल्याची बातमी पेपरात आली. जेमतेम पन्नाशी उलटल्यावर गेला तो. त्या आधी झालेल्या एका अपघाताने त्याच आयुष्य बदलून टाकलं! त्या नंतरचे त्याचे चित्रपट बघताना अपघातानंतर त्याचं वाढलेल वजन, चित्रपटात शर्टची बटणे उघडी टाकल्यावर छातीच्या मधोमध दिसणारी टाक्यांची खुण खूप काही सांगून जात असे त्याच्या तब्बेती बद्दल! कारण काहीही असो. त्याच्या जाण्याने सिनेसृष्टी एका चांगल्या कलाकाराला मुकली हे नक्की!

आजच्या तारखेला ब्याणऊ साली गेला तो. पण आजही टीव्हीवर शोले लागला की क्रूर हसत, हातात पिस्तुल धरून कालियाला कितने आदमी थे विचारणारा गब्बर बघून लहानपणी मनात दडलेली भीती परत डोकं वर काढते. मन आतून ओरडून ओरडून कालियाला सांगत असत “अरे गाढवा हसू नको. तो तुला मारणार आहे. पळ!” पण कालियाचं  प्रारब्ध सलीम जावेद नामक नियतीने फिक्स केलेलं असतं. कालिया प्रत्येक वेळी “दोन” हे उत्तर देऊन मरतो. पण गब्बर मात्र अजूनही मनात “गब्बर के ताप से एक ही आदमी बचा सकता है, खुद गब्बर” म्हणत जिवंत असतो. अमजद सोडून जाऊन चौतीस वर्षे झाली तरी, “कितने आदमी थे?” विचारणारा गब्बर आज भी जिंदा है!©मंदार जोग

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. MandarJOG.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!