फार जुनी गोष्ट नाही…काही वर्षांपूर्वीची आहे. एक नगर होतं..अगदी गोष्टीत असतं तसं आटपाट नगर. गिरगाव त्याचं नाव. तिथे छोटी छोटी घर, दोन किंवा तीन मजल्याच्या चाळी, एका चाळीत कमीत कमी ५० ते २०० पर्यंत लहानश्या खोल्या त्या लहानश्या खोल्यांमधून दाटीवाटीने वसलेले आनंदी संसार. अश्याच एक खोलीत आम्ही राहायचो!
पहाटे घराघरातून नळ आले की बादल्यांचा खडखडाट सुरु होई आणि चाळ जागी होई. शेजारच्या परांजप्यांच्या बंबात जळत असलेल्या लाकडाच्या वासाने आसमंत भरलेला असे. बालाजी मंदिरात सहाचा टोला वाजला की सुरु होणाऱ्या मृदंग आणि पिपाणी सारख्या दक्षिणी वाद्याच्या आवाजाने वातावरण मंगल झालेले असे. घरात दात घासून झाले की “डबा” घेऊन मंडळी मजल्यावरच्या “नळावर” निसर्गाच्या सगळ्या हाकांना “ओ” द्यायला जायची. इथे सार्वजनिक जीवन, तडजोड, अडलेल्या नडलेल्याला मदत करणे, एकमेका साहाय्य करू आणि सर्वात महत्वाची म्हणजे मनावर आणि इंद्रियांवर ताबा ठेवणे अश्या गोष्टी “अनुभवातून” शिकायला मिळायच्या. आपला “नंबर” लागेपर्यंत वाट पाहताना “लायनीत” असलेल्या समदु:खी चाळबांधवांबरोबर होणाऱ्या विविध विषयांवरील गप्पा “घाई” विसरायला कामी यायच्या. ती मजा ज्यांनी अनुभवली आहे त्यांना आता सतत दिमतीला हजर असलेल्या जेट स्प्रेवाल्या कमोडचे कौतुक कधीच वाटणार नाही.
तर दिवसाची अशी रम्य सुरुवात करून घरी परत येई पर्यंत आकाशवाणीवर सुधा नरवणे बातम्या द्यायला सुरुवात करायच्या. पत्र्याचं बुच असलेल्या दुधाच्या बाटलीमधून पातेल्यात ओतलेलं दुध आई गरम करत असायची. अनेक शेजार्यांच्या घरातून सुरु असलेल्या पूजेदरम्यान वाजवलेल्या शंखाचा आणि घंटांचा नाद मन प्रसन्न करायचा. अंघोळ करून दुध पोळी खाऊन होईपर्यंत शांतीची “मंदार” अशी हाक यायची आणि आम्ही पाठीवर दप्तर अडकवून शाळेत जायचो. खाली उतरताना नेमका वासुदेव भेटायचा. त्याचं गाणं ऐकत चाळीतून बाहेर पडायचो. त्या वेळी चाळीत विविध पात्र यायची. किनऱ्या आवाजात ओरडणारा काल्हैवाला, मला “राजा का राजा” म्हणणारा गुरखा, “उदबत्ती, रुचिरा पुस्तक, पंचांग” विकणारा अर्ध्या चड्डी मधला मुरली, “जुनाबार” डाळींब विकणारा एक चकणा फळवाला, दुधाच्या बाटल्या पोचवणारा धाक्रस, आलेपाक आणि लाह्या विकणारा एक ब्राह्मण तरुण मुलगा, शर्टवर जाकीट घालणारा आणि वर तिरकी टोपी घालणारा एक चीक्कीवाला, चाकू सूऱ्यानं धार काढून देणारा, धनुकलीचा टर्र टर्र आवाज करून आपल्या आगमनाची वर्दी देणारा कापूस पिंज्या आणि सर्वात महत्वाच्या म्हणजे दुपारी चाळीतील समस्त महिलावर्गाचा जिव्हाळ्याचा, मन रमवायचा आणि आनंदाचा कार्यक्रम तितक्याच आनंदाने न रागावता किंवा कंटाळता पार पडणाऱ्या “बोहारणी”. ह्या अश्या एकेका पत्राच्या आगमनाने चाळ नेहेमी गजबजलेली असायची. ह्या गजबजाटात कोणाकडेही येणारी पै पाव्हणी सहज खपून जायची.
शाळेत पण मजा होती. अनेक मित्र मैत्रिणींचे आई वडील माझ्या बाबांचे मित्र होते. शिक्षकपण खूप साधे, हुशार आणि मुख्य म्हणजे आम्ही शिकावं ह्याची मनापासून तळमळ असणारे आणि आम्हाला घडवणारे होते. ह्या सर्वाचा परिणाम म्हणून की काय पण शाळा म्हणजे आम्हाला दुसरं घरच वाटायची. शाळेत जाण म्हणजे एक वेगळीच मौज असायची. एखादवेळी शिक्षकांनी मारलेला धपाटा देखील आई बाबांकडून खाल्लेल्या अनेक धपाट्यानपैकीच एक वाटायचा. शाळा म्हणजे अभ्यास आणि मस्ती इतकंच कळत होतं. एखाद दिवशी डबा न नेता कॅंटीनमध्ये वडापाव खाण्यात स्वर्गसुख होतं. जीरा गोळ्या, पेप्सीकोला आणि कुरकुरीत नळ्या पंचतारांकित हॉटेलातील ७ कोर्स डिनरचा आनंद देत होती. साध्या, सात्विक, समाधानी आणि प्रसन्न वातावरणात एक पिढी घडत होती.
शाळेतून मळून घरी आलं की सर्वात आधी गृहपाठ करून टाकायचा ह्या छोट्याश्या सवयीमुळे आज देखील क्रिटीकल कामं लगेच संपवायची मानसिकता तयार झाली आहे. हातपाय धुवून कपडे बदलले की उपमा, शिरा, पोहे, उकड, खिचडी, घावन, आंबोळी किंवा हमखास कामी येणारी शिकरण पोळी खाल्ली की चाळीतल्या मित्रांबरोबर मनसोक्त उधळायच. लपंडाव, वि षामृत, चोर पोलिस, पकडापकडी पासून गोट्या, व्यापार, बुद्धिबळ, कॅरम, चाळीच्या चौकातल क्रिकेट ह्यापैकी काहीही खेळायचं. संध्याकाळी चाळीतील “श्रीमंत” कुटुंबांकडे असलेल्या मोजक्या संचातून ऐकू येणाऱ्या दूरदर्शनच्या ओळखीच्या सिग्नेचर ट्यून बरोबरच आईची हाक यायची आणि पोरांची पावलं घराकडे वळायची. बायाबापड्या गच्चीवर टाकलेली वाळवणं खाली आणत असायच्या. बाबा घरी आलेले असायचे. त्या वयात सर्वच मुलांना बाबा हिरो वाटायचे आणि त्यांचा दरारा पण वाटायचा. आईने “बाबांना सांगीन” म्हणणे म्हणजे आपल्या व्रात्यपणाची केस सुप्रीम कोर्टात गेल्यासारखं वाटायचं. पटपट हातपाय धुवून, पर्वचा आणि उजळणी म्हणून जेवण उरकायचे आणि शेजार्यांच्या घरातील टीव्ही वर छायागीत, फुल खिले है गुलशन गुलशन असे कार्यक्रम पाहायला हक्काने आणि दाटीवाटीने त्यांच्या घरात बसायचे हा समस्त चाळकर्यांचा शिरस्ता होता. ही सवय इतकी रुळली होती की नंतर घरोघरी टीव्ही आल्यावर त्या जुन्या टीव्हीवाल्यांना लोक आपल्याकडे न आल्याने टीव्ही पाहताना चुकल्याचुकल्यासारखे वाटायचे! त्या छोट्या खोल्यांमधून राहणाऱ्या लोकांची मन मात्र खरच मोठी होती. त्यात सर्वाना जागा होती.
चाळीत जिन्याजवळ म्हाताऱ्या आज्यांच्या गप्पा रंगायच्या, जिन्याखाली आणि गच्चीच्या वळचणीला प्रेमी युगुल आणाभाका घ्यायची, टाकीच्या मागे पोर जुगार खेळायची आणि बिड्या ओढायचा श्रीगणेशा करायची, नळावर बायकांची भांडणं व्हायची, कठड्यावरून एक पाय बाहेर टाकून उभे राहून पट्टेरी लेंगा आणि गंजीफ्रोक घातलेले पाध्ये काका दात घासून खालीच थुंकत, ती थुंकी नेमकी जोश्यांच्या तुळशीच्या झाडावर नेम घेतल्यासारखी पडे आणि मग पहिल्या मजल्याच्या कठड्यावरून डोकं बाहेर काढून जोशीकाका पाध्यांच्या सात पिढ्यांचा उद्धार करत आणि पाध्ये काका तोंडात परत तोबरा जमा झाल्याने हातवारे करत फक्त त्यांनाच समजेल असे काहीतरी बोलत. समस्त चाळकर्यांचा तो मस्त विरंगुळा होता. चाळीतील प्रत्येक खोली म्हणजे त्या त्या कुटुंबाचं किचन आणि बेडरूम होती आणि प्रत्येकाची लिव्हिंग रूम अक्खी चाळ होती! त्या छोट्याश्या जगात देखील प्रत्येकाला प्रायव्हसी होती, स्वतःची हक्काची जागा होती.
तरीही त्या वातावरणात अर्ध आयुष्य “सार्वजनिक” होतं. आपल्या खोलीत बोललेलं, हसलेलं आणि रडलेलं देखील शेजार्यांना ऐकू जात असे. त्यामुळे जो जसा आहे तसा शेजार्यांना माहिती होतां आणि मान्य देखील होतां. तिथे आज सोसायट्यांमध्ये लागतात तसे बुरखे पांघरायची गरज नव्हती. अश्या सार्वजनिक वातावरणात प्रत्येक सणाला देखील सार्वजनिक स्वरूप होतं. मग ते चाळीच्या गणपतीमध्ये देवे म्हणताना वरचढ लावलेले सूर असोत, सत्यनारायणाची पूजा असो, दिवाळीमध्ये केलेली फराळाची देवाणघेवाण असो की कौलावर धावून पकडलेले पतंग असोत…सगळे सण सार्वजनिक सोहोळे असत.
ह्या सुंदर वातावरणात वाढलेली, गिरगावचा सुवर्णकाळ अनुभवलेली आणि त्याचा आनंद घेतलेली आमची बहुधा शेवटची पिढी. पूर्वी एका खोलीत दहा जण असून देखील चार पाळणे हलवलेल्या पिढीच्या संतानांना घरातील आई वडिलांची देखील अडचण वाटू लागली, डबा घेऊन सार्वजनिक संडासात जायची लाज वाटू लागली, दरवाज्यात उभं राहिला की समोरच्या खिडकीतून पलीकडच्या चाळीचे होणारे आरपार दर्शन प्रायव्हसीला मारक ठरू लागले, घरगल्ल्या गटार वाटू लागल्या, चाळीत राहणे LS वाटू लागले आणि त्या नगराला दृष्ट लागली. अनेक कुटुंबे स्थलांतरित झाली. ही एके काळची सोन्याची लंका बिल्डर नावाच्या रावणाच्या डोळ्यात भरली. मग? मग जे व्हायचे तेच झाले. आता गिरगावात उरल्या आहेत त्या आठवणी, काही जुने चेहेरे आणि पडण्याची वाट पाहणाऱ्या काही जीर्ण चाळी!!!!
आमचं एक आटपाट नगर होतं….गिरगाव नावाचं!!!!

आत्ताच एक होतं आटपाट नगर वाचलं. नव्वद टक्के गोष्टी आमच्यावेळी पण होत्या. दूरदर्शन नव्हतं. खूप उशिरा आलं आणि फोन कॉलेजमध्ये असताना आला. त्यावर शेजारच्यांना फोन यायचे. दिवाळीला आमच्या चाळीत फटाके उडवायची खूप मजा यायची. सर्वात आधी कोण फटाका लावणार यावर बेट लागायची. त्यावेळी चिडी हा फटाका खूप प्रसिद्ध होता. ती कुठेही घरात घुसायची.त्यामुळे मारामाऱ्या पण व्हायच्या. गोविंदा,होळी,मंगळागौर हे सण पण जोरदार व्हायचे.आतचत सारखं खेळ खेळायला कोणाला बोलवावं नाही लागायचं. गणपतीचे दहा दिवस तर गच्चीतच जायचे. रात्री कार्यक्रम आणि प्रोजेक्टर लावून दोन्ही बाजूने बसून बघितलेले सिनेमे अजून आठवतात. गच्चीत टाकलेली वाळवणं ओल्या पापड्या, बटाटा पापड ओला मस्त लागायचा. वाळवणं टाकायला मदत केली की पापडाच्या लाट्या मिळायच्या खायला. खप आठवणी आहेत.