काल रात्रीची गोष्ट. मी गाढ झोपेत होतो. पहाटे चारची वेळ असावी. अचानक भूकंपांचे धक्के जाणवू लागले. ते इतके तीव्र होते की आमची सबंध इमारत गदागदा हलत होती. मी बायकोला जागे केले. घरात आम्ही दोघेच. धक्के अधीक तीव्र झाले. आम्ही दोघे त्या धक्यानी जागच्या जागी उडत होतो. आश्चर्य वाटत होते की इतके धक्के बसून अजुन इमारत उभी कशी राहू शकते. ती केव्हाही कोसळेल हे निश्चित होते. आता एकत्रच जायचे म्हणून मी बायकोचा हात घट्ट धरून ठेवला आणि डोळे मिटले!
अचानक बायको पुरुषी आवाजात माझ्या कानाशी “भिवंडी बायपास, कल्याण फाटा” असे ओरडल्याने मला भूकंपापेक्षा जास्त भीती वाटली. मी घाबरून डोळे उघडले तर समोर आमच्या “एसी स्लीपर बस” नामक भयप्रद बसचा तोंडात मावा ठासलेला क्लीनर प्रवाश्यांना त्यांचे ठिकाण आल्याचे सांगायची त्याची ड्यूटी बजावत होता. त्याच्यामुळे मी जागा होऊन भयानक स्वप्नातून भयानक वास्तवात परत आलो. कसारा नामक एका गावात बस थांबल्यावर चहा पिऊन मला लागलेली तासाभराची अमूल्य झोप मोडली!
कामानिमित्त मला अचानक धुळे नामक गावी जावे लागले. तिथे विमानतळ नसल्याने ट्रेन किंवा बस हेच पर्याय उपलब्ध होते. ट्रेन ने तत्काल, वेटिंग लिस्ट नामक बेभरोशी नावे तोंडावर फेकल्याने बस हाच एक पर्याय उरला. त्यातही स्लीपर बस नामक एक टेम्पटिंग पर्याय समजला. ऑफिसने तिकिटे काढली. बुधवारी रात्री मी बस पकडली. बस साधी डबडा प्रकारची. वॉल्वो नाही. पण बाहेरून आकर्षक सजवलेली! बसमध्ये चालायला तीन फुट रुंदीची जागा. बाकी दोन्ही बाजू पडद्याने झाकलेल्या. त्यातही लोअर आणि अपर बर्थ! त्यातही एका बाजूला दोन लोक झोपणार आणि एका बाजूला एक! मला एकट्याचा अपर बर्थ मिळाला! वर चढल्यावर लक्षात आले की तिथे झोपूनच रहावे लागते. बसायचा प्रयत्न केल्यास डोके छताला टेकते. ते पण मान अवघडून बसणे जमल्यास! गुन्हेगारांना ठेवण्यात येणारे अंडासेल असेच काहीसे असेल का? असा प्रश्न मनात येउन गेला! मग झक मारत आडवा झालो. गाडी सुरु झाली. अचानक कानात थंड हवा घुसु लागली. एसीचा ब्लोअर कानापासून तीन इंचानवर होता!!! तो जेमतेम बंद केला. रात्री नउला सुरु झालेला प्रवास सकाळी सहला संपला. मी त्यात टप्प्या टप्प्यात जेमतेम दोन तास झोपलो असेन! काल ट्रिप यशस्वी झाल्याने आनंदात होतो! रात्री परत तीच “एसी स्लीपर बस!”
ह्यावेळी परत वरचा बर्थ. त्यातून डबल ऑक्यूपंसीचा. म्हणजे रात्र एखाद्या “परपुरुषाच्या” अगदी मिठीत नाही तरी सानिध्यात काढणे आलेच! मी नव्या नवरी सारखी पडद्याआडून त्या पुरुषाची वाट पहात होतो. मनात एक अनामिक हुरहुर होती. कोण बर असेल तो? रात्र कशी जाईल? त्याने अंघोळ केली असेल का? तो गुटखा वगैरे तर खात नसेल? तो झोपेत पादत किंवा घोरत तर नसेल? त्याला खरूज, नायटा असे त्वचाविकार किंवा अन्य संसर्गजन्य रोग नसतील ना? त्याच्या कपड्यात ढेकूण, गोचिडि नसतील ना? तो कुठलेतरी उग्र वासाचे अत्तर चोपडून तर नाहीना येणार? अश्या प्रश्नांचे काहूर माजले होते!
इतक्यात एक गोड, गोंडस आठ दहा वर्षांचा मुलगा शिडीवरुन वर चढला. मला आनंद झाला. हा स्वच्छ मुलगा शेजारी झोपायला माझी हरकत नव्हती. मी त्याला जागा करून दिली. बस सुटायच्या आधी त्याचा कळकट बापही वर आला. ते दोघेही तिथेच झोपणार ह्याचा मला साक्षात्कार झाला!!! हाय रे दैवा. मुलगा ट्रेलर म्हणून दाखवून खरा चित्रपट रामसेचा हॉरर होता! मी आपल्या बेडची सीमा राखत शांतपणे आडवा पडून राहीलो. ते दोघे उग्र वासाचे काहीतरी तिथेच जेवले. मी शक्य तितका वेळ नाकही बंद ठेवायचा प्रयत्न केला.
ते दोघेही खिडकीच्या बाजूच्या त्यांच्या टेरिटरित मस्त झोपले. हळूच माझ्या भागात घुसखोरीहि सुरु होती. मी जवळजवळ बसच्या मधोमध आडवा तरंगत होतो. बसच्या प्रत्येक वळणाबरोबर घरंगळत आणि प्रत्येक खड्डा तसेच स्पीड ब्रेकर बरोबर उडत होतो. तो असह्य प्रवास संपायची वाट पहात टक्क जागा होतो. बस कसारा नामक ठिकाणी थांबल्यावर चहा प्यायलो. जरा तासभर झोप लागली. तीही इतकी गाढ असावी की कधीच स्वप्न न पडणाऱ्या मला स्वप्न पडले. त्यातही बस होतीच, भूकंपाच्या धक्यांच्या रूपाने. म्हणजे ते स्वप्नही पूर्ण स्वप्न नव्हते. स्वप्नात मी घरात झोपलो होतो पण बसचे खरे धक्के मला स्वप्नात भूकंपाचे वाटत होते. इतक्यात क्लीनरच्या भिवंडी बायपास आरोळीने जागे केले. मग चार तास बसच्या मोशनप्रमाणे गरगर घरंगळत कसाबसा मुंबईला पोहोचलो!
लोकांना ह्या स्लीपर बस नामक वाहनात झोप कशी लागते तेच कळत नाही. वादळात सापडलेल्या नौकेतील सामान जसे नावेच्या हेलकाव्यानुसार घरंगळत असते तशी काहीशी अवस्था असते आपली. निदान अपर बर्थवर तरी! असो तो प्रवास संपला. काही अनुभव देऊन गेला! ह्यापुढे रात्रभर बसून प्रवास परवडला पण अश्या त्रिशंकु अवस्थेत एसी स्लीपर म्हणजे a strict no no!
