आईबाबांची एकुलती एक. लाडात वाढलेली. मोठ्या बंगल्यात, श्रीमंतीत बालपण गेल. शिक्षणात फारशी गती नव्हती. जेमतेम बीए झाली. दिसायला सुंदर पेक्षा जास्त आकर्षक म्हणता येईल अशी. वयाची अठ्ठाविशी कधी गाठली ते तिलाही कळले नाही. मग आईवडिलांनी स्थळे पहायला सुरुवात केली. पोरीच नशीब काय खराब होत देवजाणे पण पाच वर्षात पन्नासच्या वर स्थळे पाहुनही कुठेही जमले नाही. लग्नाला आसुसलेल्या तिच्या मनाने, शरीराने आता नियतीच्या निर्णयला कुठेतरी स्वीकारल होत. सर्व व्यवस्थित असूनही लग्नाच्या बाजारात न खपलेल्या तेहतीशीच्या आपल्या “बाळासाठी” म्हाताऱ्या आईवडिलांचा जीव रोज तुटत होता. एक दिवस तो कायमचा तुटला. पंधरा दिवसांच्या अंतराने दोघेही अचानक गेले. हिला आणि त्या बंगल्याला मागे ठेवून!
दोन वर्ष अशीच उडून गेली. बंगला हीच्या नावावर झाला. मग एक बिल्डर आला. पुनर्विकासाचे प्रपोजल घेऊन. हिला बंगल्याच्या समोरील इमारतीत तात्पुरती रहायची जागा दिली. करार, कागदपत्र होऊन महिन्याभरात बंगला जमीनदोस्त झाला. ती रोज खिडकीतून समोर उजाड़ झालेली जागा बघत असे. हळूहळू तिथे एक एक स्लॅब पडत गेल्या. सात मजल्याची इमारत उभी राहीली. हिला टॉप फ्लोर मिळणार होता. इमारतीची रंग रंगोटी झाली, लाद्या, काचा, लिफ्ट, पाण्याच्या टाक्या सगळे लाउन झाले. बिल्डिंग ऑक्यूपंसी साठी तयार झाली! ती मनातून खुश होती!
इतक्यात काय माशी शिंकली कुणास ठावूक. सरकारी यंत्राणांनी इमारतीवर स्टे आणला. प्रकरण कोर्टात गेले. महीने पटापट सरकत गेले, त्याची दोन वर्ष झाली. कोर्टात जाऊन जाऊन बिल्डर गांजून गेला. त्या धसक्याने तो वारला. बिल्डिंग तशीच उभी होती…अनोक्यूपाइड! हळूहळू इमारतीकडे दुर्लक्ष होऊ लागले. कम्पाउंड वॉल फांदून कुत्री आणि बकऱ्या आता माजलेल्या गवतात हिंडू लागले. खिडक्यांची तावदाने पोरांच्या दगडांनी आणि चेंडूंनी फुटली, त्यातून आत शिरणाऱ्या कबूतरांनी इमारतीचे खुराडे करून टाकले. रात्री अपरात्री क्वचित दिवसासुद्धा गर्दुल्ले तिथे बसून मस्त जॉइंट मारू लागले. फेंसिंग वॉल थोडी ढासळली.
ती रोज हे खिडकीतून बघत होती…..आरशात बघितल्यासारखी!! ती इमारत म्हणजे हिला आरसाच वाटे. हिच्यासारखीच सर्व नीट, छान असूनही दुर्दैवी ठरलेली वास्तू. त्या इमारतीत शिरणारे गर्दुल्ले आणि कुत्री बघुन हिला तिच्या परिस्थितिचा फायदा घेत, कधी सहानुभूती दाखवत, कधी प्रेम जतवत हीच्या आयुष्यात घुसून हिला ओरबाडलेले पुरुष आठवत. गरज हिची होती आणि त्यांचीही. फ़क्त त्यात घूसखोरी होती. ऑक्यूपंसी नाही…त्या इमारतीसारखीच!
त्या इमारतीचे उडलेले रंग, गेलेली रया हिला तिच्या उतरु लागलेल्या तारुण्याची आणि त्याबरोबर उतरत असलेल्या आशा आकांक्षा ह्यांची आठवण करून देत. इमारतीच्या फुटलेल्या खिडक्या, तिच्या अनेकदा ठोकरल्या गेलेल्या मनासारख्या भासत! कबूतरानी इमारतीचे केलेले खुराडे तिला तिच्या मनातील भावनांच्या कोंडवाड्याची आठवण करून देत.
आता प्रकरण इतके हाताबाहेर गेले होते की त्या इमारतीत कोणीही येऊन रहाणे अशक्य होते…..हीच्या आयुष्यासारखे…इमारत रोज उन, पाऊस झेलत आपल्या नाशिबाला दोष देत उभी होती…पण आतून खचली होती…हिच्यासारखी!
आज पाऊस जोरात पडत होता. ही खिडकित बसून इमारतीकडे पहात होती. इमारत विजांच्या प्रकाशात न्हाऊन निघत होती! पावसाचा मारा सहन करत अगदीच अगतिक वाटत होती! अचानक तिला काय झाले कुणास ठावूक. ती उठली. घरातून बाहेर पडली. पावसात भिजत, चालत रस्ता ओलांडून त्या इमारतीत शिरली. तुरळक कुत्री उगाच भूंकली, काही कबूतरे आणि वटवाघुळे फडफड करून उडून गेली. ही काळोखात पायऱ्या चढत वर जाऊ लागली. इमरतीच्या गच्चीत पोहोचल्यावर जोरात वाहणारा वारा आणि अंगावर मार देणारा पाऊस तिची वाट पहात होते. ती शांतपणे जमिनीवर बसली. हातातील ब्लेडने तिने दुसऱ्या हाताची नस कापून टाकली. ती जमिनीवर निपचित आडवी झाली. जणू त्या इमारतीच्या कुशीत शिरावी. तिच्या हातातून वाहणारे रक्त पाईपातून खाली जाऊन त्या वास्तूच्या मातीत मुरले. अचानक ती अनोक्यूपाइड इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी खाली कोसळली….आपल्या अंगावर आपल्यासारख्याच अनोक्यूपाइड असलेल्या तिचे कलेवर घेऊन!
