मुग्धा कामाला लागली. पण मन कामात नव्हत. काहीतरी सल, काहीतरी चुकत असल्याचे विचार मनात येत होते. पण मग रोहित बोलला ते आठवून आपला न जाण्याचा निर्णयच योग्य आहे हे स्वतःला समजावून ती पटापट आवरत होती. मुग्धाला प्रशांत जायच्या आधी घरात काम करताना रेडीओ लावायची सवय होती. रेडीओ वर एका मागे एक कार्यक्रम, गाणी सुरु असत आणि ते ऐकत ऐकत मुग्धा तिची काम संपवत असे. प्रशांत गेल्यावर मात्र तो लहानसा रेडीओ किचनच्या खिडकीत तसाच पडून होता. मुग्धाच त्या रेडीओ कडे आज लक्ष गेल. तिने पुढे होऊन रेडीओ उचलला. एका कापडाने त्यावर जमलेली धूळ पुसली आणि रेडीओ सुरु करून खिडकीत परत ठेवला. तिचा हात झपाझप चालत होता. रुटीन सुरु झालं होतं. ती स्वतःला त्यात गुंतवून ठेवायचा प्रयत्न करत होती.
ऑफिसात तेजस कामात व्यग्र होता. समोर येणारी एक एक कामं हातावेगळी करत होता. हा मात्र तेजसचा एक चांगला गुण होता. एकदा कामात लक्ष लागलं की त्याला इतर काही आठवत नसे. आजचा दिवसही त्याला अपवाद नव्हता. तेजस कामात व्यग्र होता. इतक्यात राधिका आली. तेजसला बघून म्हणाली-
राधिका- हाय तेजस. बिझी डे दिसतोय आज.
तेजस- हाय राधिका. हो खास बिझी as such नाही. पण नॉर्मल डे. तुझं काय सुरु आहे? आपला campus drive कसा झाला? किती ऑफर्स गेल्या? We need to ramp up as soon as we can.
राधिका- सोळा ऑफर्स रोल आउट केल्या.
तेजस- बास? फक्त सोळा?
राधिका- हम्म…मला हल्लीच्या मुलाचं कळतंच नाही. इंटरव्ह्यू मध्ये तोंड उघडून चार वाक्य नीट बोलू शकत नाहीत. पण स्टार्ट salary मात्र a claas पाहिजे. ह्यांना जरी अपेक्षित salary देऊन हायर केलं ना तरी ते industry मध्ये तग धरत नाहीत. मुळात हल्ली education ची क्वालिटी इतकी खराब झाली आहे की सगळंच कठीण आहे.
तेजस- पण त्यामुळे मी माझं प्रोजेक्ट delay नाही ना करू शकत. तुम्ही चंद्रावरून रिसोर्स आणा. पण मला रिसोर्स पाहिजेत. भले जास्त पैसे द्या. मी कॉस्टिंग मध्ये तेवढा कुशन ठेवला आहे. मला नवीन बजेट दे हव तर.
राधिका- तेजस ते काम आधीच सुरु केलंय. रिसोर्स वेळेत जॉईन होतील. ती जबाबदारी माझी.
तेजस- मला हेच आवडतं तुझं. never say no attitude.
राधिका- तेजस तुझ्या कंपनीची काळजी घ्यायला आम्ही सगळे आहोत. पण तुझ्या पर्सनल लाईफची काळजी कोण घेणार? मला तुझ्या आई पण हे बोलून दाखवत होत्या. they both are concerned about your marriage. सॉरी मी हे personal space मध्ये बोलते आहे. पण जे आहे ते आहे.
तेजस- hey sorry काय? तुझे आणि माझे संबंध आहेत इतके की तू personal advise देऊ शकतेस मला.
तेजस उठून उभा राहिला. विचार करत बोलू लागला.
तेजस- राधिका मला माहिती आहे की मी लग्न करण माझ्या आणि माझ्या parents च्या दृष्टीने देखील किती महत्वाच आहे. पण you know what my medical condition was a few months ago. मग माझ्याच जीवाची शाश्वती नसताना मी एखाद्या मुलीला माझ्या आयुष्यात आणून तिचं आयुष्य बरबाद का करू अस मला वाटत होतं. आणि हे माहित असताना लग्नाला तयार होणारी मुलगी ९९% वेळा माझ्या पैशांसाठी माझ्याशी लग्न करणारी असती. so….
राधिका- i know तेजस. पण मी हार्ट transplant नंतर बोलते आहे. आता काय हरकत आहे?
तेजस- काहीच नाही. पण आता जे हार्ट आहे ना त्याचे ठोके वाढवणारी कोणीतरी भेटायला तर हवी.
राधिका- हम्म….डोळे उघडे ठेवलेस तर दिसेल देखील एखादी.
तेजस- डोळे फक्त उघडे नाही ताणून बघतोय. पण ठोके अजूनही नॉर्मल आहेत.
राधिका- (थोडा विचार करून) तेजस मी बघू का एखादी तुझे ठोके वाढवणारी आढळली तर?
तेजस- तू? तू काय आता matrimony service सुरु करणार?
राधिका- आमच्या कंपनीला मालकीण मिळत असेल तर मी ते सुद्धा करेन.
तेजस- पण माझं नवीन हृदय अस सहज स्वतःचे ठोके वाढू देत नाही. फार फार choosy आहे ते.
राधिका- एखाद्या पदासाठी योग्य व्यक्ती मिळेपर्यंत राधिका गप्प बसत नाही हे तुला माहीतच आहे तेजस.
तेजस- okay. शोध ना मग एखादी. बघू तुझा choice माझ्या choice पेक्षा चांगला आहे की नाही ते.
तेवढ्यात राधिकाला फोन आला.
राधिका- येस कार्तिक…आलेच मी. (फोन ठेऊन) मिटिंग आहे. पण its a deal तेजस.
तेजस- yes it is.
राधिका गेली. तेजस स्वतःशी म्हणाला-
तेजस- (फोनमध्ये मुग्धाचा फोटो बघत) राधिका, माझा choice खूप मस्त असला तरी सोपा नाहीये. किंवा तो सोपा नाहीये म्हणूनच छान आहे. मी वाट बघेन.
तेजस परत काम करू लागला. इथे मुग्धाच्या घरी अमेय शाळेतून आला होता. त्याला जेवायला घालून, त्याचा होमवर्क घेऊन मुग्धाने त्याला झोपवला. सगळी काम उरकून मुग्धा सोफ्यावर डोळे मिटून बसली. तिला सकाळचा प्रसंग आठवला. तिने तेजसला पाठवलेला मेसेज आठवला. तिने नकळत फोन हातात घेतला. तेजसचं ओके हे उत्तर वाचल. तिला स्वतःचाच राग आला. ती स्वतःला म्हणाली “ह्या सर्वात तेजसची काय चूक? तेजस चांगला माणूस आहे. इतका श्रीमंत असून इतका down to earth आहे. मग त्याच्याशी माझं हे वागण योग्य आहे का? तो इतका चांगला वागला आहे पण मी अस तोडून टाकण आणि ते पण अश्या पद्धतीने योग्य आहे का? आणि मी आजचा मेसेज पाठवल्यावर तेजसने एका शब्दाने का विचारलं नाही. फक्त ओके म्हणाला. ह्याच जागी रोहित असता तर? पण रोहित आणि तेजसची तुलना का करते आहे मी? काय संबंध रोहितचा?” मुग्धाच्या मनात विचारांचं काहूर सुरु होतं. ती स्वतःला म्हणाली “माझ्या मनात जे विचार आले ती माझी चूक आहे. तेजस ने तर निखळ मैत्री जपली आहे. मग माझ्या चुकीसाठी मी त्याला अस वागवण कितपत योग्य आहे? आमची दोघांची निखळ मैत्री नाही का होऊ शकत?” मुग्धा तिच्याच विचारात हरवली होती.
राधिका मिटिंग संपवून तिच्या केबिन मध्ये आली. काही मेसेजीसना रिप्लाय केल्यावर तिने एक फोन लावला. फोन आर्या ने उचलला.
आर्या- बोल मावशी.
राधिका- कुठे आहेस आर्या?
आर्या- कुठे म्हणजे? आज exhibition चा शेवटचा दिवस आहे ना? सो gallery मधेच आहे. का ग? dont tell me की तू माझं exhibition बघायला येणार आहेस.
राधिका- हो मी येणार आहे आणि तुला डिनरला नेणार आहे.
आर्या- अरे वा. आज इतकी मेहेरबानी का बर?
राधिका- मला wine प्यायला कंपनी हवी आहे म्हणून. देणार ना कंपनी?
आर्या- नक्कीच. ह्या चार दिवसांच्या hectic exhibition नंतर मावशी wine पाजत असेल तर त्याहून मोठ सुख काय असू शकेल? ये तू. आपण जाऊ.
राधिकाने फोन कट केला. आर्या तिला डोळ्यासमोर दिसत होती. राधिकाच्या सख्ख्या बहिणीची एकुलती एक मुलगी. आई वडिलांच्या इच्छेखातर इंजिनियर झाली. परदेशात जाऊन mba करून आली. मग वडिलांनी त्यांच्या बिझनेस मध्ये लक्ष घालायला सांगितल्यावर मात्र “मी आजवर तुमच्या आनंदासाठी जगले. तुम्हाला जे जे हव होत ते सर्व मी केलं. आता पुढे मला माझं आयुष्य माझ्या आवडीने जगू द्या.” अस म्हणून स्कल्पचर artist म्हणून तिने सुरुवात केली. काही वर्षात top च्या स्कल्पचर artist मध्ये तिचं नाव घेतलं जाऊ लागलं. दोन तीन महिने काम करून भरपूर पैसे कमावून ती महिनाभर हिमालयात किंवा परदेशात गुल होत असे. सगळ्या जगाशी सर्व संबंध तोडून. मग अचानक उगवत असे. राधिकाच्या बहिणीला तिची काळजी लागली होती. लग्नाचं वय उलटून जात होत. पण आर्या लग्न बिग्न ह्या गोष्टीला तयार नव्हती. आज राधिका तिला तयार करून काही दिवसातच तेजसच्या हृदयाचे ठोके वाढवण्यासाठी तिची त्याच्याशी ओळख करून देणार होती. राधिका स्वतःवर खुश होती. तिने तिच्या दृष्टीने एक ओपन असलेली vacancy fill केली होती.
मुग्धाच्या डोक्यातील विचारांचं वादळ आता खूप शांत झालं होत. तिने एक निर्णय घेतला होता. तिने तेजसला फोन लावला.
तेजस- बोल मुग्धा.
मुग्धा- तेजस i am sorry….i mean…
तेजस- its okay. तुला इच्छा नाही ना? मग आपण ह्यापुढे नको भेटूया. मला राग अजिबात नाही. आणि मैत्री मनापासून नसेल तर त्या मैत्रीला काहीच अर्थ नसतो.
मुग्धा- तेजस आपण आज भेटूया जेड गार्डनला.
तेजस- ओके. शार्प सात वाजता. भेटू आणि बोलू. बाय.
संध्याकाळी पावणे सात वाजता तेजस जेड गार्डनला पोहोचला. मुग्धाची वाट पाहू लागला. एक साधासा पण आकर्षक ड्रेस घालून मुग्धा तिथे आली. तेजसच्या समोर बसली.
तेजस- अगदी परफेक्ट वेळेवर आलीस तू. एकदम punctual आहेस म्हणजे?
मुग्धा- हम्म…ही सवय प्रशांतमुळे लागली. त्याला लेट झालेलं अजिबात चालत नसे.
तेजस- मलाही वेळ न पळणारी लोकं आवडत नाहीत.
मुग्धा- हम्म….
काही वेळ दोघंही काहीच बोलत नव्हते. सकाळच्या मेसेजचा impact अजून होता. तेजस मुग्धाला वेळ द्यायला तयार होता. मुग्धा उठून rest roomला गेली. तेजस एकटाच बसला होता. इतक्यात त्याला जेड गार्डनच्या गेट मधून एका सुंदर मुलीबरोबर आत येत असलेली राधिका दिसली. तिने त्याला मुग्धाबरोबर तिथे बघणं त्याला मान्य नव्हतं. क्षणभर विचारकरून तेजस तिथून उठून बाहेर पाळला. वेटरने राधिकाला मुग्धाच्या समोरचं टेबल दिलं. राधिका आणि आर्या तिथे येऊन बसल्या. राधिका म्हणाली “ मी आलेच एक call करून.” अस म्हणून राधिका निघाली आणि समोरून मुग्धा तिच्यासमोर आली. मुग्धाला तिथे बघून राधिका तिच्या जवळ आली आणि म्हणाली-
राधिका- हाय मुग्धा. तू इथे?
मुग्धा- (आश्चर्याने) राधिका तुम्ही?
राधिका- हो मी माझ्या भाचीबरोबर आले आहे. आणि तू?
मुग्धा- मी पण एका फ्रेंड बरोबर आले आहे.
राधिका- ओह ओके. कोण फ्रेंड?
मुग्धा- ते काय तिथे बसले आहेत.
अस म्हणून मुग्धाने तिच्या टेबलकडे बोट दाखवलं. त्या टेबलवर कोणीच नव्हतं. ते पाहून मुग्धाला आश्चर्य वाटलं. राधिका- हरकत नाही. कुठेतरी गेली असेल तुझी फ्रेंड. आलेच मी. © मंदार जोग
क्रमश:गुंतता हृदय….(भाग १४)

