आज अमिताभचा डॉन रिलीज होऊन ४८ वर्ष झाली. १९७८ मध्ये आजच्याच तारखेला डॉन रिलीज झाला होता. अमिताभ युगातील ती ऐन बहराची वर्ष. एकाच वेळेस अमिताभचे तीन तीन सिनेमे समोरासमोरच्या थिएटर मध्ये लागायचे आणि सगळे सिल्व्हर, गोल्डन ज्युबिली व्हायचे. लोक लायनी लावून तिकिटे काढत. ऍडव्हान्स बुकिंग फुल होऊन तिकिटे मिळत नसत. ब्लॅकवाल्यांनी त्या काळात लाखो रुपये अमिताभच्या तिकिटांचा काळाबाजार करून मिळवले होते!

तर डॉन रिलीज झाला. पोस्टर वर धावत असलेला, काळं जाकीट घातलेला बच्चन, प्राण आणि बॉयकट केलेली उफाड्याची झिनिबेबी! त्या अतिशय बालवयात उफाडा वगैरे कळत नव्हतं. ते योग्य वयात लक्षात आल्यावर, अमिताभच्या सिनेमांची परत पारायणे करताना झीनत काय चीज होती हे कळलं. त्यावेळी मात्र झीनतच्या उफाड्यासाठी नाही पण अमिताभचा सिनेमा म्हणून डॉन बघायचा(च) हे नक्की होतं. आमचं अमिताभ प्रेम इतकं जुनं आहे. सिनेमा बहुतेक गंगा जमुनाला पाहिला होता. नक्की लक्षात नाही.

ह्या सिनेमाच्या निर्मितीमागेही एक रंजक कहाणी आहे. चंद्रा बारोटला फायनान्स कसा मिळाला वगैरे. पण ते गुगल केल्यास सहज वाचता येईल. त्यामुळे त्यावर लिहित नाही. सिनेमाचा प्लॉट मात्र जबराट आहे. अमिताभ स्मगलर टोळीचा बॉस म्हणजे उलट्या काळजाचा, कोणाचीही हत्या करणारा डॉन असतो. तो इफ्तेकारच्या हातून मारला जातो आणि मग टोळीची पाळेमुळे खणून काढायला तसाच दिसणाऱ्या विजय नामक एका सामान्य माणसाला इफ्तेकार डॉन बनवून टोळीत सामील करवतो. त्यात झीनत आणि प्राणची उपकथानके आहेत जी मूळ कथानकात सहज मिसळून जातात.

माझ्या मते डॉन हा सिनेमा सलीम जावेद, अमिताभ, चंद्रा बारोट, झीनत, प्राण, कल्याणजी आनंदाजी ह्या सर्वांच्या कारकिर्दीतील टॉप पाच सिनेमांपैकी एक ठरू शकेल. प्रचंड वेगाने धावणारी, प्रेक्षकांना जरा उसंत न देणारी पटकथा हा सिनेमाचा आत्मा आहे. पटकथा लेखन करणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून ह्यातील एक एक सीन पहावा ज्याचं संपूर्ण डिटेलिंग सलीम जावेद लिहीत आणि त्या सीन्सची लिंकेजीस बघावी. सलीम जावेद ह्यांना दंडवत घालावा असं नक्की वाटेल. डायलॉग नेहमी प्रमाणे सुपर होते. “डॉन का इंतजार तो ग्यारह मुल्को की पुलीस कर रही है, लेकीन..” हा डायलॉग आजही रिलेव्हन्ट आहे ह्यातच त्याच्या यशाचं गमक आहे.

अमिताभने साकारलेला स्टायलिश, थंड डोक्याचा डॉन आणि त्याच्या कॉन्ट्रास्ट मधील गावंढळ, अशिक्षित विजय झकास आहेत. पण खरी कारागिरी म्हणजे विजयचा डॉन झाल्यावर करावी लागणारी कसरत! आणि ती अमिताभच दाखवू शकतो. निव्वळ अप्रतिम. गॅंग मधील एकाला गोळी मारून त्याचं कारण इतरांनी विचारल्यावर थंडपणे “मुझे इसके जुते अच्छे नहीं लगे” म्हणणारा अमिताभ क्रूरपणातही भावतो!

झीनत अमान ह्या सिनेमात मला वाटत पहिल्यांदाच बॉयकट मध्ये पडद्यावर आली असावी. भावाच्या मृत्यूचा बदला घ्यायला जयराज कडून कराटे वगैरे शिकून डॉनचा खात्मा करायला गॅंग मध्ये आलेली रोमा उभी करताना झीनत तिच्या त्या attitude मुळे आणि अर्थात जगप्रसिद्ध उफाडयामुळे भाव खाऊन जाते. डॉन नसलेला पण तिला डॉन वाटणारा विजय आणि तिच्यातील टशन, पुढे सत्य माहीत झाल्यावर फुलणारा रोमान्स वगैरे फार मस्त आहे.

प्राण बद्दल काय लिहावं? प्राणला कोणतीही भूमिका द्या. तो ती जगत असे. ह्या सिनेमातही मला वाटत त्याच्या पात्राच नाव जसजित होतं. चुकीच्या मार्गाला लागून तुरुंगात गेलेला आणि बाहेर आल्यावर मुलांना शोधताना कासावीस झालेला बाप त्याने छानच रंगवला होता. इफ्तेकारचा पोलीस कमिशनर नेहमी प्रमाणे झकास. बाकी ओम शिवपुरी, कमल कपूर, सत्येन कप्पू, रविनाचा मामा, रोहितचे बाबा ह्या नेहमीच्या यशस्वी मंडळीनी आपापल्या भूमिका चोख निभावून नेल्या.

मजा म्हणजे त्या काळातील अमिताभच्या बहुतांश सिनेमांमध्ये मुख्य व्हिलनचे पात्र निभावणारे अमजद, रणजित, प्रेम चोप्रा ह्यांच्यापैकी कोणीही डॉन मध्ये नव्हते. असं म्हणतात की हिरोला मोठा करायचा असेल तर व्हिलन देखील तितकाच ताकदवान लिहावा लागतो. पण डॉनचं वैशिष्ठय हे की इथे व्हिलन अजिबात स्ट्रॉंग नव्हता. कारण हिरो स्वतःच सुरुवातील व्हिलन होता. मग सिनेमाभर व्हिलन होती ती सिच्युएशन ज्यात हिरो फसतो. अप्रतिम लेखनाचा नमुना परत एकदा.

डॉनची गाणी सुपर हिट होती. मै हूं डॉन, इ है बंबई नगरिया, जीस का मुझे था इंतजार, हेलन वर चित्रित झालेलं ये मेरा दिल आणि आयकोनिक खैके पान बनारसवाला! ही गाणी लोक आजही ऐकतात आणि त्यांचे पाय थिरकतात. विशेष म्हणजे डॉन मध्ये अमिताभ आणि झीनत ह्यांच एकही रोमॅंटिक सॉंग नाहीये. पटकथेत जागा नसूनही गाणं घुसवण्याचा करंटेपणा सलीम जावेद ह्यांनी केला नाही. आणि तसे असूनही प्रेक्षकांना त्या गाण्याचा अभाव जाणवला नाही. गाण्यातील रोमांस फक्त खै के पान गाण्यात “एक कन्या कुवारी, हमरे दिलं में उतर गयी हाय” ह्या कन्फेशन मध्ये आणि त्यावर झीनत ने लावलेल्या ठुमक्यात आहे!

डोंगर उतारावर कोसळत जाणाऱ्या शिळेसारखा डॉन प्रचंड वेगाने क्लायमॅक्स पर्यंत पोहोचतो आणि मग स्मशानातील डायरी पासिंग फाईट बरोबर संपतो. आमच्यासारखा प्रेक्षक एक अत्यंत होलसम सिनेमॅटिक अनुभव घेऊन तृप्त होत थिएटर मधून बाहेर येतो.

डॉन ह्या नावाने आणि त्याच कथेवर आधारित सिनेमा जावेद अख्तरच्या मुलाने, फरहान ने शाहरुखला घेऊन बनवला. तुलना करायचा प्रश्नच नाही. कारण ती होऊ शकत नाही. उद्या तैमूर किंवा तत्सम एखाद्या खानाला घेऊन कोणीतरी परत डॉन बनवेल. ते होतच राहणार. पण आजच्या तारखेला १९७८ साली डॉन नामक जी जादू निर्माण झाली ती परत होणे नाही.

आणि हो डॉन ने त्या काळी ७ कोटींचा गल्ला जमवला होता. तेव्हा तिकिटांचे दर पाच रुपयांच्या आसपास असतील. म्हणजे साधारण १.४ कोटी लोकांनी सिनेमा पाहिला होता तिकीट काढून. थोडक्यात तेव्हाच्या लोकसंख्येच्या २.१५% लोकांनी डॉन पाहिला होता. गावातील तिकिटांचे कमी दर जमेस धरता ही टक्केवारी २.५ किंवा जास्त असू शकेल. आज जर सरासरी ५०० रुपयांच तिकीट काढून १.४ कोटी लोकांनी एखादा सिनेमा पाहिला तर त्याचं कलेक्शन ७०० कोटी असेल. आणि आजच्या लोकसंख्येच्या २.५% लोकांनी सिनेमा पाहिला तर त्याचा गल्ला ५०० रुपये प्रति तिकिट ह्या हिशोबाने १७५० कोटी होईल! प्लस सॅटेलाईट, ओव्हरसीज, ओटीटी आणि म्युझिक राईट्स मधून मिळतील ते वेगळे. थोडक्यात अमिताभचा डॉन आजच्या काळातील किमान २००० कोटी प्लस धंदा करणाऱ्या सिनेमाशी बरोबरी करणारा सिनेमा होता आणि मनोरंजन, सिनेमॅटिक अनुभवाच्या बाबतीत आजच्या बहुसंख्य सिनेमांच्या कित्येक वर्षे पुढे होता, ४८ वर्षांपूर्वी बनलेला असूनही! कारण “अमिताभ आणि डॉन से प्यार दुनियभार की पब्लिक करती है, उन्हे भुलाना मुश्किल ही नहीं, नामुमकीन है!”- ©मंदार जोग

सिनेमा जगाशी निगडीत आणखी लेख वाचायला इथे क्लिक करा- फिल्लमबाजी

आमची व्यक्ती चित्रणे वाचली का? ही लिंक क्लिक करा आणि वाचा – व्यक्तिचित्रण

हे पण वाचा- मृगजळ …भाग १ रिफ्लेक्शन भाग १

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

2 thoughts on “डॉन…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!