आज रात्री जेवताना सहज म्हणून टिव्ही लावला. समोर सगळ्या चॅनल्स वरील वेगवेगळ्या कार्यक्रम, चित्रपट ह्यांची नावं, पोस्टर दिसत होती. त्यात पिंजरा ह्या मराठी सिनेमाचं पोस्टर दिसलं. जेवतानाच थोडा वेळ पहायचा म्हणून पिंजरा सिनेमा लावला. आणि तो २ तास ५० मिनिटांचा १९७२ साली बनलेला सिनेमा मी, बायको आई ने एकदाही फॉरवर्ड न करता संपूर्ण पाहिला! लहान असताना दूरदर्शनवर पहिल्या नंतर मी आज अनेक वर्षांनी कळत्या वयात पिंजरा सिनेमा परत पाहिला आणि व्हि शांताराम, डॉक्टर लागू, संध्या, निळू फुले, जगदीश खेबुडकर, राम कदम, उषा मंगेशकर, लता आणि बाबूजी ह्या सर्व मंडळींना दंडवत घातला! What a movie! काय कथा, काय पटकथा, काय संवाद, काय दिग्दर्शन, काय अभिनय आणि काय गाणी! लाजवाब! साला आपण दिलीप कुमार आणि शाहरुखचा देवदास अल्टिमेट ट्रॅजेडी म्हणून डोक्यावर घेतो. पिंजरा ही मराठी मधे बनलेली देवदासाच्या दहा पट सुंदर ट्रॅजेडी कलाकृती आहे! मी आजवर पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट १० सिनेमांमध्ये मी पिंजराला खूप वरचे स्थान देईन!
अत्यंत तत्वनिष्ठ, निष्कलंक आणि समाजासाठी आदर्श असलेल्या एका शिक्षकाच्या आयुष्याची एका तमाशातील बाईच्या प्रेमात पडून होणारी परवड आणि अधोगती पिंजरा सिनेमात अत्यंत प्रभावीपणे मांडलेली आहे. जो सिनेमा आजही माझ्यासारख्या impatient प्रेक्षकाला होल्ड करतो तो ५२ वर्षांपूर्वी जेव्हा रिलीज झाला होता तेव्हा काय कमाल करत असेल!
सिनेमातील एक एक गाणं म्हणजे हिरा आहे. निव्वळ हिरा. उषा मंगेशकरांच्या आवाजात लताच्या आवाजाचा भास होतो. पण अर्थात लताशी तुलना अयोग्य ठरेल. परंतु पिंजरा मधील गाणी उषा मंगेशकर आणि राम कदम ह्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामांपैकी एक असल्यास आश्चर्य वाटायला नको. खेबुडकरांनी अर्थात अनेक सिनेमात अप्रतिम गाणी लिहिलेली आहेत. पण पिंजरा हा त्यांच्या देखील सर्वोत्तम पैकी एक नक्की ठरेल.
शांताराम ह्यांचा दिग्दर्शक अनेक प्रसंगातून दिसतो आणि भिडतो. संध्या ह्यांनी खरंच सुंदर काम केलं आहे. त्यांनी रंगवलेली आधी सुडाने पेटलेली, मग प्रेमात पडलेली आणि अगतिक असलेली चंद्रकला त्यांनी सुंदर उभी केली आहे. निळू फुले तमाशातील सोंगाड्याच्या भूमिकेत आणि त्यांना मिळालेल्या मोजक्या प्रसंगात भाव खाऊन जातात. आणि डॉक्टर श्रीराम लागू ते सबंध सिनेमा स्वतःच्या खांद्यावर घेऊन प्रेक्षकांना बोट धरून आपल्या बरोबर नेतात. त्यांचे डोळे, उच्चार, संवाद फेक, एक्स्प्रेशन, बॉडी लँग्वेज निव्वळ लाजवाब!
खूप जुना सिनेमा आहे. अनेकांनी पहिला असेल. पण तरीही ज्यांनी पाहिलेला नाही त्यांनी अवश्य बघा. सबंध सिनेमा धरून ठेवतोच पण शेवटची दहा पंधरा मिनिटे अस्वस्थ करतात. माझी इच्छा आहे की कोणीतरी पिंजराचा हिंदी मधे भव्य रिमेक करावा. अप्रतिम गाणी करावी. कदाचित संजय लीला भन्साळी त्याला न्याय देऊ शकेल. आज केवळ अनुदान कमवायला मराठी सिनेमाच्या नावाखाली जे काही बाजारात येतंय ते बनवणाऱ्या लोकांनी पिंजरा नक्की पाहावा. परत अनुदानासाठी चित्रपट बनवायचं धाडस होणार नाही!
