आम्ही शाळेत होतो तेव्हा. अमिताभ युग थोडं ओसरलं होतं. विनोद खन्ना, ऋषी कपूर, मिथुन, थोराड धर्मेंन्द्र, जम्पिंग जॅक जितू, शत्रू, उताराला लागलेला काका आणि नवीन निश्चल, अमोल पालेकर असे सात्विक हिरो बघणाऱ्या प्रेक्षकांना थोडा बदल हवा होता कदाचित. आणि त्याच वेळी त्रिदेवांचा उदय झाला. जॅकी, अनिल आणि सनी देओल. सनीला त्याच्या वडिलांनी राहुल रवेल आणि राहुल बर्मन ह्यांना बरोबर घेऊन उत्तम लॉन्च केला. अनिल ने सुरुवातीला बराच संघर्ष करत, लहान लहान रोल्स करत हिरोच्या भूमिकेत पाय रोवले. पण जॅकी मात्र फिल्मी दुनियेशी काहीही संबंध नसलेला आमचा सोबो बॉय होता. चौपाटीवरून वर चढायला लागलं की तीन बत्तीच्या टर्निंगला आजही जॅकीचं घर दिसतं.

जॅकीच्या पार्श्वभूमी, फॅमिली बद्दल गूगल आणि विकिपीडिया वर सगळी माहिती मिळेल. ते वेगळं लिहायची गरज नाही. एक सिनेमा लव्हर, एक प्रेक्षक, त्या वेळच्या टिन एजर पिढीला जॅकी कसा वाटला हे बघणं इंटरेस्टिंग ठरेल. सुभाष घाईच्या हिरो मध्ये जॅकी लॉन्च झाला. म्हणजे त्या आधी देव आनंदच्या स्वामी दादा मध्ये फुटकळ भूमिकेत तो आला होता. पण हिरोची पोस्टर्स मुंबईत झळकली ती जॅकीचे डोक्याला पट्टी बांधलेले फोटो घेऊन. सुकडा, लांब टांगा असलेला जॅकी सर्वांच्या कुतूहलाचा विषय ठरला होता. मग हिरो सिनेमातील लक्ष्मी प्यारे ची गाणी प्रसिद्ध झाली. सिनेमा रिलीज झाला आणि जॅकी ने साकारलेला हिरो प्रेक्षकांना भावला. सिनेमाच्या गाण्यांनी कहर केला होता. त्याची सिग्नेचर ट्यून असलेली फ्लूट मी आजही अनेकदा माझ्या फोनची रिंग म्हणून वापरतो. जॅकी आणि मीनाक्षीची जोडी, सुभाष घईच दिग्दर्शन आणि अफलातून म्युझिक ह्यांनी हिरो सुपर हिट केला. त्याकाळी बहुतांश हिरो दाढी मिशी सफाचट केलेले असतं. पण मिशिवाला जॅकी लोकांना आवडून गेला. किडकिडीत शरीरयष्टीचा, उंच, मिशिवाला रुबाबदार हँडसम जॅकी तरुण वर्गात प्रचंड लोकप्रिय झाला. त्या आधी मला वाटतं तो चारमिनार सिगारेट आणि एका फॅशन ब्रँड च्या जाहिरातीत दिसला होता.

जॅकी अभिनयात समकालीन अनिल कपूरच्या जवळपास नव्हता आणि ऍक्शन मध्ये समकालीन सनीच्या आसपास देखील नव्हता. पण स्क्रीन प्रेझेंस मध्ये ते दोघे एकत्र करूनही जॅकीच्या अर्धेही नव्हते! आम्ही कॉलेजात जाई पर्यंत जॅकी सुपर स्टार बनून जग्गु म्हणून फेमस झाला होता. मला वाटतं शशिलाल नायरच्या अंगार मध्ये अच्युत पोतदार जॅकी ला एक जग्गु अशी हाक मारतात आणि पुढे पब्लिकही त्याला जग्गु दादा म्हणून जास्त ओळखू लागलं. त्याच्या मुलाखतीत त्याची बंबईया भाषा. भिडू, मावशीची #@$ वगैरे बोलायची स्टाईल लोकांना आवडून गेली. इतका चिकणा आणि मोठा स्टार असताना लोकांमध्ये त्याचं मिसळणं, आपल्या तीन बत्तीच्या भूतकाळाबद्दल बिनधास्त बोलणं, आई वाडीलांप्रति प्रेम, अकाली गेलेल्या भावाबद्दल वाटणारी हळहळ त्याच्या मुलाखतींमधून जाणवून तो माणूस म्हणून प्रेक्षकांना भावत गेला.

जग्गु ने सोलो हिरो चे खूप कमी सिनेमे केले. तो मल्टी स्टारर मध्ये जास्त रमला किंवा सोलो सिनेमे न मिळाल्याने त्याचा इलाज नव्हता. पण त्याचे हिरो, अंगार, काश, तेरी मेहेरबनिया, आईना, गर्दीश, थ्री डी असलेला शिवा का इंसाफ हे सोलो हिरो सिनेमे कायम लक्षात राहतील. मला वाटतं त्याने २०० पेक्षा जास्त सिनेमात काम केलं असेल.

आमचा मित्र रामशस्त्र नावाचा सिनेमा दिग्दर्शित करत होता. सूचक हाऊस किंवा तत्सम नावाच्या एका घरात शूटिंग होतं. दीप्ती भटनागर आणि मनीषा कोयरला हिरोईन होत्या. जग्गु हिरो. आम्ही नेहमीप्रमाणे शूटिंग बघायला गेलो होतो. दीप्ती भटनागर बरोबर एक सेमी सेक्सी गाणं सुरू होत. फराह खान नृत्य दिग्दर्शन करत होती. दीप्ती आता जितकी अप्रतिम मलई बर्फी दिसते तितकी तेव्हा अजिबात दिसत नसे. त्यामुळे आमचं सगळं लक्ष जग्गुकडे. दोन दिवसांनी ऍक्शन सिक्वेन्स होता. मला वाटतं टिनू वर्मा ऍक्शन डायरेक्टर होता. शॉटच्या मध्ये आम्ही जग्गुशी बोलायला गेलो. आमचा यार दिग्दर्शक असल्याने त्याने ओळख करून दिली. मग आमची (म्हणजे आम्ही काही मित्र आणि जग्गु) टाऊनी रेफरन्स वरून चर्चा सुरू झाली. जग्गु आम्हाला जाम आवडला होता जसा विल्सन कॉलेजात शोला और शबनमच शुटींग करताना भेटलेला, “Amitaji is mass and culture” असे म्हणत मस्त गप्पा मारणारा गोविंदा आवडला होता तसाच! मग जग्गु ने स्पॉटबॉयच्या खिशातून त्याची बिडी काढून शिलगावली. इतका मोठा नट स्पॉट बॉय ची बिडी पितो हे आम्हाला त्यावेळी एकदम कुल वाटलं होतं! पण तोच पुढे जग्गुचा ब्रँड बनला! भिडू, मावशीची #$, बिडी, टपोरी भाषा, जबराट ड्रेसिंग आणि कॉलरचं टोक सारखं करत समोरच्याच्या नजरेला नजर न देता अवे बघत बोलणं! त्याच्या इंस्टाच प्रोफाईल पण अपना भिडू असं आहे! त्या दिवशी रामशस्त्रचं शूटिंग संपल्यावर लहानग्या गोड, गोऱ्या, गुबगुबीत टायगरला आपल्या मांडीत बसवून त्याच्या हातात स्टीअरिंग देत (अर्थात स्वतः सुद्धा ते धरून) आपल्या मर्सिडीज मधून जग्गु गेला ते पाहून कृतकृत्य वाटलं होतं आम्हा फिल्लमबाज मित्रांना!

जग्गु ने मिळेल ती काम केली. परींदा, राम लखन, कर्मा, युद्ध, खलनायक, किंग अंकल आणि आणखी अनेक उल्लेखनीय सिनेमे आणि असंख्य न आठवणारे सिनेमे. त्याला पैशांचा प्रॉब्लेम झाला होता. बूम सिनेमात त्याचं प्रचंड नुकसान झालं होतं. त्यातून तो मेहनतीच्या जोरावर बाहेर पडला. आता उतार वयात तो खलनायक, विनोदी, चरित्र अभिनेता अश्या भूमिकात दिसतो. पण अनेकदा तरुण हिरो लोकांना आपल्या व्यक्तिमत्वाने पडद्यावर फिके पडतो. लेटेस्ट ‘मस्त मे रहने का’ मध्ये झकास काम केलं आहे त्याने. आमचा टाऊनी जग्गु खूप दिलदार आहे असं लोक म्हणतात. अनेकांना त्याने पैशांची आणि इतर अनेक प्रकारची मदत केली आहे. त्याची फारशी काही लफडी वगैरे ऐकिवात आली नाही. आपल्या कित्येक वर्षांच्या गर्लफ्रेंड आणि पत्नी असलेल्या आयेशाशी तो लॉयल असावा असं वाटतं.

म्हणतात ना चांगल्या माणसांच देव चांगलं करतो. तेच आज जग्गुच्या बाबतीत अनुभवायला मिळतं. त्याचा मुलगा टायगर आता मोठा स्टार बनला आहे. बापासारखाच मितभाषी आणि मीडिया शाय असलेला टायगर फिल्म लायनीत असूनही गुड बॉय आहे. विनम्र आहे. एखाद्या शो मध्ये जेव्हा बाप बेटे एकत्र असतात तेव्हा पोराला मिळणारा आदर आणि सन्मान बघून बाप म्हणून जग्गुच्या डोळ्यात दिसणारी कृतार्थता खूप समाधान देते आम्हा त्याच्या फॅन्स ना. मग होरॉईन बद्दल वगैरे प्रश्न मुलासमोर विचारल्यावर “ए तू मरवाएगा भिडू. बच्चे लोग के सामने ये सब बात नहीं” अस म्हणत लाजणारा आणि आपल्या बापाला लाजताना बघून स्वतः देखील लाजणारा टायगर बघून जग्गुदादाला म्हणावसं वाटतं की “भिडू तेरा बेटा भी तेरे जैसाईच सोने के दिलवाला है. तीन बत्ती का पानी उस में भी दीख रहेला है! उपरावला तुम लोग को खुश रखे. अपने sobo का नाम और उंचा करो! अपुन को फक्र है!” (©मंदार जोग)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!