शाहरुख खान
शाहरुख खान
मला आजही आठवतं. कुलाब्यात असलेल्या बंद पडलेल्या मुकेश मिल्समध्ये ‘राजू बन गया जेंटलमन’ सिनेमाच्या बस्तीचा सेट लागला होता. पुढे सिनेदिग्दर्शक झालेला आमचा एक कॉलेजमित्र त्या सिनेमाचा प्रॉडक्शन मॅनेजर होता. जी. पी. सिप्पी निर्माते आणि विवेक वास्वानी हल्ली ज्याला लाईन प्रोड्युसर म्हणतात तसा होता. त्यामुळे आम्ही कॉलेजमधले मित्र जी. पी. सिप्पी आमचे आजोबा असल्यागत त्या सेटवर जायचो. जवळजवळ महिनाभर शूटिंग सुरू होतं. अझीझ मिर्झा दिग्दर्शक. नाना पाटेकर, जुही चावला आणि अमृता सिंग अशा बड्या स्टारकास्टबरोबर आम्ही ‘फौजी’ आणि ‘सर्कस’ मालिकांमध्ये पाहिलेला तुडतुड्या शाहरुख खान हिरो होता.
त्यावेळी त्याच्याकडे मुंबईत घर नव्हतं. तो कफ परेडला विवेकच्या घरी राहायचा. त्याची काळी जिप्सी होती. त्यातून तो आणि क्वचित त्याची बहीण मुकेश मिल्समध्ये यायचे. त्याच्या बहिणीचा काहीतरी प्रॉब्लेम होता. आम्ही कधी विचारलं नाही. पण ते लक्षात यायचं. पुढे त्या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्याने लाल-पांढरी मित्सुबिशी पजेरो घेतली. तोवर त्याने ‘दिवाना’ सिनेमाचं शूटिंग संपवलं होतं आणि सिनेमा पोस्ट प्रॉडक्शनमध्ये होता. मुकेश मिल्सच्या आत शिरल्यावर लगेच उजवीकडे असलेल्या जागांमध्ये मेकअप रूम्स केल्या होत्या. अनेकदा शूटिंग संपल्यावर तिथे शाहरुख गप्पा मारत बसायचा. बाकी नाना, जुही वगैरे निघून जायचे. विवेकबरोबर त्याच्याच घरी जायचं असल्याने शाहरुख थांबायचा. सर्वांशी ओळख होती. तोवर तो ‘द किंग खान’ वगैरे सोडा, अजून सिनेमात आलाही नव्हता बहुतेक. त्याच सिनेमाचा आणखी एक प्रॉडक्शन मॅनेजर अन्वर पुढे त्याचा पीए झाला. पण काही वर्षांत अन्वर गेल्याचं आमच्या मित्राकडून कळलं. तोवर शाहरुख स्टार झाला होता. विश्वास बसणार नाही, पण शाहरुखने ठेवलेली ‘दिवाना’ची ट्रायल आम्ही मिनी थिएटरमध्ये शाहरुखबरोबर पाहिली आहे. तेव्हा काहीच कल्पना नव्हती की काही वर्षांनी तो भारतातील सर्वात मोठा सुपरस्टार होईल.
पण ‘दिवाना’पासून शाहरुख जो एमआरएफच्या शेअर सारखा सुटला, तो कोणाच्याच हातात नाही आला. इंडस्ट्रीत कोणीही गॉडफादर नसताना स्वतःच्या हिंमतीवर यशाच्या शिखरावर पोहोचला. त्याला यशाच्या शिखरावर पोहोचण्यात त्याच्या “यश अंकल”चा मोठा वाटा आहे. यश चोप्रा यांच्या निर्मिती संस्थेतर्फे त्याने केलेले सिनेमे सुपरहिट होऊन शाहरुखला सुपरस्टार पदापर्यंत घेऊन गेले. त्याने डेअरिंग करून ‘डर’ तसेच ‘बाझीगर’मध्ये साकारलेले अँटी हिरो लोकांना त्याच्या प्रेमात पाडत गेले. DDLJ नामक इतिहास त्यानेच घडवला. त्याच दरम्यान भेटलेल्या करण जोहरबरोबर अनेक हिट सिनेमे दिले!
वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करूनही शाहरुख किंग ऑफ रोमान्स म्हणून जगभरातील चाहत्यांच्या मनावर गारुड करून राहिला आहे. तो नाचतो सुपर, तो ॲक्शन कमाल करतो, त्याचा कॉमेडी सेन्स खतरनाक आहे, हे त्याच्या कित्येक चित्रपटांतून दिसून आलंय. तरीही शाहरुखने दोन्ही हात पसरून मान थोडी कलती केली की कोट्यवधी बायकांचे हार्टबीट वाढतात. शाहरुखच्या गालावरील खळ्यांमध्ये उडी टाकून जीव द्यायला तयार असणाऱ्या बायका त्याच्या ओपन आर्म्समध्ये शिरून घुसमटून जायला आतुर होतात! शाहरुखचा चार्म, त्याची एनर्जी, त्याचा अभिनय, त्याचे सिनेमे, त्यातील गाणी, त्याचं बॉक्स ऑफिस यश यावर आजवर रकान्यांच्या रकाने लिहिले गेले आहेत. गुगल केल्यास सगळी जंत्री मिळेल. मी त्यावर अजून वेगळं काय लिहू?
मला शाहरुख काय वाटतो, हे मी मागे एका लेखात लिहिलं होतं. शाहरुख उत्तम अभिनेता आणि सुपरस्टार तर आहेच. पण मला शाहरुख एक उत्कृष्ट व्यापारी पण वाटतो. अतिशय हुशारीने आपल्या स्ट्रेंथ्स ओळखून, वीकनेसवर काम करून ते नष्ट करत आपल्या प्रॉडक्टची म्हणजे त्याची स्वतःची गुणवत्ता वाढवणारा, काळानुसार प्रॉडक्ट पोर्टफोलिओमध्ये बदल करून कालौघात नष्ट न होणारा, सगळ्या व्हेंडर्सना म्हणजे फिल्म मेकर्सना व्यवस्थित मॅनेज करू शकणारा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या कस्टमर्स म्हणजेच फॅन्सना फक्त व्हॅल्यू फॉर मनी न देता कस्टमर डिलाइटचा अनुभव वारंवार देऊन स्वतःची मोनोपोली निर्माण करणारा हुशार व्यापारी!
शाहरुख आला तेव्हा नुसता नट होता. पुढे तो ब्रँड झाला. त्याच्याविषयी लोकांना उत्सुकता होती. शाहरुख नामक ब्रँड जे जे करेल ते उत्तम, सॉलिड, उच्च दर्जाचं असणार, हा विश्वास लोकांच्या मनात निर्माण झालेला ब्रँड. मग ते त्याचं घर मन्नत असो, त्याच्या गाड्या असोत, त्याचे सिनेमे असोत, त्याचे परदेशातील व्हिला असोत किंवा त्याची लाईफस्टाईल असो. लोकांना ते सगळंच किंग साईज वाटतं.
धीरूभाई अंबानींच्या यशात रिव्हर्स इंटिग्रेशनचा मोठा वाटा आहे, असं म्हणतात. म्हणूनच त्यांना व्हिजनरी म्हणतात. बिझनेसमन शाहरुखने सुद्धा थोड्याफार प्रमाणात ते केलं. अभिनयातून मिळालेला पैसा त्याने सिनेमानिर्मितीच्या अन्य गोष्टींमध्ये गुंतवला. आणि मुख्य म्हणजे तो सांभाळायला हुशार लोकांची टीम उभी केली. त्याने आधी अझीझ आणि जुहीबरोबर भागीदारीत ड्रीमझ अनलिमिटेड अशी निर्मिती संस्था काढली, मग त्यातून (बहुतेक) बाहेर पडून बायकोला निर्माती बनवून स्वतः निर्मिती करू लागला, रेड चिलीज स्टुडिओ काढला. अतिशय हुशारीने तो पैशाला पैसा जोडून पैसा वाढवत गेला. पुढे आयपीएल सर्कसमधील एका टीमचा मालक बनून त्यातील जोकर्सना आपल्या इशाऱ्यावर नाचवू लागला. बघता बघता व्यापारी शाहरुख आज जवळपास १७००० कोटींच्या संपत्तीचा मालक बनला आहे!
सिनेमात यायच्या आधीपासून तो विवाहित होता. त्यामुळे प्रियंका वगळता इतर हिरॉइन्सबरोबर त्याचं नाव फार जोडलं गेलं नाही. त्याला त्याच्या ह्या क्लीन इमेजचा खूप फायदा झाला. फिल्मी पार्ट्यांना तो आवर्जून गौरीला घेऊन जाताना दिसत असे आणि आजही दिसतो. तो फारसा कधी कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अडकला नाही. अर्थात, तो ज्या धंद्यात आहे तिथे शून्य कॉन्ट्रोव्हर्सी म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये नाही, असा अर्थ निघत असल्याने बारीक बारीक वाद होत राहिले. पण शाहरुख आपली एक कुटुंबवत्सल, स्त्रीदाक्षिण्य कुटून कुटून भरलेला, हजरजबाबी, मोठ्यांना आदर देणारा गुड बॉय ही इमेज व्यवस्थित निर्माण करून मेंटेन करू शकला!
कारण साला तो आहेच प्रचंड चार्मिंग. आणि तो प्रचंड हुशार आहे, हे त्याच्या अनेक इंटरव्ह्यूमधून लक्षात येतं. हुशारीला ॲडिक्टिव्ह हास्य, हजरजबाबीपणा आणि अफलातून सेन्स ऑफ ह्युमर यांची जोड मिळालेल्या अत्यंत स्टायलिश शाहरुखला फॅन्स डोक्यावर घेतात! त्याची चाल, केसांतून हात फिरवत बोलायची पद्धत, मनात येणारा मिश्किल विचार तोंडातून बाहेर पडायच्या आधी डोळ्यांतून सांडणं, त्याचं सिगारेट ओढणं आणि त्याचा अति प्रचंड कॉन्फिडन्स वर्षानुवर्षे त्याच्या जगभरातील फॅन्सना बांधून ठेवतो आणि त्यात सतत वाढ करत राहतो. आज मुंबईत जलसा व्यतिरिक्त फक्त मन्नत आणि गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर लाडक्या स्टारची एक झलक बघायला वेड्या फॅन्सची जत्रा भरते. ही तीनही ठिकाणं अनेक मुंबई दर्शन टूरच्या साइट सीइंगमध्ये समाविष्ट आहेत!
मधला काही काळ त्याच्यासाठी वाईट होता. वानखेडेवरचा वाद, आर्यनला झालेली अटक आणि त्या संदर्भातील विवाद, त्याचे एकामागे एक फ्लॉप होणारे ‘फॅन’, ‘जब हॅरी मेट सेजल’, ‘झीरो’सारखे सिनेमे, सुहानाच्या पहिल्या सिनेमाला मिळालेलं अपयश, यामुळे काही वर्षे त्याच्यासाठी आव्हानात्मक गेली. पण नंतर आलेल्या ‘पठाण’ आणि ‘जवान’ या सिनेमांनी फिल्म इंडस्ट्रीचा बादशहा कोण आहे, हे परत एकदा सिद्ध केलं. आता तर आर्यनदेखील एक उत्कृष्ट लेखक आणि दिग्दर्शक म्हणून नावारूपाला आलाय. शाहरुखचा किंग डिसेंबर मध्ये येऊ घातला आहे.
आता शाहरुखचं वय दिसू लागलं आहे. ‘पठाण’मध्ये दिसत असलेल्या त्याच्या बॉडीबद्दल अनेक प्रकारे संशय व्यक्त केले गेले. तो ड्रेस आहे, बॉडी त्याची नाही वगैरे. त्याचं वय दिसतं, त्याने आता वयाला साजेश्या भूमिका कराव्या, असं मीसुद्धा म्हणालो होतो. पण ‘पठाण’ आणि ‘जवान’ या सिनेमांच्या घवघवीत यशाने त्याच्या समस्त टीकाकारांची तोंडं बंद केली आहेत, हेच सत्य आहे!
त्याच्या ‘रईस’ सिनेमात टॅगलाईन होती, “बनिये का दिमाग और मियाँभाई की डेअरिंग!” मला त्या सिनेमातील पात्रापेक्षा ती टॅगलाईन शाहरुख खान या व्यक्तीसाठी परफेक्ट वाटते. दिल्लीतून मुंबईत येऊन, कोणीही गॉडफादर नसताना फिल्मी दुनियेत जम बसवून त्या दुनियेचा १२५०० कोटींची नेटवर्थ असलेला अनभिषिक्त सम्राट बनणाऱ्या शाहरुखकडे अभिनयाबरोबर बनियाचा बिझनेस दिमाग आणि जन्मतः असलेली मियाँभाई की डेअरिंग हे दोन्ही गुण होते, म्हणूनच तो आज जिथे आहे तिथे पोहोचू शकला आहे!
शाहरुखचे डायहार्ड फॅन्स आहेत तसेच हार्डकोर हेटर्स पण आहेत आणि माझ्यासारखे त्याचे फॅन्स असूनही त्याचं जे आवडत नाही त्यावर टीका करणारे लोकही आहेत. पण तो इतका मोठा आहे की त्याला शष्प फरक पडत नाही. कारण काळ्या मारुती जिप्सीपासून सुरुवात करून १० कोटींच्या रोल्स रॉईसपर्यंत येणारा आणि मुंबईत घर नाही म्हणून निर्मात्याच्या घरात राहण्यापासून २५० कोटींच्या मन्नतचा मालक फक्त स्वतःच्या टॅलेंट, हुशारी आणि हिंमतीच्या जोरावर झालेल्या शाहरुखला त्याच्या दैदिप्यमान यशाचं श्रेय त्याचे शत्रूही देतील.
बनिये का दिमाग और मियाँभाई की डेअरिंग याचं मूर्तिमंत उदाहरण असलेल्या प्रचंड चार्मिंग, हँडसम, मेहनती, अत्यंत हुशार अशा सुपरस्टार शाहरुखला एकसष्टाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! ©मंदार जोग
हे पण वाचा –
सिने जगताशी संबंधित इतर लेख- फिल्लमबाजी
ही वाट दूर जाते- ही वाट दूर जाते- भाग १ | सुरुवात
प्रेमकथा- प्रेम कथा
भयकथा- भयकथा
दीर्घकथा- दीर्घ कथा
ललित लेख- ललित
आमचे whatsapp channel join करा- whatsapp.com
आम्हाला फेसबुकवर फॉलो करा- https://www.facebook.com/mandar.jog.31
