सज्जन माणूस ह्या आता जवळजवळ नामशेष झालेल्या जमातीतील एक दुर्मिळ माणूस असलेला आमचा मामा आज खूप दिवसांनी भेटला. मामाची भेट ही माझ्यासाठी ऑक्सिजन थेरपी सारखी असते. प्रचंड ऊर्जा देणारी तसेच सज्जनपणा, साधेपणा आणि सत्याचा मार्ग ह्यावर असलेला माझा विश्वास दृढ करणारी..आणि जगात चांगुलपणा अजूनही टिकून आहे ह्याची खात्री पटवणारी असते. मी गेलो की मामा कितीही वेळ मस्त गप्पा मारतो आणि त्यातून वर उल्लेख केलेली ऊर्जा मिळत जाते!
मामा इतक्या मोठ्या घरात आता एकटाच असतो. पण तो विविध सामाजिक कामात स्वतःला गुंतवून वेळ व्यतीत करतो. आज त्याच्याकडे गेलो होतो. मामाने चहा आणि बिस्किटे पुढे केली आणि आमच्या गप्पा रंगल्या. मामा शिक्षणाने इंजिनियर. रिटायर होईपर्यंत नोकरी केलेला. आज विषयातून विषय निघत होते. त्या अनुषंगाने मी म्हणालो “मामा, सज्जन माणसाबद्दल दुर्जनांना आदरयुक्त भीती असते. तसेच पोलीस असो की वकील की आणखी कोणी सरकारी अधिकारी, त्यांना दोन मिनिटात समोरचा माणूस कसा आहे हे लक्षात येतं. आणि सज्जन माणसाला मान मिळतो!” त्यावर मामाने त्याच्या नोकरीतील एक किस्सा सांगितला.
मामाच्या कंपनीत मामाची ट्रान्स्फर पर्चेसला झाली. अनेकदा पर्चेस डिपार्टमेंट बदनाम असतं. त्यात लाचलुचपत चालू असते. त्यामुळे त्या खात्याची, माणसांची कसून आणि अचानक चौकशी आणि ऑडिट होतं असतं. त्यांच्यावर लक्ष असतं. एक दिवस मामाला अचानक बोलावणं आलं की फायनान्सवाले हिशोब घ्यायला अचानक आलेत. आणि मामाला बोलावत आहेत. मामा गेला. मामला तिथे पाहून सरप्राईज ऑडिटला आलेले फायनान्स मॅनेजर म्हणाले “हे आहेत का इथे? मग ऑडिटची गरज नाही!” ते ऑडिट न करता निघून गेले आणि त्यानंतर मामा त्या विभागातून निवृत्त होईपर्यंत त्या विभागात कधीच सरप्राईज ऑडिट झालं नाही!
मी मामाला कारण विचारल्यावर तो म्हणाला की पर्चेसला यायच्या आधी काही वर्षांपूर्वी त्याच्या कंपनीने नवीन मशीनचे तंत्रज्ञान शिकायला मामाला स्वित्झरलँडला पाठवलं होतं. मामा जाताना त्याला खर्चाला काही अमेरिकन डॉलर दिले होते. स्वित्झर्लंड मध्ये त्याचे स्विस फ्रॅंक कन्व्हर्ट करून मामाने परत आल्यावर उरलेल्या फ्रॅंकचे रुपये करून कंपनीला ते पैसे परत दिले! ते दिल्यावर सर्वांना आश्चर्य वाटलं होतं. आजवर परदेशात गेलेल्या कोणीच पैसे परत केले नव्हते. मामा उरलेले पैसे परत करणारा पहिलाच इंजिनियर होता. ही घटना फायनान्स हेड सकट संचालकांना देखील माहीत झाली होती आणि म्हणूनच मामाला पर्चेस मध्ये पाहिल्यावर फायनान्स मॅनेजर ने पुढे कधीच सरप्राईज ऑडिट केलं नाही!
मामासाठी तेव्हा आणि आजही सचोटी आणि सज्जनपणा ह्या गोष्टी रोजच्या जगण्याचा, वर्तणुकीचा भाग होत्या आणि आहेत! नजर, विचार, वाणी आणि आचरणात सज्जनपणा आणि संस्कार ओथंबून वाहात असलेला माझा मामा अगदी सहज म्हणून तो प्रसंग सांगत होता. पण माझा उर मात्र अभिमानाने भरून आला होता, डोळ्यात पाणी तरळलं होतं. मला आज ऑक्सिजन थेरपीचा मोठ्ठा डोस मिळाला होता!-©मंदार जोग
