…….अमेयला बघून ती प्रचंड खुश झाली. धावत येऊन तिने अमेयला तेजस सकट मिठी मारली. त्याच्या गालाचे मुके घेतले. म्हणाली “कुठे रे गेला होतास सोन्या? मी मेले असते!”अस म्हणून तिने परत अमेयला घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू तेजसचा शर्ट भिजवत होते. नकळत तेजसचा डावा हात मुग्धाच्या पाठीवर फिरत तिला आधार देऊ लागला. शांत करू लागला. तिथे अचानक बंद पडलेल्या जायंट व्हीलच्या सर्वात वरच्या पाळण्यात बसलेला प्रशांतचा जीव ते दृश्य बघून टाळ्या वाजवत होता. काही क्षण त्यातच गेले.मग भानावर आलेली मुग्धा मागे झाली. तेजसला म्हणाली-
मुग्धा- तुम्हाला हा कुठे मिळाला?
तेजस- ते महत्वाच नाही. तुम्ही दोघे एकमेकांना भेटलात हे महत्वाच आहे. चला मी तुम्हाला घरी सोडतो.
मुग्धा- नको…तुम्हाला का त्रास? त्या दिवशी पण एअर पोर्टवरून….
तेजस- अहो घाबरू नका. आज मी क्रिकेट खेळणार नाही आणि तुमच्याकडे चहा पण मागणार नाही. बिल्डींगच्या खाली सोडून निघून जाईन.मग तर झालं ना?
मुग्धा- अहो नाही…मला तसं नव्हत म्हणायचं…..
तेजस- म्हणजे चहा मिळू शकेल तर?
मुग्धा- (हसून) हो मिळेल. आमची इतकी मदत करणाऱ्या व्यक्तीला चहा नक्कीच मिळेल. म्हणजे तो द्यायलाच हवा.
तिघे गाडीजवळ चालत निघाले. मुग्धाला कळत नव्हत की तिला झालेला आनंद अमेय परत मिळाल्याचा होता की तेजसने अमेयला आणून दिला ह्याचा होता. अमेय दोघांचे हात धरून मध्ये चालत होता. हे दोघे सरळ बघत चालत होते. तेजसला मगाशी मुग्धाने मिठी मारल्यावर, तो सकाळी ज्या परफ्युमच्या वासाच्या शोधात धावला होता तो वास गवसला होता. तो चालताना तिरक्या नजरेने मुग्धाला बघत होता. तिचं सरळ नाक, संत्र्याच्या फोडीसारखे ओठ, शरीराचे उभार, टेन्शन मुळे जरा घामेजलेला चेहरा, गालावर चिकटलेली एक बट आणि तिचा रेखीव चेहरा त्याला भुरळ घालत होते. मुग्धा पण नकळत त्याला पहात होती. इतका श्रीमंत पण जराही गर्व नसलेला, सभ्य, उत्तम सेन्स ऑफ ह्युमर असलेला, बायकांचा आदर करणारा, प्रसंगी मदत करणारा आणि पिळदार शरीराचा प्रचंड राजबिंडा तेजस तिला मनातून आवडला होता. जणू हे तिघेच त्या मैदानात सिनेमातील स्लो मोशन शॉट प्रमाणे चालत आहेस अस त्या दोघांना वाटत होत. दीड मिनिटांचा तो प्रवास त्यांना कित्येक तासाचा वाटला. पण गाडीजवळ आल्यावर ड्रायव्हरने दार उघडल्यावर तो संपला. तेजसने ड्रायव्हरला घरी पाठवला आणि तो स्वतः व्हीलवर बसला. मुग्धा शेजारी आणि अमेय मागे असे ते निघाले. अमेय रस्त्यावरची गंमत बघत होता आणि ह्या दोघांचा मगाशी सुरु असलेला स्लो मोशन सीन आता गाडीत सुरु होता. पत्ता तेजसला माहित असल्याने तो सांगायला देखील बोलायची गरज नव्हती.
तेजसची गाडी बिल्डींगच्या कम्पाउंड मध्ये आली. तिघे गाडीतून उतरल्यावर बाल्कनीत उभे असलेल्या लोकांच्या नजरा लगेच त्यांच्यावर खिळल्या. मुग्धाने हळूच वर बघत त्याचा अंदाज घेतला. तेजस म्हणाला “मला चहात साखर फक्त एक चमचा.” मुग्धा स्माईल देत म्हणाली “ओके. इथून वर.” तिघे निघाले. आज नेमकी लिफ्ट बंद होती. मुग्धा म्हणाली “आज तुमच्या नशिबात चहा दिसत नाही. लिफ्ट बंद आहे. खूप जिने चढावे लागतील. “ तेजस म्हणाला “ अमेय आणि मी धावत वर जातो. तुम्ही या सावकाश. काय रे अमेय?अमेय म्हणाला “लेट्स गो काका.” तेजस आणि अमेय धावत पायर्या चढू लागले. मागे मुग्धा पण निघाली.
त्यांच्या घराच्या दारात अमेय आणि तेजस धापा टाकत उभे होते. तेजस म्हणाला “मजा आली ना?” अमेय म्हणाला “हो. खूप. मी आणि बाबा अशी गम्मत कधीतरी करायचो.” ते वाट बघत असताना मुग्धा पोहोचली. घामाने कच्च भिजलेला चेहरा. गळ्यावरून घाम ओघळून वरच्या बाजूला भिजलेला ड्रेस, सुळसुळीत दंडावरून हातांवर ओघळणार्या घामाच्या धारा, तिच्या परफ्युमचा मंद आणि जरा दम लागल्याने धपापत आणि थरथरत असलेली मुग्धा. तिला बघून तेजस सहज म्हणून गेला “तुम्ही ना आत्ता थोडावेळ सुरु ठेवलेल्या डीझेल इंजिन सारख्या दिसताय. आता अजून दुप्पट पायर्या सहज चढून जाल अश्या. डीझेल इंजिनची हीच गंमत आहे. ते जरा दमवल्यावर सॉलिड पर्फोर्मंस देत!” हे वाक्य ऐकून मुग्धाच्या अंगावर सर्रकन काटा आला. तिने तेजसकडे चमकून पाहिलं. तो म्हणाला “सॉरी हा. इतक्या सुंदर स्त्रीला डीझेल इंजिनची उपमा हा सौंदर्याचा अपमान आहे खर तर. पण मला तेच आठवलं तुम्हाला अश्या बघू. राग मानू नका प्लीज!” मुग्धाने काही न बोलता घराचं लॉक उघडलं. आत येऊन दिवा लावला. तेजसला म्हणाली “बसा. मी पाणी देते.” तेजस घर बघत सोफ्यावर बसला. मुग्धाने थंड पाणी आणून दिल. मग म्हणाली “पाच मिनिट आहेत ना? मी फक्त चेंज करून येते. घामाने खूप भिजला आहे हा ड्रेस.” तेजस म्हणाला “टेक युअर टाईम.” मुग्धा अमेयला घेऊन आत गेली. तेजस घर बघत होता.
त्याची नजर भिंतीवर लावलेल्या प्रशांतच्या फोटोवर गेली. त्याला चंदनाचा हार घातलेला बघून तेजस उठून उभा राहिला. फोटोच्या जवळ जाऊन फोटो बघू लागला. फोटोच्या काचेत त्याला स्वतःच प्रतिबिंब दिसलं. का कोणास ठाऊक त्याचे डोळे भरून आले. त्याने खिशातून रुमाल काढून फोटोची काच पुसली आणि मग स्वतःचे डोळे. तेवढ्यात मागे आलेली मुग्धा म्हणाली-
मुग्धा- हे माझे मिस्टर. प्रशांत साठे. माहिन्याभरापूर्वी accident मध्ये गेले.
तेजस- oh. Very sorry to know that.
मुग्धा- हम्म….आम्हालाही तो खूप मोठा धक्का होता….आहे….
तेजस- हम्म…नक्कीच. पण मग आता घरी…आय मीन तुमचे इन लॉज वगैरे?
मुग्धा- मी, प्रशांत आणि अमेय….आम्ही तिघेच होतो एकमेकांना. आता मी आणि अमेय दोघेच. आम्हाला बाकी नातेवाईक नाहीत. म्हणजे असूनही नाहीत….
तेजस- ओह….
तेजसला काय रीएक्त व्हायचं सुचलं नाही.
तेजस- नशिबापुढे आपलं काहीच चालत नाही. पण मग आता कोण बघत सगळ…आय मीन तुम्ही काही जॉब बगैरे…?
मुग्धा- आजच एक जॉब मिळाला आहे.मोठी कंपनी आहे. चार दिवसात जॉईन होईन.
तेजस- ग्रेट….मी वाट बघेन.
मुग्धाने आश्चर्याने त्याच्याकडे बघितलं. ते लक्षात येऊन तेजस म्हणाला-
तेजस- आय मीन तुम्ही नोकरीत सेटल झालात की एक पार्टी द्याल ना? त्याची वाट बघेन मी.
मुग्धा- (हसून) done. पण सध्या चहा आणते. उकळला असेल.
तेजस प्रशांतच्या फोटोकडे कुतूहलाने बघत होता. मुग्धाने चहाचा कप त्याच्या समोर धरला. दोघे चहा पिऊ लागले. कोणीच काहीच बोलत नव्हत. खूप काही बोलाव अस वाटत असूनही आता पुढे काय बोलायचं हे दोघांना सुचत नव्हत. चहा पिऊन झाला. तेजस उठून म्हणाला-
तेजस- चहा मस्त झाला होता. थान्क्स. आता निघतो मी. आणि हो. तुमच्या नव्या नोकरीसाठी शुभेच्छा. भेटू परत असेच अपघाताने.
मुग्धा- आता ठरवून भेटू. माझी नोकरीची ट्रीट द्यायची वेळ येईल तेव्हा कुठे शोधू तुम्हाला? माझा नंबर लिहून घ्या आणि मला मिस्ड कॉल द्या. मी नंबर सेव्ह करेन आणि माझा पगार झाला की मी नक्की फोन करेन.
मुग्धाने तिचा नंबर तेजसला सांगितला. त्याने मिस्ड कॉल दिला. तेजस निघाला. अमेयला टाटा करत असताना अमेय म्हणाला “आई ह्या काकांबरोबर एक सेल्फी. हे काका मस्त आहेत.” मग तेजसने अमेयला उचलून कडेवर घेतला. मुग्धा त्याच्या शेजारी उभी राहिली. फ्रेम compact करण्यासाठी ती आणखी जवळ सरकली. शेवटी तेजसने तिच्या खांद्यावर आपला उजवा हात ठेवला आणि मुग्धाने सेल्फी काढला. तेजस गेला. मुग्धा सेल्फी बघत होती. त्यात मागच्या भिंतीवर फ्रेम मध्ये असलेला प्रशांत तेजसच्या चेहऱ्यामुळे झाकला गेला होता हे तिच्या लक्षातही आलं नाही. अमेय एव्हाना बेडवर जाऊन “आई ये ना” अस ओरडत होता. मुग्धा हॉलचे दिवे बंद करणार इतक्यात तिला सोफ्यावर राहिलेला तेजसचा रुमाल दिसला. तिने तो उचलला. रुमाल हातात धरून ती दिवे मालवून बेडरूम मध्ये गेली.
दिवसभर मस्ती करून दमलेला अमेय दोन मिनिटात तिच्या कुशीत झोपला. तो झोपल्यावर मुग्धाने उशीच्या शेजारी ठेवलेला तेजसचा रुमाल हातात घेतला. त्या पांढऱ्या शुभ्र मोठ्या रुमालाच्या एका कोपऱ्यात TD अशी अक्षरे लिहिलेली होती. मुग्धाने सहज तो रुमाल स्वतःच्या चेहऱ्यावर ठेऊन चेहरा झाकून घेतला. तिला तेजस तिच्या गालावर हात फिरवत असल्याचा भास झाला. रुमाल बाजूला करून ती उठून बसली. तिला तेजस बरोबर झालेल्या आजवरच्या सर्व भेटी आठवल्या. अगदी आज तो तिला डीझेल इंजिन म्हणाला ते देखील. ते आठवून तिने प्रशांतच्या फोटोकडे पाहिलं. त्याचा चेहरा प्रसन्न दिसत होता. मुग्धा खूप कन्फ्युज्ड होती. कदाचित अपराधीपणामुळे प्रशांतच्या नजरेला नजर देता येत नसल्याने तिने रुमाल बाजूला ठेऊन दिवा बंद केला.
दिवा बंद करून दीड तास झाला तरी मुग्धाला झोप लागत नव्हती. मनात असंख्य विचार येत होते. अगदी प्रशांत आणि तिच्या लग्नापासून हनिमून, घरच्यांशी मतभेद, अमेयचा जन्म, मग पुढली काही छान वर्ष, प्रशांतचा innovative romance, त्याचा अपघात, हॉस्पिटल, अचानक जाणं, नोकरीचा इंटरव्ह्यू, भविष्याची चिंता आणि रोहित…त्याचं सजेस्टीव्ह वागण, त्याचं जवळीक वाढवण…मुग्धा अस्वस्थ होऊन उठून बसली. तिने दिवा लावला. अमेय शांत झोपला होता. तिने अमेयच्या केसातून हात फिरवून त्याच पांघरूण नीट केलं. किचन मध्ये जाऊन ग्लासभर थंड पाणी पिऊन परत येऊन ती बेडवर बसली. मोबाईल हातात घेतला तर दोन वाजले होते. तिने सहज आज काढलेला सेल्फी पाहिला. तेजसला बघून तिच्या मनात रोहितमुळे निर्माण झालेली चलबिचल अचानक थांबली. तिला तेजसचा नंबर सेव्ह केल्याच आठवलं. तिने whatsapp मध्ये त्याच नाव टाईप केल्यावर तो दिसला. ती त्याचा डीपी बघत होती. आयफेल टॉवर जवळ काढलेला त्याचा एक फोटो होता. मुग्धाने TD अक्षरे व्यवस्थित दिसतील असा रुमालाचा फोटो काढला आणि तेजसला तो फोटो मेसेज करून विचारलं “हा रुमाल तुमचा आहे का? आमच्या घरात सापडला.” त्याला मेसेज केल्यावर तिला पोटात गुदगुल्या झाल्याच फिलिंग आलं. पाच मिनिट त्याच्या रीप्लायची वाट बघून रिप्लाय न आल्याने तिने दिवा बंद केला. तिला झोप लागत होती इतक्यात फोनचा मेसेंजर खणाणला. तिने लगबगीने उठून मेसेज पाहिला. रोहितने एक अश्लील क्लीप पाठवली होती आणि लिहील होत “ही तुला नक्की आवडेल…..”
क्रमशः
(© मंदार जोग)गुंतता हृदय…(भाग- ११)

