चांद मातला भाग ११
मीरा आणि अभि लिफ्ट ने वर गेले. काही सेकंद पण अनेक युगांसारखी भासत होती मीराला. क्षणभरात कितीतरी गोष्टी तिच्या मनात तरळून गेल्या. आपलं छोटंसं गाव, आई वडिलांचे लाड, सासू सासर्यांचा विश्वास, मानसचा हट्ट. हे सगळं सोडून आज आपण कुठे आहोत? काय चाललं आहे सगळं? डॉ. आनंदी? त्यांना कल्पना द्यायला हवी होती का? मनातली आंदोलन थोपवून ठेवण्याचा प्रयत्न करत मीरा पुढे चालली होती.
मोहित मानसच्या फोनमुळे घरी निघाला. ट्रॅफिक मध्ये अडकलेल्या मोहितची चिडचिड वाढत होती. कुठे गेली असेल मीरा? मी तर आता रोहन बरोबर होतो, म्हणजे ती रोहन बरोबर नाही. मग कुठे असेल ?मैत्रींणीबरोबर शॉपिंगला? पण आज पर्यंत तिने मानसला असं कधीच सोडलं नव्हतं.किती रडवेला झाला होता फोनवर मानस, त्याला असं सोडून कुठं मजा मारतीये ही मीरा? स्वत: च्या विचारांवर मोहित इतका हादरला की ए.सी.मध्ये ही त्याला घाम फुटला. मीराच्या आयुष्यात दुसरं कुणी असेल ? प्रतिध्वनी सारखा हा प्रश्न त्याच्या मनात पुन्हा पुन्हा आपटत होता. रोहनच्या जाळ्यात मीराला अडकवून आपण मजा मारायची तयारी करतोय.मीराच्या आयुष्यात दुसरं कुणी असेल हे मात्र आपल्याला सहन होत नाही. मोहित स्वत:च्याच मनातल्या द्वंद्वात फसला होता.
अभिच्या गाडीत राहिलेल्या मीराच्या फोनला आता उसंत नव्हती. मानस प्रणाली मावशीच्या फोनवरून सतत फोन करत होता. पूर्वा… तिला ही मीराला काही सांगायचं होतं. ती ही मीराला फोन करत होती. डॉ. आनंदीला ही मीराला एक सरप्राइज द्यायचं होतं. डॉ आनंदी चा ही फोन. मीराच्या सासुबाईंचे ही फोन नो रिप्लाय ऐकून गार पडत होते.
फोन वाजला. मोहितने रेडिओचा आवाज किंचित कमी करुन कॉल रिसीव्ह केला. “आई तुला थोड्या वेळाने फोन करू? ड्राईव्ह करतोय? ” “मोहित अरे मीरा कशी आहे ? ” या प्रश्नानं मोहितच्या मनात चर्र का झालं त्याचं त्याला कळलं नाही. “आई काय झालंय तुला?” “काही कळत नाही , फार अस्वस्थ वाटतंय , मीराची अचानक काळजी वाटतेय. काही झालं नाही ना पोरीला? फोन पण उचलत नाही? काळजी वाटतेय रे”
“आई आज कोजागिरी ना सोसायटीत कार्यक्रम आहे त्याच गडबडीत असेल मीरा. मी घरी पोचल्या पोचल्या तुला फोन करतो” सवयीने मोहित ने रेडिओ चा वॉल्यूम वाढवला. लता बाईंचा आवाज मोहितला आणखी अस्वस्थ करून गेला. मीराच या गाण्यातून काही सांगत होती असं त्याला वाटलं…. लताबाई गात होत्या..
दिल में सिवा तुम्हारे कोई नहीं हमारे
ये अपने दिल से पुछो क्या दिल में है तुम्हारे
देंगे मेरी गवाही ये कुदरत ये नजारे
हो गए तुम्हारे
देखो वो चांद .
काय १८५७ ची गाणी लावतात हे लोक असं पुटपुटत मोहितने चॅनेल चेंज केलं. आणि अचानक त्याची नजर चंद्रावर गेली. आईला थाप मारताना कोजागिरीची थाप मारली होती. पण आयुष्यातला निवांतपपणा हरवला होता. गोजिऱ्या चंद्राला ग्रहण लागत होतं. या चंद्रापेक्षा ही सुंदर आयुष्य मीराच्या रुपाने आपल्याला मिळालंय ते अप्रतिम सौंदर्य आपण आपल्याच हाताने कुस्करतो आहे? नकळत त्याने कारला ब्रेक लावला. मागच्या कारवाल्याने हॉर्न आणि शिव्या एकदमच वाजवल्या. भानावर येत मोहितने मनाशी काहीतरी निश्चय केला आणि त्याच्या कारने स्पीड पकडला.
सोसायटीत कोजागिरी सेलिब्रेशनची तयारी जोरात सुरू होती. मानस मात्र आता रडवेला झाला होता. आई त्याला इतका वेळ सोडून कधीच गेली नव्हती. सोसायटीतल्या मुली ही आता मीराला शोधत होत्या. सेलिब्रेशनची
बाकी तयारी होत आली होती. फक्त रांगोळी बाकी होती. प्रत्येक जण मागच्या वर्षीची मीराची रांगोळी आठवत होते. शांत सरोवरावरती पुर्ण क्षमतेने उजळणारा चंद्र मीराने रांगोळीने रेखाटला होता. ही रांगोळी चित्र किंवा फोटो नाही आहे हे पटवून द्यावं लागत होतं इतकी सुंदर रांगोळी मीराने रेखाटली होती. यावर्षी मात्र मीराच्या आयुष्याची रांगोळी विस्कटली होती. शांत सरोवर कधीच गढूळलं होतं. चंद्राला ग्रहण लागलं होतं .आकाशातला चंद्र नेहमीप्रमाणे शांत होता. हलकेच चांदणं पसरवत होता..
आज सोसायटीने मनोरंजन करण्यासाठी अनेक गेम्स ठेवले होते. त्याच बरोबर एक व्याखान ही होतं. बालपण कसं जपावं ? यावर बोलण्यासाठी येणार होत्या डॉ आनंदी.
मीरा आणि अभिची लिफ्ट काही सेकंदात वर पोचली. अभिने हलकेच मीराचा खांदा थोपटत तिला धीर दिला आणि चलण्याचा इशारा केला. लिफ्टमधून अभि बाहेर पडला . फ्लॅटचा दरवाजा मायानेच उघडला. “अभि सर ! Pleasant surprise ! अभिने मायाकडे पाहिलं तिला आनंद झाला नाहीए तर धक्का बसला आहे हे अभिने सहज हेरलं. मायाला काहीतरी विचारणार इतक्यात त्याची नजर भिंतीवरच्या एका फोटोवर खिळली . तो पुर्वाचा फोटो होता. “अभि सर रोहनने शूट जस्ट कंप्लीट केलं. मी निघालेच होते ! पाच मिनिटं उशीरा आला असता तर आपली चुकामुक झाली असती.” “ओह that’s great ! मिस्टर रोहन मला बघायला मिळतील का फोटोज” रोहनवर नजर रोखत अभि म्हणाला. रोहनची नजर मीराला शोधत होती. ती अजून दिसली नव्हती. “हो हो दाखवतो ना” असं म्हणत रोहन camera उचलणार तेवढ्यात त्याची नजर माया कडे गेली. मायाने नजरेने खुणावलं तसं रोहनच्या लक्षात आलं मोहित आणि मायाचे फोटो camera मध्ये आहेत. ” Sorry sir पण कलाकाराची कला अर्धवट बघण्यात मजा नाही. मी तुम्हांला लवकरच hard copies पाठवतो ना”. अभिने रोहनच्या नजरेत पाहिलं. एक धुर्त माणूस अभिला दिसला. याला कुठेतरी पाहिला आहे कुठे बरं? हाच प्रश्न रोहनच्या मनात होता.
अभि सर, मोहित आहे का ? मीराच्या आवाजाने तिघांनी दारात पाहिलं ! मीरा ! मीराने अभिला पाठमोरं पाहिलं. मायाने तिला hi केलं काहीच न सुचुन मीराने अभि कडे पाहिलं. पाठमोर्या अभिने वळून मीराकडे पाहिल़ं आणि अभिच्या पाठीमागे असणाऱ्या रोहनकडे मीराचं लक्ष गेलं. रोहनच्या चेहर्यावर छद्मी हसू होतं. कोणाला काही कळायच्या आत मीरा कोसळली होती…
कोजागिरीच्या रात्री गूढ उकलेल का ?
मीराच्या संसाराचं ग्रहण सुटणार का ?
अभिसागर रोहनला ओळखणार का ?
क्रमश:
लेखिका- माधुरी केष्टीकर
पुढील भागाची लिंक- चांद मातला भाग १२ आणि १३
मागील भागाची लिंक- चांद मातला भाग १०
हे पण वाचा-
आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा
आमच्या लघुकथा लघुकथा
माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख
आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण

[…] आधीच्या भागाची लिंक- चांद मातला भाग ११ […]