चांद मातला | Mandar Jog

चांद मातला भाग ३ –

मीरा हवेत तरंगतच घरी पोहोचली. घरी आली तरी तिचं मन अजूनही मागेच, त्या भेटीतच अडकलेलं होतं. तिच्या कानात रोहनचे शब्द होते आणि त्याने तिचा हात हातात घेतल्यावर झालेला त्याचा स्पर्श तिला अजूनही जाणवत होता. आज तिचं झालेलं कौतुक तिला गुदगुल्या करत होतं. लिफ्टच्या आरशात स्वतःला न्याहाळताना तिला छान वाटत होतं. लग्नानंतर पहिल्यांदाच एखाद्या पुरुषाने तिचं मनापासून आणि तोंडावर कौतुक करायची हिम्मत दाखवली हे तिला आवडलं होतं. ती तसीच आनंदाने तरंगत तिच्या मजल्यावर आली. लिफ्ट मधून बाहेर पडून घराच्या दारात आली. पर्स मधून किल्ली काढून दार उघडणार तर तिच्या लक्षात आलं की घरच दार तर उघडच आहे. घरच दार उघड पाहून तिला प्रचंड आश्चर्य आणि भीती वाटली!

तिच्या मनात विचार आला “ आपण तर कुलूप लावून गेलो होतो मग आत्ता उघडं कसं? चोरी तर झाली नसेल ना? मी दार लॉक करायला विसरले की काय?” आता घरात काय बघायला मिळेल या विचारातच ती घरात शिरली. घरात येताच पहाते तर काय समोर मोहित सोफ्यावर ऑफिसच्या फायली चाळत बसलेला होता आणि मानस त्याच्याच बाजूला खेळत बसलेला..

त्या दोघांना घरात पाहून मीराला हायस वाटलं आणि मोहितला ऑफिस ऐवजी घरात पाहून तिला आश्चर्य पण वाटलं. हे विचार मनात आल्यावर मात्र मीरा तिच्या त्या स्वप्नांच्या ढगातून धाडकन खाली आली. जरा घाबरतच तिने विचारलं, ” मोहित…त तू…तू आत्ता या वेळी घरी? “

तसं मोहितने तिच्याकडे रोखून पाहिलं मग म्हणाला, “अगं होतीस कुठे तू इतका वेळ, मानसच्या नर्सरी टीचरचा फोन आला की तू त्याला घ्यायला गेलीच नाहीस, आणि त्या तुला फोन लावत होत्या पण तुझा लागला नाही म्हणून मग त्यांनी मला केला,  मीही किती फोन केले तुला”

मोहितचे हे बोल ऐकताच मीराला स्वतःचीच लाज वाटली, असे कसे विसरलो आपण मानसला आणायला, इतके कसे वाहवत गेलो एका अनोळखी फेसबुकवर भेटलेल्या माणसाच्या भेटीत, त्याने केलेल्या कौतुकात? तिला काय उत्तर द्यायचं ते सुचलं नाही. आणखी चर्चा टाळायला तिने पटकन पर्स वैगेरे जागेवर ठेवली आणि किचनमध्ये जायला वळली. तितक्यात मोहितने तिला विचारले,

“मीरा, तू कुठे गेली होतीस/ मी काय विचारतोय? ऐकलं नाहीस का? तू मानसला घ्यायला का गेली नाहीस?”

तशी मीरा, कसनुस हसत म्हणाली “अरे त्याच काय झालं माहित्येय का…म्हणजे मी जाणारच होते…म्हणजे त्यासाठीच निघाले होते खर तर…पण माझी ना धुळ्याची एक मैत्रीण पुण्यात आली होती, तिचा वाटेतच फोन आला आणि ती भेटायचं म्हटली. तिच्याकडे वेळ अगदी कमी होता. म्हणून मग तिला भेटायला गेले होते आणि तिथेच जरा उशीर झाला..”

एवढ बोलून ती परत जायला वळणार तोच मोहितने विचारले ,

“भेट कुठे होती? वाडेशवरला का?”

तशी ती दचकली, “तू…तुला कसं माहीत?”

मोहित हसत म्हणाला, “अग त्या डॉक्टर आनंदी भेटल्या मला मोहितला घेरी घेऊन येत होतो तेव्हा. त्यांच्याशी बोलताना तुझा विषय निघाला. त्या तुलाही भेटल्या होत्या ना वाडेश्वरला?, त्यांनीच सांगितलं मला. आणि तू एवढी काय दचकतेस एखादी चोरी पकडल्यासारखी”

“काही नाही रे, असंच” म्हणत मीरा किचनमध्ये निघून गेली..

त्या दिवसाची संध्याकाळ उजाडली, दिवसभरात मीरा ने फेसबुक लॉगिन केले नव्हते, संध्याकाळी सहज तिने फेसबुक ऑन केले तर 4-5 मेसेज टोन वाजले, अपेक्षेप्रमाणे रोहनचेच होते.. सकाळच्या प्रकारामुळे मीरा धास्तावली होती.. आपण करतोय ते बरोबर का याची तिच्या मनात अजूनही धाकधूक होती.. शेवटी तिने रिप्लाय केले.. थोडी बिझी आहे नंतर बोलते.. असे म्हणून तिने फेसबुक ऑफ करून टाकले..

संध्याकाळची जेवणं आटोपल्यावर परत तिने फेसबुक ओपन केले, 10-12 मेसेज रोहनचे होतेच,

“हे बघ, स्वतःची स्वप्न जगायची असतात, अशी मारायची नसतात.. you have a damn good talent, you are beautiful, तुझा पोर्टफोलिओ बनलाच पाहिजे, तुझं करिअर खूप ब्राईट असेल, विचार कर”

एवढं सगळं वाचून मीरा मनाशी सुखावली, तिची बोटं की पॅड वर टाईप करू लागली, ” प्लॅन ऑन आहे उद्या दुपारी 2 वाजता, छान फोटो काढून हवेत हा पण माझे, प्लेस कळव” असे म्हणून तिने फेसबुक ऑफ करून झोपेच्या अधीन झाली..

इकडे मोहितच्या मोबाईलवर मेसेज झळकला, नाव होते “रोहन” आणि मेसेज होता, “बॉस, ठरल्याप्रमाणे सकाळी 10 वाजता बरिस्ता कॅफेला, वाट पाहतोय, आणि डील विसरू नको”

कुठली डील होती मोहित आणि रोहन ची, का भेटणार होते दोघे? ही कुठल्या वादळाची चाहूल होती??

क्रमशः

लेखिका- मंजिरी राजेंद्र पाठक

ह्या दीर्घ कथेच वैशिष्ठ्य म्हणजे ह्या कथेचे १३ भाग आहेत आणि प्रत्येक भाग वेगवेगळ्या लेखकाने लिहिलेला आहे. त्यातही हे भाग लिहिणाऱ्या बहुसंख्य महिला आहेत. हा प्रयोग तुम्हाला कसा वाटतो आहे ते कॉमेंट मध्ये अवश्य सांगा. समाज माध्यमांवर मिळणाऱ्या क्षणिक अटेन्शन आणि कौतुकाने हुरळून जाऊन चुकीचे पाउल उचलणाऱ्या अनेक महिला आपण बघितल्या आहेत. अश्या एका महिलेची ही कहाणी आहे. महिलांनीच लिहिलेली.

पुढील भागाची लिंक- चांद मातला भाग ४

मागील भागाची लिंक- चांद मातला – भाग २

हे पण वाचा-

सख्या रे …

ट्वेंटी थ्री

गुंतता हृदय – सर्व भाग

मृगजळ- सर्व भाग

व्हॅलेंटाईन डे- भाग १

रिफ्लेक्शन भाग १

आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा

आमच्या लघुकथा लघुकथा

माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख

आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण

ललित

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

2 thoughts on “चांद मातला भाग ३”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!