त्या अंधाऱ्या तीनेकशे मीटर लांब गल्लीत झेडपी ने लावलेले चार पिवळे दिवे. खोताच्या बंगलीला डावीकडे वळल की भात बाजारपर्यंत सापासरखी वळवळत जाणारी ती गल्ली. नानु भटजीच गळक घर वगळल्यास पुढे फक्त लाली बाईची रंगीत कोठी. तिथे रात्रभर दिवाळी असे. तबला, पेटी आणि पैंजणांचे सूर रात्री उशिरापर्यंत त्या बोळातून जाणाऱ्या तुरळक गावकऱ्यांना आधार देत. गल्ली संपली की गावाची दक्षिण हद्द आणि पलीकडे जंगल. त्यामुळे ह्या गल्लीत दिवसाही वर्दळ नसे. नानु भटजीला मयताची खबर देऊन मसणात बोलवायला येणारे आणि लालीबाईच्या माडीवर जाणारे येणारे सोडले तर गल्ली विराण असायची. रात्री तर भकास दिसायची. चार दिव्यातले तीन कायम बंद. भयानक लुकलुकत असलेला आणि दिल्या विजेला जागणारा फक्त एक मिणमिणता अंधुक पिवळा दिवा! काही दिवसांपूर्वीच लाली बाई गेल्यावर कोठीवर पण अंधार पसरला होता. त्या रात्री लालीबाई अचानक गाव सोडून गेली ती गेलीच. अनेक गुलछबू गावकऱ्यांच्या दिलाला धक्का लावून गेली. गावातली एकमेव आकर्षक “रोकडा सोय” अचानक नाहीशी झाल्याने आता मूड आल्यावर बाजूच्या गावात चंदाच्या माडीपर्यंत धीर धरून जावे लागणार ह्या विचाराने लालीचे तमाम कस्टमर हळहळत होते!

सुन्या म्हणजे सुनिल. घारू पाटलांच्या वंशाचा एकुलता एक दिवा. मुंबईला शिकून आलेला तरणाबांड गडी. सहा महिन्यांपूर्वी शिक्षण संपवून गावाकडे परत आलेला. जिल्ह्याचा उद्धार करायचा म्हणून पुढल्या इलेक्शनला उभं राहायचं लक्ष्य असलेला. त्याच्याच तयारीसाठी वर्षभर आधी येऊन फिल्डिंग भरत असलेला. आठ दहा दिवस दिल्लीत तळ ठोकून श्रेष्ठींशी सेटिंग लावून आज संध्याकाळी तो गावात परत आला होता. श्रमपरिहार म्हणून मित्रांबरोबर इंग्लिश खंबा रिचवून फुल झाला होता. फुल झाल्यावर सवयीने त्याचे पाय लालीच्या गल्लीत वळले. गेल्या सहा महिन्यांची सवय! पहिल्याच रात्री लालीने त्याला वेड लावलं होतं. त्या वेडाच व्यसन कधी झालं ते त्यालाच कळलं नाही!

आज देखील नशेत त्याची पावलं गल्लीकडे वळली. रस्त्यात दिसलेल्या एका पत्र्याच्या डब्याला सुन्याने लाथ घातली. डबा गडगडत, फुटका आवाज करत गल्लीत लांब जाऊन पडला. दोनेक कुत्री दचकून किंचाळली. अंधाऱ्या झाडांवर पंखात चोची खुपसून झोपलेल्या पक्ष्यांनी पंख फडफडत कूस बदलली. लांब कुठल्यातरी गोठयात गाय हंबरली. परत शांतता पसरली पण इतका वेळ निपचित पडलेली ती गल्ली सावध सापासरखी वळवळली. नानु भटजीच घर ओलांडून सुन्या पुढल्या वळणावर वळला. नानुच्या घराबाहेरच्या “प्रेतविधीचे सामान येथे मिळेल” असे लिहिलेल्या मळक्या बोर्डवरील धुळीने माखलेला, जळमटे साचलेला, अनेक दिवस बंद असलेला झिरोचा बल्ब आज अचानक पेटला! त्यावरच्या कोळ्याने दचकून जाळ्यात पाय घट्ट रोवत अंधाराचा आसरा घेतला!

सुन्या त्या एकमेव मिणमिणत्या दिव्याच्या खांबाजवळ पोहोचला. पुढल्या वळणावर लालीची कोठी. खाली मान घालून भेलकांडत चालत असलेल्या सुन्याने नजर सहज वर केली. त्या मिणमिणत्या दिव्याचा प्रकाशही त्याच्या डोळ्यांना प्रखर वाटला. एक हात कपाळावर धरत बारीक डोळे करून त्याने समोर बघितलं. त्याला दिव्याखाली लाली उभी असलेली दिसली. साज शृंगार करून त्याचं स्वागत करायला उभी असलेली. गोरा चेहरा. त्यावर मेकअप. कामुकतेने ओथंबुन वाहात असलेली नजर, लांबसडक केस, कमनीय बांधा, सोनेरी रंगाची घट्ट चोळी, पारदर्शक लाल साडी, त्यातून दिसणारे आणि नजरेला टोचणारे तिचे अंगांग! सुन्या उगाच फिदा नव्हता झाला! लाली लाडिक हसत होती. त्याला हाताने बोलावत होती. तिला तिथे बघून सुन्याची सगळी नशा एका क्षणात उतरली! त्याला प्रचंड घाम फुटला! 

सुन्या लालीच्या माडीवर जायला लागला आणि तिच्या प्रेमात पडला. लालीचा धंद्याचा उसुल पक्का होता. पैसे दो प्यार लो और भूल जाओ. ती सुन्याला सांगत होती तू माझ्या शरीरावर प्रेम कर. माझ्यावर नको. पण सुन्या वेडा झाला होता. त्याने तिची बरीचशी गिर्हाईक बंद केली होती. रात्रभर सुन्या तिच्याकडेच असल्याने धंदा फक्त दिवसा होत असे. सुन्याने तिला लग्नच वचन दिलं आणि लालीने उरला सुरला धंदाही बंद केला. आवक कमी झाली. पण लाली प्रेमात होती. पाटलीण व्हायची स्वप्न बघत होती. असेच काही दिवस गेले आणि दिवस गेल्याच एक दिवस लालीच्या लक्षात आलं. तिने सुन्याला गुपित सांगितलं. त्या रात्रीही सुन्या फुल होता. गुपित ऐकून त्या रात्रीही त्याची नशा खाडकन उतरली. लाली लग्नाची तारीख विचारू लागली. सुन्या तयार नव्हता. तो कारणं देऊ लागला. पोट साफ कर म्हणूं लागला. मग लालीपण इरेला पेटली. शब्दातून शब्द वाढला. सुन्याने तिला बेदम मारली. तिचं डोकं भिंतीवर अनेकदा आपटून तिची कवटी फोडली. पण श्वास सुरूच होता. लाली सहज हार मनात नव्हती. सुन्याने भिंतीवर लावलेले हरिणाचे मुंडके उचकटून काढले आणि त्याची शिंग तिच्या पोटात खुपसली. एकदा, दोनदा, दहा वेळा…शेवटी शिंग मोडली! हरिणाचा चेहरा रक्ताने भिजला! सुन्या भानावर आला. तिला उचलून त्याने कोठीच्या मागेच त्या हरिणाच्या मुंडक्यासकट पुरली! माडीवरचे रक्ताचे डाग धुवून सुन्या पहाटेच्या काळोखात पळाला! मग दिल्लीचे कारण काढून मुंबईला पळाला. गावात काहीच हालचाल नाही आणि फक्त लाली निघून गेली आहे इतकीच चर्चा असल्याची खात्री झाल्यावर परत आला. 

आज लालीला समोर बघून सुन्याला घाम फुटला. त्याचे हातपाय लटलटत होते. लाली लाडिक हसून दोन्ही हात पसरून त्याला बोलावत होती. सुन्या पळायला मागे वळला पण मागे गल्लीच नव्हती. होतं फक्त अथांग अंधाराच एक विवर! सुन्याने समोर बघितलं. तिथेही मगाचचा दिवा नव्हता. एका अंधाऱ्या,अमर्याद, कुबट वासाच्या पोकळीत लाली तरंगत होती! तिने तरंगत येऊन त्याला मिठीत घेतला. 

घारू पाटलाच्या घरी गाव गोळा झाला होता. त्यांची बायको धाय मोकलून रडत होती. तिचा एकुलता एक मुलगा सुन्या सोफ्यावर झोपला असताना भिंतीवरचे हरिणाचे मुंडके अचानक निखळले आणि हरिणाची शिंग छातीत घुसून जागेवरच मेला होता! प्रहर बदलत होता. अमावस्या संपायला काही मिनिटे उरली होती. 

लाली सुन्याला मिठीत घेऊन तरंगत होती. नानुभटजीच्या बोर्डावरच बल्ब आपोआप बंद झाला. नानुने दार वाजलं म्हणून हातात कंदील घेऊन दार उघडलं. “गुर्जी पाटलाच्या वाड्यावर मयत झालंय. चला!” असं एक गावकरी सांगत होता. वर काळोख्या आकाशात तरंगत वरवर जाणाऱ्या सुन्याला पुढे लाली दिसत होती आणि खाली दिसत होतं कोठीच्या मागे पुरलेलं, भेसूर हसत असलेलं, रक्ताने माखलेलं हरिणाचं मुंडकं! बाकी परत अजगरासारख्या आळसावलेल्या त्या वळणाच्या गल्लीत स्मशान शांतता होती!- ©मंदार जोग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!