मृगजळ मंदार जोग मराठी दीर्घकथा

सौरभच्या पाठीवरून घामाचा एक थेंब वरपासून खालपर्यंत घरंगळत गेला. त्याचे हात थंड पडले. पायातील त्राण गेल्यासारखं वाटलं आणि त्याने पुढ्यात असलेल्या खुर्चीचा आधार घेतला. त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. तो अडखळत म्हणाला—

सौरभ- रु…रुपेश, म…मला बोलावलं ना? क..काय झालं?

रुपेश- (शांतपणे) मला तुझ्या बायकोचा, अंकिताचा फोन आला होता. तिने मला तुझ्या आणि मानसीच्या रिलेशनशिपबद्दल सांगितलं.

हे ऐकून सौरभ हादरला. अंकिता त्याच्या ऑफिसमध्ये फोन करून घाण करेल, अशी त्याला अपेक्षा नव्हती.

सौरभ- न…No, रुपेश….अंकिताचा गैरसमज झालाय. मी आणि मानसी… We are just good friends… प्लीज..

रुपेश- सौरभ, प्लीज…ऑफिसमध्ये तुमच्याबद्दल आधीपासून चर्चा सुरू होती. मी ती इग्नोर केली. पण आता तुझ्या बायकोनेच फोन करून ते सांगितल्यावर मला action घेणं भाग आहे.

सौरभ- Action? काय action? आणि का? प्लीज. आमचं तसं काहीच नाहीये. आम्ही फक्त फ्रेंड्स आहोत. Colleagues आहोत. प्लीज, रुपेश.

रुपेश- Sorry सौरभ.. कंपनीची policy आहे की इथे employeesमध्ये कोणतंही रिलेशन असू शकत नाही. तुम्हा दोघांपैकी एकाला आज resign करावं लागेल. नाहीतर मला तुम्हा दोघांनाही terminate करावं लागेल.

हे ऐकून सौरभ चिडला. गेले दोन दिवस दाबून ठेवलेला त्याचा सगळा राग रुपेशवर निघाला. त्याने रुपेशची कॉलर धरली आणि ओरडला—

सौरभ- हरामखोर आहेस तू. तुझ्यात आणि अंकितामध्ये काहीही फरक नाहीये. One-track corrupt mind आहे तुमचं. कधीपासून सांगतोय की मी आणि मानसी फक्त फ्रेंड आहोत. आमच्यात त्या पलीकडे काहीच नाहीये, तरी तुम्ही ऐकत नाही. अरे, तू मला काय धमकी देतोस नोकरीवरून काढायची? मीच सोडतो तुझी ही फालतू नोकरी. भेन्चो@.

इतका वेळ तिथे उभी असलेली मानसी मध्ये पडत सौरभला मागे ओढत म्हणाली—

मानसी- सौरभ, प्लीज….शांत हो. प्लीज…

सौरभ- कसा शांत होऊ? तू ऐकलंस ना हा रुपेश काय बोलतो आहे ते? तुझं आणि माझं लफडं आहे? तूच सांग मानसी, आपलं लफडं आहे का? नाहीये ना? मग सांग ह्या चुत्याला आणि सांग त्या माझ्या हरामखोर बायकोला. प्लीज…

इतकं बोलून तो रुपेशच्या केबिनमधून बाहेर पडला. आपल्या डेस्कवर येऊन आपलं सामान जमा केलं आणि ऑफिसमधून निघून गेला. मानसी तिच्या क्युबिकलमध्ये डोक्याला हात लावून बसली होती. ऑफिसमध्ये लोकांना कुणकुण लागली होती. लोक हळूच कुजबुजत होते. मानसी शांत बसली होती, डोळे मिटून. तिला लोकांची परवा नव्हती. तिला सौरभची काळजी वाटत होती. त्याची काहीच चूक नसताना त्याच्या आयुष्याची माती झाली होती आणि तिने पाठवलेले फोटो त्यासाठी निमित्त ठरले असल्याने तिच्या मनात थोडी अपराधी भावनाही होती.

सौरभच्या घरी त्याने नोकरी सोडल्याचं कळल्यावर अंकिता आणखी चिडली. त्याला वाट्टेल ते बोलू लागली. सौरभ काहीही न बोलता फक्त ऐकून घेत होता. असेच काही दिवस गेले. सौरभ नोकरीच्या शोधात होता. अंकिता रोज त्याला बोल लावत होती. लफडेबाज, ऐतखाऊपासून वाट्टेल ते बोलत होती. त्यांच्यातला बाकी संवाद संपलेला होता. हर्षदलाही तिने आपल्या बाजूने केलं होतं. त्यामुळे तो पण आपला बाप लफडेबाज आहे, बेकार आहे, त्याने आईची फसवणूक केली आहे, ह्या समजात होता आणि हल्ली मधूनमधून तो सौरभला ते ऐकवू लागला होता.

एक दिवस जेवताना सौरभने हर्षदकडे भाजी मागितली. ते ऐकून अंकिता म्हणाली—

अंकिता- दे बाबा…भाजी दे बाबांना. ती ह्याची रखेल ह्याला बाकी सगळं देईल. जेवण इथेच मिळेल. ती फुकटात पोसणार नाहीये ह्याला.

हे ऐकून सौरभ चिडला. पण मनावर संयम ठेवत शांतपणे म्हणाला—

सौरभ- अंकिता, if you hate me so much… तू मला डिव्होर्स दे. मी तो आनंदाने स्वीकारेन.

हे ऐकून अंकिता जोरात ओरडली—

अंकिता- हर्षू, ऐकलंस का? हा प्लॅन आहे दोघांचा. मला डिव्होर्स द्यायचा की मी आणि तू घरातून बाहेर. मग हा त्या मानसीला इथे आणेल आणि दोघे ह्या माझ्या भरल्या घरात नंगा नाच करतील. पण लक्षात ठेव सौरभ. मी तुला कधीच डिव्होर्स देणार नाही आणि ह्या घरातून कुठेही जाणार नाही. हे घर मी भरलं आहे माझ्या मेहनतीच्या पैशांनी. ते मी तुझ्या त्या रखेलीसाठी सोडून जाणार नाही. परत डिव्होर्सबद्दल बोललास ना तर तुझ्यावर domestic violence ची केस टाकेन. मग बस तुरुंगात खडी फोडत.

सौरभ वैतागून जेवणावरून तसाच उठला आणि हात धुऊन बिल्डिंगच्या गच्चीत गेला. एक सिगारेट पेटवली आणि समोर दिसत असलेल्या शेकडो इमारती आणि दिव्यांकडे बघत बसला. त्याला काय वाटलं कुणास ठाऊक, त्याने मानसीला मेसेज केला.

सौरभ- हाय…

मानसी- हाय…

सौरभ- झोपलीस का?

मानसी- नाही.

सौरभ- Sorry…अंकिताच्या मूर्खपणामुळे ऑफिसात तुला…

मानसी- It’s OK सौरभ…मी समजू शकते. तू कसा आहेस? नोकरीचं काही झालं का?

सौरभ- नाही. प्रयत्न सुरू आहेत. उद्या भेटूया का? आपल्या…Sorry, तुझ्या lunch time मध्ये.

मानसी- Sure. ब्रिटिश बिस्त्रोमध्ये?

ब्रिटिश बिस्त्रो हे महाग restaurant होतं. सौरभला सध्या नोकरी नसताना तिथे जाणं परवडणार नव्हतं. तो क्षणभर विचार करत होता, इतक्यात मानसीचा मेसेज आला—

मानसी- But I will pay… तरच भेटू.

सौरभ- पण मानसी…

मानसी- उद्या शार्प १.३०. ब्रिटिश बिस्त्रो.

सौरभ- ओके. See you.

दुसऱ्या दिवशी सौरभ शार्प दीड वाजता ब्रिटिश बिस्त्रोमध्ये पोहोचला. स्मोकिंग झोनमध्ये टेबल एंगेज करून बसला. एक सिगारेट पेटवून मानसीची वाट बघू लागला. पाच मिनिटांत मानसी आली.

मानसी- हाय…किती वेळ झाला तुला येऊन? Sorry यार. You know the traffic..

सौरभ- Yes. मी पण आत्ताच आलोय.

मानसी- ओह…मग माझी sorry मी मागे घेते.

हे बोलून बसत ती हसली. सौरभही हसला.

मानसी- आज तुला खूप दिवसांनी बघते आहे. आणि हसताना तू अजूनही तितकाच क्युट दिसतोस, हे पाहून बरं वाटतंय मला.

सौरभ- कशी आहेस तू?

मानसी- कशी वाटते आहे? एकदम मस्त. काय घेणार तू?

सौरभ- कॉफी…Black coffee…

मानसी- ए हेलो, आपण लंचला भेटलो आहोत. कॉफीला नाही. मला तरी जाम भूक लागली आहे. मी ऑर्डर करू का आपल्या दोघांसाठी?

सौरभ- हम्म…ठीक आहे. कर.

तिने ऑर्डर दिली आणि सौरभच्या पाकिटातून एक सिगारेट काढून पेटवत म्हणाली—

मानसी- सौरभ, प्लीज…तुला ना असा शांत, रडका बघवत नाही यार.

सौरभ- हम्म…पण सध्या हाच मूड आहे माझा. You know…

मानसी- Yes, I know… पण असा मूड घालवून काय मिळणार आहे? तुझी नोकरी परत मिळणार आहे की अंकिताचा राग कमी होणार आहे? हे बघ, जे झालं ते आपल्या हातात नव्हतं. आणि आपल्याला माहीत आहे की त्यात आपला दोघांचाही काहीही दोष नव्हता. असलाच तर दोष माझा होता. मी तुला ते फोटो पाठवले नसते तर जे झालं ते झालंच नसतं. त्यासाठी I am sorry यार.

सौरभ- तू का sorry म्हणतेस? तू काय ते अंकिताला मिळावेत, तिचा गैरसमज व्हावा म्हणून पाठवले नव्हतेस ना? जे झालं ते नशीब होतं माझं. त्यात तुझी काहीच चूक नाहीये.

इतक्यात जेवण आलं. दोघेही मान खाली घालून शांतपणे जेवले. आता पुढे काय बोलायचं ते दोघांनाही सुचत नव्हतं. जेवण झाल्यावर मानसीने दोन black coffee मागवल्या.

मानसी- तुला black coffee हवी होती ना? म्हणून मागवली. Happy?

सौरभ- हम्म…Thanks. पण happy वगैरे नाहीये सध्या.

मानसी- हम्म…I understand. अंकिताचा राग होईल कमी हळूहळू.

सौरभ- नाही मानसी. तू तिला ओळखत नाहीस. ती मला कधीच माफ करणार नाही. ती मला सतत टोचून टोचून बोलून मारून टाकेल.

मानसी- What? अरे पण तुमचं love marriage आहे ना? मग?

सौरभ- मग काय? Love is blind ह्याचं अंकिता हे best उदाहरण आहे. कॉलेजला असताना अंकिता हट्टी होती. Ego पण खूप होता तिला…पण मला वाटलं होतं की पुढे maturity आल्यावर ती नॉर्मल होईल. आमचं लग्न पण आम्ही पळून जाऊन केलं. माझ्या घरून लग्नाला विरोध होता आणि तिला तिच्या घरातून बाहेर पडायचं होतं.

मानसी- का?

सौरभ- तिचं तिच्या वडिलांशी पटायचं नाही. त्यांचा स्वभाव सेम तिच्यासारखाच होता. हट्टी, ego असलेला आणि भांडखोर. त्यामुळे दोघांचं पटायचं नाही. म्हणून ती मागे लागली होती लग्न करायला आणि आम्ही लग्न केलं. लग्नानंतर आम्ही काही वर्षं माझ्या घरी न राहता वेगळी जागा घेऊन राहिलो. मग हळूहळू माझ्या घरच्यांनी आमचं लग्न स्वीकारलं आणि आम्ही माझ्या आताच्या घरी राहू लागलो. मग माझी नोकरी गेली. बेकार होतो काही वर्षं. तेव्हा तिने ट्युशन करून घर सांभाळलं. पण ते करताना मला इतकं ridicule केलं की ती माझ्या मनातून उतरली. आता आम्ही नवरा-बायको दुनियेसाठी आहोत. आमचं नातं कधीच संपलं आहे. ती मला hate करते आणि मी तिला avoid करतो. म्हणूनच मी तिला डिव्होर्स देण्याचा पर्याय समोर ठेवला. तर ती म्हणाली की ती मला असा सोडणार नाही. ती आयुष्यभर माझ्या आयुष्यात राहून मला रोज छळणार. मी न केलेल्या चुकीची आठवण करून देत मला टोचत राहणार.

मानसी- हम्म…त्या बाबतीत मी लकी आहे.

सौरभ- म्हणजे?

मानसी- म्हणजे माझा डिव्होर्स दोन महिन्यांत grant होईल.

हे ऐकून सौरभ शॉक होत म्हणाला—

सौरभ- What? म्हणजे तुझ्या नवऱ्याने आपल्यावर संशय घेऊन…

मानसी- No, no…तुझा त्यात काहीच संबंध नाहीये. माझी स्टोरी वेगळीच आहे…सांगेन फुरसत असेल तेव्हा…

सौरभ- फुरसत आजच आहे. मला सांग.

मानसीने कॉफीचा एक सिप घेतला. सिगारेट पेटवली आणि सौरभच्या नजरेला नजर मिळवत ती बोलू लागली.

मानसी- वीस वर्षांपूर्वी….

क्रमशः

पुढील भाग मृगजळ – भाग ४

मृगजळ सर्व भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा- मृगजळ- सर्व भाग

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. MandarJOG.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

2 thoughts on “मृगजळ – भाग ३”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!