मृगजळ मंदार जोग मराठी दीर्घकथा

मृगजळ भाग १५

मानसीने बाहेर येऊन गाडी सुरू केली आणि तेव्हाच तिला एक फोन आला. तिने फोन घेतला. फोनवर एका पुरुषाने विचारलं-

आवाज- BYK कॉलेजची माधुरी दीक्षित कशी आहे?

तो आवाज ऐकून मानसी क्षणभर शॉक झाली. तिच्या डोळ्यात चमक आली. मानसीने ओरडून विचारलं-

मानसी- श्रीरंग? तू?

श्रीरंग- Yes, my love.

मानसी- तू सुधारला नाहीस ना?

श्रीरंग- तू ज्याला बिघडवतेस तो कधी सुधारू शकतो का, स्वीट हार्ट?

मानसी- नालायका, तू जिवंत आहेस?

श्रीरंग- काय करणार? तुझ्या नजरेच्या बाणांनी मरायचं नाही म्हणून अमेरिकेला पळून गेलो होतो. लेकीन आज फिर मरनेका इरादा है… म्हणून तुझ्या शहरात आलोय.

मानसी- (अविश्वासाने) काय सांगतोस? तू इंडिया मध्ये आला आहेस नालायका?

श्रीरंग- हो. इंडियन नंबरवरून फोन केलाय मी म्हणून तर तू ओळखू शकली नाहीस कोणाचा फोन आहे ते.

मानसी- Wow. कधी भेटतो आहेस?

श्रीरंग- मी म्हणालो ना, मारायची इच्छा आहे म्हणून आलोय. तुला मारायची इच्छा असेल तेव्हा सांग. बंदा हाजीर हो जायेगा. पण पत्ता पाठव तुझा आणि लोकेशन.

मानसी- (जरा विचार करून) हम्म… आज ऑलरेडी नऊ वाजले आहेत रात्रीचे.

श्रीरंग- ते रोज रात्री वाजतात. So?

मानसी- हो… म्हणजे…

श्रीरंग- ए पोरी… तू इतकी फॉर्मल आणि सभ्य कधी झालीस गं? आणि ती पण माझ्याशी? तुला त्या तुझ्या यतीनने पटवली नसती ना तर आजवर तुला माझ्या आठ-दहा मुलांची आई केली असती मी.

मानसी- गप रे…

श्रीरंग- बरं, आठ-दहा नको. चार-पाच?

मानसी- मार खाशील तू रंगा.

श्रीरंग- तुझ्या हातच्या मारामध्ये पण मला प्यार दिसतं.

मानसी- शी रे… हे अगदी फालतू आहे. कॉलेजात बऱ्या कविता करायचास तू. अमेरिकेने वाट लावली तुझी.

श्रीरंग- तिथे तू नव्हतीस ना… काय म्हणतात ते inspiration ला मराठीत?

मानसी- प्रेरणा…

श्रीरंग- हा, प्रेरणा नव्हती ना अमेरिकेत म्हणून जरा गंज लागला आहे माझ्यातल्या कवीला.

मानसी- का? इतक्या गोऱ्या गोऱ्या प्रेरणा असतील आजूबाजूला. आणि तू तर श्रीरंग म्हणजे कृष्ण. तुला प्रेरणांची काय कमी?

श्रीरंग- नाही ना यार. माझी प्रेरणा म्हणजे इंडियन ब्युटी, इंडियन गोरी… मोठ्या चॉकलेटी डोळ्यांची, लांब केसांची, निमुळत्या लांब बोटांची… देवीसारख्या चेहऱ्याची आणि curvy body ला मराठीत काय म्हणतात? शी यार… लिंक तुटली…

मानसी- कमनीय शरीर…

श्रीरंग- हा, कमनीय शरीर असलेली आहे. ती इथे इंडियात आहे. अशा हजार अमेरिकन गोऱ्या तिच्यापुढे कुर्बान… आज भेटतेस का सांग. Single malt आणली आहे.

मानसी- हम्म… ठीक आहे. ये घरी, मी पत्ता पाठवते. पण एक अट आहे.

श्रीरंग- काय?

मानसी- अजिबात फ्लर्ट करायचं नाही. गुड बॉयसारखं वागायचं.

श्रीरंग- बघ हा. मला चालेल. पण तुला फ्लर्ट न करणारा रंगा किती वेळ सहन होईल ह्याचा विचार कर. ह्या अख्ख्या जगात तुझी इतकी मनापासून स्तुती दुसरा कोणी करतो का? स्वतःलाच विचार आणि मला सांग, आज मी कसा वागू ते.

मानसी- (हसून) तू सुधारणार नाहीस आणि आता सुधारायचं वयही निघून गेलं आहे तुझं. त्यामुळे तू ये आणि हवा तसा वाग. मित्र आहेस बाबा. काय करू. करते सहन तुला आज काही तास.

श्रीरंग- Madam, सहन करायच्या ऐवजी प्रेमात पडला नाहीस म्हणजे झालं.

मानसी- काय?

श्रीरंग- हो. म्हणजे बघ ना. एक डिव्होर्स झालेली चिकणी बाई, तिचा अमेरिकेत राहिलेला श्रीमंत handsome मित्र जो पूर्वीपासून तिच्यावर खुल्लमखुल्ला लाईन मारतो. दोघे एका रात्री, एकाच घरात एकत्र, सिंगल मॉल्टचा इफेक्ट आणि मग स्क्रीनवर दोन फुलं एकमेकांना चिकटलेली दाखवून थेट सकाळ असा सिनेमा.

मानसी- (जोरात हसून) तू गप ना रे रंगा… काहीही बोलतोस तू. लाज वाटते का गाढवा आपल्या मैत्रिणीबद्दल असा विचार करताना?

श्रीरंग- विचार काय, मला तर कृती करताना पण लाज नाही वाटणार. आणि तुला ते माहित आहे.

मानसी- मला माहित आहे तू काय आहेस ते. ये नालायका. घरी ये तू. मग दाखवते तुला. मुगाच्या डाळीची खिचडी आणि आंबट कढी अजूनही आवडते ना तुला की आता बर्गर आणि सबवे मध्ये हरवला आहेस.

श्रीरंग- चायला, ज्याला फिरंग बायका नाही आवडल्या त्याला फिरंगी जेवण का आवडेल. आपली आवड एकच, मानसी आणि मानसीच्या हातची मुगाच्या डाळीची खिचडी आणि आंबट कढी.

मानसी- वेडा आहेस तू. ये… वाट बघते…

मानसीने फोन कट केला. तिला अचानक खूप बरं वाटत होतं. रंगा भारतात आलाय आणि तो भेटणार आहे ह्या विचाराने ती सुखावली होती. श्रीरंग तिचा कॉलेजमधला मित्र. कधी कसे भेटले ते दोघांनाही आठवत नाही. पण दोघे खूप घट्ट फ्रेंड झाले. मानसी आणि यतीनचं अफेयर सुरू झालं तेव्हा श्रीरंगला यतीन आवडला नव्हता. त्याने मानसीला warn देखील केलं. पण मानसी निर्णयावर ठाम होती. मग रंगाने तिला सपोर्टच केला. रंगा दिसायला रुबाबदार, हुशार आणि मोकळ्या स्वभावाचा होता. त्याला मानसी आवडते हे त्याने तिला जेव्हा ती आवडू लागली तेव्हाच सांगितलं होतं. तो स्वतःच्या प्रेमाला निष्काम कर्मयोग म्हणत असे. म्हणजे मानसीकडून प्रेमाची अजिबात अपेक्षा न करता तो तिच्यावर प्रेम करत असे. त्याला यतीन आणि मानसीचं नातंही मान्य होतं कारण मानसी त्यात सुखी होती. पुढे तो शिकायला अमेरिकेला गेला आणि अनेक वर्षं परत आला नाही. फोनवर मानसीशी टचमध्ये होता. तिचा डिव्होर्स झाल्याचं त्याला माहित होतं. पण मानसीने सौरभबद्दल त्याला सांगितलं नव्हतं! त्याच्याशी बोलताना मानसी सौरभला आणि त्याच्याशी मगाशीच झालेल्या चर्चेला पूर्ण विसरली होती. तिने रंगाला तिचा पत्ता आणि लोकेशन पाठवलं आणि घरी जायला निघाली.

मानसीने घरी येऊन रंगाला आवडायची तशी खिचडी आणि आंबट कढी बनवली. शॉवर घेऊन चेंज करून ती रंगाची वाट बघू लागली. तो अजून कसा आला नाही ह्या विचाराने ती जरा अस्वस्थ झाली. तिने एक सिगारेट पेटवली आणि टीव्ही लावला. समोर काहीतरी न्यूज दिसत होत्या. आवाज म्युट ठेऊन ती समोर दिसणारं चित्र हलताना बघत होती. इतक्यात फोनमध्ये नोटिफिकेशन आलं. सौरभचा मेसेज होता.

मेसेज- बेबी… खूप कंटाळा आलाय. घरी येऊ का? दोन ड्रिंक घेऊ. मी घरातून बाहेर पडायचं आहे ते डिस्कस करू. I will stay over. सकाळी जाईन मी घरी. ११ पर्यंत येतो.

तो मेसेज वाचून मानसीने निर्विकारपणे रिप्लाय केला.

रिप्लाय- आज नको. मी दमलेली आहे. मी झोपणार आहे. गुड नाईट.

तिने मेसेज सेंड केला आणि दाराची बेल वाजली. मानसीने दार उघडलं. समोर handsome चेहऱ्याचा आणि तितक्याच सुंदर मनाचा श्रीरंग हातात १८ इयर्स ओल्ड स्कॉचची बाटली आणि मानसीला आवडणाऱ्या रजनीगंधाचा बुके हातात धरून हसत उभा होता.

क्रमश:

मृगजळचा पहिला भाग. मृगजळ …भाग १नवीन वाचकांनी कथा सलग वाचायला वरील लिंक क्लिक करून पहिल्या भागापासून वाचा.

मृगजळ सगळ्या भागांच्या लिंक- मृगजळ- सर्व भाग

आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा

आमच्या लघुकथा लघुकथा

माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख

आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!