मृगजळ सीझन २ भाग ११- घराबाहेर
दुसऱ्या दिवशी सकाळी सौरभ त्याच्या आईशी बोलत होता.
आई- अरे, असं अचानक दिल्लीला का? आणि तुझ्या बिझनेसचं काय? अचानक परत नोकरी का?
सौरभ- आई आता चांगला ब्रेक मिळतोय ह्या वयात तर मी नाकारू का? उत्तम पगार मिळणार आहे. पण आजच जावं लागतंय.
आई- ही अशी कुठली नोकरी आहे की आज, आत्ता जावं लागणार आहे? तू माझ्यापासून नक्की काहीतरी लपवतो आहेस.
सौरभ- नाही आई. उलट तुला जे आहे ते सांगतोय. तू इथे रहा अंकिता बरोबर.
आई- नको. मला तुझ्या बरोबर घेऊन चल.
हे बोलताना आईने तिथेच फोन बघत बसलेल्या अंकिताला जळजळीत लूक दिला. अंकिता मात्र आपलं लक्षच नाही अस दाखवत फोनमध्ये बघत होती. आईचा हा stand पाहून सौरभ गडबडला.
सौरभ- न..नाही आई. तुला असं नेता येणार नाही. म्हणजे मला जरा सेटल होऊ दे तिथे. मग नेईन मी तुला. तोवर इथेच रहा ना तू.
आई- अजिबात नको. तुला बरोबर नेता येत नसेल तर गावाला सोड मला.
सौरभ- पण आई…
आई- मी bag भरते आहे.
हे बोलून आई रागातच bag भरायला तिच्या खोलीत गेली. सौरभ रागाने अंकिता कडे बघत होता. अंकिता शांतपणे म्हणाली-
अंकिता- जाताना तुझ्याकडे असलेल्या keys मला देऊन जा.
हे बोलून अंकिता उठून निघून गेली. सौरभने किल्लीचा सेट खिशातून काढून डायनिंग टेबलवर आदळला. इतक्यात आई bag घेऊन आली. सौरभ आणि आई आपापल्या bags घेऊन घरातून बाहेर पडले. सौरभ आईला तिच्या घरी सोडायला निघाला.
इथे मानसी रागाने थरथरत श्रीरंगकडे बघत होती. श्रीरंग निर्विकार उभा होता.
मानसी- तू…तुला कोणी सांगितला होता हा आगाऊपणा करायला? काय संबंध तुझा? तू स्वतःला खूप शहाणा समजतोस ना?कोणत्या हक्काने तू आमचं प्रायव्हेट conversation रेकॉर्ड करून अंकिताला ऐकवलंस? तू स्वतःला James Bond समजतोस का? तुझ्यामुळे सौरभचा संसार तुटला आहे. तुझ्यामुळे आज तो बेघर झालाय. काय मिळवलंस तू हे करून? सांग रंगा…बोल…काय मिळवलंस तू हे सगळं करून.
श्रीरंग- तुझ्यासाठी एक चष्मा…
त्याच उत्तर ऐकून मानसी आणखी वैतागली आणि म्हणाली-
मानसी- नीट बोल हं रंगा. मी इथे मस्करी करत नाहीये. मान्य कर ना हे तू स्वतःच्या स्वार्थासाठी केलंस. तुला वाटलं मानसी आणि सौरभचं तुटलं की ती माझ्याकडे येईल. हो ना? म्हणून तू आमच्या लाईन मध्ये हे प्रॉब्लेम तयार केलेस. आता ती अंकिता सौरभला डिव्होर्स देणार नाहीये. म्हणजे आमचं लग्न होणारच नाहीये. म्हणजे आता तुझा मार्ग मोकळा आहे. कर ना मान्य तू हे सगळ स्वार्थासाठी केलंस म्हणून.
श्रीरंग- नाही मानसी. मी हे तुझ्या चष्म्यासाठी केलं.
मानसी- चष्मा? हे..हे काय बोलतो आहेस तू?
श्रीरंग- एक असा चष्मा जो तुला दाखवून देईल कि तू ज्यामागे धावते आहेस इतकी वर्ष ते मृगजळ आहे, खरं पाणी नाही. सौरभ तुझ्याशी कधीच लग्न करणार नव्हता आणि आता जर अंकिता त्याला डिव्होर्स देणार नसेल तर त्याला आणखी कारण मिळालं आहे. ऐक. अंकिताचा हा stand मलाही नवीन आहे. मला वाटलं होतं की अंकिता त्याला डिव्होर्स देईल. तुमचा लग्नाचा मार्ग मोकळा होईल. पण तरीही सौरभ तुझ्याशी लग्न करायला नकार देईल आणि मी prove करेन की बघ त्याला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये. पण अंकिताने जे केलं ते करून माझा प्लान फेल केला आहे. Yes मला तुझ्याशी लग्न करायचं आहे आणि ते आज नाही आपण कॉलेजमध्ये असल्यापासून आहे. इथे आल्यावर तुला आणि सौरभला एकत्र पाहून मी परत गेलो होतो यूएसला. तू मला परत बोलावलंस म्हणून मी आलो. सौरभ तुला फसवत होता आणि फसवतो आहे हे मला सिद्ध करायचं होतं. आता तर ती शक्यताच संपली आहे. सौरभकडे आयुष्यभर पुरेल असं कारण आहे; तुझ्याशी लग्न न करता तुझ्या बरोबर राहाण्याचं. त्यामुळे तो जिंकला आहे आणि मी हरलोय. तुला सत्य दाखवणारा चष्मा देण्याचा माझा प्लान फेल झालाय. मी उद्याच यूएसला परत जातो. तू आणि सौरभ आनंदात रहा. आणि भविष्यातही कधी गरज लागली तर एक मेसेज कर. मी येईन तुझ्यासाठी. बाय…
इतकं बोलून श्रीरंग तिथून निघून गेला. मानसी प्रचंड कन्फ्युज होऊन बसून राहिली. तिला ऑफिसला जायचं देखील भान नव्हत. दिवसभर ती झोपूनच होती. ती तहान भूक देखील विसरली. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दाराची बेल वाजली. तिने दार उघडल तर सौरभ होता. खूप दमलेला दिसत होता. हातात bag होती. तो तसाच तिथेच उभा राहिला आणि म्हणाला-
सौरभ- तू मला घरात घेणार आहेस कि तू पण मला हाकलणार आहेस? मग मी रस्त्यावर राहतो.
त्याची अवस्था पाहून मानसीला खूप भरून आलं. तिने पुढे होत त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली-
मानसी- प्लीज असं बोलू नको सौरभ…तू आधी आत ये.
त्याची bag उचलून घेत ती घरात आली. सौरभ पण आत येऊन सोफ्यावर बसला. तिने त्याला थंड पाणी दिलं. ते पिऊन सौरभ म्हणाला-
सौरभ- अंकिता ने मला फसवलं आहे. धमकी देऊन घराबाहेर काढलं आहे. वरून मला डिव्होर्स पण देणार नाही म्हणते आहे.
मानसी- हम्म..तू सांगितलंस मला.
सौरभ- तिच्यामुळे आई पण ह्या वयात आणि ह्या हेल्थ कंडीशन मध्ये गावाला गेली. मला आईशी खोटं बोलावं लागलं. मला आयुष्यभरासाठी अडकवून ठेवलं आहे तिने. स्वतः अफेयर करते आहे पण माझं अफेयर मान्य नाही. नशीब माझ्या आयुष्यात तू आहेस. मला राहायला हे घर आहे. नाहीतर मी रस्त्यावर आलो असतो त्या अंकितामुळे.
मानसी- सौरभ प्लीज इतका त्रास करून घेऊ नको. तू जेवलास का?
सौरभ- ह्या इतक्या त्रासात मला भूक लागलीच नाही.
मानसीला ते ऐकून खूप काळजी वाटली. ती रागाने म्हणाली-
मानसी- तू सकाळपासून उपाशी आहेस?
सौरभ- हो…पण ठीक आहे ना?
मानसी- अजिबात ठीक नाहीये. जेवण तयार आहे. मी वाढते तुला, नीट जेव. बियर घेणार का आधी? थंड बियर घे आणि जरा थंड हो.
सौरभ- हो चालेल.
ती बियर आणायला वळली आणि सौरभने तिला मागून मिठी मारली आणि म्हणाला-
सौरभ- मानसी…तू…तू माझ्या आयुष्यात नसतीस तर काय केलं असतं मी? किती काळजी घेतेस माझी.
अस म्हणून तो तिच्या मानेचा चुंबन घेऊ लागला. त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवत मानसी म्हणाली-
मानसी- आधी जेव आणि मग लाडात ये.
तिने त्याला बियरचा कॅन दिला आणि ती जेवण गरम करू लागली.
इथे श्रीरंग त्याची bag भरत होता. अंकिताने घेतलेल्या निर्णयामुळे सौरभचा खोटेपणा त्याला उघड करता येणार नव्हता. श्रीरंग प्रचंड निराश होता. मानसीला मिळवायची त्याची शेवटची आशाही आता संपली होती. उद्या रात्रीची त्याची फ्लाईट होती. काहीतरी तुटल्याचं फिलिंग त्याला अस्वस्थ करत होतं. तो हॉटेलच्या प्रशस्त काचेतून समोर दिसणारा रिकामा रस्ता बघत होता जो त्याला मानसी शिवाय रिकाम्या असलेल्या त्याच्या आयुष्यासारखा वाटत होता.
उमेश त्याच्या घरात अंकितासाठी बेड तयार करत होता. तो तयार करून त्याने स्वतःसाठी जमिनीवर गादी घातली आणि म्हणाला-
उमेश- तू इथे वर झोप मस्तपैकी. मी आहेच इथे खाली.
ते पाहून खूप awkward झालेली अंकिता म्हणाली
अंकिता- कशाला? तू तुझ्या बेडवर वर झोप…आणि मी खाली झोपेन गादीवर.
उमेश- नाही. तू माझ्या आयुष्याची boss आहेस. क्लासमध्ये आणि आता घरातही. आणि boss नेहमी उच्चासनावर असते. सो, तू वर झोपायचं आणि मी इथे खाली. उद्या लग्न झालं की…
हे ऐकून अंकिता लाजली. तेव्हा उमेश तिच्या जवळ येऊन तिचा हात हातात घेत म्हणाला-
उमेश- अंकिता…आपलं लग्न होत नाही तोवर तू बेडवर झोपशील आणि मी खाली गादीवर. I promise that. लग्न होईपर्यंत आपण खूप चांगले मित्र असू, प्रेमिक असू पण मी हे बंधन पाळेन.
अंकिता- आणि मी सौरभला कधीच डिव्होर्स दिला नाही तर?
उमेश- ते मी तुझ्यावर सोडतो. मी वाट बघेन. असं म्हणून त्याने अंकिताच्या कपाळाचं चुंबन घेतलं आणि तो गादीवर झोपला. अंकिता वर बेडवर झोपून त्याच्याकडे बघत विचार करत होती “उमेश तू मला आयुष्यात आधी का नाही भेटलास?”
सौरभ बेडवर पडून मानसीची वाट बघत होता. मानसी सगळं आवरून त्याच्या शेजारी येऊन पडली. सौरभ तिच्याशी जवळीक साधू लागला. मानसी तिच्याच विचारात होती. ती छताकडे बघत विचार करत होती. सौरभ तिच्या अधिकाधिक जवळ येत होता इतक्यात मानसी म्हणली-
मानसी- सौरभ, अंकिता तुला डिव्होर्स देणार नाहीये म्हणाली ना?
सौरभ- हे काय आता मधेच? सोड ना…
मानसी उठून बसली आणि त्याला दूर करत म्हणाली-
मानसी- सांग ना सौरभ. अंकिता तुला डिव्होर्स देणार नाहीये ना?
सौरभ- हो. डिव्होर्स देणार नाही म्हणाली.
मानसी- तू तिला डिव्होर्स देऊच शकतोस ना? तेच तर करणार होतास तू इतकी वर्ष. आता तर ते आणखी सोपं झालय. तू डिव्होर्स फाईल कर.
हे ऐकून सौरभ चिडला. उठून सिगारेट पटवून म्हणाला-
सौरभ- हे काय नाटक आहे यार? तुला आणि त्या अंकिताला डिव्होर्स व्यतिरिक्त काहीच सुचत नाही का? मी जर डिव्होर्स फाईल केला तर ती तो अजिबात accept करणार नाही हे तिने स्पष्ट सांगितल आहे. ती मला सुप्रीम कोर्ट पर्यंत खेचेल म्हणाली आहे. त्यात माझ्या आईला शॉक बसेल. हर्षदच्या लग्नात प्रॉब्लेम्स येतील. माझी वाट लागेल. तुला काय, सोपं आहे सगळं. माझ्या commitments, स्टेटस आणि नाती आहेत. इतक सोपं नाहीये डिव्होर्स फाईल करणं.
मानसी- मग का वचन दिलंस मला लग्नाचं? का खेळवत ठेवलंस इतकी वर्ष? डिव्होर्स न देता लग्न करणार होतास माझ्याशी? तो देता येणार नाही हे माहित होत ना तुला? तरी मला फसवत राहिलास तू? लाज नाही वाटत तुला?
आपण काय बोलून गेलो हे सौरभच्या लक्षात आल. आता हे वाढलं तर डोक्यावरून छत आणि जेवणाची सोय संपेल हे लक्षात आल्याबर तो लगेच म्हणाला-
सौरभ- असं नाहीये मानसी. मी..मी देतो ना…देतो तिला डिव्होर्स…आपण जाऊ ना सुप्रीम कोर्ट पर्यंत…मी तुझ्यासाठी हे नक्की करेन. थोडा वेळ तर दे. आज तर मी घरातून बाहेर पडलोय. थोडे सेटल होऊया आपण. आता आपण एकत्रच राहायचं आहे ह्या घरात. थोडे एकमेकांशी adjust होऊया..मी आईला आपल्याबद्दल स्पष्ट सांगतो…मग डिव्होर्स फाईल करतो. विश्वास आहे ना माझ्यावर? तू प्लीज शांत हो आणि झोप आता. इतका स्ट्रेस नको घेऊ. उद्या ऑफिस आहे ना? झोप आता आणि trust me. ओके?
त्याने मानसीला मिठी मारली. मानसी सावकाश बेडवर आडवी झाली. तो तिच्या शेजारी झोपला. मानसी त्याच्या छातीवर डोकं ठेवून त्याच्या प्रेमात हरवून गाढ झोपी गेली. सौरभ मात्र मानसीच्या ह्या कटकटीवर काय आयडिया करता येईल ह्याचा विचार करत जागा होता.
नियती रात्रीच्या त्या प्रहरात आपल शेवटचं दान आपणच हतबल केलेल्या लोकांपैकी कोणाच्या पदरात टाकायचं हे ठरवत विक्राळ हसत होती.
क्रमश:
मागील भागाची लिंक- मृगजळ सीझन २ भाग १०- सरप्राईज
पहिल्या सीझनच्या सर्व भागांची लिंक- मृगजळ- सर्व भाग
मृगजळ सीझन २ चे सर्व भाग – मृगजळ- सिझन २- सर्व भाग
हे पण वाचा-
आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा
आमच्या लघुकथा लघुकथा
माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख
आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण

मानसी मूर्ख वाटू लागली आहे आताशा
मला पहिल्या सिझन पासून वाटतंय मानसीचा डोळे उघडले पाहिजे. पण ती आजच्या काळातली स्त्री आहे तर सौरभ नाही तर श्रीरंग अशी निवड तिने करायला नको . तिने कोणाच कडे न जाता स्वतः वर लक्ष केंद्रित करावं . तीच प्रेम सौरभ आहे जो नालायक निघाला. श्रीरंग वर तिचे प्रेमच नाहीये फक्त मैत्री आहे तर तिने कुणी तरी असावं म्हणून त्याच्या कडे जाऊ नये.