मृगजळ भाग १४–
सकाळी सौरभ आणि मानसी एअरपोर्टकडे निघाले. लगेज चेक इन करून बोर्डिंग घोषणेची वाट बघत गेटजवळ बसले होते. मानसी फार काही बोलत नव्हती. तिला सौरभ आता फोन करेल अशी अपेक्षा होती. काही मिनिटं शांततेत गेली. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. त्याने पाहिलं तर फोन अंकिताचा होता. तिचं नाव फोनवर मानसीने देखील पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्कंठा दिसू लागली. सौरभने फोन घेतला.
सौरभ- हेलो…
अंकिता- आईंना हॉस्पिटलमध्ये ठेवलं आहे.
सौरभ- (काळजीने) काय?
अंकिता- हो… त्यांच्या शेजारचे शेलार काका तुला फोन लावत होते पण तुझा फोन रिचेबल नव्हता म्हणून मला फोन केला त्यांनी.
सौरभ- पण झालंय काय नक्की?
अंकिता- त्यांची शुगर शूट झाली आणि बीपी पण जवळजवळ १८० झालं होतं. त्यामुळे चक्कर येऊन त्या पडल्या होत्या. डोक्याला मार लागला आहे. शेजाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये ठेवलं आहे. आता तब्येत बरी आहे. पण…
सौरभ- ठीक आहे… मी… मी एअरपोर्टवरून डायरेक्ट नाशिकला जातो.
अंकिता- तुझी मर्जी… मी तुला माहिती दिली. आता तुझी आणि तू हवा तो गोंधळ घाला.
तिने फोन कट केला. सौरभला काळजीत पाहून मानसीने विचारलं-
मानसी- काय रे, काय झालं?
सौरभ- माझ्या आईला हॉस्पिटलमध्ये ठेवलं आहे.
मानसी- What?
सौरभ- हो. आई नाशिकला असते. आमच्या लग्नानंतर अंकिताशी तिचे खटके उडायला लागल्यावर तिने स्वतःहून नाशिकला आमच्या जुन्या घरी जायचा निर्णय घेतला. आता एकटीच राहते तिथे.
मानसी- ओह… काय झालं त्यांना?
सौरभ- शुगर आणि बीपी आहे तिला. ते शूट झालं आणि पडली. डोक्याला लागलं आहे. मला जावं लागेल लगेच.
मानसी- म..मी पण येते. तू एकटा नको जाऊ अशा टेन्शनमध्ये…
सौरभ- पण…
मानसी- कलीग आहे सांग, म्युच्युअल फंडमधली. ओके?
सौरभ- ओके…
विमान लँड झाल्यावर दोघेही कॅब करून नाशिकला निघाले. दुपारी नाशिकला हॉस्पिटलमध्ये पोहोचले. सौरभने डॉक्टरांकडे विचारपूस केली. डॉक्टर आज डिस्चार्ज द्यायला तयार होते. सौरभ आणि मानसी त्याच्या आईला संध्याकाळी तिच्या घरी घेऊन आले. संध्याकाळी मानसीने स्वयंपाक केला. सौरभने तिची म्युच्युअल फंडमधली कलीग अशी ओळख करून दिली होती. तिघे जेवायला बसले.
सौरभ- आई, तू आता एकटीने इथे राहायचं नाहीस. तू आमच्या घरी चल. इथे परत पडलीस आणि काही बरं-वाईट झालं तर मला फार वाईट वाटेल. आणि अंकिताची काळजी नको करू तू. तिला मी गप्प करेन.
आई- तिला गप्प करणं तुला शक्य असतं तर केव्हाच केली असतीस तू तिला गप्प. सोड ते. मी बरी आहे माझ्या घरी. आणि आता बरी आहे मी…
आईने एक घास घेतला. आई म्हणाली-
आई- जेवण सुरेख केलं आहेस तू पोरी. हाताला चव आहे तुझ्या. नवरा खुश असणार तुझा.
मानसी- Thanks आई… पण माझा नवरा नाहीये.
आई- म्हणजे? तुझं लग्न नाही झालं अजून?
मानसी- डिव्होर्स झाला आहे.
आई- असं होय. बापरे. कोणीतरी वेडाच असेल तुझ्यासारख्या सुंदर, सुगरण असलेल्या मुलीला सोडणारा.
मानसी- त्याने नाही सोडलं मला. मी त्याला सोडलं.
आई- ते महत्त्वाचं नाही. शेवटी संसार मोडला ना? लग्न म्हणजे हल्लीच्या मुलांना खेळ वाटतो. जरा खुट्ट झालं की द्या डिव्होर्स. मुलांचा विचार नाही, नातेवाईकांचा विचार नाही, आपल्या भविष्याचा विचार नाही की कसलाही विचार नाही. जरा जमवून घ्यायची तयारी नाही. आणि शिकलेल्या, नोकरी करणाऱ्या मुलींना तर असं वाटतं की नवरा म्हणजे नोकर आहे. आपल्या तालावर नाचायला हवा त्याने. आणि नवरा जरा स्वाभिमानी निघाला की लगेच डिव्होर्सच्या धमक्या सुरू. मला तर असं वाटतं ना की जगातून घटस्फोट हा प्रकारच नष्ट व्हायला हवा. एकदा लग्न केलं की मरेपर्यंत निभवायचं. घटस्फोटाचा कायदाच नसेल तर बघा सगळे कसे गुण्यागोविंदाने संसार करतात ते.
मानसी- आई, ज्याचं जळतं त्याला कळतं.
आई- मुळात जळूच द्यायचं नाही. त्यालाच संसार म्हणतात. संसाराची भाकरी जळायच्या आधीच फिरवायची असते. सोड. आपले विचार काही पटणार नाहीत. आणि मी का त्रास करून घेऊ तुझ्या डिव्होर्सचा? हा उद्या सौरभने डिव्होर्स वगैरेच्या गोष्टी केल्या तर त्याचे कान उपटेन मी.
हे ऐकून मानसी आणि सौरभनी एकमेकांकडे पाहिलं.
मानसी- पण सौरभ तर म्हणाला की त्याच्या बायकोशी म्हणजे अंकिताशी तुमचं पटत नाही म्हणून तुम्ही इथे नाशिकला निघून आलात. मग तिला ह्याने डिव्होर्स दिला तर तुम्हाला आनंदच व्हायला पाहिजे ना?
आई- कसला आनंद? माझ्या मुलाचा संसार मोडल्याचा आनंद की माझ्या नातवाच्या डोक्यावरून बापाचं किंवा आईचं छत्र गेल्याचा आनंद? अंकिता आणि माझ्यात जे मतभेद आहेत ते आहेत. त्यासाठीच मी तिच्यापासून वेगळी झाले. माझ्या स्वार्थासाठी मी सौरभला त्याचा संसार मोडायला नाही लावला.
हे बोलताना सौरभची आई मानसीच्या डोळ्यात रोखून बघत असल्याचं मानसीला जाणवलं आणि तिने नजर झुकवली. रात्री तिथे राहून दुसऱ्या दिवशी पहाटे दोघे निघाले. मानसीची काल एक्स्ट्रा रजा झाली होती. आज तिला वेळेवर ऑफिसला जाणं भाग होतं. परत येत असताना कॅबमध्ये मानसी बाहेर बघत होती. तिला सौरभची आई काय म्हणाली ते आठवत होतं. सौरभच्या देखील ते लक्षात आलं.
सौरभ- बेबी… तू आईचं बोलणं सिरीयसली घेऊ नको. मी तिला हँडल करेन.
मानसी- कसा?
सौरभ- कसा म्हणजे… हे आपलं… मी… मी…
मानसी- तू ना अंकिताला हँडल करू शकतोस ना तुझ्या आईला. हाच तर तुझा प्रॉब्लेम आहे सौरभ. आणि माझा प्रॉब्लेम हा आहे की हे माहीत असूनही मी तुझ्यात अडकून राहिले आहे.
सौरभ- काय म्हणायचं आहे तुला नक्की?
मानसी- हेच की ताई आणि जीजाजी माझ्यासाठी चांगल्या मुलांची स्थळं आणत असताना त्यातला एखादा निवडून आयुष्यात सेटल व्हायच्या ऐवजी मी तुझ्याबरोबर एका नात्यात अडकून बसले आहे ज्याचं भविष्य पूर्णपणे अधांतरी आहे.
सौरभ- तसं नाहीये मानसी…
मानसी- हो का? मग लाव ना अंकिताला फोन आणि सांग तिला की तू तिला डिव्होर्स देणार आहेस म्हणून. आहे हिंमत?
सौरभ- आता प्रश्न हिंमतीचा नाहीये मानसी. अंकिताला हे कळल्यावर ती लगेच आईला सांगेल आणि आईची सध्याची कंडीशन काय आहे तू स्वतः पाहिली आहेस. तिला हे कळलं तर त्या शॉकने आई… नाही… मला थोडा वेळ हवा आहे. किमान ६ महिने… डॉक्टर म्हणाले ते ऐकलंस ना तू. आईला पूर्ण रिकव्हर व्हायला सहा महिने लागणार आहेत.
मानसी घशात आलेला हुंदका आतच ठेवून बाहेर बघू लागली. तिच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं. साधारण अर्ध्या तासानंतर मानसी म्हणाली-
मानसी- आता तुला संदीपच्या डीलमधून चांगलं कमिशन मिळेल ना?
सौरभ- हो..
मानसी- मग मी हर्षदच्या बाईकसाठी दिलेले माझे पैसे त्यातून परत कर.
सौताभ हे अनपेक्षित वाक्य ऐकून क्षणभर गप्प झाला आणि म्हणाला-
सौरभ- हो.. अर्थातच… म्हणजे मी पण तोच विचार करत होतो की आता येतील त्यातून तुझे पैसे देऊन टाकायचे.
त्या घटनेनंतर दोन वर्षं गेली. सौरभने मानसीचे पैसे परत केले नाहीत. काही ना काही कारण पुढे करून तो अवॉइड करत राहिला. उलट मध्ये मध्ये लहानसहान कारणाने तो तिच्याकडून कधी दहा, कधी वीस, कधी पन्नास हजार रुपये घेतच होता. दोघे आता गोव्याला काळ्याच्या रिसॉर्टवर तीनएक महिन्यातून एकदा जात असत. भले त्यांच्यात वाद, तणाव असले तरी गोव्यातले ते तीन-चार दिवस दोघांनाही हवेहवेसे वाटत. गोव्यातही दोघे क्वचित भांडत असत. पण गोवा हे त्याचं प्रेम फुलण्याचं, त्याला बहर येण्याचं, सुंदर आठवणी निर्माण करण्याचं ठिकाण झालं होतं. इतक्यात मध्ये कोविडची साथ येऊन गेली. त्यात दोन वर्षं गेली. अंकिताच्या एका गैरसमजातून आणि संशयामुळे काहीच नसताना शून्यातून निर्माण झालेलं त्यांचं नातं आता आठ वर्षांचं झालं होतं. आता तर मानसीच्या बहिणीला, तिच्या नवऱ्याला आणि आदित्यला देखील मानसी आणि सौरभच्या नात्याबद्दल माहीत झालं होतं. म्हणजे मानसीने ते कधीच लपवलं नव्हतं. ज्यांना कुणकुण लागली त्यांनी तिला विचारलं आणि विचारल्यावर तिने जे आहे ते सांगून टाकलं होतं. प्रॉब्लेम सौरभचा होता. इतक्या वर्षांत त्याने अंकिताला सत्य सांगायची हिंमत दाखवली नव्हती. आणि त्याला कारण मानसी होती. मानसी त्याच्या डोक्यावर बसून त्याला सत्य सांगायला भाग पाडत नव्हती. प्रत्येक वेळी त्याने पुढे केलेली कारणं खरी मानून सौरभशी लग्न करण्याच्या मृगजळाच्या मागे धावत होती.
त्या दिवशी दोघे असेच बोलत बसले होते.
मानसी- तू अंकिताला आपल्या बद्दल सांगून डिव्होर्स कधी देणार आहेस?
सौरभ- लवकरच. जरा योग्य वेळ येऊ दे.
मानसी- सौरभ, दहा वर्षं झाली आपल्या नात्याला. इतक्या वर्षांत जी वेळ आली नाही ती आता येणार आहे का? नक्की अशी काय वेळ आहे ती? मलाही सांग. मला ना कंटाळा आलाय आता.
सौरभ- माझा कंटाळा आलाय?
मानसी- तुझा, तुझ्या खोट्या promises चा, माझ्या मूर्खपणाचा आणि ह्या नात्याचा पण. तू अंकिता आणि मी, आम्हा दोघींच्या बरोबर मस्त मजेत आहेस. ती तुझ्या पोटाची भूक भागवते आहे आणि शरीराची भूक मी भागवते आहे. पण माझं काय?
सौरभ- शी. किती घाणेरडं बोलतेस तू?
मानसी- घाण असलं तरी तेच सत्य आहे सौरभ. तुझा मुलगा आता शिकून नोकरीला लागला. माझा आदित्य पण कामाला लागला. आता आपल्यावर कोणतीच जबाबदारी नाहीये. पण तू तुझ्या comfort zone मध्ये मस्त मजेत आहेस. दोन दगडांवर पाय ठेवून आनंदात आहेस.
सौरभ- बेबी, तसं नाहीये.
मानसी- मग कसं आहे सौरभ? मला काय वाटतं माहीतेय का? जोवर तू तुझा comfort zone सोडत नाहीस ना तोवर तुझ्यात हिंमत येणार नाही. तू ह्याच आठवड्यात त्या घरातून बाहेर पड.
सौरभ- काय? आणि तुझ्या घरी येऊन राहू?
मानसी- नाही. एक जागा रेंटवर घे. तिथे राहा. थोडं स्वतःचं स्वतः करायला लाग. अंकितापासून लांब राहायची सवय होऊ दे तुला. मग तुझ्यात तिला सांगायची आणि डिव्होर्स देण्याची हिंमत येईल.
सौरभ- हम्म… चांगली आयडिया आहे. मी नक्की विचार करतो.
मानसी- विचार करायला तीन दिवस आहेत तुझ्याकडे. आज बुधवार आहे. येत्या रविवारपर्यंत तू जर शिफ्ट झाला नाहीस ना तर मी स्वतः घरी येऊन अंकिताला आपल्याबद्दल सांगणार आहे.
सौरभ- चार दिवसांत हे कसं शक्य आहे?
मानसी- मी तुला दहा वर्षं आणि चार दिवस दिले होते सौरभ. तू दहा वर्षं काही केलं नाहीस. आता चार दिवस उरलेत. त्यात काय करायचं ते कर नाहीतर मी मला पाहिजे ते करेन तुझ्या घरी येऊन.
हे बोलून मानसी निघाली. सौरभ टेन्शनमध्ये बसला होता. मानसीने बाहेर येऊन गाडी सुरू केली आणि तेव्हाच तिला एक फोन आला. तिने फोन घेतला. फोनवर एका पुरुषाने विचारलं-
आवाज- BYK कॉलेजची माधुरी दीक्षित कशी आहे?
तो आवाज ऐकून मानसी क्षणभर शॉक झाली. तिच्या डोळ्यात चमक आली. मानसीने ओरडून विचारलं-
मानसी- श्रीरंग? तू?
श्रीरंग- Yes, my love.
मानसी- तू सुधारला नाहीस ना?
श्रीरंग- तू ज्याला बिघडवतेस तो कधी सुधारू शकतो का, स्वीट हार्ट?
मानसी- तू आणि तुझा flirt…नालायक आहेस…
नियतीने तिच्या खेळात एका नवीन पात्राची भर घातली होती. सौरभला भविष्यात येणाऱ्या वादळाची कल्पना नव्हती. मानसी श्रीरंगचा आवाज ऐकून वेडी झाली होती. त्याच्याशी बोलण्यात हरवून गेली होती.
क्रमश:
सर्व भाग एकत्र- मृगजळ- सर्व भाग
पहिल्या भागाची लिंक- कथा इथून वाचायला सुरुवात करा- मृगजळ …भाग १
इतर दीर्घकथा आणि कादंबऱ्यांची लिंक- दीर्घ कथा
आमच्या लघुकथा इथे वाचा- लघुकथा

[…] पुढील भागाची लिंक- मृगजळ भाग १४ […]
मृगजळ सुरवाती पासून वाचता. येईल का ? वाचायची. इच्छा आहे.
https://mandarjog.com/%e0%a4%ae%e0%a5%83%e0%a4%97%e0%a4%9c%e0%a4%b3-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a5%a7/