जुलै महिन्यातील कृष्ण चतुर्दशी. गेल्या दीड महिन्यापासून दिवसभराची उघडीप देऊन सतत बरसत असलेल्या पावसाला आता सूज आली होती. पाटील वाडीतल्या झाडाझाडाला आणि घराघराला न्हाऊ घालूनही त्याला समाधान नव्हते. मनाला येईल तेव्हा आणि तसा तो बरसू लागे…कोणतीही तमा न बाळगता…अगदी सर्जेराव पाटलांसारखा!!!!
सर्जेराव म्हणजे भाऊसाहेब पाटलांचे चिरंजीव. आता चाळीशीचे सहज असतील. वडिलोपार्जित मिळालेली सावकारी, श्रीमंती आणि त्यातून मिळालेल्या सत्तेने माणसाच्या नैतिकतेचे कसे अध:पतन होते ह्याचे रसातळाला पोहोचलेले उदाहरण! सर्जेरावाच्या सावकारी पाशात अडकलेले गरीब गावकरी आणि शेतकरी त्यांचे सर्वस्व त्याच्याकडे गहाण ठेवल्यासारखे सर्जेरावाच्या दरबारात पडीक असत. कोंबड्या बकऱ्यांची सागुती, इंग्लिश तीर्थाच्या बाटल्या ह्यांच्या संगतीने ढोलकी आणि चाळ ह्याचे सर्जेरावाच्या वाड्यावरून येणारे आवाज गावकऱ्यांना नवीन नव्हते. एखाद्या महिन्यात व्याजाचा हप्ता चुकला की त्या शेतकऱ्याची बायको, बहिण किंवा मुलगी ह्याचं सर्जेरावाकडे वस्तीला जाण देखील गावकऱ्यांच्या पाचवीला पुजल होत. भारतीय रुपया बरोबरच त्या गावात “बायका” हे एक चलन बनल होत.
म्हादू शेतकऱ्याची ५ गुंठे जमीन पोसत असलेल्या ८ जीवांपैकी एक म्हणजे रखमा. म्हदुच्या ४ मुली आणि पन्नासाव्या वर्षी झालेल्या मुलगा ह्या सर्वात थोरली. २१ वर्षांची उफाड्याची पोर. ती म्हादुबरोबर शेतात राबायची, आयशीला घरी मदत करायची, लहान भावंडांची काळजी घ्यायची. म्हादूचा थोरला मुलगाच जणू. दु:खाने लडबडलेल्या आयुष्यात ज्या दिवशी यातना कमी तो दिवस सुखाचा असा समजून म्हादू आणि कुटुंबिय दिवस ढकलत होते. अश्यात ह्या महिन्यात म्हदूचा व्याजाचा हप्ता चुकला. व्याजाचा हप्ता कसला म्हादूच्या काळजाचा ठोका चुकला!
आज जुलै महिन्यातील कृष्ण चतुर्दशी. गेला आठवडाभर सतत कोसळणाऱ्या पावसाची सूज आज सकाळपासून थोडी उतरली होती. पाटीलवाडी गावातली मंडळी हळूच बाहेर पडून गळक्या कौलातून घरात जमा झालेल पाणी भांडी आणि घमेली भरून बाहेर टाकत होती. अशात संधीप्रकाशाची तिन्हीसांज झाली आणि ढगांच्या आडून ओलेती रात अवतरली. आज रखमाला सर्जेरावाकडे वस्तीला जायच होत. म्हादूच्या व्याजाचा हप्ता बनून! घरामागे झावळ्यांनी बनवलेल्या आडोश्याला अंग धुवून ती सर्जेरावाने खास पाठवलेली साडी चोळी ल्याली. लग्नाची पैठणीच जणू. त्यानेच पाठवलेल्या कसल्याश्या अत्तराची बाटली अंगाला फासून रिकामी केली, मोगऱ्याचे गजरे केसात माळले आणि शांत चेहेऱ्याने सर्जेरावने पाठवलेल्या जीप मध्ये ती बसली. म्हादू, त्याची बायको आणि सगळी पोर ह्यांच्या अश्रुना आवर घालण अशक्य होत. पण रखमाच्या चेहेऱ्यावर त्या परिस्थितीशी विसंगत असा एक स्मित हास्य होतं. आजवर अनेक पोरी ह्याच जीप मधून धनींकडे पोहोचवणाऱ्या संभाला सुद्धा जीपच्या आरशातून तिला न्याहाळत असताना तिच्या चेहेऱ्यावरचा ते स्मित थोडं खटकल होतं. जीप वाड्यावर पोचली. संभा उतरला. पावसाळ्यात रात्रीच्यावेळी वीज फक्त आकाशात चमकत असे पाटीलवाडी मध्ये. बाकी रात्री म्हणजे अंधाऱ्या. सर्जेराव जीपची अधाश्यासारखी वाट पाहत होता. कमीतकमी अर्धी बाटली रिचवून तांबारलेल्या डोळ्यांनी जीपच्या काचेमधून टाकलेल्या ब्याटरीच्या उजेडात तो आतल पाखरू न्याहाळत होता. हे पाखरू झ्याक होतं. आज अनेक दिवसांनी अशी मस्त शिकार हाती लागली होती. तांबारलेल्या डोळ्यात वासनेने प्रवेश केला आणि सर्जेराव संभाच्या हातात पन्नासची नोट सरकवून व्हीलवर बसला. आज शिकार फार्म हाउसवर करायचा बेत होता. ५ किलोमीटरचा म्हाळसाआईचा घाट पार केला की फार्म हाऊस आणि मग शिकार……
जीप वाड्याच्या गेट मधून बाहेर पडली. चतुर्दशी सरून अमावस्या लागली होती थोड्याच वेळापूर्वी. अमावास्येचा पाऊस जसा असतो त्याहून खूप जास्त पडत होता. अगदी दहा हातावरच दिसत नव्हतं. फॉग लाईटचा काही उपयोग होत नव्हता. विजांच्या प्रकाशात मधेच सबंध रस्ता न्हाऊन निघत होता. ढगांचा गडगडाट काळजात धडकी भरत होता. पावसाचा रंग आज वेगळाच दिसत होता! त्याच्या अंगात आलं होतं! सर्जेराव बेभान वेगाने घाटाची धोक्याची वळणे सराईतपणे पार करत होता. रखमाच्या चेहेऱ्यावर काळजीचा लवलेश नव्हता. एक धोक्याच वळण घेताना गाडीने जवळजवळ रस्ता सोडला होता. पण सर्जेराव इरेस पेटला होता. त्याला रखमा हवी होती. गाडीत मागेच बसलेली, काही फुटांवर असणारी, जिला स्पर्श करायची अतीव इच्छा होत होती ती, रात्रभर आपलीच होणार असणारी मुसमुसलेली रखमा. चिखलाने माखलेले वळणावळणाचे रस्ते, विंडस्क्रीनवर जोरात आदळणारे पावसाचे टपोरे थेंब, न चालणारा वायपर, समोरचा भयानक अंधार काहीच त्याला थांबवू शकत नव्हते. तो बेफाम गाडी हाकत होता. एका वळणाआधी रखमा मागून त्याच्या खांद्यावर हात ठेऊन म्हणाली “सावकार जरा जपून. मला मौत दिसते आहे”. ते ऐकून सर्जेराव तिच्याशी बोलायला मागे वळला आणि त्याचा गाडीवरचा ताबा सुटला. गाडी ६०० फूट दरीत कोसळली आणि तिने पेट घेतला. सर्जेरावचा भर पावसात कोळसा झाला. रखमा रस्त्याच्या कडेला उभी राहून त्या जळणाऱ्या जीपकडे पहात होती. चेहेऱ्यावर तेच मंद स्मित. अंगावर एकाही ओरखडा नाही…..
म्हादुच्या घरावर दुर्दैवाची कुऱ्हाड कोसळली होती. सगळा गाव जमला होता. म्हादू, त्याची बायको आणि सगळी पोर गुरासारखी हंबरडा फोडून रडत होती. सर्जेरावाच्या घरी जाण्यासाठी तयार झालेल्या रखमेने घरामागच्या पिंपळावर गळफास लाऊन जीव दिला होता. सर्जेरावने पाठवलेल्या साडी चोळीत सर्व शृंगार ल्यालेली रखमा झाडाला लटकत होती. अमावस्या सुरु झाली होती……..पाऊस कोसळत होता….!
