…मुग्धाने त्याला घट्ट मिठी मारली होती. रोहितने हळूच त्याचा हात तिच्या उघड्या पाठीवर फिरवायला सुरुवात केली. तिला अजून जवळ ओढून तो म्हणाला “मुग्धा काळजी नको करू. मी आहे ना!” एव्हाना मुग्धाच्या अश्रूंनी त्याचा शर्ट भिजला होता. त्याच्या पंजाची बोट तिच्या पाठीत रुतली होती. अनेक वर्षांच स्वप्न पुरं होण्याची शक्यता लक्षात आल्याने रोहितच्या डोळ्यातून वासना ओसंडून वाहात होती! हॉस्पिटल मध्ये शांतता होती! दुःखाचा आवेग ओसरल्यावर मुग्धा भानावर आली. रोहितशी झालेली जवळीक लक्षात येऊन ती लांब झाली. ती लांब झाल्यावर रोहित थोडा खट्टू झाला. तिचा स्पर्श, तिच्या परर्फ्युमचा आणि केसांचा वास त्याच्या शरीरात अजूनही भरून राहिला होता. पण संयम राखत तो जाधव साहेबांना भेटला. म्हणाला “मी रोहित. प्रशांत आणि मुग्धाचा मित्र. आम्ही प्रशांतला बघू शकतो का?” जाधव साहेबांनी हाताने इशारा केल्यावर रोहित आणि मुग्धा आयसीसीयू मध्ये गेले! आतलं बर्फासारखं वातावरण अंगावर काटा आणत होतं. मुग्धाने नकळत रोहितच्या दंडाचा आधार घेतला. त्या थंड वातावरणातील शांततेत फक्त पेशंटना लावलेल्या विविध यंत्रांचा आवाज ऐकू येत होता. एकेका बेडवर बेशुद्ध अवस्थेत अस्ताव्यस्त पडलेले काही कृश, काही जळलेले, काही मोडलेले देह बघत दोघे पुढे सरकत होते. त्यांचं भेसूर रूप बघून आयसीसीयू मध्ये आयुष्यात पहिल्यांदाच आलेल्या मुग्धाला मळमळू लागलं! तिची रोहितच्या दंडावरची पकड घट्ट झाली! शेवटी ते प्रशांतच्या बेड जवळ पोहोचले!
आज दुपारीच तिच्या बाहुपाशात असलेला प्रशांत बँडेज मध्ये बांधलेला बघून मुग्धाला रडू फुटलं. त्याला लावलेला व्हेंटिलेटर आणि इतर लाईफ सपोर्ट त्याला अजूनच करुण बनवत होते. त्याचा चेहरा बघण्यापालिकडे खराब झाला होता. इतका की तो प्रशांत आहे हे मुग्धाला देखील ओळखण मुश्किल होतं! समोर फक्त प्रशांतच विच्छिन्न शरीर होतं. त्यातला प्रशांत कधीच निघून गेला होता ह्याची कल्पना येऊन मुग्धाच्या मणक्यात एक कळ आली आणि त्या थंड वातावरणात देखील तिच्या पाठीवरून खाली ओघळत असलेल्या घामाच्या थेंबाची तिला जाणीव झाली! मुग्धा पुतळ्यासरखी स्तब्ध झाली. जणू त्या थंडाव्यात गोठून गेली! रोहितने तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिला जवळ घेतली. तिच्या गालावर ओघळणारे अश्रू आपल्या बोटांनी पुसले. तिला मिठीत घेऊन, तिच्या डोक्यावरून हात फिरवत तो म्हणाला “मुग्धा सावर स्वतःला. मी आहे ना? मी बोलतो डॉक्टरशी. आपण बेस्ट ट्रीटमेंट करू. पैशांची तू काळजी करू नको.” मुग्धाला काहीच ऐकू येत नव्हतं! ती एकटक प्रशांत कडे बघत होती. रोहितने त्याची मिठी घट्ट केली होती. त्याची बोटं मुग्धाच्या मांसल दंडात रुतली होती!
इतक्यात डॉक्टर आले. म्हणाले “मला जरा बोलायचं आहे. आपण बाहेर जाऊया. माझ्या केबिन मध्ये बोलूया. इथे नातेवाईकांना थांबायला परवानगी नाहीये.” रोहित ओके म्हणाला आणि निघाला. मुग्धा तिथेच थिजून प्रशांतला बघत होती. रोहितने तिचा दंड घट्ट धरला. तिच्या कानाला आपले ओठ टेकवत तो म्हणाला “मुग्धा इथे थांबायला अलाउड नाहीये. बाहेर चल.” त्याने जवळजवळ ओढत मुग्धाला बाहेर नेली. बाहेर आल्यावर अमेयने तिला विचारलं “आई बाबा कसा आहे? काय बाऊ झालाय त्याला?” मुग्धा ट्रान्स मध्ये असल्यागत तंद्री लावून बसली होती. रोहित म्हणाला “बाबा बरा आहे. काळजी नको करू.” अमेय तरीही घाबरून मुग्धाला बिलगून बसला. रोहित डॉक्टर बरोबर त्यांच्या केबिन मध्ये गेला.
अर्धा तास असाच भयाण गेला. रोहित डॉक्टरच्या केबिन मधून परत आला. मुग्धाच्या शेजारी बसला. तिचा हात हातात घेऊन म्हणाला “मुग्धा its a bad news. प्रशांत कोमा मध्ये आहे. रिकव्हरी कठीण आहे. हे मी नाही डॉक्टर म्हणत आहेत. सो….” मुग्धाने त्याच्या डोळ्यात भकासपणे बघत विचारलं “सो? सो व्हॉट रोहित?” रोहित म्हणाला “सो तुला निर्णय घ्यायचा आहे.” मुग्धा म्हणाली “कसला निर्णय?” रोहित म्हणाला “हेच की व्हेंटिलेटर आणि सपोर्ट सिस्टीम किती वेळ ठेवायच्या!” हे ऐकून मुग्धा जोरात ओरडली ” काय म्हणायचं आहे तुला रोहित? मी प्रशांतला मारून टाकायला परवानगी देऊ?” कॉरिडॉर मधले पोलीस आणि इतर लोक वळून बघू लागले. रोहित म्हणाला “मी फक्त डॉक्टर काय म्हणाले ते तुला सांगितल. तू विचार कर. घाई नाहीये. पण होप्स शून्य आहेत. त्याचा मेंदू केव्हाच डेड झाला आहे.” इतकं बोलून रोहित समोर असलेल्या काचेजवळ जाऊन उभा राहिला. खाली दिसणारे रिकामे रस्ते बघू लागला! आता जवळजवळ रात्रीचा एक वाजला होता. अमेय भुकेमुळे मुग्धाला रेलून केव्हाच झोपला होता. मुग्धाचाही डोळा लागला होता. त्या कॉरिडॉर मध्ये आता मुग्धा, अमेय आणि रोहित खेरीज कोणीही नव्हतं. रोहितची नजर मुग्धाच्या शरीरावर ठरत नव्हती. त्याला तिचा आज झालेला स्पर्श आठवत होता. झोपेत आणि अमेयने ओढल्याने थोडया अस्ताव्यस्त झालेल्या तिच्या ड्रेस मधून दिसणारं इतरवेळी झाकलेलं तिचं अंग पाहून रोहितला गुदगुल्या होत होत्या. हे सर्व आता माझं होऊ शकत ह्या विचाराने तो आधाश्या सारखा ते डोळ्यात साठवून घेत होता!
असेच अजून दोन तास गेले. पहाटेचे साडेतीन चार वाजले. रोहित टॉयलेटला जाऊन येऊन बसला. नजर मुग्धावर होती. जे समोर दिसतंय ते आपलंसं करायच्या ओढीने, त्याला स्पर्श करायच्या विचाराने रोहित उभा राहिला. हळूच मुग्धाच्या शेजारी जाऊन बसला. त्याच्यात आणि मुग्धात आता सहा इंचांच अंतर होतं. तो आधाश्यासारखा तिला न्याहाळत होता. इतक्यात मुग्धा झर्रकन त्याच्याकडे वळली. तिचे डोळे त्याच्या डोळ्यात रोखलेले होते. ते पाहून रोहित प्रचंड दचकला!
©मंदार जोग
क्रमशः

