SIF म्हणजे काय? | mandar jog

SIF म्हणजे काय? ह्या लेखात SIF मध्ये म्युच्युअल फंडापेक्षा वेगळं काय आणि काय नाही तो कोणी आणि का घ्यावा हे समजून घेऊया.

समजा तुम्ही एखाद्या ज्योतिषाकडे गेलात. त्याच्यासमोर भविष्य सांगण्यासाठी वेगवेगळ्या चिठ्ठ्या ठेवल्या आहेत. तो एक चिठ्ठी काढतो आणि तुमचं पुढचं आयुष्य सांगतो. गंमत म्हणून अशा ज्योतिषाच्या पोपटाने चिठ्ठी काढली तरी लोक त्याला भविष्य सांगणारा पोपट म्हणतात. आता गुंतवणुकीच्या जगातही असाच एक नवीन “भविष्य सांगणारा” आला आहे, असं म्हणायला हरकत नाही. पण हा पोपट चिठ्ठी काढून भविष्य सांगत नाही. तर हा बाजार कुठे जाणार, कोणता शेअर महाग आहे, कुठे संधी आहे आणि काही वेळा बाजार पडला तरी त्यातून संधी कशी शोधायची, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करतो. नाव आहे SIF — Specialized Investment Fund.

नाव ऐकून पहिल्यांदा वाटतं, हा आणखी एक mutual fund असणार. खरं तर तो mutual fundच्या कुटुंबातलाच आहे, पण त्याची गुंतवणुकीची पद्धत थोडी वेगळी आहे. SEBIने 27 फेब्रुवारी 2025 रोजी SIFसाठी स्वतंत्र regulatory framework आणल आणि तो 1 एप्रिल 2025 पासून लागू झाला. या नव्या प्रकारामागचा मुख्य विचार असा होता की भारतात mutual fundsपासून PMSपर्यंत अनेक गुंतवणूक पर्याय आहेत, पण या दोन्हींच्या मध्ये अधिक flexible आणि sophisticated investment strategiesसाठी एक जागा होती. SIF ही ती जागा भरून काढण्याचा प्रयत्न आहे.

हे समजून घेण्यासाठी आधी mutual fundकडे पाहू. समजा तुम्ही एखाद्या equity mutual fundमध्ये ₹5 लाख टाकले. तुमचे पैसे आणि तुमच्यासारख्या हजारो लोकांचे पैसे एकत्र करून fund manager वेगवेगळे शेअर्स घेतो. त्याला schemeच्या categoryनुसार काही नियम पाळावे लागतात. तो stock निवडू शकतो, portfolioमध्ये वजन वाढवू शकतो, काही शेअर्स विकू शकतो, पण त्याला दिलेली investment strategy एका ठरावीक चौकटीतच चालवावी लागते. हीच mutual fundची मोठी ताकद आहे. नियम स्पष्ट आहेत, portfolio diversified असतो आणि सामान्य गुंतवणूकदाराला स्वतः रोज बाजारात डोकं खुपसण्याची गरज नसते. त्याचे पैसे बर्यापैकी सेफ असतात.

पण आता समजा त्या fund managerला असं वाटलं की काही शेअर्स खूप स्वस्त आहेत आणि काही शेअर्स मात्र बाजाराच्या उत्साहामुळे गरजेपेक्षा जास्त महाग झाले आहेत. महाग वाटणाऱ्या शेअरची किंमत पुढे कमी झाली तर त्यातूनही फायदा घेता आला तर? इथेच SIFचा विचार पुढे येतो. SIFच्या काही strategiesमध्ये derivativesच्या माध्यमातून मर्यादित short exposure घेण्याची परवानगी आहे. म्हणजे manager फक्त “हा शेअर वाढेल का?” एवढाच प्रश्न विचारत नाही. काही परिस्थितीत “हा शेअर पडण्याची शक्यता आहे का?” हा प्रश्न विचारून त्यातूनही investment opportunity शोधू शकतो.

अर्थात Short म्हणजे बाजार पडला की SIFला आपोआप फायदा होणार, असं अजिबात नाही. Short position हीसुद्धा एक गुंतवणूक strategy आहे आणि ती चुकीची ठरली तर नुकसान होऊ शकतं. उदाहरणार्थ, managerला एखादा शेअर ₹1,000वर खूप महाग वाटला आणि त्याने short position घेतली. पण बाजाराच्या विरुद्ध तो शेअर ₹1,200वर गेला, तर त्या short positionमधून नुकसान होईल. त्यामुळे SIFचा खरा हेतू “कुठल्याही परिस्थितीत पैसे कमावणे” ही नसून, fund managerला बाजाराच्या वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये अधिक साधनं वापरून portfolio चालवण्याची मुभा मिळणे ही आहे.

पण SIF आणायची गरज काय होती?

गुंतवणुकीच्या जगात साधारणपणे एक पोकळी किंवा गरज होती ती अशी. Mutual fundमध्ये मोठ्या संख्येने लोक पैसे गुंतवतात आणि fund manager ठरलेल्या नियमांत portfolio चालवतो. त्यापेक्षा अधिक customised किंवा flexible portfolio management हवं असेल तर PMS आहे. पण PMSमध्ये प्रवेशाची किमान रक्कम मोठी आहे. सध्या PMSसाठी minimum investment ₹50 लाख आहे. SIFमध्ये मात्र सामान्य गुंतवणूकदारासाठी minimum investment threshold ₹10 लाख आहे. त्यामुळे ₹50 लाखांचा PMS करायची इच्छा किंवा क्षमता नसलेल्या पण ₹10 लाख किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम sophisticated strategyमध्ये लावू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारासाठी SIF हा मधला पर्याय ठरू शकतो.

पण इथे “SIF म्हणजे ₹10 लाखांचा PMS” असं म्हणणं चुकीचं ठरेल. PMSमध्ये तुमच्या नावाने स्वतंत्र portfolio manage केलं जातं. तर SIFमध्ये तुम्ही त्या investment strategyचे units घेता आणि त्या strategyच्या portfolioचा भाग होता. त्यामुळे SIFची रचना mutual fundच्या जवळची आहे, तर investment करण्याची काही साधनं आणि flexibility PMSपेक्षा अधिक sophisticated असू शकतात.

SIFमध्ये ₹१० लाखांचा नियम काय आहे?

हा सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे. SIFमध्ये सामान्य गुंतवणूकदारासाठी किमान ₹10 लाखांचा investment threshold आहे. हा नियम फक्त एका strategyकडे पाहून ठरत नाही. तुमची SIFमधील एकूण investment, म्हणजे त्या SIFने दिलेल्या वेगवेगळ्या investment strategiesमध्ये तुमची गुंतवणूक मिळून, PANच्या पातळीवर किमान ₹10 लाख असावी लागते. तुमचे त्याच AMCच्या साध्या mutual fund schemesमध्ये असलेले पैसे या ₹10 लाखांच्या गणनेत धरले जात नाहीत. Accredited investorsना मात्र हा minimum investment threshold लागू होत नाही.

उदाहरणार्थ, समजा एखाद्या SIFमध्ये Equity Long-Short strategyमध्ये तुम्ही ₹7 लाख आणि Hybrid Long-Short strategyमध्ये ₹3 लाख गुंतवले. एकूण SIF investment ₹10 लाख झाली, त्यामुळे minimum threshold पूर्ण झाला. पण त्याच AMCच्या thematic किंवा मल्टी कॅप किंवा डेट वगैरे इतर mutual fundमध्ये तुमचे आणखी ₹15 लाख असले, तरी SIFसाठी तुमची पात्रता ठरवताना ते ₹15 लाख या गणनेत जोडले जाणार नाहीत.

आता समजा तुम्ही ₹10 लाख गुंतवले आणि बाजार पडला. तुमच्या SIFची value कमी होऊन ₹8.5 लाख झाली. तुम्ही काहीही पैसे काढलेले नाहीत, फक्त NAV कमी झाल्यामुळे तुमच्या investmentची market value ₹10 लाखांखाली गेली. याला passive breach मानलं जातं आणि तो नियमभंग मानला जात नाही. मात्र अशा परिस्थितीत तुम्ही उरलेल्या गुंतवणुकीतून थोडे पैसे काढून ₹7 लाख ठेवू शकत नाही. SEBIच्या frameworkनुसार passive breachमुळे investment value thresholdच्या खाली गेली असेल तर उरलेली संपूर्ण SIF investment redeem करण्याचीच मुभा राहते. “SEBIचे SIF compliance framework”

याउलट तुम्ही स्वतः ₹3 लाख काढले आणि त्यामुळे तुमची SIFमधील एकूण गुंतवणूक ₹7 लाखांवर आली, तर तो active breach होतो. म्हणजे बाजारामुळे नाही, तर तुमच्या स्वतःच्या transactionमुळे thresholdच्या खाली investment गेली. अशा परिस्थितीसाठी SEBIने स्वतंत्र compliance mechanism ठेवला आहे. म्हणून SIFमध्ये ₹10 लाख ही फक्त “प्रवेशाची मर्यादा” नसून investment टिकवून ठेवतानाही लक्षात ठेवायची मर्यादा आहे.

SIFमध्ये कोणत्या strategies आहेत?

SIFचं खरं वेगळेपण इथे दिसतं. SEBIच्या frameworkमध्ये सात investment strategiesची रचना करण्यात आली आहे. त्यात तीन equity-oriented, दोन debt-oriented आणि दोन hybrid strategies आहेत. नावं थोडी मोठी आहेत, पण त्या एकदा समजून घेतल्या की विषय फार कठीण नाही.

पहिली equity strategy आहे Equity Long-Short Fund. ह्यात Portfolioचा मोठा भाग equity आणि equity-related instrumentsमध्ये असतो, पण managerला derivativesच्या माध्यमातून मर्यादित unhedged short exposure घेता येतं. या strategyमध्ये किमान 80% equity आणि equity-related instrumentsमध्ये असावं लागतं आणि unhedged derivativesमधील short exposureला 25%पर्यंत मर्यादा आहे. म्हणजे managerला चांगले शेअर्स खरेदी करण्याबरोबरच काही शेअर्सच्या घसरणीतूनही संधी शोधता येते. “SEBIचा SIF framework”

दुसरी आहे Equity Ex-Top 100 Long-Short Fund. इथे फोकस देशातील सर्वात मोठ्या 100 कंपन्यांबाहेरच्या equity universeवर अधिक असतो. किमान 65% equity investment ही top 100 market-cap कंपन्यांव्यतिरिक्त असलेल्या stocksमध्ये असावी लागते. म्हणजे मोठ्या, सर्वांना परिचित कंपन्यांपेक्षा त्याखालील कंपन्यांमध्ये संधी शोधण्याचा प्रयत्न. पण अशा कंपन्यांमध्ये चढ-उतार मोठे असू शकतात, त्यामुळे संधीबरोबर riskही वाढतो.

तिसरी equity strategy आहे Sector Rotation Long-Short Fund. इथे manager संपूर्ण बाजाराकडे एकसारखं न पाहता काही निवडक sectorsवर लक्ष केंद्रित करू शकतो. या strategyमध्ये जास्तीत जास्त चार sectors निवडता येतात आणि equity exposureचा मोठा भाग त्या sectorsमध्ये ठेवला जाऊ शकतो. sector-level derivativesच्या माध्यमातून short exposureचीही मर्यादित मुभा आहे. उदाहरणार्थ, managerला banking आणि manufacturing मजबूत वाटत असतील, पण एखादा दुसरा sector तुलनेने कमकुवत वाटत असेल, तर portfolioची दिशा त्या अपेक्षेनुसार बदलण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

SIF फक्त equity वर थांबत नाही. त्यात Debt Long-Short Fund ही debt-oriented strategy देखील आहे. यात debt instrumentsमध्ये गुंतवणूक करण्याबरोबर exchange-traded debt derivativesचा वापर करून मर्यादित short exposure घेता येतो. म्हणजे इथे managerचा फोकस शेअरच्या भावापेक्षा interest rates, bond prices, maturity आणि duration अशा गोष्टींवर जास्त असतो.

दुसरी debt strategy म्हणजे Sectoral Debt Long-Short Fund. यात किमान दोन sectorsमधील debt instrumentsचा वापर होतो आणि एका sectorमध्ये जास्तीत जास्त 75% investmentची मर्यादा आहे. debt derivativesच्या माध्यमातून short exposureचीही तरतूद आहे. म्हणजे corporate debtच्या जगातही “कुठे जास्त संधी आहे आणि कुठे सावध राहायचं” याचा तुलनात्मक दृष्टिकोन घेण्याचा प्रयत्न इथे होतो.

यानंतर येतात दोन hybrid strategies. Active Asset Allocator Long-Short Fund हा वेगवेगळ्या asset classesमध्ये portfolioचं allocation बदलण्याची मुभा देणारा प्रकार आहे. Equity, debt, त्यांचे derivatives, REITs, InvITs आणि commodity derivatives अशा विविध साधनांचा वापर strategyच्या नियमांनुसार केला जाऊ शकतो. म्हणजे बाजारात परिस्थिती बदलली की portfolioची दिशा बदलण्याची managerला तुलनेने जास्त मुभा मिळते.

दुसरी hybrid strategy म्हणजे Hybrid Long-Short Fund. यात equity आणि debt दोन्हींचं मिश्रण असतं. किमान 25% equity आणि किमान 25% debt instrumentsमध्ये गुंतवणूक असते आणि equity तसेच debt derivativesच्या माध्यमातून मर्यादित short exposure घेण्याची मुभा असते. म्हणजे पूर्णपणे equityवर किंवा पूर्णपणे debtवर अवलंबून न राहता दोन्हींचा वापर करून portfolio चालवण्याचा प्रयत्न.

हे सात प्रकार लक्षात ठेवण्याचा सोपा मार्ग म्हणजे तीन equity, दोन debt आणि दोन hybrid. पण फक्त नावं पाठ करण्यापेक्षा त्यांची वैशिष्ठ्य समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण SIF घेताना आपण त्या SIFखालील एक विशिष्ट investment strategy निवडत असतो.

Mutual Fund, SIF आणि PMSमध्ये फरक काय?

समजा साध्या equity mutual fundचा manager एखादी कंपनी स्वस्त वाटते म्हणून ती खरेदी करतो. त्याला त्या schemeच्या नियमांत राहून portfolio चालवायचं असतं. SIFच्या काही strategiesमध्ये managerला त्यापुढे जाऊन derivatives आणि limited short exposure वापरता येतं. त्यामुळे बाजाराकडे पाहण्याचे त्याच्याकडे अधिक पर्याय असतात. PMSमध्ये मात्र तुमच्यासाठी स्वतंत्र portfolio manage केला जातो. SIFमध्ये तुम्ही त्या investment strategyमध्ये सहभागी होता. PMSची minimum investment सध्या ₹50 लाख आहे, तर SIFमध्ये ₹10 लाखांचा minimum threshold आहे. त्यामुळे capitalच्या दृष्टीने SIF हा PMSपेक्षा अधिक सहज उपलब्ध पर्याय आहे. पण याचा अर्थ SIF कमी riskचा आहे असा अजिबात होत नाही.

म्हणून थोडक्यात असं म्हणता येईल की Mutual Fundमध्ये साधेपणा आणि diversification, SIFमध्ये अधिक sophisticated strategy आणि PMSमध्ये स्वतंत्र portfolio management. आता ह्यापैकी कोणता पर्याय चांगला हा प्रश्न नसून, आपल्या portfolioला काय हवं आहे हा खरा प्रश्न आहे.

SIFचे फायदे काय?

SIFचा सर्वात मोठा फायदा म्हणजे managerला काही अतिरिक्त investment tools वापरण्याची मुभा. बाजार कायम वरच जात नाही आणि कायम खालीही जात नाही. कधी एखादा sector जोरात धावतो, कधी दुसरा मागे पडतो. कधी valuation इतकी वाढते की managerला सावध व्हावंसं वाटतं. अशा वेळी traditional long-only portfolioपेक्षा अधिक flexible strategyचा उपयोग होऊ शकतो.

दुसरा मुद्दा म्हणजे ₹10 लाखांची entry threshold. ज्याच्याकडे पुरेसं capital आहे, mutual fundsचा अनुभव आहे आणि portfolioच्या एका भागासाठी वेगळी strategy वापरायची आहे, त्याच्यासाठी SIF हा विचार करण्यासारखा पर्याय आहे. मात्र minimum investment म्हणजे suitable investment नव्हे. तुमचा संपूर्ण portfolio ₹20 लाखांचा असेल आणि त्यातील ₹10 लाख SIFमध्ये गेले, तर अर्धा portfolio एका sophisticated strategyमध्ये अडकतो. त्यामुळे फक्त minimum आहे म्हणून तेवढे पैसे गुंतवायचे असं नाही.

SIF हे SEBIच्या regulatory frameworkमध्ये तयार झालेलं product आहे आणि SIF सुरू करणाऱ्या AMCसाठीही eligibility criteria आहेत. पण regulation असणं म्हणजे नुकसान होणार नाही अशी हमी नव्हे. Market risk, strategy risk आणि manager risk तिथेही असते.

SIF strategiesमध्ये SIP, STP आणि SWPसारख्या सुविधा देण्याची तरतूदही आहे. पण त्यांची प्रत्यक्ष रचना प्रत्येक strategyच्या documentsवर अवलंबून असते. त्यामुळे SIP आहे म्हणून mutual fundसारखीच प्रत्येक अट असेल असं गृहीत धरता कामा नये. संबंधित SIFचे offer document पाहणं गरजेचं आहे.

SIF चे disadvantages

SIF मध्ये वापरले जाणारे “Long-short”, “derivatives”, “dynamic allocation” हे शब्द ऐकायला आकर्षक आहेत. पण sophisticated म्हणजे complicatedही असू शकतं. साध्या mutual fundमध्ये तुम्हाला मुख्यतः fund कुठे गुंतवतो हे समजून घ्यावं लागतं. SIFमध्ये त्यापेक्षा पुढे जावं लागतं. Short exposure किती आहे, derivativesचा वापर कसा होतो, net exposure काय आहे, market उलट गेल तर strategy चा परिणाम काय असेल आणि आपला fund manager risk कसा नियंत्रित करतो हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे ज्याला या गोष्टींची कल्पना नाही त्याने फक्त नाव भारी आहे म्हणून SIFमध्ये उडी मारू नये.

दुसरी गोष्ट म्हणजे manager risk. Long-short strategy कागदावर खूप सुंदर दिसू शकते. पण चुकीच्या वेळी घेतलेली short position, चुकीचा sector call किंवा चुकीचं position sizing portfolioला नुकसान देऊ शकतं. त्यामुळे SIF निवडताना फक्त मागच्या वर्षाचा return पाहणं पुरेसं नाही. त्या returnमागे किती risk घेतल गेल होत, हेही पाहावं लागेल.

तिसरी गोष्ट म्हणजे liquidity. Mutual fund म्हटलं की अनेकांना हवा तेव्हा उपलब्ध पैसा असं वाटतं आणि ते बर्याच प्रमाणात योग्य पण आहे. परंतु SIFमध्ये प्रत्येक strategyची redemption frequency सारखी असेलच असं नाही. SEBIच्या frameworkमध्ये daily, weekly, fortnightly, monthly, quarterly किंवा इतर redemption structuresची मुभा आहे. काही strategies interval स्वरूपाच्या असू शकतात. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी “पैसे कधी आणि किती काढता येतील?” हे तपासून घ्यायला हव. तसेच खर्चाचाही विचार करावा. कारण Active management, derivatives, trading आणि अधिक sophisticated risk management यामुळे खर्चाची रचना साध्या index fundपेक्षा वेगळी असू शकते. त्यामुळे फक्त “या fundने एवढा return दिला” एवढं पाहून निर्णय घेऊ नये. Expense ratio, transaction costs, exit load आणि इतर charges पाहिल्याशिवाय खरी तुलना होत नाही.

मग SIF कुणासाठी?

माझ्या मते SIF प्रत्येक गुंतवणूकदाराने घ्यायलाच हवं असं नाहीये. ज्याला अजून equity mutual fund, debt fund, asset allocation आणि portfolio diversification याचं नीट आकलन झालेलं नाही, त्याने SIFपासून सुरुवात करण्याची काहीच गरज नाही. sif मध्ये जाण्याआधी काही बेसिक गोष्टी समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. पण एखाद्या गुंतवणूकदाराकडे आधीच व्यवस्थित diversified portfolio आहे, त्याला mutual fundsचा चांगला अनुभव आहे, ₹10 लाख किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम स्वतंत्र strategyसाठी बाजूला ठेवण्याची क्षमता आहे आणि derivatives व short exposureची गुंतागुंत समजून घेण्याची तयारी आहे, त्याने SIF त्याच्या portfolio मध्मये SIF चा समावेश करायला हरकत नाही. अर्थात इच्छा असेल तर आणि अभ्यास करून.

एखादं नवीन investment product बाजारात आलं की आपल्याला एक सवय आहे. नवीन नाव ऐकलं की “यात किती return मिळतो?” हा पहिला प्रश्न पडतो. SIFच्या बाबतीत हा प्रश्न थोडा उशिरा विचारलेला बरा. आधी विचारायचं — ही strategy काय करते? Manager पैसे कुठे लावणार आहे? Short position कधी घेऊ शकतो? Derivativesचा वापर किती आहे? बाजार उलटा गेला तर strategyची प्रतिक्रिया काय असेल? पैसे काढायचे असतील तर किती वेळ लागेल? खर्च किती आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या सध्याच्या portfolioमध्ये या strategyची गरजच काय आहे? या प्रश्नांची उत्तरं समाधानकारक असतील, तर SIFचा विचार करता येतो. नाहीतर केवळ नाव नवीन आहे, ₹10 लाखांची entry आहे आणि “PMSसारखी strategy” मिळतेय म्हणून पैसे टाकण्यात अर्थ नाही.

SIF ही काही जादूची कांडी नाही. बाजार वर गेला तर नफा आणि बाजार खाली गेला तर नफा, असा काही नियम त्यात नाही. उलट derivatives आणि short exposureमुळे काही परिस्थितीत strategy अधिक complex आणि अधिक volatile होऊ शकते.तेजीच्या काळात इतर इक्विटी फंड पेक्षा SIF मधून CAGR कमी देखील मिळू शकतो. म्हणून SIFकडे mutual fundची replacement किंवा PMSचा स्वस्त पर्याय म्हणून अजिबात बघू नये. नाही. SIF ही त्या दोन्हीच्या मधल्या एका विशिष्ट गरजेसाठी तयार केलेलं investment tool आहे.

म्हणुनच ₹10 लाख हातात आहेत म्हणून SIF घ्यायची घाई करू नका. product नवीन आहे. पूर्ण विचार करा, माहिती घ्या आणि निर्णय घ्या.

टीप: SIFमध्ये बाजाराशी संबंधित जोखीम आहे. परताव्याची हमी नाही. कोणत्याही SIFमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित Investment Strategy Information Document, Scheme Information Document, risk factors, charges, redemption terms आणि derivatives/short exposureची रचना काळजीपूर्वक समजून घ्या. प्रत्यक्ष strategyच्या अटी संबंधित SIFच्या कागदपत्रांनुसार बदलू शकतात. हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी लिहिलेला आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणूक सल्ला नाही.

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. MandarJOG.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!