श्रीरंगला लक्षात आल होत की तो अपूर्वाच्या प्रेमात पडला होता. पण त्याचा काहीच उपयोग नाही हे त्याला माहित होत. प्रेमाची कबुली दिली तर ती नक्की राखी बांधेल आणि आपली बहिण होईल ह्याची भीती होती. श्रीरंगला ते अजिबात नको होत. आज निदान कलीग, मैत्रीण तरी आहे. उद्या बहिण झाली तर तिच्याबद्दल मनात प्रेमाचे विचार येण देखील पाप असेल अस त्याला वाटत होत. तो ऑफिसमध्ये असला की अपूर्वा शी बोलण होत असे. हल्ली अपूर्वा जरा जास्तच सुंदर दिसू लागली आहे अस त्याला वाटू लागल होत. तिच्या पेहराव, मेक अप वगैरे मध्ये बदल होऊन ती जास्तीच आकर्षक दिसू लागल्याच त्याच्या लक्षात येत होत. ते खरच तस आहे की आपण प्रेमात असल्याने आपल्यालाच तस वाटतंय हे त्याला कळत नव्हत. पण तो अपूर्वाला न्याहाळत असे. तिच्या लक्षात तर येत नाही ना ह्याची एक भीती त्याच्या मनात असे. त्यामुळे अपुर्वाने विचारलेल्या साध्या प्रश्नावर देखील तो गडबडत असे. इतका हुशार आणि शार्प माणूस असा काय fumble होतोय ह्या विचाराने अपूर्वाला हसू येत असे. पण ती ते दाबून काम संपवून केबिन बाहेर आल्यावर हसत असे.
जानेवारी महिना ह्याच गुंतागुंतीत गेला. श्रीरंग ला आता असह्य होत होत. प्रपोज करून काय तो सोक्षमोक्ष लाऊन टाकावा अस त्याला सतत वाटू लागल होत. पण राखी बांधून घ्यायला तो तयार नव्हता. अपूर्वाच्या वागण्यात काहीच सिग्नल मिळत नव्हता. ती सर्वांशीच मोकळेपणाने वागत असे तशीच श्रीरंग शी पण वागत होती. बाकी तिचा नो नॉन सेन्स अवतार पाहिला असल्याने श्रीरंग पुढाकार घेऊन प्रपोज करायची हिम्मत गोळा करू शकत नव्हता.
त्या दिवशी संध्याकाळी खेळून झाल्यावर श्रीरंग ने ड्रिंक मागवलं. ते पाहून मध्या आणि आणि दिग्या चाट पडले.
मध्या- काय रे रंगा…आज चक्क क्लब मध्ये ड्रिंक? तू घरी जाऊन घेतोस ना?
श्रीरंग- सोड ना यार. कुठे घेतो त्याने काय फरक पडतो. डोक फिरलंय माझ.
मध्या- काय झाल?
श्रीरंग- काही नाही. सोड ना.
दिग्या- रंगा साल्या आम्ही यार लोक असताना असा सडू चेहरा करून बसणार तू. सांग तर काय लोचा आहे ते. आपण फोडू जो कोण वाकड्यात गेलाय त्याला.
श्रीरंग- ए मध्या तू ह्या दिग्याला सांग यार. आमच्या फिल्ड मध्ये ह्याच्या फिल्ड सारखे राडे, लाच आणि लफडी करावी लागत नाहीत. सो प्लीज हे गाडू, तोडू फोडू नको.
दिग्या- बर राहील. तुझा धंदा सभ्य आणि आमचा चोरीचा ना? तरी बर तुझ्या बिल्डींगच री डेव्हलपमेंट मीच केल आहे. कस केलय काम ते पण सांग ना मध्या ला.
श्रीरंग- सॉरी यार दिग्या. मला तस म्हणायचं नव्हत. डोक फिरलं आहे सध्या माझ.
दिग्या- बाई च matter आहे का?
हे ऐकून श्रीरंग ने चमकून त्याच्याकडे पाहिलं.
दिग्या- असा घाबरतो काय? असेल तर असू दे की. आपण त्यात पण मदत करू. ह्या मध्या ची ती साली…काय रे नाव तीच?
श्रीरंग- अपूर्वा…
दिग्या- हा अपूर्वा…तिने राखी बांधली म्हणून मी थांबलो का? तर नाही. ती नाही तर और सही. एक गायिका आहे सध्या माझ्या रडार वर.
मध्या- गायिका?
दिग्या- हो. अरे असेच लहान सहान गाण्याचे प्रोग्राम करते. माझ्या कंपनीने एक banner स्पोन्सर केला होता. म्हणून मला चीफ गेस्ट बोलावलं होता. सत्कार केला माझा. मग प्रोग्रामला बसलो. आवाजापेक्षा बाईच आवडली मला. नंबर वगैरे घेतला आहे. ऐशी टक्के ग्यारेन्ती आहे काम होणार. तुझ्या त्या अपूर्वाच्या बाबतीत दहा टक्के पण नव्हती. ती थोडी सरकलेली आहे हे आधीच माहित होत. पण मी खडा टाकून पाहिला. टेंडर असो की बाई Never leave any stone unturned हे माझ तत्व आहे. माझ सोड.. ए रंगा तू बोल ना. तुला काय झालंय बाबा.
श्रीरंग- अरे काय सांगू…
श्रीरंग अपूर्वा बद्दल काय वाटत ते सांगणार होता. पण त्याला दिग्या समोर ते बोलायला awkward वाटल. त्यात दिग्याला १०% शक्यता वाटत असलेली अपूर्वा दिग्याला, इतक्या अनुभवी माणसाला पटली नाही तर मला काय घंटा पटणार हा विचार मनात येऊन तो आणखी hurt झाला आणि त्याने समोर असलेला ग्लास एका घोटात संपवला. आठ वाजले होते. तिघे क्लब मधून निघाले. दिग्या आमदार साहेबांच्या घरी पार्टीला गेला. मध्या ने श्रीरंग च्या ड्रायव्हरला त्याच्या गाडीच्या मागून यायला सांगितल आणि श्रीरंग ला स्वतःच्या गाडीत बसवून तो घरी घेऊन आला. ते आले तेव्हा अपूर्वा निघत होती.
मध्या- अपु ह्या वेळी कुठे?
मध्या ची बायको- अहो शेजारच्या रश्मी आणि इतर पोरींबरोबर सिनेमा बघायला जाते आहे.
अपूर्वा- हेलो सर.
श्रीरंग- हेलो…
अपूर्वा- गुड नाईट सर.
श्रीरंग- गुड नाईट.
अपूर्वा गेली. हे दोघे घरात येऊन बसले. मध्या च्या बायकोने डोळ्याने खुण करून हा इथे कसा? सगळ ठीक आहे ना विचारलं. त्याने हो. काळजी नको करू. अस सांगितल. मग मध्याची बायको माधुरी म्हणाली-
माधुरी- रंगा भावोजी आला आहात तर जेऊनच जा आता. जेवण तयार आहे.
श्रीरंग- ठीक आहे.
मध्याच्या घरी त्याला अजिबात परक वाटत नसल्याने तो लगेच तयार झाला. इतकी ती मैत्री घट्ट होती. तिघे जेवयाला बसले. श्रीरंग फार काही बोलत नव्हता. मध्या ने माधुरीला खुण केली की तू विचार त्याला.
माधुरी- काय हो रंगा भावोजी. असे गप्प गप्प का? काय झालंय?
श्रीरंग- काही नाही…
माधुरी- अस कस. काहीतरी नक्की झालंय. नाहीतर असा पापड मोडत नाही तुमचा. आता सांगायचं नसेल तर नका सांगू. मी आहे त्याची अडचण आहे का? मी आत जाते हव तर.
हे बोलून माधुरी उठली.
श्रीरंग- वहिनी प्लीज. तुही असल्यावर अडचण कसली. तुमच्यापासून काय लपवलं मी आणि स्वाती ने देखील. आणि आता ज्याचा त्रास होतोय ते तर तुमच्याशीच निगडीत आहे.
हे ऐकून मध्या आणि माधुरी चकित झाले.
माधुरी- माझ्याशी निगडीत? भावोजी असे कोड्यात नका बोलू. जे आहे ते सांगा स्पष्ट.
श्रीरंग- वहिनी मी तुमच्या अपूर्वाच्या प्रेमात पडलोय. काय करू कळत नाहीये. तिचा सडेतोड स्वभाव आहे. त्याची भीती वाटते मला. मन मोकळ केल तर राखी बांधेल मला दिग्याला बांधली तशीच. आणि मला ते अजिबात आवडणार नाही. आणि रोज तिला समोर बघून जे आहे ते मनात ठेऊन जगायचा पण कंटाळा आलाय. काय करू काळात नाहीये.
हे ऐकून धक्का बसलेल्या मध्या आणि मधुरीनी एकमेकांकडे आश्चर्याने पाहिलं. श्रीरंग ताटाकडे बघत बोलत होता.
श्रीरंग- करून टाकू का मी सरळ प्रपोज? जे होईल ते होऊ दे मग. राखी बांधायला आली तर मी बांधून नाहि घेणार. जबरदस्ती काय आहे राखी बांधायची?
माधुरी- (सिरीयस स्वरात) नको…
श्रीरंग- काय नको वहिनी?
माधुरी- भावोजी प्लीज अशी चूक करू नका. आमची अपूर्वा कणखर असली तरी खूप सेन्सिटीव आहे. तुमचा खूप आदर करते ती. तुम्हाला गुरु स्थानी मानते. ऑफिसातून आल्यावर रोज मला सांगते की सर असे आहेत. सर तसे आहेत. आज मला हे शिकायला मिळाल. ते समजल. तुम्ही तिचे आदर्श आहात. आणि तिच्या गुरूच्या, आदर्शाच्या मनात तिच्याबद्दल अश्या प्रकारच्या भावना आहेत हे तिला कळल ना तर ती खूप hurt होईल. मामाच्या जाण्याच्या दु:खातून आता कुठे सावरते आहे. त्यात परत हा आघात नको.
मध्या- हो रंगा. माधुरी म्हणते आहे ते योग्य आहे. हे बघ..मला कळतंय की स्वाती वहिनी गेल्यावर तू एकटा आहेस. तुलाही कोणाची तरी साथ हवी आहे. आपण शोधू ना यार. तू हे आधी सांगितल असत तर एव्हाना एक छान बायको शोधली असती ना आपण तुझ्यासाठी. अरे हल्ली अनेक वेब साईट आहेत सेकंड म्यारेज साठी. आपण तिथे तुझ नाव नोंदवू. कोणीतरी नक्की मिळेल. पण अप्पू नको यार. मला नाही वाटत तिला अश्या कोणत्याही रिलेशनशिप मध्ये इंटरेस्ट आहे. तिला तीच आयुष्य जगू दे. तू प्रपोज वगैरे केलस ना तर तिला खूप धक्का बसेल. कदाचित ती तो सहन नाही करू शकणार. आणि तुला तिने राखी बांधली तर तुला चालेल का?
श्रीरंग पटकन बोलून गेला-
श्रीरंग- अजिबात नाही.
मध्या- मग सोड तिचा विचार. अपूर्वा म्हणजे तुझ्या आयुष्यात असलेल मृगजळ आहे अस समज. समोर दिसतंय ह्यातच आनंद मान. ते मिळवायला गेलास तर हाती काहीच लागणार नाही. हे मी तुला अपुर्वाचा जिजा म्हणून नाही तर तुझा मित्र म्हणून सांगतोय.
त्या रात्री श्रीरंग घरी आला. त्याला मध्या आणि माधुरी जे म्हणाले ते पटल होत. पण मन ऐकायला तयार नव्हत. अपूर्वला मनातून काढून टाकण त्याला अशक्य वाटत होत पण पर्याय नव्हता. तो उशिरा झोपला. सकाळी अलार्म वाजूनही तो उठला नाही. तसाच पडून होता. काहीच करायची इच्छा होत नव्हती. त्याचा परत डोळा लागला आणि जाग आली ती थेट दहा वाजता एका कॉल आल्यावर. कॉल क्लायंत चा होता. त्याने कसाबसा तो घेतला आणि मग उठून बाई ने फ्लास्क मध्ये ठेवलेला चहा कपात ओतून सिप करत तो बाल्कनीत येऊन झोपाळयावर बसला. स्वातीला आवडायचा तो झोपाळा म्हणून त्याने जुन्या घरातून तिची आठवण म्हणून इथे आणला होता. त्यावर बसल्यावर त्याला स्वातीची आठवण येत असे. आजही आली. तो उठून हॉल मध्ये लावलेल्या तिच्या मोठ्या फोटोसमोर आला आणि म्हणाला-
श्रीरंग- का गेलीस मला सोडून तू? बघते आहेस ना किती एकाकी झालोय मी ते? आपला ओंकार…ओम अमेरिकेत आणि मी इथे…तू कुठेच नाहीस…हे काय झाल ग स्वाती…आठवतात का तुला आपले आनंदाचे दिवस? आपल लग्न, ओम चा जन्म…माझी प्रगती…त्यात तुझी साथ…आपल्या फोरेन ट्रिप्स…तुझा तो झोपाळा…सगळ मागे सोडून गेलीस ग तू…पण तुझ्या वाटणीचा wardrobe अजूनही आहे आपल्या खोलीत….तुझी प्रत्येक साडी, ड्रेस आणि दागिने तसेच आहेत त्यात…अगदी तुझा चष्मा, घड्याळ आणि टूथ ब्रश पण मी घेऊन आलोय ह्या घरात…सगळ सगळ आहे…फक्त तू नाहीस….कसा जगू मी हे उरलेलं आयुष्य एकट्याने…? इतकी का स्वतःची सवय लावलीस मला? आणि सवय लावून अशी अचानक साथ सोडून का गेलीस? काय अवस्था झाली आहे बघ माझी. वेड्यासारखा त्या अपूर्वाच्या मागे लागलोय…मला तू दिसतेस तिच्यात स्वाती…काय करू मी? मला अस वाटत की ती तुझ्यासारखीच मला समजून घेईल, माझी काळजी घेईल, माझ्यावर प्रेम करेल, माझ आयुष्य आनंदाने भरून टाकेल…तू भरलं होतंस तसच…तुझी जागा कोणीच घेउ शकणार नाही स्वाती…पण माझ्या आयुष्यात तू गेल्यावर जी पोकळी आहे ना ती मला खाते आहे रोज…ती भरून काढायला कोणीतरी हवय स्वाती…खूप एकाकी आहे मी…आणि ती पोकळी अपूर्वा भरून काढेल अस मला वाटत…पण तिच्या मनात तस काहीच नाहीये…मला वाटत माझ नशीबच खराब आहे…आता खरच जगायची फार इच्छा नाहीये स्वाती…..कदाचित मी लवकरच तुझ्याकडे येईन…नाही मी weak नाहीये…पण इच्छाच नाहीये आता कशाचीच…एकटा जिवंत आहे मी…पण ह्याला जगण म्हणता येणार नाही….आणि ज्यात जगण नाही अस जिवंत राहण्याला काय अर्थ आहे स्वाती….
हे बोलून श्रीरंग त्या फोटोला डोक टेकून ढसा ढसा रडू लागला. तेव्हा त्या फोटोवर बाष्प जमा झाल्याचा त्याला भास झाला. त्याच वेळी मागे सोफ्यावर ठेवलेला त्याचा फोन वाजत होता. त्यावर अपूर्वा हे नाव दिसत होत.
क्रमश: ©मंदार जोग
