रिफ्लेक्शन | Mandar Jog

रिफ्लेक्शन भाग २

मानसीला हर्षदच्या निर्णयाचे आश्चर्य वाटले असले तरी त्याचा आत्मविश्वास आवडला होता. थोडीफार इगोकडे झुकणारी का असेना पण आपल्या निर्णयाबद्दल असलेली त्याची कमिटमेंट तिला भावली होती. काहीतरी चॅलेंजींग आणि शिकण्यासारखे मिळणार ह्या आनंदात ती होती. बॉस, व्यावसायिक ह्या पलीकडे जाऊन तिला हर्षदबद्दल व्यक्ती म्हणून एक कुतूहल निर्माण झाले होते.

दोनच दिवसात हर्षदने एक ऑपरेशन हेड लवकरात लवकर नियुक्त करायचे आदेश एचआर ला दिले. आठवड्याभरात पहिले राउंड क्लियर केलेल्या चार जणांचे सीव्ही हर्षदला मिळाले. इंटरव्ह्यू लाईनअप झाले. पहिल्या तिघांपैकी एकजण अनुभव, हुशारी ह्या निकाशांवर हर्षदला योग्य वाटत होता. आता फक्त एका कँडीडेटचा इंटरव्ह्यू झाला की हर्षद ऑफर रिलीज करायला सांगणार होता. उद्या दुपारी असलेला शेवटचा इंटरव्ह्यू फक्त फॉर्मॅलिटी होता. हर्षदचा निर्णय झाला होता.

गेला आठवडाभर हर्षद आणि मानसीमध्ये संवाद फक्त कामापुरता होता. म्हणजे आधीही तो कामापुरताच असे. पण त्या मीटिंगनंतर उगाच एक तणाव निर्माण झाला होता. मानसीच्या वागण्यात काहीच फरक नव्हता. हर्षद मात्र तिच्याशी बोलताना हातचं राखून बोलत विषय पटकन संपवू लागला होता. त्याच्या वागण्यातला फरक तिच्या लक्षात आला होता. परंतु तिने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. उलट त्याच्या निर्णयामुळे कंपनीला काय धोके उत्पन्न होऊ शकतात आणि त्यांचा सामना कसा करायचा ह्याची रणनीती ती आखत होती.

आज सकाळी अकरा वाजता सेक्रेटरीच फोन आला. “Sir the candidate has come for the interview”.

हर्षद- Okay send.

हर्षदच्या केबिनचा दरवाजा उघडला गेला. हर्षद लॅपटॉप मध्ये डोके खुपसून बसला होता. “May I come in” एक मंजुळ आवाज आणि एक धुंद करणाऱ्या परफ्युमचा सुगंध हर्षदच्या कानात आणि नाकात शिरले. त्याने डोके वर करून दरवाज्याकडे बघितले. दारात राधिका उभी होती. साक्षात रतीचे रूप. चेहऱ्यावर “येता का जाऊ” असे भाव. थेट नजरेत बघत नजरेने आव्हान देणारे डोळे, कमनीय बांध्याची जाणीव करून देणारी बोचरी वेशभूषा! जणू कॉर्क उघडायचा अवकाश की लगेच फसफसून उडायच्या तयारीत असलेली शॅम्पेनची बाटली! “ही बया ऑपरेशन्स हेड पदासाठी कोणी सिलेक्ट केली?” हर्षदच्या मनात तिला बघत असताना प्रश्न आला. त्याने तिला “प्लिज कम इन” म्हणत आत आल्यावर बसायची खूण केली. समोर असलेला तिचा सीव्ही कुतूहलाने वाचायला सुरुवात केली. तिला आवश्यक तितक्या वर्षांचा अनुभव असला तरी सारख्या नोकऱ्या बदल्याने ती एन्ड टू एन्ड अनुभवात कमी पडत होती.

हर्षद- So Radhika, right?

राधिका- (मादक हसत) Yes. Thats me.

हर्षद- तुम्हाला कॅन्डीडेट कडून आमच्या काय अपेक्षा आहेत ह्याची कल्पना आहे?

राधिका- Yes. मला कल्पना आहे. अश्या प्रकारचे तीन प्रोजेक्ट मी ह्या आधी यशस्वी केले आहेत.

हर्षद- पण तुम्हाला पूर्ण प्रोजेक्ट लाईफसायकलचा अनुभव नाही. तुम्ही फार लवकर नोकऱ्या बदलल्या आहेत. त्याच कारण?

राधिका- Growth!

हर्षद- म्हणजे तुम्ही ह्याच कारणासाठी आमची कंपनी देखील सोडाल.

राधिका- (त्याच्या डोळ्यात बघत) मी एक बोलू का तुम्हाला राग येणार नसेल तर?

हर्षद- बोला.

राधिका- ह्याकडे बघायचा एक दुसरा दृष्टिकोन पण आहे. तो म्हणजे मला ग्रोथ इथेच मिळाली तर मी आपली कंपनी सोडून नाही जाणार.

हर्षद- I like your confidence.

राधिका हर्षदच्या डोळ्यात पहात त्याच मन वाचायचा प्रयत्न करत होती.

हर्षद- पण ही पोझिशन खूप डिमांडींग आहे. मी तुम्हाला ह्या पोझिशन साठी का हायर करावे?

राधिका- कारण मी फक्त अपेक्षाच पूर्ण करणार नाही तर त्या पलीकडे जाऊन तुम्हाला “satisfy” करेन ही खात्री आहे मला.

तिने satisfy शब्दावर दिलेला जोर हर्षदच्या लक्षात आला.

हर्षद तिचा सीव्ही वाचत होता आणि अंदाज बांधत होता. त्याने आधी शॉर्टलिस्ट केलेला उमेदवार हिच्यापेक्षा खूप चांगला होता. चार पैसे जास्त द्यावे लागले तरी त्याला एकदा नोकरीवर घेतल्यावर हर्षदला प्रोजेक्टमध्ये बघायची गरज नव्हती. बाकी राधिकाचं आकर्षक दिसणं वगैरे त्याला इम्प्रेस करू शकत नव्हतं. She was not his types anyway! निर्णय झाला होता. हर्षदने उगाच दोनचार जुजबी प्रश्न विचारून “The hr will get in touch with you.” असे सांगून तिची बोळवण केली. ती थँक्स म्हणून निघायला उठली आणि इतक्यात मानसी हर्षदच्या केबिनमध्ये आली. राधिकाला तिथे पाहून दारातच थांबली-

मानसी- Oh I am sorry! मी मग येते!

इतके म्हणून राधिकाला पेन्सिल हिल सँडलच्या खालच्या टोकापासून लाल हायलाईट केलेल्या केसांवर लावलेल्या क्लिपच्या वरच्या टोकापर्यंत “आसँडल हेअरक्लिप” न्याहाळून चेहऱ्यावर ती फारशी आवडली नसल्याचे भाव घेऊन मानसी निघून गेली. हे हर्षदच्या नजरेने बरोब्बर हेरले. “Pleasure meeting you” असे म्हणून हस्तान्दोलनासाठी पुढे केलेला राधिकाचा हात दरवाज्याकडे बघत असलेल्या हर्षदने हातात घेतला. तो तसाच हातात धरून तो दरवाज्याकडे बघत विचार करत होता. राधिकाला हात सोडवून घ्यायची अजिबात घाई नव्हती. मनाशी काहीतरी ठरवून हर्षदने राधिकाचा हात सोडत तिला विचारले ” तुझा नोटीस पिरियड किती आहे?”

राधिका- तीन महिने.

हर्षद- What if we buy it out?

राधिका- Then I am all yours…immediately!

हर्षद- Cool. Please wait outside. My secretary will tell you what is next.

राधिका हर्षदकडे बघून मधाळ हसत “Okay” म्हणत निघाली. दारात पोहोचल्यावर तिला मानसीच येणं, त्यानंतर लगेच हर्षदच बदललेलं वागणं आठवलं. ती बाहेर जाऊन विचार करत बसली.

हर्षदने एचआर मॅनेजरला फोन केला.

हर्षद- Manish I have selected Radhika to head the ops. Make her an offer, buy out her notice period. Ensure that she joins in 3 days flat!

हर्षदने फोन ठेवला. हा निर्णय देखील विचारपूर्वक घेतलेला होता. पण त्याला हर्षदच्या मनात सुरु असलेल्या द्वंद्वाची पार्श्वभूमी होती. ह्या सर्वापासून अनाभिज्ञ असलेली मानसी देशपांड्यांशी बोलत होती.

मानसी- I don’t think Harshad will hire such a female. Somwhow I didn’t get very good vibes from her.

देशपांडे- I too hope so.

इतक्यात मानसीच्या मोबाईलमध्ये एचआरचे मेल आले. त्यात राधिकाला ऑफर दिल्याची आणि एचआर बजेट मध्ये ते अप्रूव्ह करायची रिक्वेस्ट होती. मानसीने आश्चर्यचकित होत ते मेल देशपांड्याना दाखवले. देशपांड्यांनी चष्मा हातात घेऊन पुसत फक्त “हम्म” असा सुस्कारा सोडला! डोळ्यासमोर येत असलेल्या राधिकाला बाजूला न सारता मानसीने मेलला यांत्रिकपणे रिप्लाय केला “Noted and approved”

क्रमश:

पुढील भागाची लिंक- रिफ्लेक्शन भाग ३

रिफ्लेक्शन पहिल्या भागाची लिंक- रिफ्लेक्शन भाग १

लघुकथा वाचायला हि लिंक क्लिक करा- लघुकथा

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

3 thoughts on “रिफ्लेक्शन भाग २”
  1. खूपच छान
    उत्कंठावर्धक गोष्टी आहेत
    पुढचा भाग कधी येतोय याची वाट पहायला लावणार्‍या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!