गुंतता हृदय ही मराठी दीर्घकथा मंदार जोग

इतक्यात त्यांच्या खिडकीबाहेर असलेल्या झाडावरून एक पांढरी आकृती लांब उडत जाऊन एका हॉस्पिटलच्या खिडकीवर बसली होती. त्या हॉस्पिटलच्या रूममध्ये कायमचा नपुंसक झालेला रोहित बेडवर झोपला होता. त्याला शारीरिक वेदनेपेक्षा त्या घरात मुग्धाबरोबर आलेला प्रशांत बघून बसलेला शॉक जास्त त्रास देत होता. हे कसं शक्य आहे, हा विचार त्याचा मेंदू पोखरत होता. त्याने सहज मान वळवून खिडकीकडे पाहिलं, तर खिडकीत उभा राहून धूसर दिसणारा प्रशांत जोरजोरात हसत होता.

मुग्धाने ती रात्र जागून काढली. तिच्या डोक्यात विचारांचं काहूर होतं. तिला प्रशांतचं अस्तित्व जाणवलं होतं. म्हणजे काल तेजसच्या रूपात प्रशांत तिच्याबरोबर होता? पण हे कसं शक्य आहे? पण काल जे घडलं ते घडताना आपल्याबरोबर तेजस होता. म्हणजे आपण जे केलं ते त्याला तेजस समजून केलं. पण तो प्रशांत असल्याने प्रशांतला ते कळलं आहे. म्हणजे प्रशांतला आपली प्रतारणा कळली आहे! पण नाही, तो प्रशांत होता म्हणूनच ते आपल्या हातून घडलं, हे पण त्याला माहीत आहे. पण तरीही…. मुग्धाच्या मनात अपराधीपणा, प्रशांतच्या अस्तित्वाचा, स्पर्शाचा आनंद, अशा मिश्र भावना थैमान घालत होत्या.

सकाळी अमेयला शाळेत सोडल्यावर मुग्धा ट्रान्समध्येच होती. इतक्यात दाराची बेल वाजली. मुग्धाने दार उघडलं, तर समोर तेजस होता. मुग्धाला तो तेजस आहे की प्रशांत, हे कळत नव्हतं. त्यामुळे कसं रिअॅक्ट व्हायचं, हे सुचत नव्हतं.

तेजस- काल कुठे होतीस तू, मुग्धा?

मुग्धा- तू… तू… तुम्ही… कोण आहात?

तेजस- काय? तू हे मला विचारते आहेस? तू मला ओळखत नाहीस?

मुग्धा- खरं सांगा, तुम्ही कोण आहात? प्रशांत की तेजस?

तेजस- मुग्धा, मी तेजस आहे. प्रशांत ह्या जगात नाहीये.

मुग्धा- नाही. प्रशांत आहे. काल मला भेटला तो. की तू… तू प्रशांत आहेस? खरं सांग, प्रशांत.

मुग्धा वेड लागल्यासारखी बरळत होती. ते पाहून तेजस टेन्शनमध्ये आला.

तेजस- मुग्धा, काय झालंय तुला? बरं वाटत नाहीये का?

मुग्धा- प्रशांत, प्लीज मला माफ कर. मी काल जे वागले ते….

तेजस- मुग्धा, मी तेजस आहे, तेजस….. प्लीज, मला प्रशांत नको म्हणू. प्रशांत मेला आहे.

मुग्धा- तुम्ही जे कोणी असाल ते असा. पण प्लीज, इथून निघून जा. मला हे सहन होत नाहीये.

असं म्हणून मुग्धा दरवाजा बंद करू लागली. तेजसने दरवाजा धरून ठेवला आणि त्याने मुग्धाला आत ढकलून दार आतून लावून घेतलं. ते पाहून मुग्धा प्रचंड घाबरली. तिच्या डोळ्यात वेडसर झाक दिसू लागली.

मुग्धा- तेजस, लांब रहा. माझ्या जवळ येऊ नका….

तेजसला तिचं हे रूप बघून प्रचंड आश्चर्य वाटत होतं.

तेजस- (दोन पावलं पुढे सरकून) मुग्धा, तुला काय झालंय? मी का आलोय, ते ऐकून तर घे.

मुग्धा- तेजस, डोन्ट टच मी. लांब रहा.

तेजस- मुग्धा, हा काय वेडेपणा आहे? तू ऐक जरा माझं.

असं म्हणून तेजस तिच्या जवळ सरकला. मुग्धा अचानक किचनमध्ये धावली आणि आतून मोठा सुरा घेऊन बाहेर आली. तिच्या डोळ्यात अंगार फुलला होता. केस अस्ताव्यस्त झाले होते. चेहऱ्यावर घाम जमा झाला होता. तिने तेजसच्या दिशेने सुर्‍याचं पातं रोखून धरलं होतं.

मुग्धा- तेजस, लांब रहा. माझ्या जवळ यायचा प्रयत्न केलात तर मी हा चाकू माझ्या मानेवरून फिरवेन.

मुग्धाने चाकू आपल्या मानेजवळ धरला. ते पाहून तेजस हादरला. त्याला काय करायचं, ते सुचत नव्हतं. अचानक मुग्धाच्या मागे बघत तेजस म्हणाला—

तेजस- प्रशांत, तू?

हे ऐकून मुग्धा मागे वळली. ती वळल्यावर तेजस शिताफीने पुढे झाला आणि त्याने तिच्या हातातील चाकू काढून लांब फेकला. मुग्धा जोरात ओरडली—

मुग्धा- तेजस, डोन्ट टच मी.

तेजसने आपल्या उजव्या हाताने मुग्धाच्या कानफटात वाजवली. मुग्धा तिरमिरत सोफ्यावर जाऊन आदळली. तेजस पुढे झाला. तिच्या शेजारी बसून तिला हाताने हलवत म्हणाला—

तेजस- मुग्धा, काय झालंय तुला? अशी का वागते आहेस? काल कुठे होतीस दिवसभर? आणि तो मेसेज का केलास? आपण कधी भेटलो काल?

मुग्धा तेजसच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडत होती. तेजस तिला थोपटत होता. त्याला कळत नव्हतं की तिला नेमकं काय झालंय. अशीच दहा मिनिटं गेली. थोडी सावरल्यावर मुग्धा बोलू लागली. तिने त्याला काल घडलेली सर्व हकीगत सांगितली. ती ऐकल्यावर तेजस स्तिमित झाला.

तेजस- पण… पण मुग्धा, हे… हे कसं शक्य आहे?

मुग्धाने तिचा ड्रेस बाजूला करून तिच्या मानेवर, दंडावर, पाठीवर असलेले लव्ह बाईट्स तेजसला दाखवले.

मुग्धा- तेजस, हे फक्त प्रशांत करतो. हे मी त्याची बायको म्हणून सांगू शकते.

तेजसचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. पण जे समोर दिसत होतं, ते सत्य नाकारणंही शक्य नव्हतं.

मुग्धा मान खाली घालून म्हणाली—

मुग्धा- आणि हे सर्व होत असताना तिथे प्रशांत नाही, तर तुम्ही होतात. म्हणजे तो प्रशांत होता, पण तुमच्या रूपात. मला इंटिमेट क्षणी आनंद मिळत होता तो प्रशांतच्या स्पर्शाची ओळख कळल्यामुळे. पण… पण ते क्षण मी तुमच्याबरोबर जगत होते, तेजस. मी माझ्या प्रशांतशी बायको म्हणून त्याच्या जवळ येताना त्याच्याशीच प्रतारणाही करत होते!

मुग्धाला परत रडू फुटलं. तेजसने तिला जवळ घेतलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवला.

तेजस- मुग्धा, जर प्रशांत खरोखर आहे, तर त्याला सत्य काय आहे हे माहीत असेल. जर तो आहे आणि ह्या खोलीत आत्ता असेल, तर मी त्याला सांगू इच्छितो. प्रशांत, मी तुझ्या बायकोवर, मुग्धावर वेड्यासारखं प्रेम करतो. मी तिच्याशी लग्न करू इच्छितो. मी तिला आयुष्यात पूर्ण सुखी ठेवायचा प्रयत्न करेन. प्रशांत, आम्हाला परवानगी दे.

हे ऐकून मुग्धा तेजसकडे अविश्वासाने बघू लागली. तेजस म्हणाला—

तेजस- हो, मुग्धा. मी तुझ्याशी आज… आत्ता लग्न करायला तयार आहे. फक्त एक कोडं माझ्याकडेही आहे. त्याचं उत्तर आपल्याला शोधावं लागेल.

मुग्धा- कसलं कोडं?

तेजस- तेच सांगायला मी काल तुझ्या घरी आलो होतो. तू भेटली नाहीस म्हणून दिवसभर फोन करत होतो.

मुग्धा- काय झालंय, तेजस?

तेजसने आर्याने त्याच्यासाठी बनवलेला पुतळा प्रशांतचा कसा बनला, हे सर्व सांगितलं.

मुग्धा- पण… पण तेजस, हे कसं शक्य आहे?

तेजस- हा बघ फोटो.

तेजसने मोबाईलमध्ये काढलेला पुतळ्याचा फोटो तिला दाखवला. ते पाहून मुग्धा प्रचंड हादरली.

मुग्धा- तेजस, हा खरंच प्रशांत आहे. पण… पण आर्याने तर त्याला कधीच पाहिलेला नाहीये. मग….?

तेजस- म्हणून तर मी म्हणालो की हे एक खूप मोठं कोडं आहे. आणि ह्या कोड्याचं उत्तर आपल्याला मिळायलाच हवं.

मुग्धा- तेजस, सॉरी…. तुम्ही आल्यावर मी आत्ता जे वागले त्यासाठी. पण….

तेजस- मुग्धा, प्लीज. मला कळतंय सगळं. पण काहीतरी आहे, जे आपल्याला अजून कळलेलं नाहीये, पण कळायला हवं आहे. मला वाटतं कोणीतरी आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतंय. आपल्याला समोर असलेलं काहीतरी दिसत नाहीये. पण ते दिसेल आता, असं मला वाटू लागलं आहे.

तेजसच्या घरी दांडेकर काका आणि काकू पुतळ्यासमोर उभे होते. काका चष्मा नाकावर आणून पुतळ्याचा चेहरा निरखून बघत होते. काकू शेजारी उभ्या होत्या.

काका- हे… हे कसं शक्य आहे? हे अतर्क्य आहे.

काकू- तेच ना. काय होतंय, तेच कळत नाहीये.

काकांनी सहज पुढे होऊन पुतळ्याला हात लावला, तर त्यांना त्यात चेतना असल्याचा भास झाला. त्यांनी शॉक लागल्यासारखा हात काढून घेतला.

काकू- काय हो, काय झालं?

काका- (पुतळ्याकडे रोखून बघत) क… काही नाही. चल तू. आपल्याला लगेच निघायचं आहे.

काकू- कुठे?

काका- गुरुजींकडे…..

गुरुजी ध्यान लावून बसले होते. काका आणि काकू त्यांच्याकडे गंभीर चेहऱ्याने बघत होते. अशीच काही मिनिटं गेली. गुरुजींनी डोळे उघडले.

काकू- गुरुजी, सांगा ना हे नक्की काय आहे ते.

गुरुजी- मी म्हणालो होतो तेच आहे हे. हे तिचं आणि त्याचं युगानुयुगाचं नातं आहे. प्रत्येक जन्मात ती आणि तो एकत्र येतात. ह्या जन्मी ते दोन वेळा एकत्र येणार आहेत. त्यांना एकमेकांपासून दूर करणं नियतीलाही जमलं नाहीये. म्हणून जे होईल, ते तुम्ही बघत रहा. ह्या जन्मी तेजस तुमचा मुलगा म्हणून जन्माला आला असला, तरी आयुष्यात पुढे तो त्या शक्तीचा होईल, त्या दोघांच्या प्रेमाचा भागीदार होईल, हे लक्षात ठेवा.

काका- पण कोण आहेत ते दोघं?

गुरुजी- युगानुयुगं एकत्र असलेल्या प्रेमाचं प्रतीक आहेत ते दोघं. त्यांच्यावर नियती, काळ, निसर्ग कोणीही बंधन घालू शकत नाहीत. युगानुयुगं ही सृष्टी, नियती त्यांच्यासमोर झुकत आले आहेत. आता परत त्यांना झुकावं लागणार आहे. तुम्ही आणि तेजस नशीबवान आहात की तुम्ही ह्या अवर्णनीय घटनेचे फक्त साक्षीदार नसाल, तर त्यात तुमचं योगदान असेल. ह्यापलीकडे मला काही दिसत नाहीये. माझी दिव्यदृष्टी पण त्या शक्तीला एका मर्यादेपलीकडे बघू शकत नाही. फक्त तेजसला एका दिव्यातून जावं लागणार आहे, हे लक्षात ठेवा आणि त्यासाठी मानसिक तयारी करा.

काका-काकूंनी एकमेकांकडे पाहिलं. दोघे सावकाश उठले आणि निघाले.

मुग्धाच्या घरी मुग्धा तेजसला प्रशांतबद्दल सांगत होती. त्यांचं लग्न, घरून असलेला विरोध, त्यांचे सर्व नातेवाईकांशी संपलेले संबंध, त्यांनी लग्नानंतर केलेला संघर्ष, अमेयचा जन्म, त्यांचे बदललेले दिवस, त्यांच्यात असलेला अप्रतिम रोमान्स. तेजस ऐकत होता. बोलता बोलता संध्याकाळ झाली. अमेय घरी येऊन ट्युशनला गेला होता. मुग्धा भरभरून बोलत होती. कधी हसत होती, तर कधी डोळ्यात अश्रू येत होते. बोलता बोलता ती म्हणाली—

मुग्धा- मला अजून आठवतो तो दिवस. आमची दहावी ॲनिव्हर्सरी. १६ जानेवारी. दिवसा प्रशांतच्या प्रेमात न्हाऊन मी आणि अमेय डिनरला त्याला भेटायला निघालो. टॅक्सीत असताना मला आरोग्यनिधी हॉस्पिटलमधून इन्स्पेक्टर जाधवांचा फोन आला. आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो…..

मुग्धा तेजसला सगळी घटना सांगत होती. तिची डॉक्टर आणि रोहितबरोबर झालेली भेट. तिला मिळालेले पैसे. तिने प्रशांतचं हृदय दान करायला दाखवलेली तयारी. सगळं मुग्धा सांगत होती. ते ऐकून तेजसला प्रचंड शॉक बसला. तेजस म्हणाला—

तेजस- काय तारीख म्हणालीस तू? १६ जानेवारी? आरोग्यनिधी हॉस्पिटल? हार्ट ट्रान्सप्लांट?

मुग्धा- हो… का, काय झालं?

तेजस काहीतरी बोलणार, इतक्यात त्याच्या हृदयात प्रचंड कळ आली आणि तो कोसळला. ते पाहून मुग्धा घाबरली. ती तेजसला हाक मारू लागली—

मुग्धा- तेजस… तेजस… काय झालंय तुम्हाला? तेजस, उठा ना….

मुग्धाने तेजसच्या चेहऱ्यावर पाण्याचे हपके मारले. तेजस बेशुद्ध होता. मुग्धाने पॅनिक होऊन ॲम्ब्युलन्सला फोन लावला!

ॲम्ब्युलन्स आरोग्यनिधी हॉस्पिटलकडे निघाली होती. मुग्धा तेजसचा हात हातात धरून रडत त्याच्याकडे बघत होती. आपल्या आश्रमात ध्यानस्थ बसलेल्या गुरुजींना ती वेळ आल्याची जाणीव झाल्याने त्यांनी हात जोडून विधाता नामक शक्तीची प्रार्थना सुरू केली होती!

क्रमश:

सर्व भाग एकत्र – गुंतता हृदय – सर्व भाग

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. MandarJOG.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

One thought on “गुंतता हृदय….(भाग ३२)”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!