गिल्ट…

वेळ पहाटे साडेचार पाचची. अजून उजाडलं सुद्धा नव्हतं. ती त्यांच्या फाईव्ह स्टार रिसॉर्ट मधील रूमच्या टेरेस वर येऊन उभी राहिली. समोर दिसत असलेल्या बीच वरून येणारा थंड वारा अंगाला लागून ती शहारली. अंगाभोवती गुंडाळलेली चादर तिने आणखी घट्ट गुंडाळून घेतली. डोळे मिटून खोल श्वास घेत ती थंड, दमट हवा ती स्वतःत भरून घेऊ लागली. इतक्यात मागून तो आला. फक्त बॉक्सर शॉर्टस आणि वर उघडा. पन्नाशीचा होता तो. पण अजूनही उत्तम मेंटेड. पांचेचाळीशीत असलेल्या तिच्या सारखाच. त्याने मागून येऊन तिला मिठी मारली आणि तिच्या कानात पुटपुटला-

तो- गुड मॉर्निंग…

ती- कसलं गुड मॉर्निंग? अजून आपली नाईट सुद्धा झालेली नाही. झोपलोय कुठे आपण.

तो- तुझ्यामुळे…

ती- हो का? तू जागी ठेवली आहेस मला रात्रभर आणि माझ्यावर आरोप करतो आहेस.

तो- बर माझ्यामुळे जागलो. मान्य. पण जागरणाचा आनंदच आहे ना? गिल्ट नाही ना?

ती त्याच्याकडे वळून त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली-

ती- माहीत नाही. पण गिल्ट नक्की वाटेल जेव्हा माझ्या नवऱ्याला हे…आपलं हे असं रात्र जागवण, एकमेकांत हरवून जाणं कळलं तर…

तो- कळू दे की. माझ्या बायकोला पण कळू दे. मला आता भीती नाही वाटत…

ती- मला वाटते. आज आमच्या लग्नाचा पंचवीसवा वाढदिवस आहे. तो असा तुझ्या बरोबर ह्या रिसॉर्ट मध्ये रात्र जागवून साजरा होईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं…तू सिंगापूर वरून अचानक आलास काय आणि मला इथे बोलावून घेतलंस काय…

तो- शक्य होतं. क्लायंटची मिटिंग अचानक कॅन्सल झाली सो लगेच चान्स घेतला आणि आलो इथे… ए तू मुलांना काय सांगितलंस?

ती- काय सांगायचं हेच कळत नव्हतं…असं अचानक गोव्याला आणि ती पण एकटीने…मुलं कॉलेजात आहेत आता. त्यांना अक्कल आहे बरोबर…

तो- हो आता तर त्यांचं वय आहे मैत्रिणीला रिसॉर्ट मध्ये घेऊन जायचं..आणि जाते आहे कोण तर त्यांची आई…

ती- हम्म…पण सांगितलं त्यांना की आमच्या क्लब च्या काही फ्रेंड्स जातोय म्हणून…

तो- आणि नवरा?

ती- तो नालायक आहे. त्याला माझी पर्वा असती तर आज इथे असं अचानक गोव्याला यायची वेळच आली नसती माझ्यावर! पंचवीस वर्षांचा संसार…पण त्या माणसाला लाज नाही. वागायची पद्धत नाही…फक्त स्वतःला हवं ते करायचं…म्हणून मग मी पण त्याला किंमत नाही देत…आले अशीच त्याला काही न सांगता…

तो- बिचारा तुझा नवरा…लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवशी त्याची बायको माझ्या बाहुपाशात इथे आहे…

ती- तो हेच डिझर्व करतो…त्याचं सोड…तुझ्या बायकोला हे कधीतरी कळलं तर काय होईल?

तो- कळलं तर कळलं. मी कामाच्या निमित्ताने जगभर फिरत असतो. आम्हाला एकत्र वेळ कमी मिळतो. जो मिळतो त्यात ती घरच्या आणि मुलांच्या कामात बिझी असते. जवळ आलो तर दमले आहे वगैरे कारणं सांगते आणि झोपते…

ती- हम्म..but is she good in bed?

तो- म्हणजे काय? पण उपयोग नाही. म्हणून तर इथे तुझ्या बरोबर आलोय…माझी जुनी क्रश…

ती- किती जुनी क्रश आहे रे मी तुझी?

तो- आज पंचवीस वर्षे पूर्ण झाली आपल्या मैत्रीला. आजच्या दिवशी आपलं लग्न लागलं. माझी अगदी किरकोळ नोकरी होती तेव्हा. पण तू विश्वास ठेवलास माझ्यावर आणि लग्न केलंस माझ्याशी. मग माझ्या मुलांची आई झालीस, माझ्या आई वडिलांची सून नाही तर मुलगी झालीस, माझ्या प्रगतीत माझी पार्टनर झालीस….आणि माझी बेस्ट फ्रेंड झालीस!

त्याच्या गळ्याभोवती हात टाकत त्याच्या डोळ्यात बघत ती म्हणाली-

ती- आणि क्रश?

तो- ती तर पहिल्या दिवसापासून आज पर्यंत आहेस…

ती- बघ हा…माझ्या नवऱ्याला किंवा तुझ्या बायकोला आपलं हे अफेयर कळलं तर प्रॉब्लेम होईल…

तो- च्यायला कळू दे ज्याला कळायचं त्याला…आपण घाबरतो काय? पंचवीस वर्षे जुनी क्रश आहेस तू आपली…ऑफिशियल..लग्नाची..आणि इतकी सॉलिड आहेस की इतर कोणी आवडायची गरजच पडली नाही…आज पळवून आणली आहे मी माझ्या क्रशला गोव्याला आमच्या लग्नाच्या सिल्व्हर ज्युबिलीला…सांग तुझ्या नवऱ्याला की आहेस तू तुझ्या मित्राबरोबर गोव्याला…

ती- सांगू का? (त्याच्या कानात) ऐक रे नवऱ्या….मी ना माझ्या जुन्या छाव्या बरोबर गोव्यात आहे…जा तुला काय हवं असेल ते कर..

तो- (एक्साईट होत) नक्की? काय हवं ते करू? म्हणजे काहीही ना?

ती- (लांब पळत) ए नाही हा…अजिबात नाही…

तो- तूच म्हणाली आहेस हवं ते कर…आता चल… मी चान्स सोडणार नाहीये…

तो तिला उचलून आत घेऊन गेला. त्यांच्या लग्नाचं सिल्व्हर ज्युबिली सेलिब्रेशन परत सुरू झालं होतं!©मंदार जोग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!