सौरभ आणि मानसीचे ते फोटो आणि मेसेज पाहून अंकिताच्या चेहऱ्यावरचे भाव सरसर बदलले. तिचा चेहरा लालबुंद झाला. कपाळाच्या शिरा तटतटू लागल्या. ती रागाने फोनकडे बघत होती. डोळ्यांत अंगार फुलला होता. ती फोन हातात घेऊन रागाने थरथरत बाहेर आली. सौरभजवळ जाऊन म्हणाली,
अंकिता – सौरभ, आत चल. मला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे.
सौरभ गात होता. त्याने गातगात तिच्याकडे बघून स्माईल केलं. जणू तो म्हणत होता की, गाणं झालं की येतो. अंकिता अचानक जोरात ओरडली,
अंकिता – सौरभ, मी काय म्हणाले ते ऐकलंस ना? We need to talk.
तिचा आवाज ऐकून सगळेच अचंबित झाले. अंकिताचा भाऊ अजय पुढे होत म्हणाला,
अजय – ताई, काय झालं अचानक?
अंकिता – Leave.
अजय – (अविश्वासाने) काय?
अंकिता – ऐकलं नाहीस का, अजय? Please leave. (सर्वांना उद्देशून) Guys, the party is over. Sorry. पण तुम्ही प्लीज जा. मला आणि सौरभला एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. प्लीज.
मैत्रीण – अंकिता, पण…
अंकिता – Just leave… everyone…
लोक हातातले ग्लास आणि प्लेट्स ठेवून निघू लागले. हे सर्व बघत असलेला सौरभ म्हणाला,
सौरभ – अंकिता…
अंकिता – Shut up, you basta@d…
घरातून निघत असलेल्या लोकांना तिची ही भाषा ऐकून धक्का बसला. हर्षद पुढे येत म्हणाला,
हर्षद – आई…
अंकिता – तू गप्प बस… Just shut up…
पार्टीचा विचका झाला होता. सगळे लोक गेले. इतका वेळ शांत असलेला सौरभ चिडून म्हणाला,
सौरभ – अंकिता, what’s wrong with you? हे काय आहे? तू बरी आहेस ना?
अंकिताने त्याचा फोन त्याच्या चेहऱ्यासमोर धरला आणि म्हणाली,
अंकिता – सौरभ, what’s wrong with you? हे काय आहे? तू बरा आहेस ना? ह्या अशा छिनाल बायकांशी लफडी करायला तू ऑफिसमध्ये जातोस? मला शंका होतीच की तू बाहेर शेण खातो आहेस. आणि आज मला पुरावा मिळाला. आता बघ मी काय करते ते.
ते फोटो पाहून सौरभला धक्का बसला. अंकिता का चिडली आहे, हे त्याच्या लक्षात आलं. तिचा मोठा गैरसमज झाला आहे, हेही त्याला कळलं. हर्षद अविश्वासाने ते फोटो बघत होता. अंकिता ओरडली,
अंकिता – काय बघतो आहेस तिच्याकडे इतका? सगळी बघून झाली असेल तिला अनेकदा. हो की नाही? कधीपासून सुरू आहे हे लफडं? ह्या मानसीची इतकी हिंमत की ती गणपतीला माझ्या घरी आली होती. माझ्याशी गोड गोड बोलली होती. माझ्या नवऱ्याबरोबर झोपणारी माझ्या देवाला नमस्कार करत होती.
हे ऐकून सौरभ ओरडला,
सौरभ – Enough, अंकिता. मानसी तशी नाहीये.
अंकिता – हर्षू, बघ तुझा बाप किती चिडला त्याच्या रखेलीला एक शब्द बोलल्यावर.
हे ऐकून चिडलेल्या सौरभने नकळत अंकिताच्या कानशिलात मारली.
सौरभ – बस! एक शब्द नकोय मला.
तिरमिरलेली अंकिता क्षणभर भानावर आली. ती सौरभकडे रागाने बघत पुढे आली आणि दोन्ही हातांनी त्याला मारू लागली. मारताना ती बडबडत होती,
अंकिता – नालायक माणसा, तू माझ्यावर हात उचललास? त्या चीप बाईसाठी? तुझ्या आईने हेच संस्कार केलेत तुझ्यावर. तुझं खानदानच असं आहे, लफडेबाज. मी तुझा संसार सांभाळला आहे. दुसरी कोणी असती तर कधीच निघून गेली असती.
ती दोन्ही हातांनी सौरभला मारत होती. चेहऱ्यावर, छातीवर, हातावर. हर्षद हे बघत थिजला होता. त्याला आपण नक्की कशी प्रतिक्रिया द्यायची, ते कळत नव्हतं. शेवटी अंकिताने रागाच्या भरात सौरभचा शर्ट फाडला आणि त्याला मारून दमून ती जमिनीवर बसली. तिचा सगळा मेकअप चेहऱ्यावर पसरला होता. सौरभचे गाल मारामुळे लाल झाले होते. डोळ्यांत अश्रू जमा झाले होते. तो तसाच हताश उभा होता. त्यांच्या नात्याला एक कायमचा तडा गेला होता!
दुसरा दिवस उगवलाच उदासवाणा. अंकिता सकाळीच बाहेर निघून गेली. सौरभला ऑफिसला जायची इच्छा नव्हती. तो घरीच थांबला. काहीच करावंसं वाटत नव्हतं त्याला. काल आलेल्या काही नातेवाईकांचे “All okay ना?” असे विचारणारे मेसेज आले होते. त्याने कोणालाच रिप्लाय केला नाही.
साधारण अकरा वाजता मानसीचा फोन आला. तिचं नाव पाहून सौरभला कालचा सगळा प्रसंग आठवला. त्याने फोन घेतला नाही. मानसीने मेसेज केला.
“तू आज येणार नाहीयेस का? तब्येत बरी आहे ना? फोन का घेत नाहीस? मी पाठवलेले आपले फोटो पाहिलेस ना? काही reaction नाही दिलीस. Hope all is well. वेळ मिळाला की फोन कर.”
सौरभने तिलाही फोन केला नाही. तो दिवसभर पडूनच होता. काल जे झालं, ते आता पुढे कुठे जाणार, याचा तो विचार करत होता. अंकिता काहीही समजून घेणार नव्हती. आता फक्त ती हा मुद्दा किती ताणते आणि त्याचं किती नुकसान करते, हे बघणं त्याच्या हातात होतं.
संध्याकाळी उठून खिडकीजवळ जात त्याने सिगारेट पेटवली. खाली दिसत असलेली रहदारी बघत तो भकास उभा होता. तेवढ्यात अंकिताचा भाऊ अजयचा फोन आला. सौरभने तो घेतला.
सौरभ – हॅलो…
अजय – सौरभ, तू हे काय केलंस? अंकिता रस्त्यावर पडलेली नाहीये. माझ्या बहिणीचा असा अपमान मी सहन करणार नाही. ती इथे आमच्या घरी आलेली आहे.
सौरभ काहीही न बोलता फक्त ऐकत होता.
अजय – मी तिला स्पष्ट सांगितलं आहे की तू घर सोडायचं नाही. घर कोणी सोडायचं असेल तर ते सौरभ सोडेल. मी तिला परत पाठवतो आहे. तिला तू हात जरी लावलास तर मी तुला सोडणार नाही, हे लक्षात ठेव.
असं म्हणून त्याने फोन ठेवला.
अजय हा खायला काळ आणि भुईला भार होता. जेमतेम बारावी झालेला. काहीच स्किल नसलेला. नाक्यावर चहा-बिडी मारत लुख्खेगिरी करणारा. सौरभने त्याच्या मित्राकडे शब्द टाकून अजयला मित्राच्या कंपनीत ऑफिस बॉय म्हणून लावला होता. त्यामुळे अजय त्याच्यासमोर वचकून असे. अजयची बायको एका सरकारी शाळेत क्लार्क होती. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी होती. सौरभसमोर मान वर न करणारा अजय आज त्यालाच धमक्या देत होता.
सौरभने सिगारेट संपवली आणि तो परत झोपला.
सौरभला सकाळी जाग आली ती रोजच्या गजराच्या आवाजाने. आज ऑफिसला जायलाच हवं होतं. तो पटापट तयार झाला. अंकिता हर्षदच्या रूममध्ये गप्प बसून होती. सौरभ कोणाशीही काही न बोलता ऑफिसला गेला. त्याला गेलेला पाहून अंकिताच्या चेहऱ्यावर खुनशी स्मित उमटलं.
सौरभ ऑफिसला पोहोचला. आपल्या क्युबिकलमध्ये बसून त्याने लॅपटॉप सुरू केला. इतक्यात त्याला रुपेशचा फोन आला. रुपेश त्याचा बॉस. कंपनीचा SVP. रुपेशने त्याला आपल्या केबिनमध्ये बोलावलं.
सौरभ तिथे गेला तर मानसी आधीपासून तिथे उभी होती. डोळ्यांत पाणी. हातात रुमाल. तिला त्या अवस्थेत पाहून सौरभ चकित झाला. त्याने अविश्वासाने रुपेशकडे पाहिलं. रुपेश त्याच्याकडे संशय, राग आणि अविश्वास असे सर्व भाव चेहऱ्यावर आणून बघत होता.
सौरभच्या पाठीवरून घामाचा एक थेंब वरपासून खालपर्यंत घरंगळत गेला. त्याचे हात थंड पडले. पायातील त्राण गेल्यासारखं वाटलं आणि त्याने पुढ्यात असलेल्या खुर्चीचा आधार घेतला.
क्रमशः
पुढील भाग मृगजळ – भाग ३
मृगजळ सर्व भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा- मृगजळ- सर्व भाग

मृगजळ चे 12 पासून भाग मला दिसत नाहीत
२० भाग पोस्ट केले आहेत. एक भाग संपला कि खालीच पुढील भागाची लिंक आहे. वाचनाची आवड असलेल्या आपल्या ओळखीतील लोकांना पोर्टलची लिंक पाठवा.
Interesting. पुढे काय होते त्याची वाट बघते
thanks. वाचनाची आवड असलेल्या आपल्या ओळखीतील लोकांना पोर्टलची लिंक पाठवा.