संध्याकाळच्या पिक ट्रॅफिकची वेळ. रस्त्यावर वाहनांचा महापूर. पण बसमध्ये गर्दी तुरळक. अर्धी बस चक्क रिकामी. सगळे प्रवासी विंडो सिट पकडून बाहेरून येणाऱ्या धूर आणि धूळ मिश्रित वाऱ्याचा आनंद घेत. त्यातच एका स्टॉपवर ती चढते. कॉलेज कुमारी किंवा नुकती नोकरीस लागलेली. नाकीडोळी निटस चवळीच्या शेंगेसारखी. एक विंडो ती पण पकडते. तिकीट घेऊन कानाला हेडफोन लावून गाणी ऐकत बाहेर पहात रहाते. वाऱ्याने चेहऱ्यावर येणाऱ्या बटा डाव्या हाताने मागे सारत उजव्या हाताने फोनमधून गाणी सिलेक्ट करत रहाते.
इतक्यात फोन वाजतो. बहुतेक अपेक्षित असावा, बहुतेक ती वाट पहात असावी. ती लगबगीने फोन घेते. तिच्या चेहर्यावरचा आनंद त्याला, त्या फोन करणार्याला दिसत नसतो. ऐकू येत असतो फक्त लटका राग! तो बहुधा समजवायचा प्रयत्न करतो. पण ही आज जामच वैतागलेली असावी. हेडफोनचा माईक हातात धरून शेजारच्यालाही ऐकू जाणार नाही इतक्या हलक्या आवाजात ती त्याला रागे भरत असते! फोनवर इतके हळू पण समोरच्याला व्यवस्थित ऐकू जाईल असे बोलायची कला फक्त बायकांनाच निसर्गदत्त अवगद असते!
समोरचा तो हळूहळू समजूत घालू लागतो. रागाची जागा तक्रार घेते. तिच्या चेहऱ्यावर मनातला राग रीता केल्यानंतरचे एक हास्य पसरते. तरीही अजुन ती वाट पहात असलेला, रोज घरी जातानचा खरा मयुरपंखी संवाद सुरु झालेला नसतो. आवेग ओसरला असला तरी अजुन समर्पण झालेल नसत. कुरबुरीत, आपली बाजू मांडताना तिला वाऱ्यावर उडणाऱ्या केसांचही भान नसत. त्या प्रेमळ भांडणात मग बहुतेक तो परावलीचे शब्द फोनमधून बोलतो. एका क्षणी हीच्या चेहर्यावरील उरला सुरला राग जाऊन स्मित हास्याची जागा लाजणे घेते! इतका वेळ उडत असलेले केस ती बांधून घेते. हातातली पर्स आणि बॅग सारखी करून सरसावून बसते. ईयर पिस नीट कानात खोवून मोबाईलला घट्ट जवळ घेते…जणू मोबाईल म्हणजे “तोच” असावा!
आता तिची तंद्री लागते. फोनवरचा प्रत्येक शब्द तिला लाजून चुर्र करत असतो. कधी डोळे मोठे करून, कधी ते मिटून घेऊन, कधी हसताना मधेच हाताने चेहरा झाकून घेऊन, कधी हळूच खिदळून ती विरघळत जाते! आता ती फारसे बोलत नसते. फक्त ऐकत असते. एखादा हम्म इतकाच प्रतिसाद! ऐकण्याव्यतिरिक्त, लाजण्याव्यतिरिक्त, हसण्याव्यतिरिक्त वाऱ्याने उडणारी बट मागे करणे ही एकच हालचाल. अन्यथा तिची समाधी लागलेली असते!
बसमध्ये हळूहळू गर्दी वाढत असते. तिच्या शेजारी बसून दोन बायका उठुनही गेलेल्या असतात, बस ट्रॅफिकजाम मध्ये अडकत लोकांचा अंत पहात असते! आता बस तुडुंब भरते. पाय ठेवायलाही जागा उरत नाही. तिकीट काढायला पैसे घ्यावे म्हणून खिशात हात घालावा तर तो दुसर्याच्या खिशात जाईल इतकी गर्दी! माणस हा प्रवास संपावा म्हणून वाट पहात असतात. पण एक ती असते. त्याच्या मोरपंखी संवादाने वेडी झालेली, ह्या गर्दीतही त्याच्याबरोबर एकांतात असलेली, हा प्रवास संपू नये असे वाटणारी! आणि तिच्याबरोबर असतो तो…असाच कुठल्यातरी बस किंवा ट्रेनच्या गर्दीत असूनही तिच्यासह फोनवरच्या एकांतात स्वप्नांच्या हिंडोळ्यावर झोके घेणारा…आणि बाकी असतो आम्ही, वास्तवाच्या दुनियेत कंडक्टरच्या घंटीबरोबर ब्रेकच्या तालावर झुलणाऱ्या बसचे गचके खात लोंबकळणारे घामाने चिंब झालेले आयुष्याच्या वाटेवरचे प्रवासी!
