गेल्याच आठवडयात गिरगावात मित्राची वाट पहात कटिंग पीत उभा होतो. मागून जोरात पाठीत गुद्दा पडला. मी रागाने कोण तो म्हणून वळून पाहिले तर “काय रे भ#$ आहेस कुठे हल्ली?” टिपिकल गिरगाव स्टाईल प्रश्न. समोर दामू उभा होता. बऱ्याच वर्षांनी. त्याने मला एवढ्या वर्षांनी ओळखले ते देखील  मागून ह्या जाणीवेनी मला गलबलून आले. त्याचं काय आहे की माझ्या डोक्यावर कमी वयातच पडलेल्या कायम स्वरूपी दुष्काळानंतर जुने लोक भेटले की आधी ओळखतच नाहीत आणि ओळख सांगितली तर “काय सांगतोस काय? किती वेगळा दिसतोस तू! कौलं किती उडाली!” हे आणि असलं बोलून हृदयाला घरं पाडतात!!!! अश्या पार्श्वभूमीवर दामुने मला ओळखलं ते सुद्धा मागून हे फिलिंग किती आनंदाचे असू शकते ते फक्त “कौलं उडालेले” समदु:खी लोकंच समजू शकतात!!! असो…मुद्दा तो नाहीच आहे.

तर असा अचानक दामू भेटला. सोडावॉटर चष्म्यात खालच्या बाजूस नव्याने आलेले चाळीशीचे अर्धवर्तुळ आणि केसात पडलेली हलकीशी चांदी सोडली तर दामूच्या बाह्य रूपामध्ये काहीच बदल झाला नव्हता. तोच ६६ इंचांचा कृश देह, पुढे आलेली हनुवटी, खोल डोळे, गळ्याच्या जवळ लटकणार अॅडम्स अॅपल, ढेकुण छाप मिशी, तेल चोपडून एका बाजूला भंग पाडून शिस्त लावलेले लाटांचे कुरळे घनदाट राठ केस, अर्ध्या इंचाच कपाळ, दोन साईज मोठा ढगळ शर्ट, साधी पँट, खांद्यावरची शबनम पिशवी आणि कुरकुर आवाज करणाऱ्या कोल्हापुरी चपला. पूर्वी दामू त्या चपलांना असलेल्या एका विशिष्ट भोकात रॉकेल ओतत असे. त्यामुळे चपलांचा कुरकुराट म्हणे वाढत असे. खरे खोटे देवास ठाऊक पण दामू वयाच्या पंधराव्या वर्षापासून फक्त कोल्हापुरी चपला वापरत असे.

“काय रे भ#$ आहेस कुठे हल्ली?” ह्याचं मी उत्तर दिलं आणि त्याला विचारलं:
मी: पण तू इथे काय करतो आहेस? कुठे असतोस तू?
दामू: भिवपुरीला रहातो आता. ठाण्यात एका सब ब्रोकरकडे जॉबला आहे. बायको आणि दोन पोरं. मस्त चाललं आहे. भिवपुरीची हवा काय झकास एम जे (मला एम जे म्हणणाऱ्या काही ठराविक लोकांपैकी दामू एक आहे). साला गिरगावसारखा उकाडा नाही. इथे आलो होतो एका डोनरला भेटायला.
मी: डोनर? साल्या तू अजून दुनियादारी सोडली नाहीस तर. सगळ्या लष्कराच्या भाकऱ्या. कशाला आणि कसं करतोस हे सगळं?
दामू: That is Damodar my dear friend! तुला माहिती आहे एम जे I am social working for last many years. I have many projects. (दामू दुनियादारी बद्दल बोलायला लागला की भयानक इंग्रजी फाडतो)
मी: (मला वेळ होता आणि उत्सुकता देखील. दामूसाठी चहा मागवला आणि मी फिरकी सोडली) सध्या काय प्रोजेक्ट्स सुरु आहेत?
दामू: मेनी प्रोजेक्ट्स. यंदा गणेश विसर्जनाला पाणी वाटायचं टेबल टाकणार आहे भिवपुरीला.
मी: कोण तू?
दामू: नाही आमचे सर.
मी: कोण सर?
दामू: मी नोकरी करतो ते दिलीपभाई.
मी: मग तू काय करतो आहेस? ते पण गिरगावात? आणि डोनर कसला?
दामू: मी सरांना म्हटलं सर तुम्ही पाण्याचा स्टॉल लावा. मी बाकीचं बघतो. भक्तांना फक्त पाणी का द्यायचं? मी पाण्याबरोबरच पॉपकॉर्न पाकिटे देणार आहे. त्यासाठी डोनर आणि स्पॉन्सर शोधतो आहे.
मी: अरे पॉपकॉर्नचा खर्च तो किती? तो पण तुझ्या सरांना सांग करायला. त्यासाठी डोनर आणि स्पॉन्सर कशाला हवा? एवढी मेहेनत कशाला?
दामू: एम जे, मग आपलं कॉन्ट्रीब्युशन काय? तुला माहिती आहेच. आपण मेहेनतीला मागे नाही हटत. आपलं नाव दामोदर आहे. You know me मित्रा. यंदा गणपती विसर्जनाला बघच तू भिवपुरीमध्ये काय दंगा करतो ते. दामोदरला कोणीच विसरू शकणार नाही. तू पण ये बघायला. चल पळतो आता. गोरेगावला एका डोनरला गाठायचाय एका दुसऱ्या प्रोजेक्टसाठी.

दामू खरंच पळाला. मला दामुचे पूर्वीचे अनेक प्रोजेक्ट आठवले. मग ते गणेशोत्सवात मंडळाचे सर्व कार्यक्रम ठरल्यावर शेजारच्या चाळींमधून एकवीस ब्राह्मण पोरं जमवून अचानक केलेला अथर्वशीर्ष पठणाचा वाढीव कार्यक्रम असो, दिवाळीत चाळीचा कंदील लाऊन झाल्यावर त्याने चाळीच्या प्रवेशद्वारावर लावलेला “शुभ दीपावली” लिहिलेला स्वतःचा बोर्ड असो, गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत मंडळाने ठरवलेला कच्छीबाजावाला वाजवत असताना दामुने स्वतःच्या ओळखीने खास १० मिनिट वाजवण्यासाठी बोलावलेला आणखी एक प्रसिद्ध कच्छीवाला असो, चाळीतील एखाद्याचे निधन झाल्यावर “वॉर्ड ऑफिसमधून डेथ सर्टीफिकेट मी आणीन” अशी कोणीही सांगितलेले किंवा विचारलेले नसताना त्याने केलेली घोषणा असो अथवा चाळीच्या चौकात गेलेल्या माणसाची तिरडी बांधत असलेल्या लोकांना सुंभ कापायला हमखास लागणारे आणि दामुने गॅलरीतील त्यांच्या कपाटाच्या फटीत नेमके अडकवून ठेवलेले ब्लेड कोणीही मागायच्या आधी पुढे करणे असो; त्याचे सर्व प्रोजेक्ट हे “दामुचे प्रोजेक्ट” असत. त्याचं वेगळेपण दाखवून देणारे. आता विचार करता वाटतं की सामान्य बुद्धी, अॅव्हरेज रूप आणि मर्यादित वकूब ह्यामुळे फारसा कुठेच प्रभाव न टाकू शकणाऱ्या दामूला कुठेतरी न्युनगंड होता, स्वतःचे वेगळे अस्तित्व दाखवून द्यायची सुरसुरी होती, प्रसिद्धीची इच्छा होती. म्हणून लोकांचे लक्ष वेधून घेण्याकरिता केलेले हे सर्व प्रयत्न! “दाम्या आवर्तन मस्त झाले. कसं काय बर जमवलस?” इतकं कौतुक दामूला पुढल्या गणेशोत्सवापर्यंत अनेक “प्रोजेक्ट” प्लान करायची उर्मी देत असे. अतिशय किरकोळ आयडिया काढून त्या “गाजावाजा करून” प्रत्यक्षात उतरवणे हा दामुचा हातखंडा होता. त्याना “प्रोजेक्ट” असे भारदस्त नाव त्यानेच दिले होते. अपेक्षा फक्त वेगळे उठून दिसायची. एखाद्या कौतुकाच्या शब्दाची. आज इतकी वर्ष झाली तरी दामूला आपली ओळख पटवून द्यायला “प्रोजेक्ट्स” ची गरज लागते हे पाहुन खरंच वाईट वाटलं.

पण नंतर विचार आला दामू ही व्यक्ती नसून एक “विचारसरणी” आहे. तिला वयाचे बंधन नाही. कधी दामू तर कधी इतर नावाने ती आपल्याला अनेकदा भेटते. नवनवीन फुटकळ संकल्पना अतिशय गंभीरपणे मांडणारी व राबवणारी ही व्यक्ती “अतिशय बिझी” असते नेहेमी. जास्त वेळ नसतो त्यांना बोलायला. इतरांबद्दल ऐकायला. पण ते न चुकता स्वतःबद्दल, त्यांच्या “प्रोजेक्ट्स” बद्दल भरभरून माहिती देतात. कौतुक ऐकून घेतात. विरोध, टिंगल ह्याकडे दुर्लक्ष करतात. तश्या टवाळ माणसांपासून लांब रहातात. त्यांना त्यांचं ऐकून घेऊन कौतुक करणारे “श्रोते” आवडतात. अशी माणसं नेहेमी प्रोजेक्ट्स मध्ये गुंतलेली असतात.

आपण देखील त्यांना त्या गुंत्यातून बाहेर काढायचा प्रयत्न कधीच करू नये. फक्त त्याना हवं असलेलं थोडसं लक्ष द्यावं आणि क्षणभर त्यांची दखल घ्यावी……पुढील “प्रोजेक्ट्स” करीता उभारी देण्यासाठी!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!