नुकतीच शावर घेऊन आलेली उत्तरा आरशात पहात केस विंचरत होती. अंगावरील झुळझुळीत गाऊनमधील आपलेच आकर्षक रूप पाहून रोमांचित होत होती, लाजत होती. केस विंचरून झाल्यावर तिने अद्वैतने मुद्दाम आणून दिलेले त्याच्या आवडत्या फ्रेग्रंसचे परफ्यूम स्प्रे केले. त्याच्या वासाने संबंध खोली भरून गेली. एसीच्या थंडाव्यात, सामोर स्टॅण्डवर तेवत असलेल्या तीन मेणबत्त्यांच्या मंद प्रकाशात बेडरूम कुंद झाली होती. अद्वैतच्या लॅपटॉपवर त्याचेच आवडते गीत “मालवून टाक दिप” सुरु होते. त्याच्या आवडीचे गाणे, त्याच्याच आवडीचे परफ्यूम, त्याच्या आवडीचे वातावरण आणि त्याच्या आवडीची ती स्वतः… उत्तरा! पण उत्तराच्या आवडीचे काय? तर अद्वैत स्वतः! त्याचा राकटपणा, रांगडेपणा, उतावीळपणा, त्याची आक्रमकता, तो जोश, तरीही त्यात जपलेला हळवेपणा!
कॉलेजपासून त्यांचे अफेयर होते. अगदी सर्वांना सांगून…राजरोजपणे. मग एकत्र सिनेमाला जाणे, ग्रुपबरोबर ट्रेकला जाणे, कधी लॉंग ड्राइव्हला जाणे हे नेहमीचेच. पण तिला कधीकधी भीती वाटायची अद्वैतची. त्याचा तो आक्रमकपणा, ते पॅशनेट असण, ती उतावीळता संभाळताना, त्याला समजावताना दमायची ती! “अद्वैत प्लीज. इथे थांबूया आपण. बाकी लग्नानंतर!” इतके म्हणून अनेकदा ती रंगात आलेल्या अद्वैतला थांबवत असे. “अरे यार मी लग्न करणारच आहे तुझ्याशी. पण तोवर थांबायचे म्हणजे कठीण आहे. You and your restrictions! It’s annoying and frustrating! जरा कुठे मूडमध्ये आलो की तुझी ती…काय ग म्हणतेस तू तिला?” त्याला कधीच ते नाव आठवत नसे. मग उत्तराच हसत, त्याच्या केसातून हात फिरवत म्हणायची “लक्ष्मण रेषा!” मग तो रागाने म्हणायचा “Yaa.One day I am going to kill whoever that Laxman is!” त्यावर ती जोरात हसायची आणि तो आणखी चिडायचा. मग ती त्याच्या कपाळाचे हळूच चुंबन घेऊन त्याला शांत करायची. तो तिच्या मिठीत विसावायचा! हे पथ्य तिने कॉलेज संपेपर्यंत पाळल. अद्वैत आणि तिचे एकमेकांवरील प्रचंड प्रेम एका किसच्या पलीकडे कधीच नाही गेल. तो किस पण एका पावसाळी ट्रेकला चिंब भिजून थरथरत असलेली ती डोंगरमाथ्यावरच्या त्या गुहेत त्याला बिलगली तेव्हा त्या धुंद वातावरणात काही क्षण तिचे नियंत्रण सुटले म्हणून अद्वैतने मारलेला चांस होता. त्यानंतर आठवाडाभर ती अद्वैतला भेटली नव्हती!
एरवी इंग्रजाळलेल्या अद्वैतला कस कोण जाणे “मालवून टाक दिप” हे गाण प्रचंड आवडायच. तो तेव्हापासून उत्तरला म्हणायचा “आपल्या हनीमूनला हे गाण मी लूप करून रात्रभर लाउन ठेवणार!” मग उत्तरा त्याला म्हणायची ” अरे मग झोपणार कधी?” त्यावर तो तिच्या डोळ्यात निर्लज्जपणे पहात म्हणायचा “इतक्या वर्षांचे सीक्रेट आहे तू जपून ठेवलेले. ते पूर्ण एक्सप्लोर झाले तर झोपणार. नाहीतर दिवस रात्र एक्सपीडिशन सुरु ठेवणार!” ती लाजुन चुर्र होत त्याच्या मिठीत विरघळायची!
कॉलेज संपल. अद्वैतला अमेरिकेच्या एका युनिव्हर्सिटीत मास्टर्ससाठी प्रवेश मिळाला. त्याला तिथेच सेटल व्हायच होत. त्यामुळे मास्टर्स संपवून, जॉब मिळवून उत्तराशी लग्न करायला परत येईपर्यंत बरीच वर्ष गेली असती. म्हणून त्यांनी आणि त्यांच्या घरच्यांनी लग्न उरकून घ्यायचा निर्णय घेतला. मुहूर्तदेखिल नेमका त्याच्या जायच्या आदल्या दिवशीचा मिळाला! मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पण थाटामाटात लग्न लागले. मंडळी हॉलवरून निघेपर्यंत संध्याकाळ झाली. उत्तरा अद्वैतच्या घरी आली ती त्याच्या बॅग्स पॅक करायला. रात्री दोनची फ्लाईट असल्याने दहा वाजता घर सोडावे लागणार होते! तो पहिल्यांदाच अमेरिकेला जात असल्याने लग्नाला आलेले अनेक नातेवाईक त्याला सी ऑफ करायला एअर्पोर्टवर जाण्यासाठी घरी आले होते. त्या भरलेल्या घरात नवदाम्पत्याला क्षणाचाही एकांत मिळत नव्हता. शेवटी अद्वैतने लोकांना “एक्सक्यूज अस फॉर अ मोमेंट” म्हणत बाहेर पाठवत बेडरूमचा दरवाजा लावून घेतला. लॅपटॉपवर हळू आवाजात मालवून टाक दिप लावले आणि उत्तराला आपल्याजवळ ओढून तो तिच्या डोळ्यात पाहू लागला. त्याच्या नजरेतले प्रेम, त्याच्या मिठितला आवेश आणि त्याला आपल्या नवऱ्याच्या रूपात पाहून उत्तरा विरघळून गेली! तिने डोळे बंद करून घेतले आणि स्वतःला त्याच्या स्वाधीन केले. ती थरथरत होती. विलग झालेले तिचे अधर त्याच्या अधरांची अधीरतेने वाट पहात होते! अद्वैत थरथरत तिच्या कानात म्हणाला “Can that line of yours…what do you call it?” ती डोळे उघडून सवयीने म्हणाली “लक्ष्मणरेषा!” “Yes that bloody Laxman stop me today?” उत्तरा त्याच्या केसांना धरून त्याचा चेहरा आपल्या चेहऱ्याजवळ ओढून “नो” म्हणाली. पण ते नो तिने घेतलेल्या त्याच्या चुंबनात घुसमटुन गेले! असेच अधीरतेचे, उत्कटतेचे एक मिनिट गेले आणि तेवढ्यात बाहेरून दरवाज्यावर थाप पडली. “अद्वैत फ्लाईट पकडायची आहे. लेट होईल. बाकी भेट नंतर करा. आवारा आता!” अश्या हुकुमानंतर पाचकळ हसण्याचे काही आवाज आले आणि आता हे दोघे भानावर आले! “Shit! I don’t want to go to the US!” अद्वैत वैतागुन म्हणाला. उत्तराने त्याची समजूत काढली. काही महिन्यांचा प्रश्न आहे मग मी येतेच तिथे असे समजावले. तो म्हणाला देखिल “तू लवकर नाही आलीस तर मीच येईन परत तुला भेटायला. आपला प्लान माहिती आहे ना हनीमूनचा?” तिने लाजुन त्याला कुरवाळले आणि दरवाजा उघडला.
अमेरिकेत प्रचंड प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ म्हणून नाव कमावलेला मानस, अद्वैतचा चुलत भाऊ अद्वैतच्या बाबांशी बोलत होता “This is the first case of this kind. I cannot believe it. तुम्ही इतकी वर्ष सांगताय पण माझा विश्वास बसत नव्हता till I saw it today with my own eyes!” अद्वैतचे वडील त्याला सांगत होते “त्या दिवशी अद्वैत गेला. आम्ही सगळे घरी आलो. उत्तरा अद्वैतच्या बेडरूममधे झोपली. दुसऱ्या दिवशी बातमी आली त्याच प्लेन क्रॅश झाल्याची. आम्ही तिला सांगितल्यावर ती शांत झाली…. गोठल्यासारखी… अद्वैतची बॉडीपण मिळणार नव्हती. सगळे पॅसेंजर महासागरात विमानाबरोबर बुडून गेले होते. आम्ही प्रचंड दुःखात होतो. उत्तरा बेडरूममधे गोठुन बसून होती. रात्री साधारण बाराच्या सुमारास अचानक तिने मालवून टाक दीप गाण लावल. कोणाशीतरी हसत, लाजत गप्पा मारत होती. तिने रात्री शावर घेऊन बेडरूम मेणबत्त्या लावून सजवली. मजेत एकटीच कोणाशीतरी गप्पा मारत होती. शेवटी खिदळत तिने बेडरूमचे दार लावून घेतले. आतून तिने लावलेल्या मालवून टाक दीप ह्या गाण्याचा आवाज आम्हाला येत होता. आज अद्वैतला जाऊन पंधरा वर्ष उलटून गेली. पण उत्तरा त्या शॉक मधून बाहेर आलेली नाहीये. तिच्या दृष्टीने अद्वैत आमच्यात, ह्या घरात रहातो. म्हणजे ते दोघच ह्या घरात रहातात. तिला आम्ही दिसतही नाही. तिचा अद्वैतबरोबर संसार सुरु आहे गेली पंधरा वर्ष. सर्व ट्रीटमेंट झाल्या. पण उपयोग नाही!” मानस अविश्वासने हे ऐकत होता आणि उत्तराला ऑब्झरव्ह करत होता.
….नुकतीच शावर घेऊन आलेली उत्तरा आरशात पहात केस विंचरत होती. अंगावरील झुळझुळीत गाऊनमधील आपलेच आकर्षक रूप पाहून रोमांचित होत होती, लाजत होती. केस विंचरून झाल्यावर तिने अद्वैतने मुद्दाम आणून दिलेले त्याच्या आवडत्या फ्रेग्रंसचे परफ्यूम स्प्रे केले. त्याच्या वासाने संबंध खोली भरून गेली…..
तिला ऑब्झरव्ह करणारा मानस अद्वैतच्या वडिलांना म्हणाला “काका she is not mad. This is beyond science. I think Adwait is actually around. अद्वैत ह्या घरात आहे. पण फक्त तिला दिसतो!”
……एसीच्या थंडाव्यात, सामोर स्टॅण्डवर तेवत असलेल्या तीन मेणबत्त्यांच्या मंद प्रकाशात बेडरूम कुंद झाली होती. अद्वैतच्या लॅपटॉपवर त्याचेच आवडते गीत “मालवून टाक दिप” सुरु होते. त्याच्या आवडीचे गाणे, त्याच्याच आवडीचे परफ्यूम, त्याच्या आवडीचे वातावरण आणि त्याच्या आवडीची ती स्वतः… उत्तरा! पण उत्तराच्या आवडीचे काय? तर अद्वैत स्वतः! त्याचा राकटपणा, रांगडेपणा, उतावीळपणा, त्याची आक्रमकता, तो जोश, तरीही त्यात जपलेला हळवेपणा! उत्तराने बेडरूमचा दरवाजा शांतपणे बंद करून घेतला. अद्वैतच्या बाहुपाशात, त्याच्या आवेगात ती हरवून गेली…त्याची झाली…मेणबत्त्या हलकेच विझल्या… कुणीतरी फुंकर घातल्यासारख्या….बेडरूममध्ये अद्वैतच्या आवडीचे गाणे सुरु होते…मालवून टाक दिप…!!!!
