milind soman | Mandar Jog

मिलिंद सोमण

मिलिंद सोमण

आम्ही कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होतो बहुतेक किंवा त्यानंतर एक-दोन वर्षांनी असेल. बिर्ला मातोश्री सभागृहात एक फॅशन शो होता. त्यात सुझान खानने जिचा संसार मोडला ती बिचारी मेहेर जेसिया, आराध्याच्या आईचा सर्वात पाहिला मित्र रंजीव मूलचंदानी, लुबना ॲडम्स (कदाचित ती कोरिओग्राफर पण होती) वगैरेबरोबर तो पण होता. तो स्टेजवर आला आणि सभागृह मुलींच्या किंचाळण्यांनी दणाणून गेलं. होताच तो दिसायला ग्रीक गॉड. उंच आनिओ पिळदार शरीर. ताशीव jaw line, भेदक डोळे, रुबाबदार चाल, पोरींना घायाळ करणारं स्माईल, प्रचंड आत्मविश्वास आणि गंधर्व पृथ्वीवर अवतला आहे अस वाटावं अस घायाळ करणारं रूप. सगळ्या पोरी तिथेच खल्लास.

त्या काळी (खरं तर आजही) मिलिंद प्रभाकर सोमण नाव असलेला मुलगा एकतर उत्तम गुण मिळवून केवळ गुणवत्तेच्या जोरावर इंजिनिअरिंग करून अमेरिकेत जायचा किंवा सीए करून बिग फोर मध्ये नोकरी धरायचा किंवा तसलं काही केलं नाही तरी गेला बाजार एखाद्या खासगी कंपनीत किंवा बँकेत आणि बिपिओ मध्ये अकाउंटंट वगैरे बनून क्लेरिकल नोकरी करायचा. माझ्या ओळखीत असलेले सगळे सोमण थोड्याफार फरकाने ह्याच मार्गाने गेलेले आहेत. फक्त मिलिंद सोडून!

मिलिंद इतर समस्त सोमणांनी धरलेली मळवाट सोडून सर्वात आधी राष्ट्रीय स्तरावरचा स्विमर झाला. त्याने त्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्यातून तयार झालेल्या पिळदार शरीराच्या जोरावर तो योगायोगाने मॉडेल झाला. आणि साधासुधा नाही. टॉपचा मॉडेल. तेव्हा खरंच मिलिंद सोमण आणि मधुश्री सप्रे ही दोन नावं आणि विशेषतः सोमण आणि सप्रे ही कोकणस्थ आणि कऱ्हाडे आडनावं एका वेगळ्याच ग्लॅमरच्या क्षेत्रात टॉपला पोहोचलेली पाहून अचंबा वाटत असे. दोघेही तेव्हा सुपर मॉडेल होते.

यथावकाश त्यांचं जमलं. मग त्यांनी अंगावर फक्त अजगर पांघरून काढलेला फोटो सोशल मीडिया नसताना देखील प्रचंड व्हायरल झाला. पुढे मधू इटालियन माणसाशी लग्न करून इटलीमध्ये स्थिरावली. मिलिंद मात्र हिंदी सिनेमांमध्ये नशीब आजमावत राहिला. अभिनय अजिबात येत नसल्याने त्याला अपेक्षित अपयश देखील मिळालं. मेड इन इंडिया ह्या अलिषा चिनॉयच्या म्युझिक व्हिडिओमध्ये तो खूप छान दिसला. काही टीव्ही सिरियल्स देखील त्याने केल्या.

मग पुढे आम्ही संसारात अडकलो आणि आम्हाला सध्या मिलिंद काय करतो हेच माहीत नव्हतं. तो तसा विस्मृतीत गेला. अधूनमधून काही हिंदी सिनेमांत दिसत होता. पण ते सिनेमे पडले किंवा फार चालले नाहीत. आणि “मिलिंद आता काय करतो?” असा प्रश्न आम्हाला कधीच पडला नाही. अर्थात मधूनमधून दिपनीता शर्मा, गुल पनाग अशा गोड मुलींबरोबर त्याचं गुळपीठ जमल्याच्या बातम्या ऐकून आम्ही क्वचित खट्टू होत होतो. पण आमच्या ऐवजी मिलिंद दिसायला थोsssडा(च) उजवा असल्याने त्यांनी मिलिंदला निवडला आणि आपला चान्स गेला, अशी स्वतःची समजूत घालत टकलावरचा घाम पुसताना ढेरीवरून खाली सरकलेली पँट वर ओढत आम्ही उसासे सोडत होतो! असो! काळ सरकत होता. आम्ही संसारात आणि मिलिंद नवनवीन सुंदर युवतींच्या मनात स्थिरावत होता. आमच वय वाढत होतं पण मिलिंद तसाच चिरतरुण राहिला होता.

पण गेल्या दहा-पंधरा वर्षांत मात्र मिलिंद हा फिटनेसचा पुरस्कर्ता म्हणून अचानक खूप दिसू लागला. मुळात खूप चांगला स्विमर आणि नियमित धावपटू असलेला मिलिंद सोशल मीडियाचा प्रसार झाल्यावर आता विविध मॅरेथॉन स्पर्धांमध्ये धावताना, कधी फ्लॅग ऑफ करताना लोकांना दिसू लागला. त्याच्याबरोबर क्वचित त्याच्या मातोश्री उषा सोमण धावताना दिसू लागल्या. मग त्याची विद्यमान पत्नी अंकिता कोनवार मात्र त्याच्या सर्व रन्समध्ये त्याच्या पावलावर पाऊल टाकत धावताना दिसू लागली. लोकांना हा सॉल्ट अँड पेपर रूपातला मिलिंद आणखी भावला. शाकाहारी, निर्व्यसनी, कोणतीही सप्लीमेंट न घेणारा, जिम वगैरे मध्ये अजिबात न जाणारा, मोठमोठ्या कठीण शर्यती पूर्ण करणारा, अनवाणी धावणारा, पार्कात व्यायाम करणारा मिलिंद सोशल मिडीयाच्या माध्यमातून सपत्नीक फिटनेस आयकॉन बनला.

आमच्यासारख्या १० किलोमीटर जेमतेम १.१५ ते १.२० तासांत पूर्ण करणाऱ्या लोकांसाठी डोंगरदऱ्यांमधून उन्हा-पावसात अविरत धावणारा, कधी समुद्रकिनारी विवस्त्र धावणारा, कधी शिवाजी पार्कमध्ये पुल-अप्स मारणारा मिलिंद खूपच मोठे इन्स्पिरेशन आहे. त्याच्या ५०% जरी फिट झालो तरी १० वर्षांनी आयुष्य नक्की वाढेल ह्याची खात्री आहे.

बाकी तरुण मुलींपासून चाळिशी-पन्नाशीत असलेल्या बायकांपर्यंत मिलिंदची क्रेझ आजही आहे. किंबहुना कित्येक पटीने वाढलेली आहे. आपल्या वयाच्या २६ व्या वर्षी तेव्हा ५२ वर्षांचा असणाऱ्या मिलिंदशी लग्न करून त्याची पत्नी अंकिताने हे सिद्धच केलेलं आहे की मिलिंद आणि वाईन जितके मॅच्युअर होतात तितकेच जास्त आकर्षक होत जातात. फक्त लोचा असा की ह्या लग्नानंतर त्याच्या वयाचे पुरुष त्याच्यावर जळतात की ह्या वयात त्याला इतकी तरुण बायको मिळाली आणि बायका बिचाऱ्या अंकितावर जळतात की आमच्या स्वप्नातला राजकुमार मिलिंद तिला अख्खा अव्हेलेबल झाला! असो!

तर आज मिलिंदचा ६१ वा वाढदिवस. आपल्या आडनावाला न जागता एक वेगळं आयुष्य स्वतःच्या टर्म्सवर जगलेल्या, देवाने दिलेलं दैवी सौंदर्य प्रचंड मेहनतीने जपून जोपासणाऱ्या, करोडो लोकांसाठी फिटनेसचे स्फूर्तिस्थान बनलेल्या, करोडो बायकांचा विक पॉइंट असलेल्या डोळे, केस, दाढी, शरीरसौष्ठव आणि त्यांना फक्त कल्पनेत दिसत असलेल्या इतर गोष्टींचा मालक असलेल्या मिलिंद सोमण नामक राजस सुकुमार मदनाच्या पुतळ्याला वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा! ©मंदार जोग

सिने जगताशी संबंधित इतर लेख- फिल्लमबाजी

ही वाट दूर जाते- ही वाट दूर जाते- भाग १ | सुरुवात

प्रेमकथा- प्रेम कथा

भयकथा- भयकथा

दीर्घकथा- दीर्घ कथा

ललित लेख- ललित

आमचे whatsapp channel join करा- whatsapp.com  

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: © Mandar Jog - All Rights Reserved