वंदे मातरम- मंदार मायक्रोस्कोप

वंदे मातरम् – वाद आणि सत्य- काल ‘वंदे मातरम्’वरून एक वाद झाला. समस्त माध्यमात त्यावर प्रतिक्रिया आल्या. अश्या वेळी नेहमीप्रमाणे दोन बाजू तयार झाल्या. एक बाजू म्हणते की वंदेमातरम संपूर्ण गीत म्हटलं पाहिजे, तर दुसरी बाजू पहिल्या दोन कडव्यांपुरतीच भूमिका योग्य मानते. मला मात्र अशा वेळी आपण ज्या गीतावर एवढं ठाम मत मांडतोय, ते नेमकं आहे तरी काय हे आधी समजून घ्यावं असं वाटलं आणि ते समजून घेताना समोर आलेले मुद्दे ह्या लेखात मांडायचा प्रयत्न केला आहे.

‘वंदे मातरम्’ हे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेलं गीत आहे. ते ७ नोव्हेंबर १८७५ रोजी बंगदर्शन या साहित्यिक नियतकालिकात प्रथम प्रकाशित झालं आणि नंतर बंकिमचंद्रांनी त्याचा समावेश आनंदमठ या कादंबरीत केला. आनंदमठ १८८२ मध्ये पुस्तकाच्या रूपात प्रसिद्ध झाली. ब्रिटिश राजवटीच्या काळातील बंगालच्या पार्श्वभूमीवरची ही कादंबरी होती आणि मातृभूमीला आईच्या रूपात पाहणारी ‘वंदे मातरम्’ची कल्पना पुढे स्वातंत्र्यलढ्यात अत्यंत प्रभावी ठरली. त्यातही अत्यंत महत्वाची आणी अनेकांना माहित नसलेली बाब म्हणजे ‘वंदे मातरम्’ ही पूर्णपणे संस्कृत रचना नाही. म्हणजे संस्कृत भाषेशी वाकड असणाऱ्या लोकांनी ह्या गीताकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलायला हरकत नाही. तिची मूळ भाषा बंगाली असून त्यात संस्कृत शब्दसंपदा आणि संस्कृत शैलीचा मोठ्या प्रमाणावर वापर आहे. त्यामुळे ती रचना ऐकताना किंवा वाचताना आपल्याला ती संस्कृत वाटते. पण बंकिमचंद्रांची मूळ रचना बंगाली साहित्याच्या परंपरेतली आहे. ‘वंदे मातरम्’ म्हणजे साधारणपणे ‘हे माते, तुला वंदन’. इथली माता म्हणजे मातृभूमी.

गीताच्या पहिल्या दोन कडव्यांमध्ये बंकिमचंद्रांनी आपल्या मातृभूमीचं जे चित्र उभं केलं आहे ते अतिशय सुंदर आहे. पाण्याने आणि फळांनी समृद्ध भूमी, मलय पर्वताकडून येणाऱ्या थंड वाऱ्याने सुखावलेली भूमी, पिकांनी हिरवीगार झालेली जमीन, चांदण्यांनी उजळलेल्या रात्री, फुलांनी बहरलेली झाडं, गोड बोलणारी आणि प्रसन्न हसणारी माता. ती सुख देणारी आहे, वरदान देणारी आहे. म्हणजे सुरुवातीला भारतमाता ही कुठल्याही राजकीय घोषणेच्या रूपात नाही, तर आपल्या मातीच्या, निसर्गाच्या आणि समृद्धीच्या रूपात समोर येते. पुढच्या कडव्यांमध्ये मात्र मातृभूमीचं रूप अधिक सामर्थ्यशाली होत जातं. कोट्यवधी कंठांचा आवाज आणि कोट्यवधी बाहूंची ताकद असताना ही माता दुर्बल कशी असू शकते, असा प्रश्न बंकिमचंद्र विचारतात. त्यानंतर मातृभूमीला विद्या, धर्म, प्राण, शक्ती आणि भक्तीचं रूप दिलं जातं. पुढे तिची तुलना दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वतीशी केली जाते. त्यामुळे संपूर्ण गीतात दोन वेगवेगळे भाव दिसतात. पहिल्या भागात मातृभूमीचं निसर्गरम्य आणि ममतेचं रूप आहे, तर पुढच्या भागात तिचं शक्तीचं आणि भारतीय धार्मिक प्रतीकांशी जोडलेलं रूप आहे.

‘वंदे मातरम्’चा स्वातंत्र्यलढ्याशी असलेला संबंधही तितकाच महत्त्वाचा आहे. १८९६ मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी ते गायले. पुढे स्वदेशी आंदोलनात हे गीत ब्रिटिश सत्तेविरोधातील राष्ट्रीय भावनेचं एक प्रभावी प्रतीक बनलं. मात्र संपूर्ण गीतातील दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वतीच्या उल्लेखामुळे काही मुस्लिम नेत्यांनी आक्षेप घेतले. १९३७ मध्ये काँग्रेसमध्ये या विषयावर चर्चा झाली आणि राष्ट्रीय कार्यक्रमांसाठी पहिली दोन कडवी वापरण्याचा मार्ग स्वीकारला गेला. या दोन कडव्यांमध्ये मातृभूमीचं वर्णन आहे, पण पुढील कडव्यांमधील देवीरूपकं नाहीत. त्यामुळे विविध धार्मिक पार्श्वभूमीच्या लोकांना स्वीकारता येईल असा तो मध्यममार्ग मानला गेला.

स्वातंत्र्यानंतर २४ जानेवारी १९५० रोजी संविधान सभेच्या शेवटच्या बैठकीत अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी स्पष्ट केलं की ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत असेल आणि स्वातंत्र्यलढ्यात ऐतिहासिक भूमिका बजावलेल्या ‘वंदे मातरम्’ला त्याच्याबरोबर समान सन्मान आणि समान दर्जा दिला जाईल. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट आहे. ‘जन गण मन’ हे भारताचं National Anthem आहे आणि ‘वंदे मातरम्’ हे National Song आहे. दोन्हींची ओळख वेगळी आहे, पण ‘वंदे मातरम्’ला देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्याच्या ऐतिहासिक भूमिकेमुळे अत्यंत मोठं राष्ट्रीय स्थान देण्यात आलं आहे.

गेल्या काही महिन्यांत या विषयाला पुन्हा महत्त्व मिळण्याचं आणखी एक कारण म्हणजे २०२६ मध्ये ‘वंदे मातरम्’ची १५० वर्षांची वाटचाल साजरी होत आहे. त्याच औचित्य साधत गृह मंत्रालयाने २८ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय गीताच्या अधिकृत आवृत्तीबाबत नवीन guidelines जारी केल्या आणि सहा कडव्यांची आवृत्ती निश्चित केली. दोन्ही राष्ट्रीय गीते एखाद्या अधिकृत कार्यक्रमात सादर केली जाणार असतील तर ‘वंदे मातरम्’ आधी आणि ‘जन गण मन’ नंतर असावं, अशीही तरतूद करण्यात आली. आकाशवाणीनेही २६ मार्च २०२६ पासून सहा कडव्यांची पूर्ण आवृत्ती प्रसारित करण्यास सुरुवात केली. आणि काल, म्हणजे १५ ऑगस्ट २०२६ रोजी लाल किल्ल्यावर झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या अधिकृत सोहळ्यात ‘वंदे मातरम्’ची संपूर्ण सहा कडव्यांची आवृत्ती प्रथमच सादर करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्यात उपस्थित होते. कार्यक्रमाच्या पुस्तिकेतही संपूर्ण सहा कडवी देण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रगीत सादर करण्यात आलं. सदर प्रसंगातून “संपूर्ण वंदे मातरम् गाणं कायद्याच्या विरोधात आहे” किंवा “त्याची फक्त पहिली दोन कडवीच म्हणता येतात” असा जो सार्वत्रिक गैरसमज काही ठिकाणी निर्माण केला गेला होता तो दूर झाला! उलट केंद्र सरकारच्या अधिकृत protocolमध्ये सहा कडव्यांची आवृत्ती वापरली जात आहे आणि देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्वोच्च अधिकृत सोहळ्यात ती सादर झाली आहे.

२०२६ मध्ये आणखी एक कायदेशीर बदल झाला आहे. Prevention of Insults to National Honour Act, 1971 मध्ये दुरुस्ती करून ‘वंदे मातरम्’च्या गायनाला जाणीवपूर्वक अडथळा आणणे किंवा त्याचं गायन रोखणे यालाही कायदेशीर शिक्षेच्या कक्षेत आणण्यात आलं आहे. याचा अर्थ प्रत्येक नागरिकाने प्रत्येक प्रसंगी संपूर्ण गीत गायलंच पाहिजे असा नाही. कायद्यातील मुख्य मुद्दा गायन रोखणे किंवा सुरू असलेल्या गायनात जाणीवपूर्वक अडथळा आणणे हा आहे. जो खूप चांगला बदल आहे. आणि म्हणूनच मला वाटतं, कालच्या वादाकडे थोडं शांतपणे पाहायला हरकत नाही. ज्यांना बंकिमचंद्रांनी मातृभूमीला दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वतीच्या रूपात पाहिलेली कल्पना मनापासून स्वीकारता येते, ज्यांना या भारतीय देवी-देवतांबद्दल आदर, भक्ती किंवा प्रेम आहे, त्यांनी संपूर्ण गीत गावं. ज्यांना त्या धार्मिक प्रतिमांशी स्वतःला जोडता येत नाही, जे वेगळ्या धर्मांच पालन आणि समर्थन करतात त्यांनी पहिली दोन कडवी गावी. पहिल्या दोन कडव्यांमध्येही आपल्या मातृभूमीच्या निसर्गाचं, समृद्धीचं आणि सौंदर्याचं अप्रतिम वर्णन आहे. थोडक्यात देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने वंदेमातरम गायला हरकत नाही.

आता शेवटी एकदा संपूर्ण गीताचा अर्थ समजून घेऊया. कारण एखाद्या गीतावर मत बनवण्यापेक्षा ते गीत नेमकं काय म्हणतं हे समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे.

संपूर्ण सहा कडव्यांचा मराठी अर्थ

पहिलं कडवं :

‘हे माते, तुला वंदन. तू पाण्याने आणि फळांनी समृद्ध आहेस. मलय पर्वताकडून येणाऱ्या शीतल वाऱ्याने तू सुखद आहेस. पिकांनी हिरवीगार झालेली माझी माता, तुला वंदन.’

दुसरं कडवं :

‘चंद्राच्या शुभ्र प्रकाशाने उजळलेल्या तुझ्या रात्री सुंदर आहेत. उमललेल्या फुलांनी आणि बहरलेल्या वृक्षांनी तू सजली आहेस. तू प्रसन्न हसणारी आहेस, गोड बोलणारी आहेस, सुख देणारी आणि वरदान देणारी माझी माता आहेस.’

तिसरं कडवं :

‘सात कोटी कंठांच्या जयघोषाने दुमदुमणारी आणि चौदा कोटी बाहूंच्या सामर्थ्याने सज्ज असलेली तू दुर्बल कशी असू शकतेस? अपार शक्ती धारण करणाऱ्या, संकटातून तारून नेणाऱ्या आणि शत्रूंच्या सैन्याचा पराभव करणाऱ्या माझ्या माते, तुला वंदन.’

चौथं कडवं :

‘तूच विद्या आहेस, तूच धर्म आहेस. तूच आमच्या हृदयात आहेस, तूच आमच्या अस्तित्वाचा गाभा आहेस. आमच्या शरीरातील प्राण तूच आहेस. आमच्या बाहूंमध्ये असलेली शक्ती तूच आहेस आणि आमच्या हृदयातील भक्तीही तूच आहेस. आमच्या घरातील पूजनीय प्रतिमेतही तुझंच रूप आहे.’

पाचवं कडवं :

‘तूच दहा शस्त्रं धारण करणारी दुर्गा आहेस. तूच कमळावर विहार करणारी कमला म्हणजे लक्ष्मी आहेस. तूच ज्ञान देणारी वाणी म्हणजे सरस्वती आहेस. अशा मातेला मी वंदन करतो.’

सहावं कडवं :

‘निर्मळ, निष्कलंक आणि अतुलनीय अशा कमलारूप तुला मी वंदन करतो. जल आणि फळांनी समृद्ध अशा माझ्या माते, तुला वंदन. हिरव्यागार, साध्या, प्रसन्न हास्याने नटलेल्या आणि सर्वांना धारण-पोषण करणाऱ्या माझ्या मातेला वंदन.’

संपूर्ण गीताकडे पाहिलं तर बंकिमचंद्रांच्या मनातली मातृभूमी एकाच वेळी माती आहे, निसर्ग आहे, समृद्धी आहे, शक्ती आहे, विद्या आहे आणि शेवटी देवीच्या रूपात दिसणारी माता देखील आहे. कुणाला त्यातलं पहिलं रूप अधिक जवळचं वाटेल, कुणाला दुसरं. पण गीत समजून घेतल्यानंतर त्यातून प्रतीत होणारं देशप्रेम कोणत्याही वादांपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि ज्याला या संपूर्ण गीतात आपली मातृभूमी दिसते, त्याने मनापासून म्हणावं, वंदे मातरम्.- मंदार जोग

आणखी माहितीपूर्ण लेखांची लिंक – माहितीपूर्ण लेख

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!