population | Mandar Jog

लोकसंख्या संस्कृती आणि भारत…

स्मिता प्रकाश यांच्या पॉडकास्टमध्ये संजीव सन्याल यांनी लोकसंख्येच्या घटत्या जन्मदरावर बोलताना मांडलेला एक मुद्दा अतिशय इंटरेस्टिंग आहे आणि तो समजून घेणं गरजेचं आहे. ज्या देशांमध्ये जन्मदर सातत्याने कमी होत जातो, तिथे काही दशकांनी फक्त लोकसंख्या कमी होत नाही, तर काम करणाऱ्या तरुणांची संख्याही कमी होते. मग उद्योग, शेती, रुग्णालयं, सेवा आणि संपूर्ण अर्थव्यवस्था चालवण्यासाठी माणसं कुठून आणायची हा प्रश्न उभा राहतो.

जर ती तशीच कमी होत गेली तर हळूहळू त्या भागातील, राज्यातील, देशातील शाळा, घरे, कारखाने, कार्यालये बंद करावी लागू शकतात. कारण ती ज्या लोकांसाठी निर्माण झाली तितकी लोकच त्यांचा उपभोग घेण्यासाठी आणि चालवण्यासाठी उपलब्ध नसू शकतात! सन्याल यांनी याच संदर्भात भारतातील काही राज्यांचा उल्लेख करताना पुढच्या काळात एका राज्याला दुसऱ्या राज्यातून मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणावं लागू शकतं आणि त्यातून cultural continuityचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं सांगितलं.

इथे दोन शब्द समजून घेणं महत्त्वाचं आहे. Replacement level म्हणजे एका पिढीची जागा पुढच्या पिढीने भरून काढण्यासाठी आवश्यक असलेला सरासरी जन्मदर. म्हणजे आज एखाद्या शहराची किंवा देशाची लोक संख्या १०० असेल ज्यात ५० कपल आहेत अस समजू. ती म्हातारी झाल्यावर त्या शहरात किंवा देशात पुढेही १०० लोकसंख्या टिकायला प्रत्येक कपलला २ मुले जन्माला घालणे आवश्यक आहे. पण समजा फक्त ३० कपलनी प्रत्येकी दोन मुलं जन्माला घातली. १० कपलनी फक्त एक मुल जन्माला घातलं आणि १० जणांना मुल झालंच नाही. तर भविष्यात हे शंभर लोक मेल्यावर त्या शहरात पुढील पिढीत ८० लोक उरतील. हे असाच सुरु राहिलं आणि तिथे बाहेरून लोक आलेच नाही तर काही शतकांनी ते शहर किंवा देश रिकामा होईल.म्हणुनच Replacement level मध्ये साधारणपणे 2.1 मुलं प्रति स्त्री हा त्याचा निकष मानला जातो. एखाद्या समाजात जन्मदर अनेक वर्षं या पातळीच्या खाली राहिला तर, स्थलांतराचा आधार नसताना, काही काळाने त्या समाजाची लोकसंख्या कमी होऊ लागते.

Cultural continuity म्हणजे एखाद्या समाजाची भाषा, परंपरा, सण, सामाजिक रीतिरिवाज, मूल्यव्यवस्था आणि जीवनपद्धती पुढच्या पिढ्यांपर्यंत टिकत जाणं. सन्याल यांच्या मुद्द्याचा गाभा इथेच आहे. एखाद्या प्रदेशातील स्थानिक तरुणांची संख्या कमी झाली आणि अर्थव्यवस्था चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बाहेरून माणसं आणावी लागली, तर मनुष्यबळाची समस्या सुटेल. पण त्याचबरोबर त्या प्रदेशाची भाषा, संस्कृती आणि सामाजिक रचना किती बदलत जाईल?

भारताच्या बाबतीत हा प्रश्न आता पूर्णपणे काल्पनिक राहिलेला नाही. देशातील मोठ्या शहरांमध्ये देशाच्या विविध भागांतून होणारं स्थलांतर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, बेंगळुरू, सुरत यांसारख्या शहरांची अर्थव्यवस्थाच आता मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित मनुष्यबळावर अवलंबून आहे. रोजगाराच्या संधी जिथे असतील तिथे लोक जातात. पण ह्या स्थलांतरामुळेच शहरांची, राज्यांची लोकसंख्येची रचना बदलत असताना स्थानिक समाजाच्या भाषेचा आणि सांस्कृतिक ओळखीचा प्रश्नही निर्माण होतो. हल्ली मोठ्या प्रमाणात निर्माण होणारे महाराष्ट्रातील भाषिक आणि प्रांतीय अस्मितेचे वाद त्याचं एक उदाहरण आहेत. स्थानिकांना रोजगारात प्राधान्य मिळावं, मराठी भाषेला सार्वजनिक जीवनात योग्य स्थान मिळावं किंवा परप्रांतीयांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक संस्कृतीवर परिणाम होतोय अशा भावना वेळोवेळी व्यक्त होतात. त्यातून राजकीय संघर्षही होतात. पण त्यांच्या मागे लोकसंख्येतील बदल आणि मोठ्या प्रमाणावर होणारं अंतर्गत स्थलांतर ही वस्तुस्थिती आहे. जो समाज उत्तरोत्तर प्रगल्भ, सुशिक्षित आणि सुसंस्कृत होत जातो तितकी त्याची Replacement level कमी होत जाऊन तो संपायची शक्यता वाढत जाते.

उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यांमध्ये आजही लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढते आहे. मग अश्या मोठ्या लोकसंख्येच्या राज्यांतून महाराष्ट्रासह देशाच्या औद्योगिक आणि महानगरीय भागांकडे होणारं स्थलांतर या बदलाचा मोठा भाग आहे. दुसरीकडे दक्षिण आणि पश्चिम भारतातील अनेक राज्यांमध्ये जन्मदर replacement levelच्या खाली गेला आहे. त्यामुळे एका बाजूला तरुण मनुष्यबळाची मोठी उपलब्धता असलेले बिमारू म्हणून ओळख असलेले प्रदेश आणि दुसऱ्या बाजूला स्थानिक लोकसंख्या वृद्धत्वाकडे जाणारे प्रगत प्रदेश अशी देशाची लोकसंख्या रचना पुढच्या दशकांत होताना स्पष्ट दिसत आहे.

धर्माच्या बाबतीतही लोकसंख्येच्या वाढीचे आणि जन्मदरातील फरकांचे प्रश्न उपस्थित केले जातात. भारतातील वेगवेगळ्या धार्मिक समुदायांमध्ये जन्मदरात ऐतिहासिकदृष्ट्या फरक राहिला आहे. मात्र सर्व समुदायांमध्ये कालांतराने जन्मदर कमी होत असल्याचं लोकसंख्याशास्त्रीय आकडे दाखवतात. तरीही ज्या धर्मात लोकसंख्या वाढीचा दर इतरांपेक्षा जास्त आहे त्यांची संख्या भविष्यात वाढून त्यातून इतर धर्मांच्या cultural continuityचा प्रश्न निर्माण होऊ शकतो हे सत्य नाकारता येणार नाही.

युरोपमध्ये कमी जन्मदर आणि मोठ्या प्रमाणावर झालेलं स्थलांतर यामुळे सामाजिक रचनेत मोठे बदल झाले आहेत. मुस्लिम देशांमधून झालेल्या स्थलांतरामुळे अनेक युरोपीय देशांमध्ये मुस्लिम लोकसंख्येचा टक्का प्रचंड वाढला आहे. Pew Research Centerच्या projectionsनुसार migrationचा मोठा प्रवाह कायम राहिल्यास 2050 पर्यंत युरोपातील मुस्लिम लोकसंख्येचा हिस्सा लक्षणीय वाढू शकतो. हा प्रश्न धर्माच्या चष्म्यातून पाहण्यापेक्षा, एका समाजाची लोकसंख्या कमी होत असताना बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे त्या समाजाची लोकसंख्या आणि सामाजिक रचना कशी बदलते, या व्यापक संदर्भात पाहणं अधिक योग्य आहे.

जपानने बराच काळ वेगळा मार्ग स्वीकारला. वृद्धत्व आणि कामगारांची कमतरता असूनही मोठ्या प्रमाणावर immigration स्वीकारण्याऐवजी त्यांनी नियंत्रित पद्धतीने परदेशी कामगारांना प्रवेश दिला. मात्र कामगारांची गरज वाढल्याने जपानलाही आता अधिक परदेशी मनुष्यबळ स्वीकारावं लागत आहे. 2025 मध्ये जपानमधील परदेशी रहिवाशांची संख्या प्रथमच 40 लाखांच्या पुढे गेली.

भारतासमोरही पुढच्या काही दशकांत असाच प्रश्न उभा राहू शकतो. भारताची एकूण लोकसंख्या लगेच कमी होणार नाही, पण आजचा कमी झालेला जन्मदर पुढे तरुण मनुष्यबळाच्या संख्येवर परिणाम करणार आहे. आज अनेक कुटुंबांमध्ये एकच मूल आहे. पुढची पिढीही लहान कुटुंबाचीच निवड करत राहिली तर प्रत्येक पिढीत कुटुंबाचा आकार कमी होत जाईल आणि वृद्धांची संख्या वाढत जाईल. मग 2050 किंवा 2060 मध्ये एखाद्या राज्याला आपली अर्थव्यवस्था चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बाहेरून मनुष्यबळ आणावं लागलं तर? त्या लोकांचं येणं आर्थिक गरज पूर्ण करेल. पण त्याच वेळी स्थानिक भाषा, परंपरा आणि सामाजिक ओळखीचं प्रमाण बदलत गेलं तर त्याकडे आपण कसं पाहणार?

खरं तर संस्कृती बदलण्याची प्रक्रिया भविष्यात सुरू होणार नसून वर उल्लेख केल्याप्रमाणे ती अनेक ठिकाणी आजच दिसते आहे. भाषेवरून होणारे वाद, स्थानिक विरुद्ध परप्रांतीय अशी राजकीय विभागणी, शहरांच्या बदलत्या सामाजिक रचना आणि रोजगारासाठी देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात होणारं मोठ्या प्रमाणावर स्थलांतर हे त्याचे संकेत मानता येतील. याचा अर्थ स्थलांतर थांबवणं हा उपाय आहे असं नाही. भारतासारख्या देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी लोकांचं एका भागातून दुसऱ्या भागात जाणं आवश्यकच आहे. पण आर्थिक गरज आणि सांस्कृतिक सातत्य यांच्यात समतोल साधण्याचा प्रश्न आपण वेळेवर विचारात घ्यायला हवा. कारण लोकसंख्या म्हणजे केवळ आकडा नाही. त्या आकड्यांच्या मागे भाषा, परंपरा, कुटुंबव्यवस्था , संस्कृती आणि अनेक पिढ्यांनी जपलेली ओळख असते. जर तो समतोल राखला गेला नाही तर माझ्या एका मित्राचे व्हिजनरी आजोबा म्हणाले होते ते सर्वांना अनुभवायला मिळेल. त्यांचं वाक्य होतं “एक दिवस येईल जेव्हा ह्या देशात ह्या गुलाबपुष्पे नष्ट होतील आणि खाजखुजली फोफावलेली असेल!”

इतर ललित लेख- ललित

मंदार मायक्रोस्कोप मधील इतर लेख- मंदार मायक्रोस्कोप

आमच्या लघुकथा- लघुकथा

आमच्या भय कथा – भयकथा

आमच्या कादंबरी- ट्वेंटी थ्री

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!