मृगजळ सिझन २- भाग १ | |Mandar Jog

मृगजळ सीझन २ भाग ९- डिव्होर्स?

अंकिता घरी आली तेव्हा सौरभ बेडरूम मध्ये झोपला होता. त्याला पाहून अंकिता प्रचंड चिडली. पण चिडून तिलाच त्रास झाला असता म्हणून ती शांत झाली. चेंज करून बेडवर आडवी झाली. सौरभ निर्विकार चेहऱ्याने शांत झोपला होता. तिच्या मनात विचार येत होते की ह्याला असा सहज सोडायचा कि पुरता नागडा करून सोडायचा. मग तिला ती उमेशला जे म्हणाली होती ते आठवल. “त्याच्या घराला, त्याच्या पैशांना डिव्होर्स देणार आहे. तुम्ही कराल तिच्याशी लग्न?” तिच्या मनात परत संघर्ष सुरु झाला. एक मन सांगत होतं की ह्या माणसाचं काहीही नको. माझी मी समर्थ आहे. आणि दुसरं मन सांगत होतं की अश्या नालायक माणसाला हलक्यात सोडू नको. त्याचं सर्वस्व काढून घे. तीच त्याला शिक्षा असेल. तिच्या डोक्यात विचारांची चक्रे जोरात फिरत होती. तेवढ्यात तिला सौरभने मानसीकडून मागितलेली एका आठवड्याची मुदत आठवली. तिने तीच मुदत वापरायचं ठरवलं आणि तिने डोळे मिटले. तिच्या डोळ्यासमोर आज उमेश बरोबर व्यतीत केलेले क्षण येऊ लागले. ते आठवून तिला छान वाटू लागलं. त्या आठवणीतच ती शांत झोपी गेली. 

श्रीरंग आणि मानसी तिच्या घरी होते. श्रीरंग ने त्यांच्या टेबल वर माईक लावून जे रेकॉर्ड केलं होतं आणि अंकिताला ऐकवलं होतं ते मानसी ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावर राग दिसू लागला. तिच्या कपाळाची शीर आता उडत होती. तो ऑडियो संपल्यावर ती रागाने थरथरत श्रीरंगला म्हणाली- 

मानसी- तू…तू ह्या थराला गेलास रंगा? आमचं private conversation तू रेकॉर्ड करून अंकिताला ऐकवलंस? तू इतका चीप वागलास?

श्रीरंग- चीप? मी तुला मदत करत होतो मानसी.

मानसी- अजिबात नाही. तू स्वतःला मदत करत होतास. माझ्यात आणि सौरभ मध्ये दरी निर्माण करायचा प्रयत्न करून. 

श्रीरंग- एक मिनिट मानसी. नीट विचार करून बोल. मी तुमचं बोलणं अंकिताला ऐकवलं ह्यात तुझ्यात आणि सौरभ मध्ये दरी निर्माण होईल की अंकिता आणि सौरभच्या मध्ये?

हे ऐकून मानसी विचारात पडली. 

श्रीरंग- अंकिताला आज कळलं आहे की सौरभ तिच्याबद्दल काय विचार करतो ते. तुझं आणि सौरभचं अफेयर आहे ते. हे कळल्यावर अंकिता काय करेल अस वाटतं तुला?

मानसी- ती सौरभला डिव्होर्स देईल. 

श्रीरंग- आणी ते झालं तर सौरभ काय करेल?

मानसी- माझ्याशी लग्न करेल. 

श्रीरंग- आणी तेच तुला हवं आहे. Right?

इथे मानसी नि:शब्द झाली. 

श्रीरंग- मी तुला हवं तेच घडवतो आहे. फक्त माझ्या style ने. तू बघच. सौरभ धावत येईल उद्या अंकिताने दिलेली डिव्होर्सची नोटीस घेऊन. मग तुमचं लग्न लावून मी अमेरिकेला निघून जाईन. 

हे ऐकत असलेल्या मानसीला कळत नव्हत की तिला सौरभचा डिव्होर्स होणार आणि तिचं लग्न होणार म्हणून बरं वाटतंय की श्रीरंग तिला सोडून अमेरिकेला जाणार ह्याच वाईट वाटतंय. त्या नंतर दोघेही फार काही बोलले नाहीत. श्रीरंग त्याच्या हॉटेलला निघून गेला. 

दुसऱ्या दिवशी अंकिता क्लासला जायला तयार होऊ लागली. नेहमीप्रमाणे फार मेकप वगैरे न करता ती आरशात एकदा पाहून निघाली. दोन पावलांवर थबकली. तिला काल उमेश जे म्हणाला होता ते आठवलं. ती मागे फिरली. आरशात बघत तिने छान मेकप केला. कपडे बदलून जरा ठेवणीतला ड्रेस घातला. आरशात स्वतःचं रूप पाहून तिचं तिलाच बरं वाटलं. समाधानाने स्वतःकडे पाहून ती क्लासला निघाली. आज स्कूटर वरून क्लासला जाणारा रस्ता तिला फार सुंदर दिसत होता. रोजचा ट्रॅफिकचा होणारा त्रास आज जाणवत नव्हता. ती जणू तरंगतच क्लासला पोहोचली. तिला त्या रुपात पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होतं. फिमेल टीचरस् आणि स्टाफ तर तिच्या रुपाचं कौतुक करत होता. “madam आज किती सुंदर दिसताय. आज काय विशेष?” अस विचारत होता. अंकिता तिच्या केबिन मध्ये येऊन बसली. ती नकळत उमेशची वाट बघत होती. बराच वेळ तो आला नाही. शेवटी अंकिता तिच्या लेक्चरला गेली. दोन तास शिकवून परत केबिन मध्ये आली तरी उमेश आला नव्हता. शेवटी तिने रिसेप्शन वर फोन करून चौकशी केल्यावर तिला कळल की उमेशचा आज विकली ऑफ आहे. ते ऐकून तिचा मूड ऑफ झाला. 

संध्याकाळी ती घरी निघाली. पण उमेश भेटला नसल्याने आलेली बेचैनी तिला शांत बसू देत नव्हती. तिने स्कूटर उमेशच्या घराकडे वळवली. त्याच्या घरी पोहोचून तिने बेल वाजवली. उमेशने दार उघडल. तिला घरी आलेली पाहून उमेश चकित झाला. 

उमेश- madam तुम्ही?

अंकिता- हो मी. परत जाऊ का?

उमेश- न..नाही..या ना आत या..

अंकिता त्याच्या घरात आली. थोडा अॅाकवर्ड सायलेन्स. उमेशच्या लक्षात आलं की तो shorts वर आहे. तो म्हणाला-

उमेश- मी..मी आलोच…तुम्ही बसा ना. 

अंकिता बसली. ती घराचं निरीक्षण करत होती. तितक्यात उमेश आला. 

उमेश- तुम्ही पाणी घेणार का? की चहा टाकू?

अंकिता- नको काही नको. 

उमेश- काही काम आहे का? I mean मला फोन करायचा ना. मी क्लासला आलो असतो. तुम्ही का त्रास घेतला?

अंकिता- तुमचा विकली ऑफ आहे ना आज. मग क्लासला कशी बोलावू तुम्हाला असा विचार केला आणि मीच आले. 

उमेश- त्यात काय..मी आलो असतो. काय काम आहे?

अंकिता- काहीच नाही. 

हे बोलताना ती उमेश्कडे रोखून बघत होती. त्याला तिचा मेकप,तिच्यातला बदल लक्षात येतोय की नाही हे ओळखत होती. उमेशही आता तिच्याकडे बघत होता. तिच्या रूपातला बदल त्याच्या लक्षात आलेला त्याच्या नजरेत दिसत होता. तो नकळत बोलून गेला. 

उमेश- madam आज किती वेगळ्या आणि सुंदर दिसताय तुम्ही. 

त्याच्या तोंडून हे ऐकून अंकिताला बरं वाटलं.

अंकिता- thanks. 

उमेश- खरं तर माझा सल्ला ऐकल्याबद्दल मीच तुमचे आभार मानायला हवे. Thanks madam.

अंकिता- सर मी पण एक सल्ला देऊ का?

उमेश- हो. काय?

अंकिता- क्लास मध्ये ठीक आहे. पण क्लासच्या बाहेर तुम्ही प्लीज मला madam नका म्हणू. इतक छान नाव आहे अंकिता. त्यानेच हाक मारा. 

उमेश- पण madam..

अंकिता- madam नाही अंकिता. 

उमेश- तुम्ही मला सर म्हणणार आणि मी तुम्हाला अंकिता म्हणजे मला क्लास मधे student शी बोलतो आहे अस वाटेल. तुम्ही पण मला सर ऐवजी उमेश म्हणा. 

अंकिता- ठीक आहे उमेश. 

उमेश- मला तुमचं हे फार आवडतं. बिनधास्त आहात तुम्ही. उगाच आढेवेढे नाही. 

अंकिता- आता तरी अंकिता म्हणाल ना?

उमेश- हो अं…अंकिता…तुम्ही चहा घेणार का अंकिता जी?

अंकिता- नको उमेशजी. मला कॉफी चालेल.

उमेश- उमेश जी नको. फक्त उमेश. 

अंकिता- मग तुम्ही पण तो जी काढून टाका. फक्त अंकिता म्हणा. ए अंकिता..

उमेश- ओके अंकिता. कॉफी घेऊया तिघेही.

अंकिता- तिघे कोण?

उमेश- तू , मी आणि तुझी ती सेम तुझ्यासारखी आरशातली बहिण जिचा डिव्होर्स झाल्यावर मी तिच्याशी लग्न करायचं आहे ती. 

हे ऐकून अंकिता लाजली. 

उमेश- ओह हो…लाजताना तर अंकिता…माझ्याकडे शब्द नाहीत.

अंकिताने हाताने चेहरा झाकून घेतला. 

उमेश- डिव्होर्सचं काय ठरवलं आहेस? आणि हे बघ. तू काल जे म्हणालीस ते योग्यच आहे. तू त्याची साथ सोडून, त्याचं घर, त्याचा पैसा सगळं त्याला देऊन नेसल्या वस्त्रानिशी बाहेर पडून माझ्याकडे ये. मी दुसऱ्या दिवशी लग्न करेन तुझ्याशी. आपल्याला त्या माणसाचं काहीही नको. 

अंकिताला हे ऐकून भरून आलं. ती उठून उमेशकडे गेली आणि त्याला घट्ट मिठी मारून रडू लागली. उमेशने तिला समजावलं. पाणी प्यायला दिलं आणि आत जाऊन तो कॉफी घेऊन आला. तिला कॉफीचा मग देऊन तिच्या समोर बसला. अंकिताने एक सिप घेतला आणि म्हणाली-

अंकिता- खूप छान कॉफी करतोस तू. 

उमेश- मी माणूसच छान आहे. 

अंकिता- hmm..आलंय माझ्या लक्षात म्हणून तर इतका विश्वास ठेवते आहे मी. आणि तुला त्या माणसाचं काहीही नको असलं तरी मी त्याला सोडणार नाहीये. त्याने माझी इतकी फसवणूक केली आहे त्याची शिक्षा मी त्याला देणार आहे. घर मी त्याच्या आई आणि माझ्या मुलासाठी ठेवेन. त्यात हिस्सा मागणार नाही. पण त्या बदल्यात त्याच्याकडून भरपूर पैसे घेईन ज्याचा त्याला त्रास होईल. मग भले ते पैसे आपण क्लास मध्ये गरीब students ना फुकट शिकवायला वापरू. नवीन क्लास रूम add करू. पण सौरभला मी सोडणार नाही. मला डिव्होर्स फाईल करायचा आहे. त्यासाठी वकील शोधायला हवा. 

उमेश- माझा मित्र आहे family कोर्ट मध्ये प्रक्टिस करतो. आपण त्याला भेटू. 

अंकिता- ठीक आहे. उद्या जाऊया. मी निघू आता?

उमेश- नको म्हणालो तर थांबणार आहेस का?

अंकिता- जाण्याची इच्छा अजिबात नाहीये पण जावं लागणार आहे. कायमची इथे येण्यासाठी आज इथून बाहेर पडावं लागणार आहे. 

उमेश- हम्म..ठीक आहे…बाय.

अंकिता जायला निघाली. उमेश सोफ्याजवळ उभा होता. अंकिता अचानक वळली आणि उमेशच्या जवळ येऊन त्याच्या गालावर पापी घेऊन म्हणाली-

अंकिता- माणसाने इतकंही चांगलं असू नये कि “तो आधी का नाही भेटला” अस वाटून एखाद्याला वाईट वाटेल. 

इतक बोलून ती निघून गेली. उमेश तिने पापी दिलेल्या गालावर हळुवार हात फिरवत होता. 

सौरभ गच्चीत उभा राहून सिगारेट ओढत मानसीला आता डिव्होर्स न देण्यासाठी काय कारण देता येईल ह्याचा विचार करत होता. अंकिता स्कूटरवर घराकडे येताना उद्या वकिलाला भेटून परवा किंवा तेरावा सौरभला नोटीस दिल्यावर त्याचा चेहरा कसा दिसेल हे आठवून हसत होती. मानसी तशीच कन्फ्युज्ड स्टेट मध्ये घरात बसली होती. सगळं ठरवल्याप्रमाणे झालं आहे आणि घडणार पण आहे. मग त्या नंतर मानसी काय निर्णय घेईल ह्या विचारात श्रीरंग समोर दिसणाऱ्या शांत रस्त्याकडे बघत होता. नियती रात्र आणि सकाळ ह्यांच्या मधोमध लटकून उद्या टाकायचे फासे मुठीत धरून कराकरा फिरवत होती. 

क्रमश:

पुढील भागाची लिंक- मृगजळ सीझन २ भाग १०- सरप्राईज

मागील भागाची लिंक- मृगजळ सीझन २ भाग ८- माईक आणि मनातलं

पहिल्या सीझनच्या सर्व भागांची लिंक- मृगजळ- सर्व भाग

मृगजळ सीझन २ चे सर्व भाग – मृगजळ- सिझन २- सर्व भाग

हे पण वाचा-

सख्या रे …

ट्वेंटी थ्री

गुंतता हृदय – सर्व भाग

व्हॅलेंटाईन डे- भाग १

रिफ्लेक्शन भाग १

आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा

आमच्या लघुकथा लघुकथा

माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख

आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण

ललित

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!