तो वास नक्की त्या लिफ्ट मधून येत असल्याची खात्री झालेला तेजस दुसर्या लिफ्टची वाट न बघता पायऱ्या उतरत खाली निघाला. खाली रोहितला देखील लिफ्ट मिळाली. आपण खेळवत असलेल्या कळसूत्रीच्या बाहुल्या एकाच इमारतीत वर आणि खाली जाताना बघत असलेली नियती स्वतःवर खुश होऊन हसत होती. मुग्धाची लिफ्ट लॉबी मध्ये आली. मुग्धा गर्दीबरोबर इमारतीच्या बाहेर पडली. पायर्या उतरून आलेल्या तेजसला लॉबीत दरवळत असलेला, कमीकमी होत जाणारा तो वास जाणवला पण मुग्धा दिसली नाही. सुप्रीम इंजिनियर्सच्या रीसेप्शनिस्तने मुग्धाची चौकशी करणाऱ्या रोहितला काहीही माहिती न देता फुटवला. रोहित चरफडत लिफ्टची वाट बघू लागला. तेजसची लिफ्ट वर येत होती. सुप्रीमच्या ऑफिसच्या मजल्यावर लिफ्ट थांबली. तेजस बाहेर आल्यावर सिक्युरिटी गार्डसनी उभे राहुन त्याला कडक salute ठोकला. ते रोहितच्या लक्षात येईपर्यंत तेजस पुढे गेला होता. रोहितने विचारलं “हा कोण?” गार्ड म्हणाला “हा नाही. हे कोण म्हणा. ते आमचे मालक आहेत.” पाठमोऱ्या तेजसकडे बघून रोहित म्हणाला “पैशाचा माज. दुसर काय?” अस म्हणून तिथेच बघत लिफ्टमध्ये चढणाऱ्या रोहितच नाक बंद झालेल्या लिफ्टच्या दारावर आपटून लाल झालं. रोहित कळवळला. सिक्युरिटी फिदीफिदी हसले. पण त्यांची साईझ बघता रोहित काहीही न बोलता नाक चोळत दुसऱ्या लिफ्टची वाट पाहू लागला.
मुग्धा घरी आली ती प्रचंड खुश होऊन. येताना अमेयसाठी आईस्क्रीम घेऊन आली. त्याला म्हणाली “आता आई पण ऑफिसला जाणार आहे बर का? तुला सांभाळायला रमा बाईंना ठेऊ आपण. चालेल ना?” अमेय म्हणाला “मग रोज ऑफिसातून येताना आईस्क्रीम आणशील ना?” मुग्धा म्हणाली “अगदी तुझ्या बाबा सारखा आहेस. प्रत्येक गोष्टीत वसुली आणि अटी. चल आपण एक काम करू. माझ्या नोकरीच्या आनंदात आज पार्टी करू. आधी पिझ्झा आणि मग आईस्क्रीम.” अमेय खुश झाला. म्हणाला “आपण तिघे जाऊया ना?” मुग्धा म्हणाली “तिघे कोण?” अमेय म्हणाला “तू, मी आणि रोहित काका. तो हल्ली असतो न आपल्या बरोबर. आज पण आला होता. मग मी त्याला तुझ्या ऑफिसात पाठवला.” हे ऐकून मुग्धा चमकली. म्हणाली “रोहित आला होता? आणि तू त्याला माझ्या कुठल्या ऑफिसला पाठवलास?” अमेयने तिला डायरी दाखवली. ते पाहून मुग्धा विचारात पडली. मग अमेयला जवळ घेऊन म्हणाली “हे बघ अमेय रोहित काकाला आता आपण त्रास द्यायचा नाहीये ओके? सो तो आला परत कधी आणि माझ्याबद्दल काही विचारलं तर तुला माहित नाही अस सांगायचं. आणि जेवायला आपण दोघेच जाणार आहोत. तो आपली family आहे का? नाही ना? बाबा बाप्पाकडे गेल्यावर फक्त आपण दोघे family आहोत. ओके?” अमेय ओके म्हणून खुश होत बाहेर खेळायला गेला. मुग्धा विचारात पडली.
तेजस त्याच्या केबिन मध्ये बसून रिसेप्शन एरियाच सीसी टीव्ही फुटेज बघत होता. का कोणास ठाऊक त्याला तो वास अजूनही आठवत होता. फुटेज बघता बघता त्याला मुग्धा दिसली. त्याने झूम केल्यावर त्याचा डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. “ही आपल्या ऑफिसात काय करते आहे?” असा प्रश्न त्याला पडला. मग ती राधिकाचा निरोप घेऊन निघताना दिसली. तेजसने फुटेज बंद करून राधिकाला फोन लावून बोलावून घेतली. राधिका येईपर्यंत तेजस बेचैन होता. राधिका आली. आता कंपनीच्या मालकाने एचआर हेडला एका बाईबद्दल सरळ विचारणं जरा ऑड दिसलं असत हे लक्षात घेऊन तेजसने आवांतर प्रश्न विचारायला सुरुवात केली. एरवी फक्त to the point बोलणाऱ्या तेजसला इतका आवांतर बोलताना पाहून राधिकालाही आश्चर्य वाटलं. परदेशातील विद्यापीठात पदवी घेतलेला तेजस तिच्यासमोरच सुप्रीम मध्ये ट्रेनी म्हणून जॉईन झाला होता. सिनियर दांडेकर साहेबांनी राधिकालाच त्याचा रीतसर इंटरव्ह्यू घ्यायला लावला होता. आणि राधिकाने देखील तो चेअरमनचा मुलगा आहे हे बाजूला ठेऊन त्याचा इंटरव्ह्यू घेऊन, त्याच्यातील नेतृत्व गुण ओळखून “we must hire” असा शेरा देऊन त्याला निवडला होता. ती इंटरव्ह्यू शीट पुढे तेजसने laminate करून त्याच्या भव्य टेबलाच्या काचेखाली ठेवली ती आजतागायत. तेजस राधिका समोरच कंपनीत ट्रेनी ते सिईओ असा ग्रो झाला होता. त्यामुळे त्या दोघांचा एक खास बॉंड होता. राधिकाच्या हुशारी, वय आणि व्यक्तिमत्वाचा तेजसला आदर होता. ती तेजसला ओळखून होती.
पाच मिनिट काहीच कामाचा विषय न निघाल्याने राधिका घड्याळात बघत तेजसला म्हणाली “तेजस प्लीज आता काय काम आहे ते स्पष्ट सांगून टाक. मला एक मिटिंग आहे.” तेजस म्हणाला “राधिका आज तू कोणाचा इंटरव्ह्यू घेतलास?” त्या प्रश्नाने चकित झालेली राधिका म्हणाली “what? come again.” तेजस म्हणाला “राधिका आज तू कोणाचा इंटरव्ह्यू घेतलास?” हा विषय डोक्यात नसलेली राधिका डोळे बंद करून आठवून म्हणाली “एक मुलगी आली होती. एच आर असिस्तंत म्हणून ऑफर देते आहे मी तिला. का रे?” तेजस म्हणाला “ओह ओके. काय…नाव काय आहे त्या मुलीचं?” राधिका म्हणाली “मुग्धा समथिंग… मी तुला तिचा cv पाठवते. पण का रे? काही प्रॉब्लेम? recommendation?” तेजस म्हणाला “नाही. तू इंटरव्ह्यू करत असताना मी एका contract साठी तुझ्या डेस्कवर फोन केला तेव्हा तू इंटरव्ह्यू मध्ये आहेस कळल. So I was wondering की तू इंटरव्ह्यू घेते आहेस म्हणजे सिनियर हायरिंग असणार and I was not aware…so तुला विचारलं. बाकी काही नाही.” त्याच्या ह्या उत्तराने समाधान न झालेली राधिका मिटींगला उशीर होत असल्याने फार न बोलता निघाली. ती दाराजवळ पोहोचली असताना तेजस मागुन म्हणाला “राधिका तो cv लगेच पाठव… न विसरता.” राधिकाने अविश्वासाने मागे वळून बघितल. नाकावर आलेला चष्मा मधल्या बोटाने वर केला आणि “येस तेजस” अस म्हणून ती निघून गेली.
संध्याकाळी साडेसातची वेळ. मुग्धा आणि अमेय पिझ्झा खायला आले. प्रशांत गेल्यावर आज पहिल्यांदाच ते दोघ बाहेर जेवायला आले होते. दोघंही खुश होते. पिझ्झा खाऊन झाल्यावर समोरच असलेल्या मैदानावर लागलेल्या जत्रेत दोघ भटकू लागले. जत्रेतली गर्दी, तिथले रंगीबेरंगी दिवे, आजूबाजूला असलेली असंख्य लहान लहान दुकान, त्यात विक्रीला असलेले विविध पदार्थ आणि खेळणी ह्यात दोघे हरवून गेले. तिथे कॅन्डी फ्लॉस खात असलेल्या अमेयला जायंट व्हील दिसलं. त्याने मुग्धाकडे त्यात बसायचा हट्ट सुरु केला. मुग्धाला त्यात बसायची प्रचंड भीती वाटत असे पण प्रशांत मात्र अमेय अगदी लहान असल्यापासून त्याला घेऊन जायंट व्हील मध्ये बसत असे. मग खाली उतरल्यावर दोघे मुग्धाला घाबरट म्हणून चिडवत असत. मुग्धाला ते सर्व आठवत होत. अमेय हट्ट सोडायला तयार नव्हता. मुग्धा समजावत होती. शेवटी अमेय म्हणाला “आता बाबा नाहीत तर जायंट व्हीलमध्ये मी कधीच बसू शकणार नाही का?” हे ऐकून मुग्धाच्या हृदयात काहीतरी तुटलं. तिने डोक्यावर दिसत असलेल्या त्या जायंट व्हीलकडे बघितलं. त्यातील एका पाळण्यात बसून प्रशांत तिला अंगठा दाखवत “go for it.” अस सांगत असल्याचा तिला भास झाला. मग मनाचा हिय्या करून ती आणि अमेय तिकिटाच्या लायनीत उभे राहिले.
प्राईम एव्हीन्युच्या बेसमेंट थ्री मध्ये दिवसभर आळसावलेली पांढऱ्या रंगाची BMW सेव्हन सिरीज आता थोडा थरार अनुभवायला सिद्ध झाली होती. ड्रायव्हर ने तिला चालवत इमारतीच्या पोर्च मध्ये आणली. खाली उतरून त्याने दार धरून ठेवलं. तेजस व्हीलवर बसला. ड्रायव्हरनी दार हळूच लोटलं. जर्मन हॉट ब्युटी दिमाखात निघाली. तिच्या मागे स्कोडा सुपर्ब मधून दोघे ड्रायव्हर निघाले. प्राईम एव्हीन्यू पासून शहराच्या गर्दीचा, रहदारीचा भाग साधारण पंधरा किलोमीटर अंतरावर होता. मूड असेल तेव्हा तेजस त्याच्या ताफ्यातील मीन मशीन्स त्या पंधरा किलोमीटरच्या अंतरात मनसोक्त उडवत असे. काही मिनिटांचा तो थरार त्याला आणि त्याच्या गाड्यांना किक देत असे. मग शहराच्या पहिल्या सिग्नलच्या काही मीटर अलीकडे तेजस मागे बसून व्हील मागून आलेल्या ड्रायव्हरच्या हाती देत असे. आज पण तोच प्लान होता. गाडी सिग्नलच्या जवळ आल्यावर व्हीलवर ड्रायव्हर बसला आणि तेजस मागे बसून मुग्धाचा बायोडेटा वाचू लागला.
जायंट व्हील सुरु झाल्यावर मुग्धाने भीतीने डोळे बंद करून घेतले. पाळणा खाली येऊ लागल्यावर तिच्या पोटात पिळवटून निघत होत. तिचा घाबरलेला चेहरा पाहून अमेयला आणखी मजा येत होती. व्हील थांबून एकेका पाळण्यातून लोकांना उतरवायला सुरुवात झाली तरी मुग्धाने डोळे उघडले नव्हते की दोन्ही हातानी मागे धरून ठेवलेला पाळणा सोडला नव्हता. त्यांचा पाळणा खाली आला. त्याची कडी काढून रॉड बाजूला झाला. अमेय टुणकन उडी मारून उतरला. मुग्धा डोळे मिटून तशीच बसून होती. रांगेत एकमेकांना धक्के देत असलेले तीन जण पाळण्यात घुसले. मुग्धाला “madam उतरो” असा आवाज ऐकू आल्यावर तिने डोळे उघडले. मग ती सावकाश उतरली. तरी तिचे पाय लटपटत होते. ती सावकाश चालत खाली आली. सवयीने अमेयचा हात धरायला शोधू लागली. पण अमेयचा हात हाताला लागला नाही. तिने सभोवार बघितलं. अमेय कुठेच नव्हता. ती घाबरून परत व्हील जवळ गेली. अमेय अमेय अश्या हाका मारून सर्वत्र बघू लागली. पण अमेय दिसत नव्हता. मुग्धाच्या हृदयाचा ठोका चुकला. पायातलं त्राण गेल्यासारखं वाटू लागलं. तिने व्हीलच्या सभोवार चार फेऱ्या मारल्या. अमेयला हाका मारून तिचा गळा सुकला. त्या गर्दी आणि कोलाहलात तिची हाक अमेयला ऐकू जाणही शक्य नव्हत. ती वेड्यासारखी रडत अमेयला शोधू लागली.
मैदानाच्या बाहेरच्या सिग्नलवर तेजसची गाडी थांबली. मुग्धाचा बायोडेटा त्याने किमान सहा वेळा वाचला होता. तो तिचाच विचार करत होता. त्यावर असलेल्या तिच्या फोटोने ओळख पटवली होती. तेजसने सहज बाहेर बघितलं तर मैदानाच्या दारात जोरात रडत उभा असलेला अमेय त्याला दिसला. अमेयला रडताना बघून तेजसच्या हृदयात कालवाकालव झाली. त्याने दरवाजा उघडून गाडीतून उतरत मैदानाकडे धाव घेतली. अमेय रडतच होता. तेजसने त्याला उचलून घेतला आणि विचारलं “काय झालं? का रडतो आहेस?” अमेय म्हणाला “माझी आई जत्रेत हरवली!” तेजसने आपल्या रुमालाने त्याचे डोळे पुसले आणि म्हणाला “घाबरू नको आपण शोधू तुझ्या आईला.ओके?” तेजस अमेयला खांद्यावर घेऊन पोलीस कंट्रोल रूम जवळ आला. त्याच्या खांद्यावर असलेल्या अमेयला काही फुटांवर पोलिसांशी बोलत रडत असलेली मुग्धा दिसली. तो “आईssss” असं जोरात ओरडला. त्याचा आवाज ऐकून मुग्धाने त्यांच्या दिशेला बघितलं. अमेयला बघून ती प्रचंड खुश झाली. धावत येऊन तिने अमेयला तेजस सकट मिठी मारली. त्याच्या गालाचे मुके घेतले. म्हणाली “कुठे रे गेला होतास सोन्या? मी मेले असते!”अस म्हणून तिने परत अमेयला घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू तेजसचा शर्ट भिजवत होते. नकळत तेजसचा डावा हात मुग्धाच्या पाठीवर फिरत तिला आधार देऊ लागला. शांत करू लागला. तिथे अचानक बंद पडलेल्या जायंट व्हीलच्या सर्वात वरच्या पाळण्यात बसलेला प्रशांतचा जीव ते दृश्य बघून टाळ्या वाजवत होता.
क्रमशः
(© मंदार जोग)गुंतता हृदय….(भाग- १०)

