पुणे मुंबई इंटरसिटीचा रिझर्व्हेशन डबा. मी सवयी नुसार पंधरा मिनिटे आधी येऊन खिडकी जवळच्या सीट वर स्थानापन्न झालो. काही वेळात एका बाईचा आवाज ऐकू आला. “धूम्रवर्ण तू मधल्या सीटवर बस. पप्पांना विंडो मध्ये बसू दे. वारा लागला तर सर्दी होईल तुला!”. मी वळून बघेपर्यंत सतरा अठरा वर्षांचा जीन्स, टीशर्ट आणि पायात क्रॉक्स ल्यालेला गोरा गोमटा धूम्रवर्ण, त्याची जीन्स, वर शॉर्ट कुर्ता ल्यालेली आई आणि स्वच्छ कांतीचे, इस्त्रीचे कपडे आणि रीमलेस चष्मा लावलेले वडील नजरेस पडले. मुळात धूम्रवर्ण हे नाव असलेली व्यक्ती मी प्रत्यक्षात पहिल्यांदाच प्रत्यक्ष बघत होतो. त्या धूम्रवर्णची माझ्या समोरच्या सीट वर मधोमध प्रतिष्ठापना झाली. बाजूला आयल सीट वर त्याची आय..सॉरी मम्मी बसली. पलीकडे खिडकीत त्याचे इस्त्री केलेले पप्पा बसले. माझ्या बाजूला एक काका आणि शेजारची सीट रिकामी. म्हणजे मी आणि काका आता पसरून बसू शकत होतो. ट्रेन मध्ये ६ सीट चे २ भाग असतात. त्यांच्या मध्ये जायला यायला aisle असते. एका बाजूला समोरासमोर तीन लोक आणि दुसऱ्या भागात समोरासमोर तीन लोक. धूम्रवर्ण आणि मम्मी आमच्या भागात माझ्या समोर होते आणि त्याचे वडील लांब दुसऱ्या भागाच्या खिडकीत बसले होते.
सगळे स्थिरस्थावर होऊन आता गाडी सुटणार इतक्यात ती झंजावातासारखी आली. कानात इयर प्लग कोंबलेले. पाठीवर एक बॅकपॅक, हातात एक बॅग, जीन्स, थंडीच जॅकेट, केसांचा जेमतेम पोनी, पायात फ्लोटर आणि फोनवर बोलत होती. वय वर्ष अठरा एकोणीस.
ती – पोहोचले मी…म्हणजे काय? तुम्हाला काय वाटलं रिंकीची ट्रेन मिस झाली? अरे तुम्ही फ्रेंड आहात की दुश्मन. रिक्षा मिळत नव्हती म्हणून चालत आले वनाझ पर्यंत आणि मग मेट्रो. मेट्रो मधून उतरून धावत ट्रेन गाठली.
ती रिंकी माझ्या समोर विंडो सीट वर बसली. बॅकपॅक वर टाकली. दुसरी बॅग पायाशी. ट्रेन निघाली. तिने लगेच कोणत्या तरी मैत्रिणीला व्हिडीओ कॉल लावला. दोन्ही पाय दुमडून अंगाच मुटकुळ करून मैत्रिणीशी गप्पा सुरू. तिला बहुधा कल्याणला जायचं होतं. मग इंटरसिटी कल्याणला थांबत नाही. मी ठाण्याला उतरून जाणार वगैरे सांगत होती. मग त्यातच “त्यात काय..काही प्रॉब्लेम नाही. फार उशीर नाही होणार…जायचं ग बिनधास्त..” वगैरे सुरू होतं. त्यात खाली ठेवलेल्या बॅग मधून काहीबाही काढून खात होती. थोड्या वेळाने पाय अखडले असावे म्हणून फ्लोटर काढून आमच्या सीटवर त्या काकांच्या आणि माझ्या मध्ये तिने पाय ठेवले. ते ठेवताना मला म्हणाली –
ती – पाच मिनिट ठेवते पाय. चालेल का?
मी – ठीक आहे.
ती मजेत ऐसपैस बसली. फ्रेंड्स बरोबर सतत फोन सुरू होते. गप्पा सुरू होत्या. लोणावळा आल्यावर लोणावळ्याला पोहोचले हे सांगून झालं. तिथे चढलेल्या माणसाकडून वडापाव घेऊन खाल्ला. चुकून तिचा पाय मला लागल्यावर सॉरी म्हणत चार वेळा नमस्कार करून झाला. पोरगी एकदम चुणचुणीत आणि स्मार्ट होती. अनेकदा एकटीने प्रवास करत असेल. कदाचित पुणे कल्याण नियमित जात असेल. पण कॉन्फिडन्स, अवेअरनेस मस्त होता. हसरी आणि विनम्र पण होती.
लोणावळ्याला वडापाववाले डब्यात चढल्यावर रिंकी ने वडापाव घेतल्यावर थंडी लागू नये म्हणून तिच्या शेजारी मधल्या सीटवर बसवलेला धूम्रवर्ण तिच्या हातातल्या वडापाव कडे बघत होता. ती मस्त हळूच मिरची चावत वडापाव खात होती आणि खाताना व्हिडिओ कॉल वर असलेल्या मैत्रिणीला अगदी चिडवत पण होती. इतक्यात धूम्रवर्णच्या मम्मी ने त्याच्या हातावर सानिटायझर टाकून त्याला “धूम्रवर्ण हात सनिटाईज् करून घे” असा आदेश सोडला. मी विचार करत होतो की विनय च विन्या, मंगेश च मंग्या, उमेश च उम्या वगैरे होत तसं धूम्रवर्ण च धुम्या होईल का? कारण सतत धूम्रवर्ण नावाने हाक मारायला पण जरा त्रास होत असेल. पण असो. त्याचे हात स्वच्छ झाल्यावर त्याच्या मातेने विविध फळांच्या (अगदी स्ट्रॉबेरी सकट) फोडी असलेला एका गोंडस डबा धूम्रवर्णला दिला. मग बॅग मधून फोर्क आणि टिश्यू पेपर काढून दिले. धूम्रवर्ण ते फळांचे काप खाऊ लागला. फळं खाऊन झाल्यावर त्यानेही कानाला इयर प्लग लावले आणि मोबाईल मधून काहीतरी पाहू लागला. त्याचे इस्त्री केलेले पप्पा त्या बाजूने वाकून बघत म्हणाले, “धूम्रवर्ण ओन्ली थट्टी मिनिट हां!”. त्याची मम्मी म्हणाली “डोन्ट वरी मी टायमर लावते माझ्या फोन मध्ये!”. तिने धूम्रवर्ण चा स्क्रीन टाईम अर्ध्या तासात संपवायला टायमर लावला. पाच मिनिट झाली नसतील तर त्याला कोणत्या तरी मित्राचा फोन आला. तो फोनवर बोलत असताना इथे मम्मी आणि पप्पांचे एकमेकांना इशारे सुरू होते. पप्पा तिथून खुणेने विचारत होते की कोणाचा फोन आहे. मम्मी एक कान धूम्रवर्णच्या संभाषणावर ठेऊन कोणाचा फोन आहे ह्याचा अंदाज घेत होती. धूम्रवर्ण बाsssरीक आवाजात फोनवर मिनिटभर बोलला आणि त्याने फोन कट केला. एकीकडे रिंकीचा मात्र फोनवर मैत्रिणीशी दंगा सुरू होता.
धूम्रवर्ण ने फोन ठेवल्यावर मम्मी ने विचारलं-
मम्मी – अमन होता ना?
धूम्रवर्ण – हो.
मम्मी – त्याला अवॉइड करत जा सांगितल ना आम्ही? काय म्हणत होता? (पप्पांना ओरडुन सांगत) अमन होता.
हे ऐकून पप्पांच्या चेहऱ्यावरच्या इस्त्रिला लगेच चुणी पडली.
धूम्रवर्ण – saturday sunday सगळे फ्रेंड्स अलिबागला जाणार आहेत. रोहनच्या अंकल च फार्म हाऊस आहे तिथे. मी येणार का विचारत होता.
मम्मी – नाही येणार म्हणून सांगून ताक त्याला. Saturday ला आपल्याला पार्ल्याला दिनेश अंकल कडे जायचं आहे आणि sunday ल तू आणि पप्पा स्विमिंग ला जाता ना? ते स्कीप करून चालणार नाही. हेल्थ महत्वाचं की अलिबाग? आणि त्या अमन आणि गँग बरोबर तर अजिबात नको.
हे सांगून तिने धूम्रवर्ण ने संपवलेला डबा त्याच्या हातातून काढून घेतला. टिश्यू पेपर ने त्याने हात पुसल्यावर परत त्याचे हात सानिटाईज केले. धुमृ परत काहीतरी ऐकू लागला.
गाडीने साधारण कर्जतच्या जवळपास होती. मम्मी च्या फोन मधला गजर वाजू लागला.
मम्मी – धूम्रवर्ण टाईम अप.
धूम्रवर्ण ने देखील आज्ञाधारक मुलाप्रमाणे इयर प्लग काढून ते डबीत ठेऊन डबी त्याच्या कडक इस्त्रीच्या जीन्सच्या खिशात ठेवली. ट्रेन पुढे जात होती. धूमृच्या पप्पा आणि मम्मीने देखील फोर्क ने फलाहार केला. आता काहीच ॲक्टिव्हिटी नसलेला आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटी मध्ये पप्पा आणि मम्मी दोघांचा सहभाग असलेला बिचारा धूम्रवर्ण शेजारच्या रींकीच्या फोन मध्ये हळूच डोकावू लागला. कदाचित व्हिडिओ कॉल वर असलेली रिंकी ची मैत्रीण सुस्वरूप असावी. रिंकीच्या ते लक्षात आल्यावर रिंकी फोन थोडा तिरका करून फोन मधल्या मैत्रिणीला म्हणाली “हा धूम्रवर्ण. त्याला हाय म्हण!”. ते ऐकून धूम्रवर्ण हादरला. त्याची मम्मी रींकिला म्हणाली “तू कशाला धूम्रवर्ण च नाव घेतलं?” रिंकी शांतपणे म्हणाली “काकू हा माझ्या फोनमध्ये वाकून बघत होता. म्हणून मी माझ्या फ्रेंड बरोबर त्याची ओळख करून दिली. विचारा ह्याला हा बघत होता की नाही ते!”
हे ऐकून मम्मी काहीच बोलली नाही. ती उठून त्या दोघांच्या मध्ये बसली आणि कॅसलिंग करून धूमृला स्वतःच्या आयल सीट वर बसवला. एव्हाना गाडीने डोंबिवली क्रॉस केलं. रिंकी फोनवर असलेल्या मैत्रिणीला म्हणाली “चल ग बाय..उद्या भेटू कॉलेजला…पोहोचले की मेसेज करते.” फोन कट करून ती वॉशरूमला गेली. जाताना मला “प्लीज जरा बॅग वर लक्ष ठेवा. मी आलेच.” असं सांगून गेली. परत आल्यावर बॅग्स ची आवराआवर करुन ठाणे यायची वाट पाहू लागली. धूम्रवर्ण मात्र डोक्यावर टीशर्ट ची हूडी लेवून मम्मीच्या शेजारी शांत बसून होता.
दोघेही साधारण एकाच वयाचे असणार. पण दोघांमध्ये जमीन अस्मानाचा फरक होता. ती रिंकी आत्मविश्वास पूर्ण होती. जबाबदार होती. धूम्रवर्ण च्या आई वडिलांनी मात्र त्याला ओव्हर प्रोटेक्ट केला होता. खरं तर ह्या वयाच्या मुलांना थोडी मोकळीक द्यायला हवी. त्यांच्यावर विश्वास दाखवायला हवा. हल्ली सर्वांकडेच हम दो हमारा एक असच असतं. सगळीच मुलं आई वडिलांची खूप लाडकी असतात. पालक प्रोटेक्टिव असतात. सगळं मान्य. पण अती जपणूक काय कामाची जी मुलांना स्वतःच्या जीवावर उमलुच देणार नाही? योगायोगाने आज ती रिंकी आणि तो धूम्रवर्ण अगदी समोर दिसले आणि विरोधाभास जाणवला इतकंच.
