अनेकांनी मला मेसेज करून सांगितलं की रेखाबद्दल काहीतरी लिहा. ते वाचून मलाही वाटलं की मी आजवर रेखा बद्दल काहीच का लिहिलं नाही? त्याचं कारण हे की मला लिहावं असं वाटलं नाही. म्हणजे एखादा विषय मनात आला की मी एकटाकी लिहून टाकतो. पण रेखाविषयी लिहिण्याचा विचारच somehow मनात आला नाही आजवर!

रेखा सिनेमासृष्टीत ढोबळ मानाने तीन रूपात वावरली. पाहिलं रूप म्हणजे सावन भादो, रामपूर का लक्ष्मण सिनेमात दिसलेलं तिचं चबी, बाळसेदार रूप. नंतर सिलसिला, खुबसुरत, नटवरलाल, उत्सव, घर अशा सिनेमात दिसलेलं “द रेखा” हे ग्लॅमरस रूप ज्याने अनेकांना घायाळ केलं. आणि नंतर चरित्र भूमिका करू लागल्यावरच वयस्क खरं रूप जे ती सतत लपवायचा प्रयत्न करते आणि हल्ली त्या प्रयत्नात अनेकदा हास्यास्पद, उथळ वागते.

रेखा सिनेमात पीकवर असताना आम्ही शाळेत होतो. पण बच्चन नावाचं गारुड मनावर अधिराज्य करायला सुरुवात होत होती. मला अमिताभ आणि रेखा ही जोडी अमिताभ झीनत आणि अमिताभ परवीन किंवा अमिताभ राखी सारखीच आवडायची. रेखा आणि अमिताभचे जवळजवळ सगळे सिनेमे मी पाहिले आहेत. पण खरं सांगतो मला त्यांच्या जोडीत काही विशेष किंवा वेगळ वाटलं नाही. म्हणजे लोक म्हणतात तशी स्पेशल केमिस्ट्री वगैरे सलाम इ इश्क मेरी जा हे गाणं, किंवा सिलसिला मधील काही सीन वगळता फरशी जाणवली नाही. उलट मला अमिताभ आणि परवीनची केमिस्ट्री जास्त खरी वाटते.

पण रेखाच अमिताभ बरोबर असलेलं अफेयर कानावर आलं आणि रडतोंडी जया पूर्वीपासूनच आवडत नसल्याने तेव्हा जो अमिताभचा निर्णय योग्य वाटला तो आजतागायत. अर्थात अमिताभ व्यतिरिक्त तिचं नाव विनोद मेहरा, तिचा नवरा मुकेश अग्रवाल, संजय दत्त, जितेंद्र पासून अगदी अक्षयकुमार आणि तिची सेक्रेटरी फरजाना पर्यंत सर्वांशी जोडलं गेलं. त्यातील मजेचा भाग म्हणजे इतर समस्त नट्या त्यांची लफडी नाकारून we are just good friends म्हणत असताना रेखा मात्र हे काहीही न नाकारता आणि अमिताभ वगळता बाकी कशाचा उघडपणे स्वीकारही न करता गॉसिप मधून मिळणारा लाइमलाईट, त्यातून होणाऱ्या चर्चा आणि त्या चर्चेतून तिचं चर्चेत रहाणं एन्जॉय करत होती अस मला वाटतं.

फेसबुकवर काही स्त्रिया असतात ज्या “मला इनबॉक्समध्ये इतके मेसेज येतात…वैताग नुसता” अश्या पोस्ट टाकतात तेव्हा त्या “अरे बाबांनो मलाही मेसेज करा की” असं खरं तर सुचवत असतात हे चाणाक्ष लोकांना लक्षात येत. रेखा त्याच प्रकारची आहे अस मला वाटतं. विशेषतः तिने अमिताभ बरोबर असलेल्या अफेयरचा वर्षानुवर्ष चर्चेत आणि लोकांच्या स्मरणात राहण्यासाठी केलेला उपयोग पाहून हेच वाटतं. कोणीही अमिताभ बद्दल विचारल्यावर अगदी ठरवून लाजून वगैरे आपण त्याच्या किती प्रेमात आहोत हे त्याचं नाव न घेता ठासून सांगणं हा मीडियाच्या चर्चेत राहण्याचा तिचा प्रयत्न असल्यासारखं वाटतं. हल्ली टीव्ही वरील रिअलिटी शो मध्ये असो किंवा अवॉर्ड फंक्शन असोत, गेल्या काही वर्षातील रेखाचा एकूणच सार्वजनिक वावर हा झगमगा मला बघा छाप वाटतो. मग ते विनाकारण इतर नट नट्याच्या अंगचटीला जाण असो किंवा आपण किती तरुण आहोत हे दाखवायला इतरांच्या गळ्यात पडून त्यांना अनकंफर्टेबल करत फोटोसाठी पोझ देणे असो. ते प्रचंड हास्यास्पद दिसतं!

बाकी नटी म्हणून रेखा कमाल होती आणि अजूनही आहे. तिचं खुबसुरत, सिलसिला काळातील रूप, तिचं नृत्यकौशल्य, तिचा आवाज ही सगळंच टॉप हिरोईन बनायला पोषक होतं आणि म्हणूनच ती “द रेखा” बनली. तिच्या चेहऱ्यावरचे सरसर बदलणारे भाव निव्वळ कमाल होते. पण रेखा काही लोकांना वाटते तशी सेक्सी वगैरे मला कधीच वाटली नाही. हा, ती आकर्षक नक्कीच होती. पण तिच्या समकालीन झीनत, परवीन जास्त सेक्सी वाटतात तर हेमामालिनी अत्यंत ग्रेसफुल आणि स्वतःचा आब ठेऊन वावरणारी आहे. म्हणजे रेखा जितकी बालीश, अटेंशन सिकिंग वागते त्याच्या कॉन्ट्रास्ट मधे तिच्या समकालीन हेमा, नीतू किंवा आधीच्या पिढीतील शर्मिला टागोर, वहिदा रेहमान पासून आजच्या पिढीतील कियारा अडवाणीचा ग्रेसफुल वावर ठळक उठून दिसतो. त्यामुळे रेखा सिनेमापुरती ठिकठाक वाटली तरी मी तिचा फॅन वगैरे कधीच झालो नाही. खरं तर ती ज्या स्थानावर पोहोचली आहे तिथे तिने सार्वजनिक जीवनात परिपक्वता, मार्दव, शालीनता दाखवणं अपेक्षित होतं. पण दुर्दैवाने ते घडलं नाही. रवी शास्त्री कसा, बरा क्रिकेटर होता. त्याच्या काळात बॉलिंग, बॅटिंग दोन्ही करायचा. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन बनून या काळात ऑडी गाडी जिंकला होता. पण शास्त्री क्रिकेट पेक्षा तेव्हा आणि विशेषतः हल्ली नको त्या गोष्टींनी चर्चेत असतो. जो भेटेल त्याला आपण क्रिकेटचे किती पापड आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतो, तरुण क्रिकेटरच्या ड्रेसिंग रूम मधे शिंग मोडून घुसतो, आचरट इंटरव्ह्यू देतो आणि प्रचंड अटेंशन सिकिंग करतो तशीच हल्लीची रेखा देखील सिनेमा विश्वातील लेडी रवी शास्त्री आहे अस मला राहून राहून वाटतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!