hands forming a heart shape with sunset silhouette. Copy space text.

रोहितच्या बोटात धरलेली सिगारेट फिल्टर पर्यंत जळली होती. त्याच्या बोटाला लागलेल्या चटक्याने रोहित भानावर आला. मुग्धा बरोबर रंगवलेल्या रात्रीच तो बघत असलेलं स्वप्न संपून त्याला सत्याची जाणीव झाली. पण आता जागेपणी पाहिलेलं स्वप्न सत्यात जगायची अतीव इच्छा त्याला स्वस्त बसू देत नव्हती. हातातली बीयर संपवून रोहित उठला. त्याने बेडरूमचा दरवाजा किलकीला केला. त्याला बेडवर झोपलेली मुग्धा दिसली. झोपेत अस्ताव्यस्त झालेल्या तिच्या गाऊन मधून दिसणारं तीच अंग त्याला वेड लावू लागलं. डोक्यातील बियरची नशा शरीरात आग लावत होती!

इथे हॉस्पिटल मध्ये तेजसने डोळे उघडले. जाग आली तरी तो गुंगीत होता. त्याला छातीत जड वाटत होतं. खूप वजन उचलल्यासखी छाती भरून आली होती. हृदयाचे ठोके वाढले होते. हातापायात पल्पिटेशन होत होतं. घशाला कोरड पडली होती. पाणी प्यावं असं वाटत होतं. त्याने उठायचा प्रयत्न केला. पण त्याला उठता येत नव्हतं. कोणीतरी जखडून ठेवल्यासारखं वाटत होतं. आणि त्याच वेळी कोणीतरी ओढत असल्याचा भास होत होता. तेजसला दरदरून घाम फुटला. तो हालचाल करायचा प्रयत्न करत होता. शेवटी न राहाऊन तो ओरडला “मुग्धा मला पाणी हवंय!”

मुग्धाला झोपेत प्रशांत हाक मारतो आहे ह्याची जाणीव झाली. त्याला पाणी हवं आहे हे लक्षात आलं. ती दचकून उठली. समोर तिच्याकडे वखवखलेल्या नजरेने बघणारा रोहित होता. त्याला पाहून मुग्धा दचकली. म्हणाली “तू इथे काय करतो आहेस?” तिच्या अचानक उठण्याने आणि प्रश्नाने गडबडलेला रोहित म्हणाला “मी? मी ते हे आपलं ब्लॅंकेट घ्यायला आलो होतो. थंडी वाजते आहे म्हणून. मुग्धाने त्याला ब्लॅंकेट दिलं. रोहित गेल्यावर रूमला आतून कडी लावून घेतली. ती बराच वेळ विचार करत होती की तिला प्रशांतची “मुग्धा मला पाणी हवंय ही हाक इतकी जवळून आणि खरी असल्यासारखी कशी ऐकू आली! हॉस्पिटल मध्ये तेजस आता पाणी पिऊन शांत झोपला होता. डॉक्टर विचार करत होते आपल्याकडे मुग्धा नावाची नर्स कोण आहे!

दुसऱ्या दिवशी सकाळी रोहित हँगओव्हर मुळे डोकं धरून बसला होता. मुग्धा म्हणाली “मी जरा फिरून येते.” मुग्धा ब्रेकफास्ट करून बाहेर पडली. कुठे जायचं माहीत नव्हतं. ती दिशाहीन भटकत होती. मनात प्रशांतच्या आठवणी आणि अमेयच्या भविष्याची चिंता होती. दर महिन्याचे बांधलेले खर्च समोर दिसत होते. मुंबईला परत गेल्यावर नोकरी शोधायला हवी होती. मुग्धा विचारांच्या तंद्रीत रस्त्यात चालत होती. एका सिग्नलवर रस्ता ओलांडताना उजव्या बाजूने येणारी मर्सिडीज तिला दिसलीच नाही. तिला अचानक समोर आलेली पाहून ड्रायव्हर ने करकचून ब्रेक लावला. तरी गाडी मुग्धाला टच झालीच! लोक जमले. ड्रायव्हर उतरला. मुग्धाच्या गुढग्याला मुका मार लागला होता. बाकी ती बचावली होती. लोक लगेच ड्रायव्हरची धुलाई करायला सज्ज झाले. मुग्धा लोकांना म्हणाली “मी नीट आहे आणि चूक माझी आहे. ड्रायव्हरला मारू नका!” आता मुग्धाच अस म्हणल्यावर हात धुवायची मस्त संधी मिळालेल्या जमवायचा विरस झाला. लोक पांगले.

मुग्धा तिची पर्स सांभाळत लंगडत निघाली. इतक्यात तिला मागून प्रेमळ हाक ऐकू आली. तिने मागे वळून बघितलं. गाडीच्या खाली केलेल्या काचेपलीकडून दांडेकर काकू तिला हाक मारत होत्या. त्या म्हणाल्या “तू गाडीत बस. आपण डॉक्टरना दाखवू.” मुग्धा म्हणाली “नको काकू. मी बरी आहे.” काकू म्हणाल्या “काकू म्हणते आहेस ना? मग काकूच ऐक आणि लगेच गाडीत बस. आम्ही हॉस्पिटलमध्येच  जातोय. एकदा डॉक्टरना दाखवून घेऊ.” त्या प्रेमळ आग्रहाला मुग्धा नाही म्हणू शकली नाही. लंगडत जाऊन ती ड्रायव्हरने अदबीने उघडलेल्या दारातून त्याच्या शेजारच्या सीटवर बसली. गाडी निघाली. त्या आलिशान गाडीतील सुखद थंडाव्यात मुग्धाला बरं वाटलं. गाडीत एक ओकवर्ड सायलेन्स होता. पुढे बसलेले ड्रायव्हर आणि मागे बसलेले दांडेकर दाम्पत्य एकमेकांशी काहीच बोलले नाहीत. पाचव्या मिनिटाला गाडी हॉस्पिटलच्या पोर्च मध्ये थांबली. ड्रायव्हर ने लगबगीने दोन्ही दरवाजे उघडले. तिघे उतरून हॉस्पिटलच्या प्रशस्त लॉबी मध्ये आले. दांडेकर काकूंनी रिसेप्शन वर सूचना दिल्या आणि मुग्धाला म्हणाल्या “मी इथे सांगितलं आहे. Opd मध्ये एक्सरे काढतील. काही सिरियस असेल तर मला कळवतील. नाहीतर तू जा.” मुग्धाने मान हलवली. थँक्स म्हणाली. दांडेकर काका म्हणाले “पोरी तुझ्यातली मगाशी दाखवलेली माणुसकी जप. तुझं नेहमी भलं होईल!” का कुणास ठाऊक मुग्धाला त्या दोघांच्या पाया पडवसं वाटलं. ती तिथे लॉबीतच त्यांच्या पाया पडली! दोघांनी “दीर्घायु भव, आयुष्यमान भवं!” असा आशीर्वाद दिला. त्यांचे ते शब्द मुग्धाच्या मनात रेंगाळत असतानाच दोघे लिफ्टमध्ये शिरले!

मुग्धाने एक्सरे काढला. पाय व्यवस्थित होता. डॉक्टरांनी एक पेन रिलीफ स्प्रे आणि काही पेन किलर गोळ्या हॉस्पिटलच्या फार्मसीतून दिल्या. त्याचे पैसे घेतले नाही. वर तेजसच्या रूम मध्ये डॉक्टर दांडेकर दाम्पत्याला सांगत होते की उद्या तेजसच्या डिस्चार्ज करू. ते ऐकून दांडेकर दाम्पत्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. दांडेकर काकांनी ऑफिसच्या व्हीपी अडमिनला मेसेज करून उद्याची बंगलोर मुंबईची बिझनेस क्लासची तीन तिकीट काढायला सांगितली. खाली मुग्धा हॉस्पिटलच्या लॉबीतून बाहेर पडून हॉस्पिटलच्या मेन गेट मधून बाहेर आल्यावर रस्ता क्रॉस करून रिक्षाला हात दाखवू लागली. समोर दिसत असलेल्या त्या हॉस्पिटलकच्या प्रचंड इमारतीच्या गच्चीवर उभा राहून प्रशांत तिला हात दाखवत असल्याचा तिला भास झाला! डोळ्यात जमा झालेलं पाणी रुमालाने पुसत तिने नकळत प्रशांतला हात हलवत टाटा केला आणि रिक्षात बसत हॉटेलचा पत्ता सांगितला!

हॉटेलात परत आल्यावर मुग्धाला रूमवर जायची इच्छा होत नव्हती. पण वेळ कसा घालवायचा ते पण लक्षात येत नव्हतं. इतक्यात अमेयचा फोन आला. त्याने तिची चौकशी केली. अमेय तिला प्रचंड मिस करत होता. ती म्हणाली “मी तुझ्यासाठी एक मस्त गिफ्ट आणि चॉकलेट आणणार आहे.” ते ऐकून अमेय खुश झाला. तिला लवकर ये म्हणाला. मुग्धा म्हणाली “बाळा अभ्यास कर नीट. आंटीला त्रास देऊ नको.” अमेय म्हणाला “आई तुला माहित्येय काल रात्री बाबा माझ्या स्वप्नात आला होता. मला म्हणाला अम्या नीट अभ्यास कर. मी गेलेलो नाही. माझं लक्ष आहे तुझ्यावर. मग आम्ही खूप मस्ती केली. मग अचानक बाबा निघून गेला आणि मी जागा झालो. आई बाबा कुठे आहे?” हे ऐकून मुग्धाला रडू फुटलं. ती म्हणाली “बाबा आहे आकाशात. आपल्यावर लक्ष आहे त्याच. ओके? जेवलास का तू? जेवून घे पोटभर ओके?” अमेय ओके म्हणाला. मुग्धाने फोन ठेवला. मग अमेयला गिफ्ट घ्यायला ती जवळच्या मॉल मध्ये दिवसभर भटकली. त्याच्यासाठी तीन गेम्स आणि चॉकलेट घेऊन ती संध्याकाळी बाहेर पडली.

रूमवर आल्यावर बघते तर रोहित बीयर पीत टीव्हीवर सिनेमा बघत होता. मुग्धाला ते बघून थोडा उबग आला. रोहितने तिला बीयर ऑफर केली. मुग्धा म्हणाली “रोहित मला बीयर वगैरे नकोय आणि तू पण बास कर आता.” तिच्या आवाजातील जरब आणि अचानक आलेल्या आत्मविश्वासाची जाणीव होऊन रोहित सावरून बसला. बेडवरच्या बाटल्या आणि इतर पसारा आवरून त्याने बेड व्यवस्थित केला. तो काही न बोलता बाहेर गेला. त्याच्यामागे दार लॉक केल्याचा आवाज त्याने ऐकला.

मुग्धाने शावर घेऊन देवाच स्मरण केलं. मग टीव्हीची चॅनल उगाच ब्राउज करताना तिला आजची घटना आठवत होती. आजचा अपघात. मग ते काका काकू. मग हॉस्पिटल. तिथे त्या दोघांनी दिलेला आशिर्वाद आणि मग हॉस्पिटलच्या गच्चीवरून हात दाखवत असलेला प्रशांत. तिला कळत नव्हतं की त्या हॉस्पिटलच्या गच्चीवर तिला प्रशांत का दिसला? प्रशांत अमेयच्या स्वप्नात येऊन मी आहे असं का म्हणाला? ह्या घटना सहज घडल्या आहेत की ह्यामागे काही संकेत आहे? असेल तर तो काय आहे? तिच्या मनात विचारांची गर्दी झाली होती. मग ती प्रशांतची आठवण आहे अशी स्वतःची समजूत घालून मुग्धाने उद्याचे कपडे काढून ठेऊन बॅग पॅक केली. मुंबईला परतल्यावर नोकरीचे अर्ज कुठे करता येतील ह्यासाठी जॉब साईट बघू लागली.

काही तास जॉब साईट आणि सोशल मीडियावर घालवल्यावर तिला झोप येऊ लागली. तेवढ्यात दारावर टकटक झाली. बाहेरून रोहित विचारत होता “जेवणाच काय तुझ्या? चल खाली रेस्टरन्ट मध्ये जाऊन जेवू. एकेक बीयर मारू आणि थोडावेळ डिस्कोथेक मध्ये डान्स करू. तुला बरं वाटेलं.” मुग्धा म्हणाली “मला भूक नाहीये. तू जा. मी झोपते.” तरीही रोहितने आग्रह केलाच. पण मुग्धा बधली नाही. रोहित एकटाच जेवायला गेला. बेडवर शांत पडलेल्या मुग्धाला का कोण जाणे ह्यापूढे रोहितला अवोईड करावं असं मनापासून वाटत होतं. आज अनेक दिवसांनी सारासार विचार जागृत झाल्यावर तिचा सिक्सथ सेन्स तिला काहीतरी सूचना देत होता. तिने रोहितला ह्यापुढे शक्यतो टाळण्याचा निश्चय करून दिवा बंद केला.

दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट करताना रोहित बडबड करत होता. मुग्धा फक्त हो ला हो करत त्याच्यापासून अंतर राखून होती. शेवटी रोहितने तिला विचारलं “मुग्धा तू अशी गप्प का? काही टेन्शन आहे का? मला सांग ना. मी आहे ना.” अस म्हणत तिचा हात हातात घ्यायला त्याने पुढे केलेल्या हातातून मुग्धाने आपला हात सोडवून घेतला. मुग्धा म्हणाली” रोहित प्रशांत गेल्यावर तू माझ्यासाठी हे काही केलंस ते उपकार मी कधीच विसरणार नाही. पण आता मला माझ्या पायावर उभी राहू दे. किती दिवस तुझ्या आधाराने जगू? प्रशांतला पण हे आवडणार नाही. सो मी रिक्वेस्ट करते की मला जरा independently जगाला फेस करू दे. काहीही मदत लागली तर मी तुलाच सर्वात आधी सांगेन!” आपली कणी कापली जात असलेली रोहितच्या लक्षात आली. पण तो सहज हार मानणारा नव्हता. पण आता रिऍक्ट केलं तर मुग्धा जास्त अंतर निर्माण करेल हे लक्षात येऊन तो म्हणाला “i am proud of you मुग्धा! तुला हवं ते तू कर. पण कधीही मदत लागली तर हा बंदा हाजीर असेल हे लक्षात असू दे.” मुग्धा थँक्स म्हणाली आणि उठून रूमकडे निघाली.

एअरपोर्टच्या चेकइन काऊंटरवर फ्लाईट ओव्हर सोल्ड झाल्याने मुग्धाला बिझनेस क्लास अपग्रेड मिळाला. फ्लाईट बोर्ड केल्यावर एअर होस्टेसने अदबीने दाखवलेल्या बिझनेस क्लास सीटवर मुग्धा बसली. रोहित मागे वाय क्लास मध्ये जाऊन बसला. लोक अजूनही फ्लाईट बोर्ड करत होते. दोन दिवसांच्या थकव्याने त्या गुबगुबीत चेयर मध्ये मुग्धाला झोप लागली. सीटबेल्ट बांधून मुग्धा गाढ झोपी गेली. फ्लाईट टॅक्सी वे वरून रन वे वर आली. पायलटला रन वे समोर दिसत होता. मुग्धाने झोपेत शेजारच्या प्रवाशाच्या खांद्यावर नकळत डोकं टेकल. विमान रन वे वरून जोरात धावू लागलं. मुग्धाने झोपेतच आधारासाठी शेजारच्या प्रवाश्याचा दंड धरला. तो प्रवासी तेजस दांडेकर होता. मुंबईतल्या दांडेकर इंडस्ट्रीजचा मालक. विमान हलकेच हवेत झेपावल! तेजस मुग्धाच्या लोभस चेहऱ्याकडे बघत होता!

©मंदार जोग

क्रमशः

गुंतता हृदय- भाग- 6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!