मृगजळ सिझन २- भाग १ | |Mandar Jog

मृगजळ सीझन २ भाग १०- सरप्राईज

दुसऱ्या दिवशी अंकिता तिचं लेक्चर संपवून तिच्या केबिन मध्ये आली. हर्षद तिची वाट बघत बसला होता. तिला आलेली पाहून तो घाईत म्हणाला-

हर्षद- आई मला इतक्या घाईत का बोलावून घेतलंस? आणि ते पण इथे? घरी का नाही? काय झालंय नक्की?

अंकिता- हर्षद, मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे जे घरी बोलता आलं नसतं म्हणून तुला इथे बोलावून घेतलं. 

हर्षद- काय आहे? सांग.

अंकिता- एक मिनिट. मी उमेशला पण बोलावते.

हर्षद गोंधळून तिच्याकडे बघत असताना तिने फोन करून उमेशला बोलावून घेतलं. उमेश तिच्या केबिन मध्ये आला. 

अंकिता- उमेश हा हर्षद. तू ह्याला ओळखतोस ना?

उमेश- हो…of course..हाय हर्षद. कसा आहेस तू?

हर्षद- मी ..मी ठीक आहे. 

अंकिता- आणि हर्षद हे उमेश सर. आमच्या क्लास मधले बेस्ट शिक्षक आणि बेस्ट माणूस. उमेशला सौरभ म्हणजे तुझ्या बाबांबद्दल सगळं माहित आहे. 

हे ऐकून हर्षदला काय react कराव कळलं नाही. 

हर्षद- सगळं…म्हणजे…?

अंकिता- म्हणजे त्याच्या आणि मानसीच्या अफेयर बद्दल, आमच्या कधीच संपलेल्या married life बद्दल आणि तू बाहेरगावी नोकरीला गेल्यावर माझ्या आयुष्यात निर्माण झालेल्या vacuum बद्दल. 

हर्षद- पण आई..

अंकिता- सांगते. त्यासाठी तर तुला बोलावलं आहे मी. हर्षद, तू आता तरुण आहेस. तुला तुझं करियर आहे. तू म्हणालास त्याप्रमाणे कदाचित तू उद्या परदेशातही जाशील. तेव्हा तर वर्षानुवर्षे आपली भेट होणार नाही. उद्या तू लग्न करशील, तुझ्या लाईफ मध्ये बिझी होशील. आणि ते नैसर्गिक आहे. मला तेच व्हायला हवं आहे. आई म्हणून मी माझी जबाबदारी सगळ्या संकटांचा सामना करत निभावली आहे असं मला वाटतं. तुला मी कुठे कमी पडले अस वाटतं का?

हर्षद- नाही आई..पण हे सगळं तू आता..

अंकिता- हो आता. कारण आता ती वेळ आली आहे. सौरभने मला आयुष्यात तुला वगळला तर फार काही सुख दिलेलं नाही. माझा संसारही मी माझ्या ताकदीवर ओढला आहे. सौरभकडून नवरा म्हणून मला फार प्रेम मिळालं नाही. मान्य माझ्या स्वभावात, वागण्यात बरेच flaws होते. पण सौरभ देखील परफेक्ट नव्हता ना? पण त्याने माझ्या flaws च भांडवल करून मानसी बरोबर अफेयर केलं. माझ्याशी प्रतारणा केली आणि आजही तेच करतोय.

हे ऐकून हर्षदला shock बसला. 

हर्षद- काय?

अंकिता- हो…आणि तो मला डिव्होर्स द्यायची तयारी करतोय. 

हर्षद- काय?

अंकिता- yes…मी त्याला त्याच्या आयुष्यात आलेली पनवती वाटते. 

हर्षद- ओह…

अंकिता- पण मला हे देखील माहित्येय की मला डिव्होर्स देण्याची हिम्मत त्याच्यात नाहीये. ती असती तर त्याने मला कधीच डिव्होर्स दिला असता. पण मी एक निर्णय घेतलाय.

हर्षद- निर्णय? काय निर्णय?

अंकिता- मी त्याला त्या घरातून बाहेर काढणार आहे. 

हे ऐकून उमेश देखील चकित झाला. 

उमेश- madam..

अंकिता- मला बोलू दे उमेश. हर्षद, काल मी आणि उमेशने निर्णय घेतला होता की मी सौरभला डिव्होर्स देईन आणि तो मिळाल्यावर आम्ही दोघे लग्न करू. 

हे ऐकून हर्षद shocked होत उभा राहिला. 

हर्षद- आई…हे…हे..काय बोलते आहेस तू?

अंकिता- तेच जे तू ऐकतो आहेस. हर्षद तू स्वतःला माझ्या जागी ठेऊन विचार कर. आज माझ वय पंचेचाळीसच्या पुढे आहे. तू काही वर्षात तुझ्या संसारात पडशील. मग मी कोणाकडे बघून जगायचं? एका अश्या नवऱ्याकडे जो माझा कधीच नव्हता आणि पुढेही असणार नाहीये? मलाही भावना आहेत, मलाही साथोदाराची गरज आहे,मलाही म्हातारपणी आधार लागणार आहे, मलाही कोणीतरी माझी मनापासून काळजी घेणारा साथीदार हवा आहे. 

हर्षद- मी आहे ना आई…

अंकिता- तू माझा मुलगा आहेस. तुला तुझं भविष्य आहे. मी तुला माझ्यात अडकवून ठेवणार नाही. मी तुझ्या आयुष्यात लुडबुड करणार नाही. तुझ्या आजीने जी चूक सौरभच्या बाबतीत केली आहे ती मी करणार नाही. आणि मला साथ देईल असा, मला समजून घेईल असा, मी जशी आहे तसा माझा स्वीकार करणारा माणूस उमेश आहे. ह्यापुढे मी उमेशच्या घरी राहणार आहे. पण मी सौरभला घरातून बाहेर काढेन. अर्थात ते घर तुझंच असेल मला ते अजिबात नकोय. तुझ्या आजीला तिथे राहायच असेल तर माझी काहीच हरकत नसेल. पण सौरभला मात्र मी त्या घरात राहू देणार नाही. आणि डिव्होर्स देखील देणार नाही. त्याला डिव्होर्स दिला की तो मोकळा होईल मानसीशी लग्न करायला. मी त्याला मोकळा होऊ देणार नाही. मी त्याला डिव्होर्स न देणे हीच त्याला शिक्षा असेल. 

हर्षद- आई हे तू काय बोलते आहेस? बाबांनी जी चूक केली तीच तू पण करणार आहेस आणि त्यासाठी बाबांना blame करते आहेस?त्यांनी अफेयर केल म्हणून त्यांना नाव ठेवताना तू स्वतः पण अफेयरच करणार आहेस. 

अंकिता- खूप फरक आहे हर्षद. सौरभने जे केलं ते मजा म्हणून केलं. मी जो निर्णय घेतला आहे तो गरज म्हणून घेतला आहे आणि त्याला कारण सौरभच आहे. तो जर नवरा म्हणून नीट वागला असता तर माझ्या आयुष्यात ही पोकळी निर्माणच झाली नसती. तूच आठव. एक कुटुंब म्हणून, family म्हणून आपण शेवटचा सिनेमा कोणता पाणी कधी पाहिला? सुट्टीत फिरायला कुठे आणि कधी गेलो होतो? साधं एकत्र जेवायला कधी गेलो होतो ते आठव. तुला नाही आठवणार. कारण गेल्या बारा पंधरा वर्षात आपण family म्हणून काहीही केलेलं नाही. फक्त समारंभात लोकांसमोर छान छान कपडे घालून सगळं कसं छान आहे हे खोटं चित्र दाखवत राहिलो. तुला आता कदाचित कळणार नाही. पण तुझं लग्न झालं, तुझी बायको आली आणि काही वर्ष संसार केल्यावर तुला मी काय म्हणते आहे ते कळेल. तुझ्या बापाने नवरा कसा नसावा हे तुला दाखवून दिलेलं आहे. ते लक्षात ठेव फक्त. बाकी आजवर तू मला समजून घेऊन माझ्या बाजूने उभा आहेस. पुढेही असशील अशी मी आशा करते. आता तुझ्या मनात खूप कन्फ्युजन,कदाचित रागही असेल माझ्याबद्दल. पण हर्षद मी डिव्होर्स नाही देणार सौरभला. तुझं भविष्य आणि माझा सूड ही दोन कारणं आहेत मी डिव्होर्स न देण्याची. बास मला इतकाच सांगायचं होतं. तुला काही बोलायचं असेल, विचारायचं असेल तर अवश्य बोल. 

हर्षदला काय बोलावं, काय react करावं कळत नव्हतं. तो स्वतःच्या विचारात होता. 

हर्षद- आई..I need time..मी..मी निघतो…तुला हवं ते तू कर…

हे बोलून उमेशला एक लूक देऊन तो निघून गेला. उमेश न राहवून म्हणाला-

उमेश- madam…

अंकिता- माझा हाच निर्णय आहे उमेश. कदाचित तुला…

उमेश- मला मान्य आहे आणि योग्यही वाटतोय. मी म्हणालो आहे ना तुम्हाला की driving seat वर मी तुम्हाला बसवलेलं आहे. त्यामुळे तुमच्या प्रत्येक निर्णयात मी तुमच्या बरोबर आहे. आयुष्याच्या अंतापर्यंत. 

अंकिता- अंत नाही उमेश हि तर सुरुवात आहे आपल्या एकत्र आयुष्याची. 

ती उठून उभी राहिली आणि तिने उमेशला घट्ट मिठी मारली. दोघांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. 

 त्या रात्री अंकिता सौरभची वाट बघत होती. सौरभ जवळजवळ दहा वाजता घरी आला. जेवून वगैरे बेडरूम मध्ये आला. आज अंकिता मुद्द्दाम आकर्षक दिसत होती. तिला पाहून सौरभ चकित झाला. 

सौरभ- अरे वा. आज एकदम वेगळी दिसते आहेस. 

अंकिता- वेगळी म्हणजे?

सौरभ- म्हणजे एकदम सेक्सी. मला ती त्या दिवशीची रात्र आठवते आहे. आज परत ती अनुभवायची इच्छा होते आहे. 

अंकिता- अच्छा? डिव्होर्स द्यायच्या आधी पनवती बरोबर सेक्स करायची इच्छा आहे का?

हे ऐकून सौरभ चपापला. 

सौरभ- पनवती? डिव्होर्स? हे..हे काय बोलते आहेस तू अंकिता?

अंकिताने पुढे होत त्याची कॉलर धरली आणि रागाने थरथरत त्याला म्हणाली-

अंकिता- ए हरा@खोर माणसा, तुला ना नरकात पण जागा देणार नाहीत कारण तू तिथेही घाण करशील इतका तू नीच आहेस. 

सौरभ आता मात्र घाबरला होता. अंकिताचा हा अवतार तो अनेक वर्षांनी बघत होता. 

अंकिता- गेली दहा बारा वर्ष तू मला तर फसवतो आहेसच पण त्या मानसीला पण फसवतो आहेस. माझ्याशी लग्न करूनही नवरा न होता आणि तिचा नवरा होऊनही तिच्याशी लग्न न करता तू आम्हा दोघींना फसवतो आहेस. हो की नाही?

सौरभ- न..नाही अंकिता…हे बघ तुझा काहीतरी…

अन्किता- गैरसमज? तू स्वतःला फार हुशार समजतोस ना? पण आता मी तुला रस्त्यावर आणणार आहे. 

सौरभ- म्हणजे?

अंकिता- म्हणजे उद्या सकाळी bag भरायची आणि ह्या घरातून निघायचं. 

सौरभ- पण हे माझं घर आहे. 

अंकिता- हो? ठीक आहे. मी domestic violence ची केस टाकते तुझ्यावर आणि तुझ्या आईवर. दोघांना उचलून नेतील आणि सरकारी घरात सडवतील. चालेल?    

सौरभ- तू..तू मला धमकी देते आहेस?

अंकिता- अजिबात नाही. मी काय करेन हे तुला स्पष्ट सांगते आहे. निर्णय तुझा आहे. एकतर तू हे घर सोडून जा किंवा पोलीस तुला घेऊन जातील. आणि तू माझी इतकी वर्ष जी फसवणूक केली आहे त्याचा बदला म्हणून मी तुला शेवट पर्यंत पोहोचवेन. त्यासाठी मी बरबाद झाले तरी चालेल. पण तुलाही बरबाद करेन. आणि हो. तू जितका मला विरोध करशील तितकं हे सगळंच जगासमोर येईल आणि आपल्या मुलाचं भविष्य खराब होईल. नवरा म्हणून तू नापास झालाच आहेस. पण मुलगा म्हणून आणि बाप म्हणून जर तुला तुझ्या आई बद्दल आणि मुलाबद्दल काही वाटत असेल तर उद्या सकाळी ह्या घरातून निघायचं. आणि हो. मला डिव्होर्स द्यायचा विचारही मनात आणू नको. एकतर त्याने आपल्या मुलाच्या भवितव्यावर परिणाम होईल, तुझ्या आईला धक्का बसेल आणि मी तुला सुप्रीम कोर्टापर्यंत खेचेन. मी डिव्होर्स देणार नाही. आजवर तू तुला हवं ते केलंस. खोटं बोलून माझ्या नकळत केलंस. ह्यापुढे मी सांगेन तेच करायचं. आणि मी जे करते आहे ते सांगून करते आहे. माझ्या बरोबर माझा मित्र उमेश आहे आणि माझे सगळे कलीगज् आहेत आणि कायदा पण आहे. 

सौरभ- कोण उमेश? तो क्लास मधला?

अंकिता- हो तोच. जो मला समजून घेतो. जो मी जशी आहे तशी मला स्वीकार करतो. माझ्या कठीण प्रसंगात माझ्या बाजूने उभा राहतो आणि सर्वात महत्वाच म्हणजे मला रिस्पेक्ट देतो. त्याच प्रेम आहे माझ्यावर. निरपेक्ष प्रेम.

सौरभ- अच्छा. असं आहे तर. तुझ लफडं आहे क्लास मध्ये टीचर बरोबर म्हणून तू आता अशी वागते आहेस. 

अंकिता- अगदी बरोबर बोललास. लफडंच आहे माझ उमेश बरोबर. पण त्यात खोटी वचनं नाहीयेत, त्यात लापवाछपवी नाहीये, त्यात फसवणूक नाहीये. आमचं जमल्यावर मी लगेच तुला ते सांगते आहे. तुला डिव्होर्स देऊन मी खंर तर माझा मार्ग मोकळा झाला असता. पण त्यमुळे तू मोकळा होशील. मला तुला मोकळा करायचा नाहीये. मला इतकी वर्ष जो त्रास दिलास त्यातून तुला इतक्या सहज सोडायचा नाहीये. माझ्या हर्षदचं लग्न होईपर्यंत तर नाहीच नाही. त्या नंतर मी विचार करेन. आलं माझ्या मनात तर डिव्होर्स देईनही तुला. पण तोवर तुला तडफडत ठेवेन. ना तू माझा राहशील ना त्या मानसीचा होऊ शकशील. आणि मी सगळ हर्षदला देखील सांगितलं आहे. 

सौरभ- काय? हर्षदला हे..हे मान्य आहे?

अंकिता- त्याला हे माहित आहे. मान्य आहे की नाही हे तो सांगेल. आणि मला खात्री आहे. तो माझा मुलगा आहे. मी त्याला वाढवला आहे. तो त्याच्या आईला ओळखतो. तो माझी साथ सोडणार नाही. बाकी तू उद्या निघायचं सकाळी. Bag भरून ठेव. 

सौरभ- पण मी कुठे जाऊ?

अंकिता- आईला घेऊन गावाला जा. किंवा आईला इथे राहू दे. तू तुझ्या लाडक्या मानसीकडे जा राहायला. आणि मानसीकडे गेलास तर आईला काय सांगायचं ते पण सांगून ठेव मला. ह्या वयात त्यांना त्रास नको ना.

सौरभ प्रचंड धक्क्यात होता. अंकिता अत्यंत थंडपणे आणि निग्रहाने त्याच्याकडे बघत होती.ती सावकाश जाऊन बेडवर आडवी झाली. सौरभ टेरेसवर गेला आणि त्याने सिगारेट पेटवली. अंकिताच्या डोळ्यातून अश्रू वाहात होते. तिचा संसार आज संपला होता. तिची उशी अश्रूंनी भिजली होती इतक्यात फोनवर नोटिफिकेशन आलं. तिने फोन पाहिला. हर्षदचा मेसेज होता.

मेसेज- आई मी तुझ्या बरोबर आहे. तुझ्या प्रत्येक निर्णयात. माझी आई कधीच चुकणार नाही.

हा मेसेज वाचून तिच्या मनावर आलेला ताण, uncertainty, थोडीशी guilt हे सगळ एका क्षणात निघून गेलं. तिने आनंदाने डोळे मिटून घेतले. तिला खूप शांत झोप लागली. 

क्रमश:

पुढील भागाची लिंक- मृगजळ सीझन २ भाग ११- घराबाहेर

मागील भागाची लिंक- मृगजळ सीझन २ भाग ९- डिव्होर्स?

पहिल्या सीझनच्या सर्व भागांची लिंक- मृगजळ- सर्व भाग

मृगजळ सीझन २ चे सर्व भाग – मृगजळ- सिझन २- सर्व भाग

हे पण वाचा-

सख्या रे …

ट्वेंटी थ्री

गुंतता हृदय – सर्व भाग

व्हॅलेंटाईन डे- भाग १

रिफ्लेक्शन भाग १

आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा

आमच्या लघुकथा लघुकथा

माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख

आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण

ललित

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!