अमिताभ | mandar jog

अमिताभ बच्चन

आम्ही काही मित्र आमच्या गिरगाव चौपाटीला विल्सन कॉलेजमध्ये शोला और शबनम सिनेमाचं शूटिंग बघायला गेलो होतो. आम्हाला शूटिंग वगैरे बघायची प्रचंड हौस (किडे) होती. शोला और शबनममध्ये गोविंदा आणि दिव्या भारती. गोविंदा तेव्हा सुपरस्टार होता आणि दिव्या भारती ठाशीव दारुगोळा. दारूगोळ्याचं दर्शन नाही झालं. फक्त गोविंदा भेटला. तो मस्त खुर्चीवर बसला होता. आम्ही लोचटासारखे समोर जाऊन हाय-हॅलो केलं. तो पण मूडमध्ये होता. बोलला. नुकताच त्याचा हम रिलीज झाला होता. त्याला आम्ही विचारलं की हममध्ये अमिताभबरोबर काम करायचा अनुभव कसा होता? गोविंदा म्हणाला, “Amitji is mass and culture!” गोविंदाने आम्हा फॅन्सना इम्प्रेस करायला, त्याच्या जेमतेम इंग्रजीत जे सांगायचा प्रयत्न केला, ते मात्र आमच्यापर्यंत तेव्हा पोहोचलं नाही. त्यानंतर आम्ही मरीन ड्राइव्हवर गाडीत जोरात म्युझिक ऐकत, बॅचलरचं आईस्क्रीम खात गोविंदाच्या इंग्रजीला मनमुराद हसलो होतो!

पण पुढे थोडी अक्कल आल्यावर, अमिताभ म्हणजे काय वैश्विक गारुड आहे हे कळायला लागल्यावर, त्यावेळी गोविंदा जे सांगायचा प्रयत्न करत होता ते लक्षात येऊन पटलं देखील. सोप्या मराठीत सांगायचं तर अमिताभ म्हणजे लोकनायक आहे, असं गोविंदा सांगत होता. आणि तो खरं बोलत होता. आज अमिताभच्या समकालीन नट-नट्यांची ओळख कन्येला सांगताना हे अमुकचे बाबा, ही अमुकची आई असं सांगावं लागत असताना आज कन्या “अभिषेक म्हणजे अमिताभचा मुलगा” असं स्वतःच म्हणते. ह्यात अमिताभ लोकनायक का आहे, हे सहज लक्षात येईल. फक्त अमिताभची बायको ह्या कर्तृत्वावर टेचात वावरत, अत्यंत उर्मटपणे वागणाऱ्या रडतोंड्या जयाच्या मठ्ठपणाला झाकोळून टाकणारा अमिताभचा सार्वजनिक जीवनातील अत्यंत विनम्र वावरदेखील त्याच्या लोकनायक असण्याला जबाबदार आहे!

तो आला तेव्हा म्हणे त्याला हँगर वगैरे म्हणून त्याच्या आवाजाची टिंगल करून अनेक निर्मात्यांनी नापास केलं होतं. तिथून सुरू झालेला प्रवास त्याला आज जिथे आहे तिथे नेऊन पोहोचवून पुढे सुरूच आहे. तो लोकनायक व्हायला त्याचा मास हिस्टेरिया बराचसा कारणीभूत आहे, असं मला वाटतं. मला लहानपणीचे गणपती आणि नवरात्रीचे दिवस… खरं तर रात्री आजही आठवतात. प्रत्येक वाडीत स्थानिक कार्यक्रम, वाद्यवृंद, नाटक किंवा मधोमध पडदा लावून दोन्ही बाजूंना बसून बघायचा सिनेमा असे. अभ्यास, शाळा ह्यात फारशी रुची नसणारे आमचे काही मित्र दिवसभर फिरून कुठल्या वाडीत कोणता सिनेमा आहे ह्याची माहिती गोळा करत. ते यादी वाचत असताना मला फक्त डॉन, त्रिशूल, दीवार, नटवरलाल, दो और दो पाँच, अमर अकबर अँथनी, हेराफेरी अशा बच्चनच्या सिनेमांचीच नावे ऐकू यायची. ह्यातील प्रत्येक सिनेमा कमीत कमी सात ते आठ वेळा तेव्हाच पाहून झाला होता. एखादा तर काल रात्रीच पाहिलेला असे. पण अमिताभ बच्चन नामक जादू तेव्हा थिएटर आणि रस्त्यावरचे पिक्चर, दोन्हीकडे तुफान गर्दी खेचायची. फारसं कळत नसलेल्या बालवयातदेखील त्याचा एंग्री यंग मॅन आम्हा लहान पोरांना खूप भावला, तर त्यावेळी असलेल्या अस्थिर सामाजिक परिस्थितीत तरुणांना तो किती आवडला असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी! परिस्थितीशी दोन हात करत नशिबाला आणि परिस्थितीला आपल्या मनगटाच्या बळावर झुकवणारा, रंकाचा राजा होणारा, गुंडांना यथेच्छ बुकलणारा लंबू अंकल तेव्हापासून आमच्या मनावर अधिराज्य करू लागला, तो आजतागायत.

तेव्हा चांगला अभिनय, दिग्दर्शन, संवाद असलं तांत्रिक काहीच कळत नव्हतं. पण बाबांबरोबर थिएटरमध्ये दीवार पाहताना जो आनंद मिळाला होता, तोच आनंद तोच दीवार रस्त्यावर वर्तमानपत्रावर बसून पाहताना मिळाला होता. कारण “मैं फेके हुए पैसे नहीं उठाता” असं इफ्तिखारला लहानपणी सांगणारा बूट पॉलिश करणारा मुलगा आपल्याबरोबर ह्याच गर्दीत हा चित्रपट बघत असेल, असं कुठेतरी वाटत असावं. हास्य जत्रेमध्ये दत्तू मोरे कसा “माझ्याकडे सुप्पर पावर आहे. मी तुला गरगर फीरवून फेकून देईन” असं म्हणतो, तसं त्रिशूल पाहिल्यानंतर मला काही दिवस वाटायचं. म्हणजे आपण शाळेत अँब्युलन्स घेऊन जावं आणि आपलं भांडण असलेल्या मित्रांना बुकलून, त्रिशूलमध्ये बच्चन जसा शेट्टीला अँब्युलन्समध्ये भरतो, तसं त्या पोरांना भरून हॉस्पिटलमध्ये पाठवावं, असं वाटे. पण मग बाबा आणि नाबर सरांचा चेहरा समोर येऊन “विजय”चा क्षणार्धात मंदार होई!

वयाबरोबर समज, ज्ञान वाढत गेलं. सिनेमा आणि खरं आयुष्य ह्यातील फरक लक्षात आला. तरीही थिएटरच्या काळोखात दोन-अडीच तास खऱ्या आयुष्यातील सगळं विसरायला लावून निखळ आनंद देणारे बच्चनचे चित्रपट पाहणं हे व्यसन होतं… आहे! त्याने रंगवलेलं प्रत्येक पात्र आम्हा भक्तांना खरं वाटतं, म्हणूनच तो लोकनायक आहे. अमिताभ पाठमोरा असला तरी त्याचा मूड काय आहे, हे कळू शकतं, इतका त्याचा अभिनय समृद्ध आहे. अर्थात, त्याच्या अभिनय, आवाज, व्यक्तिमत्त्व ह्याबद्दल आम्ही पामरांनी काय बोलावं? आम्ही फक्त त्याचा अभिनय, त्याच्या पात्रांचे मूड्स, त्याच्या आवाजाचे चढ-उतार, चेहऱ्यावरील हलणारी रेषानरेषा ह्यासमोर नतमस्तक व्हावं. नमक हलालमध्ये त्याने घातलेला आचरट गोंधळ, असंख्य सिनेमांत त्याने रंगवलेला इन्स्पेक्टर, अग्निपथमध्ये “दिनकरराव टोपी संभालो. हवा बहुत तेज चलाता है” किंवा “मौत के साथ अपॉइंटमेंट है मेरा” असे मनावर कोरले गेलेले अनेक संवाद म्हणताना त्याच्या चेहऱ्यावरील भाव बघत आणि आठवत राहायचं!

वहीदा रेहमानपासून झीनत, परवीन, रेखा, माधवी, स्मिता पाटील, राखी, हेमा, जयाप्रदा, श्रीदेवी, अमृता सिंग, मीनाक्षी शेषाद्री ते अगदी तब्बू आणि जिया खानपर्यंत त्याची नायिकेशी दिसत असलेली केमिस्ट्री, त्याच्या डोळ्यांतून व्यक्त होणारा रोमांस, त्याच्या आवाजातून जाणवणारं हळुवार प्रेम फक्त अनुभवावं. सिलसिलामध्ये “मैं और मेरी तनहाई…” हा संवाद मृदू आवाजात म्हणत, “ये कहाँ आ गए हम” गात रेखाच्या हृदयात अलगद उतरणं, ग्रेट गॅम्बलरमध्ये व्हेनिसमध्ये झीनत अमानबरोबर नावेत पहुडून “दो लब्जों की है इतनी कहानी”मध्ये हरवून जाणं, तर कधी महानमध्ये नायिकेबरोबर “ये दिल तो आता है एक दिन जवानी में” नामक धुडगूस घालणं असो. ह्यानेच तीन पिढ्यांना रोमांस म्हणजे काय ते शिकवलं!

अनेक समकालीन नायक आजारांनी ग्रस्त होऊन किंवा काम न मिळाल्याने VRS घेऊन दुकान बंद करून बसलेले असताना हा मात्र कसोटीत रेकॉर्ड करून नव्या जमान्यातील नवे दिग्दर्शक, नवे तंत्रज्ञान ह्यांच्या खांद्याला खांदा लावून, वयाला शोभेशी पात्रं रंगवून टी-ट्वेंटीमध्येही शतकं ठोकू लागला. मोहब्बतेंपासून सुरू झालेली नवी इनिंग बागबानमध्ये स्थिरावून अगदी पीकू, पिंक, बदला ते अगदी आता येऊ घातलेल्या अनेक सिनेमांपर्यंत बहरत राहिली आहे. प्रेक्षक, भक्त, निर्माते, दिग्दर्शक सर्वांना आनंद देत आहे!

आमच्या तसेच आमच्या आधीच्या काही पिढ्यांच्या जडणघडणीत अमिताभ नामक महानायकाचा वाटा आहे. आमच्या आयुष्यातील बदलत असलेल्या समकालीन कालखंडाचं, विचारसरणीचं समर्पक चित्र त्या त्या वेळी पडद्यावर अत्यंत ताकदीने उभं करून ह्याने आम्हाला एक आरसा दाखवला आहे. त्याने दोन तासांच्या सेल्युलॉइड अनुभवाने अनेकांचे अनेक ताण, दुःखं विसरायला लावून आयुष्यात आनंद पेरला आहे. म्हणूनच तो लोकांना आपल्यातला वाटणारा लोकनायक आहे!

हल्ली सिनेमाच्या शूटिंगला वगैरे जाणं होत नाही. पण गोविंदा परत कधी एअरपोर्टवर किंवा तत्सम ठिकाणी दिसला, तर मी मुद्दाम त्याला भेटून सांगेन की त्या दिवशी तो जे म्हणाला ते आम्हाला पटलं आहे. Amitabh is indeed mass and culture! या अशा “मास अँड कल्चर” महानायक अमिताभला वाढदिवसाच्या लाखो शुभेच्छा! असेच सिनेमे करत राहा. आम्हाला आनंद देत राहा! कारण आमच्या नातीनेदेखील “ती हिरोईन आराध्या म्हणजे अमिताभची नात” असं म्हटलेलं आम्हाला ऐकायचं आहे!

© मंदार जोग

हे पण वाचा

रेखा रेखा

अक्षय कुमार अक्षय कुमार

आशा भोसले आशा भोसले  

गुलजार गुलजार

काजोल काजोल…

सचिन सचिन पिळगावकर- वो तो है अलबेला

अभिमान अभिमान…

मनमोहन देसाई लॉजिक आणि मॅजिक

झीनत अमान – लैला मैं लैला अर्थात झिनिबेबी…

सिनेमा विषयी सगळे लेख- फिल्लमबाजी

लघुकथा विभाग – लघुकथा

दीर्घकथा विभाग – दीर्घ कथा

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

One thought on “अमिताभ बच्चन”
  1. सहा फुटाच्या अमिताभ बच्चन आणि त्यापेक्षा कितीतरी प्रचंड अभिनयाची उंची असलेल्या या महानायकास शब्दबद्ध करणे इतके सोपे नाही, पण मंदारजी आपण शब्देचनेची खूप छान मेजवानी देऊन थोडा अमिताभ समजावून दिलात.
    सात हिंदुस्तानी पासून सुरू झालेला अमिताभ बच्चन यांचा प्रवास अगदी अलीकडील कल्की मधील अस्वस्थामा पर्यंत सुरू आहे…आणि अस्वस्थामा प्रमाणे तो कायमच प्रेक्षकांच्या मनात जिवंत राहील.
    अभिनयाच्या या पाठशाळेस वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!