वर्षातून एखादं दोन वेळा अपरिहार्यपणे घडणारा लाल डब्याचा एसटी प्रवास मला एक रियालिटी चेक म्हणून आवडतो. तो केल्यावर लाल डबा म्हणून हिणवल्या जाणाऱ्या एसटी बसला लाल परी का म्हणतात ह्याची जाणीव होते. इतर वेळी विमान किंवा गाडीने लांबीचा प्रवास करणाऱ्या माझा आणि एसटी चा संबंध खरं तर मुंबई पुणे शिवनेरी इतकाच सीमित आहे. पण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे साध्या बस मधून काही अपरिहार्य प्रवास होतात आणि मी ते प्रचंड एन्जॉय करतो.
स्थानकात लागलेल्या एसटीची घोषणा झाली की आपापलं समान घेऊन लोक चढू लागतात. जागा पकडून बसू लागतात. ड्रायव्हर गाडी सुरु करतो आणि मी मनातल्या मनात गणपती बाप्पा मोरया म्हणतो. माझ्या शेजारी बहुतांश वेळा एखाद्या गावरान मावशी किंवा काका बसतात. मला तेच हवं असतं. त्यांच्याशी गप्पा मस्त होतात. त्यांचं आयुष्यच साधं, सोपं आणि सरळ तत्वज्ञान ऐकायला मजा येते. आपण आयुष्य किती कॉम्प्लिकेट करून ठेवलं आहे ह्याची जाणीव होऊन स्वतःवरच हसू येतं.
कंडक्टर एक एक करत तिकीट कापत येतो. सुट्टे नसले तरी न रागावता तिकिटावर किती मोड परत द्यायची आहे हे नोंदवून नंतर सुटे पैसे परत करतो. तोवर ती प्रॉमिसरी नोट आपण जपायची! शेजारचे काका सिनियर सिटीझन कन्सेशन पास असल्याने त्यांना “तुमचं एक हाफ ना?” असं वाहकाने विचारल्यावर “व्हय” असं उत्तर देऊन गुंडाळी केलेल्या नोटांमधून नेमके पैसे काढून देणारे ते हाफ तिकीट काका किंवा मावशी मला अचंबित करतात.
शिवनेरी मुंबई ते पुणे थेट जाते. पण लाल परी हायवे सोडून प्रत्येक गावातील थांबे घ्यायला खडबडीत रस्त्यांवर धूळ उडवत आत जाते. थांब्यावर दोघे तिघे बराच वेळ वाट बघत असतात. माझ्या दृष्टीने ते डायव्हर्जन वेस्ट ऑफ टाईम असलं तरी त्यांच्या दृष्टीने ती एसटी अत्यंत महत्वाची असते. लोक मोठमोठ्या ट्रँका, बोचकी, दोरीने बांधलेल्या बॅग घेऊन चढतात. कंडक्टर स्थानकात हजेरी लावून येईपर्यंत चिक्की, तळकट, उसाचा रस, पाणी, पेरू विकणारे गाडीत येउन जातात. कदाचित त्यांच्यात देखील गाड्यांची वाटणी वगैरे असावी हे त्यांच्यात क्वचित होणाऱ्या हमरी तुमरी वरून लक्षात येतं.
समस्त खिडक्या वाजणारी, सीट्स वर धुळीचे राप असलेली, आतला रंग उडालेली लाल गाडी गावं घेत घेत पुढे सरकत असते आणि मी त्या विश्वात एकरूप होत असतो. ती रापलेल्या रंगांची, मळकट आणि धुवट कपडे घातलेली लोकं हळू हळू त्यांचं स्वच्छ मन दाखवू लागतात.
बायका हातात चुडा, नाक आणि कान टोचून त्यात ढीगभर दागिने घातलेल्या, हातावर दादल्याच नाव किंवा देवीचं चित्र गोंदवलेल्या तर पुरुष एकेकाळी पांढरा धोप असेल असा सदरा, त्याखाली ढगळ लेंगा किंवा धोतर नेसणारे आणि अनेकजण डोक्यावर घट्ट पांढरी गांधीटोपी घालणारे. मला नेहमी आश्चर्य वाटतं की बस जोरात जाऊ लागल्यावर खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याने माझा चष्मा हलतो पण ह्यांची टोपी तसूभर हलेल तर बिशाद. जणू ती डोक्याला चिकटवली आहे अशी स्थिर असते!
काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी चढतात स्टुडंट पासवाले. जवळच्या खेड्यातून तालुक्याच्या गावी कॉलेजला जाणारे. आधुनिक कपडे आणि मोबाईल वापरणारे. रोजचा प्रवास असल्याने त्यांना ड्रायव्हर आणि कंडक्टर ओळखत असतात. आस्थेने त्यांची चौकशी होते. शिवनेरी मध्ये जरा पांढरपेशा उच्चभ्रू अलिप्तपणा जाणवतो. प्रत्येकजण आपल्या विश्वात असतो. शेजाऱ्याशी जास्तीतजास्त “एसी इज नॉट कुलिंग ईनफ ईट सीम्स” किंवा “होप देअर इज नो लँड स्लाईड अँड ट्राफिक कंजेशन इन द घाट” असा जुजबी संवाद होतो. पण इथे लोक जनरल गप्पा मारत असतात. लहान मुलं घेऊन जाणाऱ्या बाईला बस मधल्या इतर बायका मदत करतात आणि टिप्स सुद्धा देतात. एखादे काका कॉलेज तरुणांना “आत सर की जरा” म्हणत थर्ड सीट पटकावतात आणि मुलं देखील ती आनंदाने देतात.
मी शेजारच्या काकांशी एक स्माईल एक्स्चेंज करतो. ते आपसूक कुठे जाणार वगैरे चौकशी करतात. इतर वेळी अनोळखी लोकांपासून अंतर राखून असणारा मी त्या काका किंवा मावशी बरोबर मस्त गप्पा हाणतो. मला त्यांच्या कळकट अवतारामागे असलेला स्वच्छ मनाचा माणुस दिसत असतो. उन्हाने रापलेला चेहरा. मळाने भरलेली नखं, काथाने रंगेलेले दात आणि झाडाची वर्तुळ जसं झाडाच वय सांगतात तश्या काकांच्या डोळ्याच्या बाजूला, भवताली आणि गालावर उमटलेल्या सुरकुत्या मी मोजत असतो. त्या पलीकडे असतात खोल, अनुभवी, मला एक्सरे सारखे आतबाहेर जोखणारे पण अपार मायेने आणि खरेपणाने ओथंबलेले, क्वचित भाबडे वाटणारे, पाण्याचा पापुद्रा साचलेले डोळे. ते खूप काही सांगून जातात. काकांच्या कपाळावर गंध. मावशी असतील तर कपाळावर गोंदवलेलं हिरवं कुंकू आणि त्यावर लावलेलं लाल कुंकू. गळ्यात डोरलं. काकांच्या गळ्यात तुळशीची माळ.
ते हाफ तिकीट सिनियर सिटीझन असले, चेहऱ्यावर असलेल्या रेषा सत्तरी उलटल्याचे संकेत देत असल्या तरी त्यांचा उत्साह अजब असतो. मस्त तंबाखू मळत ते गप्पा मारू लागतात. घरी कोण आहे, शेती किती आहे अशी वैयक्तिक माहिती माझ्यासारख्या अनोळखी माणसाला ते बिनधास्त देत असतात. आम्हाला राजकारण मोदी, पवार, ठाकरे हे विषय देखील वर्ज्य नसतात. त्यावर त्यांची मतं आणि त्यामागे असलेलं लॉजिक ऐकून खरा मतदार काय म्हणतो ह्याची कल्पना येते. इतकी आपुलकी आणि त्यांच्या डोळ्यातील सच्चाई पाहून मी देखील एखाद्या स्थानकात लॅपटॉपची बॅग त्यांच्या हवाली करून बिनधास्त वॉश रूमला जाऊन येतो. कधी ते काका किंवा मावशी त्यांच्याकडे असलेल्या जुन्या नोकिया फोनची बॅटरी संपली किंवा बॅलन्स संपला असेल तर बिनधास्त माझ्या मोबाईल वरून त्यांना स्टॅण्डवर घ्यायला येणाऱ्या मुलाला, भाच्याला फोन लावतात. माझ्या फोनवर त्यांचे “कुठवर पोहोचला?” विचारणारे फोन येतात.
एकूणच लाल परीने प्रवास करणारे लोक हाडामासाची, मोकळी ढाकळी, कोणतीही ईनेबिशन किंवा बडेजाव नसणारी मस्त माणसं असतात. त्यांच्या लहानश्या जगात आनंदी असलेली, कोठेही काही प्रुव्ह करण्याचा प्रयत्न न करणारी, आपले मोठेपण वगैरे दाखवून देण्याचा कोणताही प्रयत्न न करणारी, सोफीस्टिकेशन नामक अफूची नशा न चढलेली मातीतली माणसं!
मुंबईत ते देखील सोबो मध्ये जन्माला येऊन, बहुतांश मुखवटे पांघरून वावरणाऱ्या, चतुर, हुशार, चांगल्या अर्थाने ओपोर्च्युनिस्ट असलेल्या, सोफीस्टिकेशन नामक गांजा रोज ओढणाऱ्या, कट थ्रोट स्पर्धेत विश्वासार्हता गमावलेल्या समाजात वावरणाऱ्या मला हा लाल परीचा आणि त्यातल्या जमिनीवरच्या लोकांचा अनुभव प्रचंड रिफ्रेशिंग वाटून निखळ आनंद देतो. रोज पिझा आणि बर्गर खायला चटावलेल्या जिभेला कधीतरी झुणका भाकर आणि ठेचा खाल्यावर अस्सल चवीचा जो अवर्णनीय आनंद मिळतो तोच मला ह्या अस्सल लोकांमध्ये राहून मिळतो. मग कित्येक दिवस ही चव मनात रेंगाळत राहते. एक रियालिटी चेक होतो ज्यात मी रहात असलेल्या इंडियाच्या बाहेर असलेल्या खऱ्या भारताची ओळख होते आणि माणुसकी, सच्चाई, साधेपणा, संवेदनशीलता अजूनही मोठ्या प्रमाणात जिवंत आहे ह्याची जाणीव होते आणि मी ती शाश्वत जाणीव मनाशी जपून मी त्या भारतातून माझ्या इंडियाकडे परत जातो.- © मंदार जोग
हे पण वाचा-
संमिलन- संमिलन
चांदणी- चांदणी
गिल्ट – गिल्ट…
गुंतता हृदय – गुंतता हृदय…(भाग 1)

[…] पण वाचा- लाल परीतला भारत… मृगजळ- सर्व […]