चांद मातला | Mandar Jog

चांद मातला – भाग २

मीराला एक एक क्षण कैक वर्षांसारखा वाटत होता… वाऱ्याच्या वेगासोबत धावणारी रिक्षाही तिला संथ वाटत होती, कारण तिचं मन भरधाव वेगाने रोहनला भेटण्याच्या उत्कंठेमागे धावत होतं. जसा जसा तो क्षण जवळ येत होता, तिच्या काळजाची धडधड वाढत होती…

उतरण्याआधी स्वतःलाच एकदा रिक्षाच्या आरशात न्याहाळत तिने केसांच्या बटा सावरल्या. उजवीकडे आणि मग डावीकडे मान वळवून स्वतःचा चेहरा आणि ‘तरतरीत’ नाक बघून रोहनचा मेसेज आठवत मनातल्या मनात लाजली.

रिक्षा वडेश्वरसमोर थांबली… ती उतरली. रिक्षावाल्याला पैसे देऊन इकडे-तिकडे बघून रोहनला शोधू लागली. तिची नजर भिरभिर फिरू लागली, पण रोहन तिच्या नजरेस पडत नव्हता. क्षणभर विचार केला, आपण तर भेटण्याआधी काही ठरवलंच नाही की कुठल्या टेबलवर बसणार किंवा कुठे भेटणार… एकमेकांचा फोन नंबरही नाही.

तिने तडक बॅगमधून फोन काढून चेक केलं, रोहनचा काही मेसेज आहे का, पण मेसेज नव्हता. पाच मिनिटं वाट बघून शेवटी तिनेच त्याला मेसेज केला.

“Hi, कुठे आहेस? मी पोहोचले. किती वेळ लागेल अजून?”

पण समोरून काहीच रिप्लाय आला नाही. ती अगदी चातकासारखी डोळ्यात प्राण आणून त्याची वाट बघत होती.

हळूहळू तिचा मूड खराब होत होता. तिला मनातून रोहनचा प्रचंड राग येत होता. अशी भररस्त्यात तिला त्याची वाट बघावी लागत होती. ती मनात म्हणत होती, “नाही आला तर नाही आला, मला कुठे फरक पडतोय!”

ती स्वतःला समजावत होती, पण तरी कुठेतरी तिला आस होती की तो येईल, किंबहुना त्याने यावेच.

तिने ठरवलं… बस, आणखी पाच मिनिटं वाट बघायची. नाही आला तर सरळ निघून जायचं आणि पुन्हा कधीही रोहनशी बोलायचं नाही, काहीही संपर्क ठेवायचा नाही, ब्लॉक करून टाकायचं त्याला… तिच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं.

ती स्वतःतच हरवलेली होती. तितक्यात तिच्या खांद्यावर कुणीतरी मागून हात ठेवल्याचं तिला जाणवलं. तशी ती भानावर आली.

तिची कळी खुलली… अगदी आनंदाने तिने मागे वळून बघितलं, तर समोर डॉक्टर आनंदी आपटे.

आनंदीने आश्चर्याने विचारलं, “अरे, Hi मीरा, तू इथे कशी? आणि तीही एकटीच? कधीपासून बघतेय तुला. कुणाची वाट बघतेय का?”

डॉक्टरला बघून मीरा चपापली. तिला दरदरून घाम फुटला होता. अगदी चोराची चोरी पकडली जावी तशी तिची अवस्था झाली होती.

आनंदीच पुढे बोलली, “अगं, बोल ना… तू एकटी थांबलीस ना, म्हणून विचारतेय गं. मी इथे एका मैत्रिणीसोबत आले होते. आता निघतोच आहोत आम्ही. पण तू कुणाची वाट बघत असशील, तर ते येईपर्यंत मी थांबते तुझ्यासोबत, तू म्हणत असशील तर…”

मीरा: (स्वतःला सावरत) “नाही गं, तू जा. माझी गावाकडची एक मैत्रीण भेटणार आहे. ती नवीन आहे ना इथे, म्हणून जरा वेळ लागला. ती येतेच आहे… पोहोचेलच आता. तू निघ. तुझा वेळ नको घालवूस. मी थांबेन, काही प्रॉब्लेम नाही.”

आनंदी: “Are you sure?”

मीरा: “हो हो…”

आनंदी: “Bye then, take care.”

मीरा: “Bye.”

आनंदी आणि तिची मैत्रीण तिथून गेल्यावर मीराचा जीव भांड्यात पडला. तिने सुटकेचा निःश्वास टाकला. ती आता घाईने तिथून निघण्यासाठी रिक्षा शोधू लागली. असं अचानक जर मोहितने आपल्याला बघितलं तर? हे सगळं जर मोहितला समजलं तर काय होईल? आपण हे चुकीचं वागतोय याची जाणीव तिला झाली… तिने तडक तिथून निघण्याचा निर्णय घेतला.

तेवढ्यात एक रिक्षा तिच्यासमोर येऊन उभी राहिली आणि त्यातून एक राजबिंडा पुरुष उतरला. त्याने पैसे देऊन मागे वळून पाहिलं आणि मीराची नजर त्याच्यावर पडली.

उंच बांधा, गव्हाळा वर्ण, पण चेहरा अगदी आकर्षक. चेहऱ्याला शोभेल असा फर्स्ट-क्लास हेअरकट, ब्लू डेनिम, त्याच्या जिम-फिट बॉडीला साजेसा ब्लॅक टी-शर्ट, हातात महागडं घड्याळ, डोळ्यावर गॉगल… अगदीच स्वप्नातला राजकुमार असावा असा दिसत होता.

रोहन… सॉरी, सॉरी म्हणत डोळ्यावरचा गॉगल काढत, हातातलं सुंदर गुलाबाचं फूल तिला देत तिच्याशी बोलू लागला. रस्त्यात एक अपघात झाल्यामुळे ट्रॅफिक जाम होतं, म्हणून त्याला उशीर झाला होता. हे तो अगदी अपराधी भावनेने तिला सांगत होता.

पण त्याचं ते राजबिंडं रूप न्याहाळत असलेल्या मीराला काहीच ऐकू येत नव्हतं. फोटोत दिसतो त्यापेक्षाही जास्त हँडसम होता तो. दोन मिनिटांपूर्वी रोहनशी सगळे संबंध तोडण्याचा विचार तिच्या मनाने कुठल्याकुठे लाथाळून दिला होता. तिला वाटणारी भीती पळून गेली होती.

तो, “मीरा… मीरा… really sorry यार,” म्हणत होता. तशी ती शुद्धीवर आली आणि त्याच्या हातातलं फूल घेऊन हळूच लटका राग दाखवत म्हणाली, “It’s okay…”

दोघे कॅफेमध्ये गेले. त्याने तिच्यासाठी खुर्ची ओढली, तिला बसवून मग तो बसला. तिच्यासाठी मोहितने कधीच असं काही केलं नव्हतं, त्यामुळे तिला अगदी स्वप्नात असल्यासारखं फीलिंग येत होतं.

रोहन: “काय घेणार?”

मीरा: “काहीही चालेल, घे तुझ्या आवडीने काहीही.”

रोहन: “नाही, सांग ना तू… आज पहिल्यांदा भेटतोय आणि मी उशीरही केला. So, आज तुझ्या आवडीचं. नाहीतर मला वाटेल तू अजून रागावली आहेस माझ्यावर.”

मीरा: (हसून) “बरं, ठीक आहे…”

“दोन नेसकॅफे,” (वेटरला)

वेटर ऑर्डर घेऊन गेल्यावर शांतता…

दोघेही एकमेकांकडे बघत होते. मीरा पूर्णपणे त्याच्या नजरेत हरवत होती. तोही तिला न्याहाळत होता. तिचे वाऱ्यावर भुरभुरणारे केस, मधेच केसांची लट सावरत कानामागे नेणारी ती, तिचा गोरा रंग, बोलके डोळे, तरतरीत नाक, सुंदर ओठ, गुलाबी रंगाच्या टॉपमध्ये उठून दिसणारं तिचं सौंदर्य… जणू तो त्याच्या डोळ्यांच्या कॅमेऱ्यात कैद करत होता. तीही लाजून पाणी पाणी होत होती. शब्दांची जागा नजरेच्या भाषेने घेतली होती.

तितक्यात त्याने हळूच तिच्या हातावर त्याचा हात सरकवला. त्याचा स्पर्श होताच तिचं अंगांग शहारलं. त्याने हळुवार त्याचा हात तिच्या हातावर फिरवला आणि हात हळूच दाबत, डोळे बारीक करत, एक हात कानात लावून अगदी हळूच “sorry” म्हणाला.

बस्स! मीरा पूर्णपणे पिघळली. तिनेही त्याच्या हातांच्या बोटांत तिच्या बोटांची गुंफण केली आणि हळूच म्हणाली, “It’s okay…”

दोघांनी कॉफी घेतली. बऱ्याच गप्पा केल्या. तिच्याबद्दल रोहनला बरीच माहिती आधीपासून होती, पण तो फोटोग्राफर आहे याव्यतिरिक्त मीराला त्याच्याबद्दल जास्त काही माहित नव्हतं.

रोहनने शिक्षणासोबतच प्रोफेशनल फोटोग्राफीचं प्रशिक्षणही विदेशात घेतलं होतं. नुकतंच शिक्षण पूर्ण करून तो मायदेशी परतला होता. तो वयाने तिच्यापेक्षा दोन वर्षे लहान होता.

पण तिला त्या गोष्टीचा काहीही फरक पडत नव्हता.

इतर काही बोलणं होण्याआधीच रोहन तिला म्हणाला,

“तू खूप सुंदर आहेस… तुझ्याकडे बघून कुणाला वाटणार नाही की तू एका मुलाची आई आहेस. मी फोटोग्राफरच्या नजरेतून तुला सांगतोय, थोडी grooming आणि training ची गरज आहे… you can be a professional model…”

मीरा: “काहीही बोलतोस हा तू… इतकी काही सुंदर नाही मी.” (मनातून खूप खुश, पण उगीचच चेहऱ्यावर खोटा आव आणत)

“आणि मी काही professional shoot वगैरे नाही करू शकत रे.”

रोहन: “अगं, पण तू खरंच खूप सुंदर आहेस… माझ्या नजरेतून स्वतःला बघ. मला विशेष वाटतं, तुला आतापर्यंत हे कुणीच कसं सांगितलं नाही. (नजर तिच्या शरीरावर नको तिथे फिरवत) Modelling चं राहू दे, पण माझ्यासाठी करशील एक photoshoot? मी स्वतः तुझे फोटो काढेन… माझ्या कॅमेरामध्ये… मला हे सौंदर्य माझ्या कॅमेरात कैद करायचं आहे… Please?”

मीरा: (काहीशी लाजत) “ठीक आहे, पण हे आपल्यापुरतंच मर्यादित असावं. मलाही आवडेल स्वतःसाठी जगायला, स्वतःचं सौंदर्य तुझ्या नजरेतून बघायला. तू खरंच छान फोटो काढतोस… मला आवडेल.”

थोडावेळ गप्पा मारून निघण्याआधी त्यांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले. फोटोशूटसाठी सगळी तयारी करून रोहन तिला कळवणार, हे ठरवून इच्छा नसतानाही दोघांनी एकमेकांना निरोप घेतला आणि ते आपापल्या वाटेने निघाले.

रिक्षा घराच्या दिशेने धावत होती, पण मीराचं मन अजूनही रोहनच्या मागे धावत होतं. त्याच्या स्पर्शाची आठवण येऊन ती पुन्हा पुन्हा शहारत होती… तिला त्या स्पर्शाची पुन्हा एकदा ओढ लागली होती.

भलं-बुरं, चांगलं-वाईट, चूक-बरोबर… सगळ्याचा तिला विसर पडला होता. प्रेम की आकर्षण, याचा विचारही करायला तिचं मन मानत नव्हतं. रोहनच्या तोंडून तिच्या सौंदर्यासाठी निघालेले कौतुकाचे शब्द तिला भुरळ पाडत होते.

ही भुरळ तिला कुठे घेऊन जाणार होती, तिलाच ठाऊक नव्हतं; पण त्यात भान हरपून ती स्वतःला हरवायला तयार होती…

क्रमशः

लेखिका- सुवर्णा राहुल बागुल

पुढील भागाची लिंक- चांद मातला भाग ३

मागील भागाची लिंक- चांद मातला – भाग १

हे पण वाचा-

सख्या रे …

ट्वेंटी थ्री

गुंतता हृदय – सर्व भाग

मृगजळ- सर्व भाग

व्हॅलेंटाईन डे- भाग १

रिफ्लेक्शन भाग १

आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा

आमच्या लघुकथा लघुकथा

माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख

आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण

ललित

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

One thought on “चांद मातला – भाग २”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!