चांद मातला | Mandar Jog

चांद मातला – भाग १

“हा फोटो छान आहे. फक्त पुढच्या वेळी मान थोडी तिरकी ठेवा लेफ्ट साईडला, म्हणजे नाक आणखी शार्प दिसेल आणि हो, सेल्फी रिव्हर्स करून मग पोस्ट करावा. मी व्यावसायिक फोटोग्राफर आहे म्हणून साजेस्ट केलं. तुम्ही फोटोजेनिक आहात असं वाटलं म्हणून. राग मानू नका.”

मीरा आरशात बघत मान डाव्या बाजूला विविध अँगलमध्ये वाकवत सेल्फी काढत असताना तिला काल रात्री फेसबुक मेसेंजरमध्ये आलेला तो मेसेज परत परत आठवत होता!

मीरा मोहित वेदक. मोहितची बायको, मानस वेदकची आई इतकीच तिची ओळख होती सध्या. म्हणजे पुण्यात शेजारीपाजारी तिला मोहितची बायको म्हणून ओळखत आणि मानसची नर्सरी टीचर तसेच त्याची बालरोगतज्ज्ञ तिला मानसची आई म्हणून ओळखत. पुण्यात तिची स्वतःची अशी काहीच ओळख नव्हती. फर्स्ट क्लासने ग्रॅज्युएशन पूर्ण केलेली मीरा मूळ धुळ्याची. माहेरची सायली पोवळे. वडील दागिने घडवणारे सोनार. एक मोठा भाऊ. आता लग्न झालेला. आई धुळ्याच्या शाळेत शिक्षिका. तिथेच हिचं आणि संतोष म्हणजे हिच्या भावाचं शिक्षण झालं. भाऊ डिप्लोमा इंजिनियर होऊन तिथेच एका कंपनीत नोकरीला लागला. बावीसाव्या वर्षी वडिलांनी हिचं त्यांच्याच ज्ञातीमधल्या पुण्यात सेटल झालेल्या मोहित वेदकशी लग्न लावून दिलं. सायलीची मीरा होऊन तिची पुण्याला रवानगी झाली!

सुरुवातीला तिला पुण्यात फार भीती वाटत असे. इतकी गर्दी, गाड्या, वस्ती ह्यांची तिला सवय नव्हती. सिंहगड रोडवर एका इमारतीत त्यांचा वन बीएचके फ्लॅट होता. मोहितचा सेल्सचा जॉब. त्याला घरी यायला उशीर व्हायचा. नवीन संसार होता. दोघेही लग्नानंतर भाड्याच्या नवीन घरात शिफ्ट झाले होते. मोहितचे आईवडील पिंपरीला होते. घरात फक्त दिवा, पंखा, एक डबल बेड आणि दोन गोदरेज कपाट इतकंच फर्निचर आणि गॅस तसेच पाणी ह्या सोयी होत्या. लग्नानंतर सर्वात जास्त वापर बेडचा होत असल्याने बाकी असलेल्या सोयींची गरज किंवा नसलेल्या सुविधांची उणीव भासायला सहा महिने जावे लागले. ते गेले तेव्हा मीराला तीन महिने गेले होते आणि मोहित कामानिमित्त मुंबईला गेला होता. मीरा घरात एकटीच. कंटाळत असे. कोणी मैत्रिणी नाहीत, ओळखीचे नाहीत. घरात साधा टीव्ही देखील नाही!

मग आईला, धुळ्यातल्या मैत्रिणींना फोन करून त्यांच्याशी गप्पा मारायची ती. आता आई झालेल्या काही मैत्रिणींकडून मातृत्वाच्या टिप्स घ्यायची. रात्री उशिरा मोहित फोन करायचा. त्याच्याशी बोलल्यावर तिला हायसं वाटायचं. ती लवकर परत ये असा घोषा लावायची! सकाळी एकदाच स्वयंपाक करायची. तोच ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर होता तिचा. आणि हो, तिच्या gynecologist डॉक्टर आनंदी आपटेशी तिची ओळख आणि मैत्री झाली होती. म्हणजे तिला आनंदीमध्ये मैत्रीण दिसायची. आनंदीचं प्रसन्न व्यक्तिमत्त्व, दिलासा देणारे शब्द, खळखळून हसणं, आधुनिक विचार आणि राहणी मीराला आवडली होती. कधीही फोन जरी केला तरी आनंदी तो घेत असे. लगेच सल्ला देत असे. मोहित पंधरा-वीस दिवसांनी परत येई. चार दिवस किंवा फार तर आठवडाभर घरी असे आणि परत दौऱ्यावर. त्याला आता संपूर्ण राज्याची जबाबदारी दिली होती. फिरती अनिवार्य होती. त्या दोघांनी सध्या तरी हेच रुटीन स्वीकारलं होतं!

असाच मोहित एकदा दौऱ्यावर होता. मीराला प्रचंड कंटाळा आला होता. बाहेर मळभ आणि घाणेरडा पाऊस होता. मीराच्या मनातदेखील मळभ दाटून आलं होतं. मोहित फोन घेत नव्हता. मीराने आनंदीला फोन लावला. आता मीरा सात महिन्यांची प्रेग्नंट होती.

मीरा- डॉक्टर, दोन मिनिटं आहेत ना?

आनंदी- हो. बोल ना. काय होतंय?

मीरा- नाही, होत काही नाहीये. बरी आहे मी. पण डॉक्टर, खूप एकटं वाटतंय हो. मोहित फोन घेत नाहीये. बिझी असेल. खूप उदास वाटतंय म्हणून तुम्हाला फोन लावला. सॉरी. मी ठेवते.

आनंदी- अगं, सॉरी काय त्यात. इट्स ओके. जरा टीव्ही बघ. बरं वाटेल.

मीरा- नाही. आम्ही दिवाळीत टीव्ही घेणार आहोत.

आनंदी- ओह, ओके. मग सोशल मीडिया बघ. युट्युबवर प्रेग्नन्सीबद्दल व्हिडीओ आहेत ते बघ. माझं फेसबुक पेज वाच. तिथे बरीच माहिती आहे. युट्युब आणि फेसबुक माहीत आहेत ना?

मीरा- हो, डॉक्टर. म्हणजे फेसबुकचं अकाउंट धुळ्याच्या एका मैत्रिणीने काढून दिलं होतं. पण वापरलं नाही मी कधीच.

आनंदी- मग आता वापर. वेळ मस्त जाईल. ठेऊ आता?

मीरा- ओके. थँक्स.

मीराने फोन कट केला आणि काही वर्षांपूर्वी आलेलं फेसबुक रजिस्ट्रेशनचं मेल पाहिलं. मग फेसबुक वेबसाईटवर ब्राऊजरमधून जाऊन लॉगिन केलं. पण काहीच दिसत नव्हतं. मग बसल्या बसल्या शिकत तिने आनंदी आपटे सर्च केल्यावर शेकडो आनंदी आपटे समोर आल्या. मग त्यातून तिची डॉक्टर तिने शोधली. तिच्या पेजवर माहिती वाचण्यात वेळ कसा गेला हे मीराच्या लक्षातच नाही आलं. त्यानंतर मात्र तिने अनेक जुन्या मैत्रिणी शोधून त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या. तिला मोहित पण सापडला तिथे. तिची रिक्वेस्ट पाहून मोहित चकित झाला. मग त्यानंतर घरी आल्यावर मोहितने तिला ॲप डाउनलोड करून दिलं. तो सदस्य असलेल्या काही समूहात तिला ॲड केली.

त्यानंतर मीरा इतकी प्रो झाली की मानसच्या जन्मानंतर हॉस्पिटलमध्ये दोघांचा सेल्फी काढून तिने “राजपुत्राचे आगमन” असे कॅप्शन देऊन पोस्ट केला. त्याला तिच्या काहीशेच लोकांच्या फ्रेंडलिस्टमधून काहीशे लाईक आणि अभिनंदनाच्या कॉमेंट मिळाल्या. आज तीन वर्षांचा मानस नर्सरीत जात होता. घरात टीव्ही होता. मोहितचे दौरे आता तीन महिन्यांतून चार दिवस इतके कमी झाले होते. मीरा पुण्यात बऱ्यापैकी सेटल झाली होती. पण तिला स्वतःची ओळख अजूनही नव्हती. बाकी सोडा. आनंदीदेखील तिला मानसची ममा म्हणू लागली होती!

पण काल रात्री आलेल्या त्या मेसेजने का कोणास ठाऊक, पण मीरा मनातून खुश झाली होती. तिची, तिच्या फोटोची, तिच्या रूपाची कोणीतरी दखल घेतल्याचा आनंद तिला झाला होता. म्हणूनच आज मोहित ऑफिसला गेल्यावर आणि मानसला शाळेत सोडल्यावर मीरा ठेवणीतला घट्ट स्लीव्हलेस टॉप घालून आरशात बघत त्या मेसेजमध्ये सुचवल्यानुसार अँगल धरून सेल्फी काढत होती. तिने दोन-तीन सेल्फी काढले. त्यात तिच्या नाकाबरोबरच इतर गोष्टीदेखील बघणाऱ्याच्या नजरेत भरतील ह्याची काळजी घेतली. खुश होत तिने ते फोटो फेसबुकवर पोस्ट केले. मुळात तिच्या फ्रेंड लिस्टमध्ये मैत्रिणी आणि नातेवाईक होते. सर्वांच्या कॉमेंट्स आल्या. त्यात “Wow, सुंदर, बारीक झालीस का?, काय दिसते आहेस, (मोहितला टॅग करून) आज मोहित खल्लास होणार” अशा कॉमेंट्स होत्या. पण तिला त्याने फार फरक पडला नाही. ती वाट बघत होती रोहन बी.च्या कॉमेंट किंवा मेसेजची. तोच फोटोग्राफर ज्याने काल मेसेज पाठवला होता. तिने रोहनचं प्रोफाईल कालच बघून घेतलं होतं. त्याने क्लिक केलेले खूप मस्त मस्त फोटो त्याने पोस्ट केले होते. तो स्वतः दिसायला प्रचंड आकर्षक आणि देखणा होता. मीरा त्याच्या प्रतिसादाची दिवसभर वाट बघत होती. शेवटी रात्री मोहितने तिला मिठीत घेतली तेव्हा तिने “नाही दिला रीस्पॉन्स तर नाही. मला गरज नाहीये. माझ्या मोहितला आवडले आहेत फोटो” असं मनातल्या मनात म्हणत ती मोहितच्या मिठीत हरवली. त्यानंतर दोघे प्रेमात बुडालेले असतानाच तिचा मेसेंजर वाजला. अचानक तिला डोळ्यासमोर रोहन दिसू लागला, त्याने काय मेसेज पाठवला असेल ह्याची उत्सुकता वाटू लागली. तिचं अचानक withdraw होणं जाणवून मोहित म्हणाला-

मोहित- काय ग, काय झालं?

मीरा- काही नाही रे.

मोहित- मग अशी अचानक थंड का झालीस?

मीरा- काही नाही. आज दिवसभर काम करत होते ना. त्याचा थकवा असेल.

मोहित बाजूला होऊन झोपून गेला. मीरा मोबाईल घेऊन किचनमध्ये गेली. तिने मेसेंजर उघडला. त्यात रोहनचा मेसेज होता, ज्यात फक्त दहा बदाम होते आणि मेसेज होता, “हे सौंदर्य माझ्या कॅमेरामध्ये लॉक करता आलं तर मी स्वतःला नशीबवान समजेन. उद्या अकरा वाजता वडेश्वरला भेटता येईल का? डिटेलमध्ये बोलू!”

मीरा तो मेसेज आणि कौतुक वाचून खुश झाली. आता वडेश्वरला जायचं की नाही, ह्या विचाराचं तिच्या डोक्यात थैमान सुरू झालं. पण सकाळी उठल्यावर तिने रिप्लाय केला, “येते.”

आज तिने जीन्स आणि आकर्षक असा पिंक टॉप घातला. मानसला शाळेत सोडून तिने रिक्षा पकडली आणि त्याला “एफसी रोड, वडेश्वर” असं सांगितलं आणि ती रोहनच्या प्रोफाईलमधले त्याचे प्रोफाईल फोटो बघू लागली. रिक्षा रस्त्यावर धावत असताना हळूहळू वाऱ्याचा वेग वाढत होता. ती मीराच्या आयुष्यात लवकरच येणाऱ्या वादळाची चाहूल होती. पण मीरा मात्र त्या वाऱ्याने उडत असलेल्या बटा रिक्षाच्या आरशात बघत सारख्या करत वादळाला कवेत घ्यायला निघाली होती!

क्रमश:

पुढील भागाची लिंक- चांद मातला – भाग २

हे पण वाचा-

सख्या रे …

ट्वेंटी थ्री

गुंतता हृदय – सर्व भाग

मृगजळ- सर्व भाग

व्हॅलेंटाईन डे- भाग १

रिफ्लेक्शन भाग १

आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा

आमच्या लघुकथा लघुकथा

माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख

आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण

ललित

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

2 thoughts on “चांद मातला – भाग १”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!