जानी
हिंदी सिनेमातले काही कलाकार फक्त अभिनेते नव्हते… ते एक अजब रसायन किंवा वल्ली होते. पडद्यावर ते दिसले की कथा, पटकथा, अभिनय, इतर कलाकार बाजूला पडून फक्त त्यांचं व्यक्तिमत्त्व पडदा व्यापून राहायचं. अशा वल्लींच्या यादीत सर्वात वरचं नाव म्हणजे राजकुमार. आज त्याची पुण्यतिथी. आज त्याला जाऊनही ३० वर्ष होतील! पण आजही तो लक्षात आहे. आणि गंमत म्हणजे त्याची आठवण आली की सर्वप्रथम त्याचे चित्रपट आठवत नाहीत; आठवतो तो माणूस. जानी उर्फ राजकुमार. नावासारखाच राजेशाही जगणारा! त्याचं ते ताठ उभं राहणं, गळ्यातून येणारा तो खास आवाज, समोरच्याकडे पाहण्याची ती विलक्षण तुसडी पद्धत आणि स्वतःवरचा अफाट विश्वास. जणू बाकी सगळे एका सिनेमात काम करत आहेत आणि हा स्वतःचा असा वेगळा सिनेमा जगतो आहे!
आम्ही सिनेमा पाहायला लागलो, तेव्हा त्याने नायकाच्या भूमिका जवळजवळ बंद केल्या होत्या. त्यामुळे आमच्यासाठी राजकुमार म्हणजे बुलंदी, तिरंगा, सौदागर आणि अशा चित्रपटांमधला तो रुबाबदार, कोणालाही न जुमानणारा माणूस. त्याचे जुने नायकाचे चित्रपट नंतर पाहिले; पण आमच्या मनातला राजकुमार आधीच तयार झाला होता. अर्थात राजकुमारच्या अभिनयाचा वकूब फार मोठा होता हे कदाचित त्यालाही माहीत होतं. आणि त्याने कधीच आपण महान अभिनेता आहोत वगैरे दावे केल्याचं ऐकिवात नाही. त्याच्या चेहऱ्यावर फारसे भाव नसत. ते इतके नसत की कधी कधी वाटायचं त्याच्या चेहऱ्यावर माशी चिकटवली आहे इतकी ती हलत नसे. पण मग तो एक संवाद बोलायचा… आणि थिएटरमधल्या सगळ्या नजरा त्याच्याकडे खिळून जायच्या. अभिनयातल्या मर्यादा त्याने स्वतःच्या लकबी, आवाज, देहबोली आणि अफाट कन्व्हिक्शनने झाकून टाकल्या होत्या.
म्हणूनच सौदागरमध्ये प्रत्यक्ष दिलीप कुमारसमोर उभं राहूनही तो कुठेच कमी पडत नाही. दिलीप कुमार अभिनयाची शाळा असेल, पण राजकुमार स्वतःच एक स्वतंत्र विद्यापीठ होता. वक्तमधला त्याचा “चिनॉय सेठ… जिनके घर शीशे के हों…” हा संवाद आजही लोकांच्या तोंडी आहे. आजही लोक आपापसात बोलताना तो संवाद एखाद्या म्हणी सारखा वापरतात. राजकुमारने त्याच्या शैलीने तो अजरामर केला आहे. आणि हीर रांझामधल्या “मिलो ना तुम तो हम घबराएँ” या गाण्यात त्याने केलेला नाच पाहिला की धर्मेंद्र किंवा शत्रुघ्न सिन्हालाच नृत्याविषारद पदवी द्यावीशी वाटेल! पण आश्चर्य म्हणजे तो नाचही आपण हसत हसत पाहतो, कारण त्या माणसाला स्वतःबद्दल प्रचंड कॉन्फिडन्स होता. जराही शंका नव्हती. त्याच्या प्रत्येक आचरटपणामागे शंभर टक्के कन्व्हिक्शन होतं. म्हणून ते कधी हास्यास्पद वाटत नाही; ते “राजकुमार” वाटतं. त्याच्या हातात बॉम्ब असो, तलवार असो किंवा फक्त सिगारेट… प्रत्येक वस्तू त्याच्या स्टाईलचा भाग व्हायची. तो मोठमोठे बॉम्बही इतक्या रुबाबात फेकायचा की जणू दिवाळीतले आपटिबार आहेत! पण ते राजकुमार करत असल्याने आम्हाला तेच आवडायचं. कारण तो सिनेमातून वास्तव साकारतच नव्हता. तो राजकुमार नावाची स्टाईल, लकब आणि व्यक्तिमत्व साकारत होता.
त्याच्याबद्दल विक्षिप्तपणाचे असंख्य किस्से प्रसिद्ध आहेत. किती खरे, किती खोटे, हे सांगणं कठीण. पण गंमत अशी की प्रत्येक किस्सा त्याच्या व्यक्तिमत्त्वाला इतका साजेसा वाटतो, की तो खरा असावाच असं वाटतं. झीनत अमानबद्दलचा एक प्रसिद्ध किस्सा तर आजही सांगितला जातो. ती मोठी स्टार झाल्यानंतर तिला पाहून राजकुमार म्हणाला, “आप बहुत खूबसूरत हैं… फिल्मों में काम क्यों नहीं करतीं?” हा किस्सा खरोखर तसाच घडला का, याचा ठोस पुरावा नाही. पण हे वाक्य ऐकल्यावर पहिल्याच क्षणी डोळ्यासमोर राजकुमारच उभा राहतो. कारण अशी बेफिकीर शैली त्याच्याशिवाय दुसऱ्या कुणाची असूच शकत नाही.
‘जानी’ हा शब्द त्याच्याशी इतका एकरूप झाला की आजही तो उच्चारला की राजकुमारच आठवतो. तो लोकांना जानी म्हणत असला तरी जानी हे त्याच्या कुत्र्याचं नाव होतं अशी देखील एक वदंता होती! ती खरी की खोटी माहीत नाही. पण ती त्याच्या व्यक्तिमत्त्वाला इतकी फिट बसते की ती राजकुमारच्या कथेचा भाग बनून गेली.
पण तो पडद्यावर जितका अहंकारी वाटायचा, तितकाच प्रत्यक्ष आयुष्यात कामाच्या बाबतीत शिस्तप्रिय असल्याचं अनेक सहकाऱ्यांनी सांगितलं आहे. वेळेवर सेटवर पोहोचणं, स्वतःचं काम प्रामाणिकपणे करणं आणि अनावश्यक गोंधळ न घालणं, हे त्याचे गुण मानले जातात. तो सुरुवातीपासून विग लावत असल्याचंही सगळ्यांना माहीत होतं आणि त्यानेही कधीच ते नाकारलं नाही. कारण त्याची खरी ओळख केसांत नव्हती, ती त्याच्या आवाजात, लकबीत, चालण्यात आणि ट्रेडमार्क राजकुमार स्टाईल मधे होती!
८ ऑक्टोबर १९२६ रोजी बलुचिस्तानमधील लोरालाई येथे कुलभूषण पंडित म्हणून जन्मलेला हा माणूस पुढे बॉम्बे पोलिसात सब-इन्स्पेक्टर झाला आणि तिथून हिंदी सिनेमात आला. ३ जुलै १९९६ रोजी घशाच्या कर्करोगामुळे मुंबईत त्याचं निधन झालं. शेवटच्या काळातही त्याने आजाराचं प्रदर्शन केलं नाही. जगाला रुबाबात आणि गेला तो देखील राजकुमार स्टाईल रुबाबात.
आज मागे वळून पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. आज उत्तम अनेक अभिनेते आहेत. चांगले कलाकार आहेत. पण केवळ स्वतःची चाल, स्वतःचा आवाज, स्वतःची लकब, स्वतःची स्टाईल आणि स्वतःच व्यक्तिमत्व ह्यांच्या जोरावर स्वतःच सुपरस्टार स्थान निर्माण करणारा कोणीच नाहीये. तसा केवळ एकच राजकुमार होता! अर्थात त्याच्या काही फॅन्सना हे पटणार नाही. त्यातून राजकुमार महान अभिनेता होता की नव्हता, यावर वाद होऊ शकतील. पण राजकुमार स्टाईलला अभिनयाचं रूप देणारा कलाकार होता, यावर वाद होऊ शकत नाही.
राजकुमार भूमिका जगत नसे. भूमिका राजकुमार जगत असे! अशा त्या रुबाबदार, थोड्या विक्षिप्त, पण कायम लक्षात राहणाऱ्या वल्लीला आज त्याच्याच शब्दात श्रद्धांजली अर्पण करूया. कारण श्रद्धांजली लेख वाचून, लोक त्याच्या आठवणींचे कढ काढत असलेले पाहून तो उर्मटपणे आपल्याला म्हणेल “राजा के ग़म को किराए के रोने वालों की ज़रूरत नहीं पड़ेगी चिनॉय सेठ.” आणि आपण त्यावर देखील टाळ्या, शिट्ट्या वाजवू! ©मंदार जोग
हे पण वाचा-
आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा
आमच्या लघुकथा लघुकथा
माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख
आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण
