श्रीरंग ने डोळे पुसत फोन घेतला.
श्रीरंग- हेलो…
अपूर्वा- सर गुड इव्हिनिंग.
श्रीरंग- हम्म…बोल अपूर्वा…
अपूर्वा- सर उद्या मी ऑफिसला हाफ डे येणार आहे. सकाळी जरा कामाला जायचं आहे. मी मेसेज केला असता पण तुम्ही घरी आलात तेव्हाही नीट बोलू शकले नाही आज…म्हणून विचार केला की कॉल करून सांगावं.
श्रीरंग- अस काय काम आहे कि तू हाफ डे राजा घेणार आहेस. थोडी उशीरा ये. Its okay.
अपूर्वा- नाही सर. मला ते नाही पटत. काम माझ आहे. महत्वाच आहे. मग त्याच्यासाठी मी हाफ डे रजा घ्यायला हवी. ऑफिस च्या वेळेत personal काम माझ्या तत्वत नाही बसत. आणि सर जर काम तितक महत्वाच नसत तर मी घेतला असता हा काफ डे? पण माझा नाईलाज आहे. ताई ऐकत नाहीये.
श्रीरंग- (कुतूहलाने) असं काय काम आहे if I may ask…
अपूर्वा- तुम्हाला हक्क आहे सर विचारायचा. आज मी सिनेमा पाहून घरी आले तर ताई आणि जीजू खूप सिरीयस चेहऱ्याने घरात माझी वाट बघत होते. मी आल्यावर जेवायला वाढताना ताई म्हणाली की “अपु उद्या आपण तुझ नाव दोन तीन म्यारेज ब्युरो मध्ये नोंदवू.” सर ते ऐकून मला आश्चर्य वाटलं. मी ताईला म्हणाले पण की मला लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. पण मग जिजाजी सुद्धा मध्ये पडले. त्यांनी सांगितल की मी अशीच आयुष्यभर एकटी राहू शकणार नाही. पुढे जाऊन एखाद्या विधुर किंवा घटस्फोटीत माणसाशी लग्न करेन. त्या ऐवजी अजूनही वेळ गेलेली नाहीये. मला चांगला नवरा मिळू शकेल. ताईच्या ओळखीच्या कोणीतरी जोगळेकर बाई आहेत…
श्रीरंग- हो. शंत्या जोगळेकर ची बायको. नवी पेठेत ब्युरो चालवते. पटापट लग्न लावते ती.
अपूर्वा- हो सर नवी पेठ. ताई मला सर्वात आधी तिथे नेणार आहे आणि मग आणखी दोन तीन ठिकाणी. त्या दोघांना अचानक काय झालंय काहीच कळत नाहीये मला.
श्रीरंगला आज मध्याच्या घरी झालेलं बोलण आठवल. थोडक्यात मध्या आणि वाहिनी अपूर्वा ला दुसर्या कोणाच्या तरी गळ्यात बांधणार आहेत. ते पण बरोबर आहे म्हणा…तिने माझ्यासारख्या विधुराशी का लग्न करावं? पण मध्या आणि वहिनी ने हे मला तोंडावर सांगितल असत तर बर झाल असत. हे अस मागून, लपून…इतक्यात अपूर्वा म्हणाली-
अपूर्वा- हेलो सर…हेलो…
श्रीरंग- (भानावर येत) हो..हेलो…
अपूर्वा- सर चालेल ना उद्या मी हाफ डे आले तर…
श्रीरंग- its okay…इतक महत्वाच कारण आहे म्हटल्यावर मी कोण नको म्हणणार…आणि तसाही मला चोइस कुठे आहे…
अपूर्वा- म्हणजे? मला कळल नाही सर…
श्रीरंग- काही नाही..घे तू उद्या हाफ डे…
फोन कट झाला. श्रीरंग स्वातीच्या फोटो कडे बघत तिथेच सोफ्यावर झोपला. दिवे सुरूच होते.
सकाळी श्रीरंग ला उशिरा जाग आली. कामवाली बाई ने बेल वाजवल्यावर. बाई ने साफसफाई केली. त्याला चहा दिला. स्वयंपाक केला. बाई गेली. श्रीरंग पेपर वाचत होता. मग त्याने टीव्ही वर न्यूज लावल्या. पण त्याच मन कशातच रमत नव्हत. तो बेडरूम मध्ये जाऊन चक्क झोपला. डिस्टर्ब नको म्हणून त्याने फोन स्वीच ऑफ केला. बेडरूम मध्ये काळोख करून तो झोपला. त्याला गाढ झोप लागली. अचानक दाराच्या बेलचा दूर वरून येणाऱ्या आवाजाने त्याला जाग आली. दुपारचे दोन वाजले होते. त्याला दाराची बेल वाजत असलेली ऐकू येत होती. तो दचकून उठला. इतका वेळ झोप कशी लागली आपल्याला असा विचार करत त्याने दार उघडलं. दारात अपूर्वा होती. तिला घरी आलेली पाहून तो चकित झाला. अपूर्वा घाईत आणि चिंताग्रस्त चेहऱ्याने आत येत त्याचा हात हातात घेत, त्याच्या कपाळाला हात लावून ताप आहे का बघत म्हणाली-
अपूर्वा- सर तुम्ही बरे आहात ना?
श्रीरंग- हो…I am fine…
अपूर्वा- पण सर तुम्ही ऑफिसला का नाही आलात? आणि फोन पण ऑफ आहे तुमचा. म्हणून मग मी घरी आले. Honesty traders च्या फाईल वर तुमची सही पाहिजे सर. ती आजच द्यायची आहे.
श्रीरंग- ओके…बस तू मी आलोच…
अस बोलून श्रीरंग आत गेला. सोफ्यावर बसलेली अपूर्वा त्याच घर न्याहाळत होती. तिला स्वातीचा फोटो दिसला. ती फोटोसमोर जाऊन उभी राहिली. स्वाती किती सुंदर आणि हुशार होती ते तिच्या फोटो मधून सहज लक्षात येत होत. तिच्या डोळ्यात माया आणि करुणा होती. अपुर्वाचे हात नकळत जोडले गेले. अपूर्वा हात जोडून तशीच उभी होती आणि तितक्यात श्रीरंग बाहेर आला. अपूर्वा ला स्वातीच्या फोटो समोर उभी पाहून म्हणाला-
श्रीरंग- my late wife स्वाती.
अपूर्वा- हो सर…आल लक्षात…mam किती सुंदर होत्या…आणि हुशार पण असणार…
श्रीरंग- येस…स्वाती सारखी कोणी नाही. ती माझं सर्वस्व होती. माझ नशीब चांगल की मला स्वाती सारखी बायको मिळाली…पण नशिबाचा देवाला पण हेवा वाटला असावा…भरल्या संसारातून त्याने तिला उचलून नेली.
हे बोलताना त्याचा आवाज कातर झाला. एक मिनिट कोणीच काहीच बोलल नाही.
श्रीरंग- आण ती फाईल…मी सही करतो.
अपूर्वा ने फाईल दिली. श्रीरंग ने सही केली. परत एक ओक्वर्द सायलेन्स.
अपूर्वा- सर तब्बेत बरी आहे ना तुमची? डॉक्टर ला दाखवूया का?
श्रीरंग- नको. I am fine…काल जरा उशीर झाला झोपायला…म्हणून उशिरा उठलो. बाकी काही नाही. बर तू चहा घेणार का?
अपूर्वा- नको सर. ताई बरोबर लंच करून ऑफिसला गेले आणि तशीच इथे आले.
श्रीरंग- मग ज्यूस?
अपूर्वा- सर तुम्ही जेवलात का?
श्रीरंग- ह..हो जेवलो की. बाई सकाळीच स्वयंपाक करून गेली.
अपूर्वा- सर तुम्हाला ना खोट बोलता येत नाही अजिबात. तुमचा चेहरा आणि डोळे तोंडाशी सिंक मध्ये नाहीयेत. बसा तुम्ही मी तुम्हाला वाढते. किचन कुठे आहे?
श्रीरंग- अग कशाला…मी घेईन…
अपूर्वा- सर प्लीज…तुम्ही इथे डायनिंग टेबल वर बसा. मी जेवण गरम करून आणते. किचन कुठे आहे?
श्रीरंग- तिथे…
अपूर्वा किचन मध्ये गेली. बाई ने काय काय केलय ह्याचा अंदाज घेतला. फ्रीज मध्ये काय काय आहे ते पाहिलं. मग भात, कढी, भाजी आणि पोळ्या गरम केल्या. कांदा आणि टोमेटो चिरून त्याची कोशिंबीर केली. सगळ जेवण बाहेर आणून श्रीरंग ला वाढलं. श्रीरंग ताटाकडे बघत होता.
अपूर्वा- आता वारा घालू का मी मग जेवणार का तुम्ही?
हे बोलून अपूर्वा जोरात हसली. श्रीरंग पण कसनुस हसून जेवू लागला. तिने केलेली कोशिंबीर त्याला खूप आवडली. अगदी बारीक चिरलेले कांदा आणि टोमेटो. परफेक्ट तिखटपणा देणाऱ्या वाटून घातलेल्या मिरच्या, आलं, दाण्याचं कुट आणि वरून लिंबू पिळून हलकी फोडणी ओतलेली. आहाहा.
श्रीरंग- कोशिबीर मस्त झाली आहे हा अपूर्वा. स्वाती पण सुगरण होती. हाताला अफाट चव होती तिच्या..
श्रीरंग हे बोलला…पण आपण काय बोलून गेलोय हे लक्षात येऊन जरा गडबडला.
श्रीरंग- म्हणजे मला अस म्हणायचं होत की…
अपूर्वा- आल लक्षात सर…तुमच्या मिसेस चांगला स्वयंपाक करायच्या आणि माझ्या हाताची कोशिंबीर खाऊन तुम्हाला त्यांची आठवण आली. हे माझ्यासाठी compliment आहे सर.
श्रीरंग जेवत होता. अपूर्वा त्याला जेवताना बघत होती. पोळी, भाजी संपली की ताटात वाढत होती. श्रीरंग च जेवण झाल. तो हात धुवून आला. बोलताना मग अपूर्वा आणि तो म्यारेज ब्युरो बद्दल बोलत होते. त्या अनुषंगाने अपूर्वाच्या नवर्याकडून अपेक्षा, अपूर्वाची कौटुंबिक पार्श्वभूमी, तिला लग्न ह्या गोष्टीबद्दल वाटत असलेली भीती, तिचे, गाव, नातेवाईक, शिक्षण ह्याबद्दल ती बोलत गेली. श्रीरंग ने देखील नकळत स्वाती आणि त्याच्या आयुष्याबद्दल तिला सांगितल. ओंकार बद्दल माहिती दिली. अश्या गप्पांमध्ये संध्याकाळ कधी झाली दोघांना कळल नाही.
श्रीरंग- आता संध्याकाळी तरी चहा घेणार ना? मी मस्त चहा करतो.
अपूर्वा- नको. मी जास्त चांगला चहा करते. बसा तुम्ही. मी बनवते चहा.
अपुर्वाने चहा केला. खरच छान झाला होता. दोघांनी चहा घेतला. आता निरोपाची घडी आली.
अपूर्वा- सर एक सांगते…उद्या माझ कुठे लग्न होईल आणि मी कुठल्या शहरात जाईन ते माहित नाही. इथे पुण्यात असले तरी घरचे नोकरी करून देतील की नाही माहित नाही. पण सर, तुमच्याबरोबर जितके दिवस काम केलंय त्यात मला खूप शिकायला मिळाल आहे. तुम्ही माझे गुरु, माझे शिक्षक आहात. मी जगात कुठेही असले तरी ही नोकरी आणि तुम्ही दोघानाही कधीच विसरणार नाही. Thank you सर.
अस म्हणून अपुर्वाने वाकून त्याच्या पायाला हात लावून नमस्कार केला.
श्रीरंग- अग हे काय करतेस…
अपूर्वा- सर जे मनात आहे ते सांगते आहे.
मग तिने पुढे जाऊन स्वातीच्या फोटोला पण नमस्कार केला. आणि ती निघून गेली. श्रीरंग काही मिनिट तसाच बसून होता. मग त्याला आठवल की आता क्लब मध्ये जायची वेळ झाली आहे. तो चेंज करून क्लब मध्ये जायला निघाला.
क्लब मध्ये मध्या, दिग्या, उत्तम तिघेही भेटले. मध्याला पाहून मात्र श्रीरंग च्या डोक्यात तिडीक गेली. इतक्या वर्षांच्या मैत्रीवर त्याने पाणी ओतलं होत. आणि ते पण मेहुणीसाठी? स्पष्ट सांगायला हव होत त्याने. परस्पर लग्न लावून टाकणार होता तो. श्रीरंग आज गप्प गप्प होता. बाकी तिघांच्या ते लक्षात आल.
दिग्या- काय रे रंगा…आज शांत का इतका? तब्बेत बरी आहे ना?
श्रीरंग- हो…
उत्तम- मग असा घुम्या सारखा का आहेस? बीपी शूट झालंय का? ए मध्या बघ रे जरा ह्याची पल्स…
श्रीरंग- प्रत्येक वेळी आजार शारीरिक असेल अस नाही. मनाला पण आघात होऊ शकतो ना?
दिग्या- आयला….इमोशनल matter आहे…काय रे काय झाल? प्रेमात वगैरे पडलास की काय? आणि मग कोणीतरी व्हिलन शत्रू आला वगैरे…
श्रीरंग- व्हिलन शत्रू कशाला पाहिजे? मित्र आहेत की पाठीत सुरा खुपसणारे.
हे बोलून त्याने मध्या कडे रागाने पाहिलं. माद्या ने नजर चोरली.
उत्तम- हे काय नवीन? स्पष्ट बोल काय झालंय ते.
श्रीरंग- मला का विचारतोस? ह्या मध्या ला विचार ना दोस्तीत का मुतला ते. बायकोच्या हातच खेळण का झाला ते.
हे ऐकून मध्या चिडून बोलला-
मध्या- ए रंगा…तोंड सांभाळ बर का. बायकोवर कोणाच्या जातोस तू?
श्रीरंग- तुझ्या…काय करशील? मारशील? मार ना आहे तुझ्या समोर मी. मार…
दिग्या- ए बाबांनो…कॉलेजात आहात का? भांडताय काय असे? काय झाल नक्की रंगा?
श्रीरंग- होणार काय? मी ह्याला आणि ह्याच्या बायकोला सांगितल की अपूर्वा मला आवडते म्हणून. तर ह्याच्या बायकोने काय केल माहित्येय? लगेच तीच नाव शांत्याच्या बायकोच्या ब्युरो मध्ये टाकल.
उत्तम- मग लगेच लग्न होणार. शन्त्याची बायको लै फास्ट लग्न लावते.
दिग्या- अरे ए उत्तम…विषय शंत्या च्या बायकोचा नाहीये अप्पू चा आहे. पण रंगा तुला अपु आवडते? कधीपासून?
श्रीरंग- तू चान्स मारत होतास तेव्हापासून.
दिग्या- काय सांगतोस लेका. म्हणजे आपला फुल दोस्ताना सिनेमा होता की. तू अमिताभ आणि मी शत्रू.
श्रीरंग- तो परवडला. हा प्रेम चोप्रा बघ इथे बसलेला. लाज नाही वाटत त्याला माझ प्रेम असून अपूर्वा च लग्न दुसरीकडे करून द्यायला.
मध्या- ए रंगा…काय चुकल रे माधुरीच? तिला जर तिच्या बहिणीच लग्न तुझ्यासारख्या विधुराशी न होता आधी लग्न न झालेल्या मुलाशी व्हाव अस वाटल तर काय चुकल तिचं? तुला हाच चोइस दिला तर तू काय करशील?
श्रीरंग- माझी बहिण असती आणि जर माझ्या जागी तू असतास तर मी तीच लग्न तुझ्याशी लावून दिल असत.
मध्या- हे बोलायला सोप आहे. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. आणि तू ढीग लावशील रे लग्न. जिला लग्न करायचं आहे ती तयार पाहिजे ना? ती तर राखी घेऊन उभी असते तुझ्यासारख्या लोकांसाठी. काय दिग्या.
दिग्या- हा ते तर आहेच. लई खतरनाक आहे ती अपूर्वा. आपल्या सारख्यांना उभे नाही करणार.
श्रीरंग- तरीही मध्या तू आणि वहिनी ने मला चुत्या बनवला हे नक्की.
मध्या- परत तेच. आम्ही काय अपूर्वा ला कोंडून ठेवली आहे की अमुक माणसाशी लग्न कर म्हणून? आम्ही आमच कर्तव्य केल तिचं नाव ब्युरो मध्ये घालून. तिला जर दुसरा कोणी आवडला तर आमची काहीच हरकत नसेल. आणि तो जर तू असशील तर आम्हाला आनंदच होईल.
उत्तम- ए रंगा जा ना. इथे बडबड का करतोस? तिला विचार ना जाऊन.
मध्या- तिला नाही भिडणार हा. कारण ती राखी बांधून ह्याचा पण भाऊ करेल ह्या विचाराने फाटते ह्याची.
दिग्या- प्रेमात आणि धंद्यात फाटून उपयोग नाही. चान्स सोडायचा नाही एक पण.
मध्या- उद्या व्हलेन्ताईन डे आहे. बघ. मार प्रपोज अपु ला. एकतर ती मिसेस गद्रे होईल किंवा तू तिचा रंगा दादा बनून तिच्या लग्नात अक्षता टाकून तिची पाठवणी करशील.
दिग्या- आयला हे भारी आहे. रंगा…गो फॉर इट. ही नाही तर दुसरी मिळेल. पण हिला मिळवायचा चान्स सोडू नको. इसी ख़ुशी में ए वेटर चार लार्ज JD. बिल गद्रे साहेब देणार.
श्रीरंग च्या डोक्यात विचारांचं काहूर होत. त्या क्लब मधले इतर आवाज त्याला ऐकू येत नव्हते. इतक्यात त्याला अपुर्वाचा मेसेज आला. तिने लिहील होत “सर आत्ताच एका स्थळाचा होकार आलाय. उद्या व्हलेन्ताईन डे ला भेटायचं म्हणतोय तो. इंजिनियर आहे. आय टी मध्ये मोठ्या पदावर आहे. परदेशात होता बरीच वर्ष म्हणून लग्न नाही झाल. आता पुण्यात सेटल आहे. बावधनला चार बेडरूम ची जागा आहे. घरी आईवडील आणि तो असे तिघेच आहेत. सर उद्या मी राजा घेऊ का? उद्या आम्ही भेटून फायनल करू. मला फोटो आवडला आहे आणि त्याचा होकार तर आहेच.”
इतक्यात मध्याच्या फोनमध्ये पण माधुरीचा मेसेज आला की मुलाचा होकार आला आहे. उद्या फायनल करायचं आहे.
मध्याने ओरडून सांगितल-
मध्या- गाईज शंत्या ची बायको चेटकीण आहे. एका दिवसात स्थळ आणून होकार पण कळवला आहे अपूर्वाला. उद्या फायनल मिटिंग आणि मग मार्च मध्ये लग्न. Bad luck रंगा.
श्रीरंग त्याच्या फोनमध्ये मेसेज वाचत होता. त्याने अपूर्वला ओके असा रिप्लाय दिला आणि खिशातून पाच हजार रुपये काढून टेबलवर ठेऊन तो तिथून निघून गेला. हे तिघे त्याच्याकडे सहानुभूतीने बघत होते.
दिग्या- मित्रांनो, आपला रंगा तर विकेट वर न येता रिटायर hurt झाला यार.
इथे घरी अपूर्वा श्रीरंग चा ओके असा रिप्लाय पाहून समोरच्या आरशात स्वतःकडे बघत लाजत होती. तिच्या कानात उद्याच्या त्या मुलाशी होणाऱ्या भेटीनंतरच्या लग्नाची सनई वाजत होती.©मंदार जोग
क्रमश:व्हालेंटाईन डे…भाग ४
