अपूर्वाला भेटून श्रीरंग घरी आला. फ्रेश होऊन क्लब मध्ये गेला. तिथे मध्या भेटला. बार जवळ बसून वाईन चा घोट घेत तोंडात एक काजू टाकून तो रंगाला म्हणाला-

मध्या- कशी काय वाटली अपूर्वा?

श्रीरंग- छान आहे.

मध्या- ते मलाही माहित आहे. आमच्या लग्नात तिला पाहिली तेव्हा ही आधी का नाही भेटली अस वाटलं होत. आमच्या हिला मी ते लग्नानंतर सांगितल देखील.

श्रीरंग- मग?

मध्या- मग काय? ती म्हणाली की अपूर्वा आमची नशीबवान आहे. तुमची नजर आधी तिच्यावर नाही पडली म्हणून. माझ्यावर पडली आणि मी अडकले.

श्रीरंग- वहिनी खतरनाक आहे हा ह्या बाबतीत. एक शब्द खाली पडू देत नाही.

मध्या- अपूर्वा तिची आई आहे ह्या बाबतीत. येईल तुला अनुभव.

श्रीरंग- पण काय रे. तू तिच्यावर टवके टाकत होतास हे माहित असून वाहिनी ने तिला तुमच्या घरी राहायला कशी बोलावली?

मध्या- ती म्हणाली मला. अपूर्वला बोलावते आहे. काय लाईन मारायची ती मारा. मला माहित आहे तुमच्यात तितकी हिम्मत नाही आणि अपुर्वावर विश्वास आहे की ती तुम्हाला तशी हिम्मत करू देखील देणार नाही.

श्रीरंग- इतकी खतरनाक आहे का अपूर्वा?

मध्या- मेलडी खाव खुद जान जाओ रंगा. ठेवतो आहेस ना तिला कामावर? कळेल हळू हळू.

श्रीरंग- हो. उद्यापासून बोलावली आहे. हुशार आणि स्मार्ट आहे ती. चांगल काम करेल.

मध्या- रंगा. कामाशी काम ठेव. बाकी “कामाचे” विचार मनात आणलेस ना तर अपूर्वा कुठेच “काम करण्याच्या” लायकीचा ठेवणार नाही तुला.

श्रीरंग- ते सगळ तुझ खातं दिग्या च आहे. मला तू ओळखतोस. मी बायकांच्या लफड्यात पडतो का कधी?

मध्या- म्हणून तर अपुला तुझ्याकडे पाठवली. सेफ deposit vault आहेस ना तू आमचा.

श्रीरंग- अप्पू?

मध्या- घरचं नाव आहे तीच. तू नको म्हणू. नाहीतर मार खाशील.

इतक्यात तिथे आलेल्या दिग्या आणि उत्तम ने ते ऐकल. तिथे बसत दिग्या म्हणाला-

दिग्या- कोण मारतोय रे आमच्या रंगा ला? बोलावू का आमच्या साईट वरच्या पोरांना? Slab मध्ये गाडून टाकतील. माणूस गुल होईल.

मध्या- गप रे. दिग्या तू पटवर्धन आहेस हे सांगाव लागत यार तुझ हे अस बोलण ऐकल की. काय ही तुझी भाषा? काय हे भयानक विचार? माणसाला slab मध्ये गाडणार?

दिग्या- तू लोकांना ऑपरेशन करताना सपासप कापतोस तेव्हा चालत का?

मध्या- काय संबंध? काही तुलना आहे का?

उत्तम- ए तुम्ही दोघे शाळेत असल्यापासून असेच भांडता. गप कि जरा. रंगा ला कोण मारतंय सांग तरी मध्या. दरबंघा कोर्टात केस करतो. दर आठवड्याला बिहार ला फेर्या मारून वेडा होईल जो कोणी आहे तो.

मध्या- कोणी कोणाला मारत नाहीये. माझी मेहुणी आहे. ती रंगाच्या ऑफिसात लागते आहे.

दिग्या- कोणाला?

हे ऐकून रंगा आणि उत्तम जोरात हसले. मध्या चिडून म्हणाला-

मध्या- हा वाईट होता बर का? माझी मेहुणी आहे ती.

दिग्या- असू दे की. ती लागते आहे हे महत्वाच.

रंगा- अरे ए दिग्या…ती माझ्या ऑफिसात नोकरीला लागते आहे.

दिग्या- शी. इतकच. मला वाटलं…

मध्या- ए गपतो का आता?

रंगा- ए दिग्या…खतरनाक आहे ह्याची मेहुणी. आणि जाम हुशार आणि शार्प पण आहे.

दिग्या- म्हणजे पटायला सोपी.

मध्या- तू तेच करणार. समोरच्या वाड्यातली मंजिरी माझी होती. पण तिला तू काढलीस.

दिग्या- मी तुला थांबवला नव्हता. तिला मी रांगडा गडी आवडलो त्याला मी काय करणार?

मध्या- रांगडा गडी? कॉलेज पासून नॉन व्हेज खाल्ल की रांगडा गडी? तरी बर आहे रांगड्या गड्याला आता हायपर टेन्शन आणि शुगर डिटेक्ट झाली आहे. पोट बघ जरा. पोहोचेल का मनात आणलस तरी?

दिग्या- ज्याचा दोस्त डॉक्टर मध्या आहे त्याला कसली बीपी आणि शुगर ची काय भीती? बाकी पोहोचायचं कसं ते मला माहित आहे. तू नको काळजी करू.

उत्तम- अरे विषय काय? तुम्ही काय बोलताय? आपला रंगा गुड बॉय आहे. तो मध्या च्या मेहुणीला काहीही करणार नाही. काय रे रंगा?

श्रीरंग ने हम्म अस उत्तर दिल.

उत्तम- बर ऐका. आज कोर्टात काय मजा आली सांगतो.

चौघांनी आणखी ड्रिंक ऑर्डर केली आणि गप्पा रंगल्या.

दुसऱ्या दिवशी अपूर्वा ऑफिसात आली. श्रीरंग ने तिची स्टाफ शी ओळख करून दिली. अपूर्वाला काम दाखवलं आणि ऑफिसातल्या एका मुलाला तिला मदत करायला सांगितली. पुढे काही दिवस अपूर्वा काम समजून घेत होती. अपूर्वा आता ऑफिसला येऊन आठवडा झाला होता. ती कामात बर्यापैकी रुळली होती. रंगा आणि तिची भेट कमी होत असे. रंगा फार थोडा वेळ ऑफिसला जात असे. असाच महिना गेला.

पुण्यात डिसेंबर ची थंडी पडली होती. ऑफिसात अपूर्वा एकटी होती. आर्टिकल करणारी पोर audit साठी दिल्लीला गेली होती. अपूर्वा कामात हरवली होती. जवळजवळ सात वाजले होते. विजय ने तिला चहा दिला आणि विचारलं-

विजय- madam अजून किती वेळ लागेल? माझ्या मुलाचा वाढदिवस आहे आज. घरच्यांना घेऊन जेवायला जायच आहे.

अपूर्वा- अरे वा. हे घे. (तिने पाचशे रुपये त्याला दिले) माझ्याकडून तुझ्या मुलाला चोकलेट घे. आणि जा तू. मी ऑफिस बंद करेन.

विजय- आणि चावी?

अपूर्वा- कुठे द्यायची सांग. मी देते.

विजय- तुम्ही निघताना सरांना फोन करा. ते सांगतील.

अपूर्वा- ओके.

विजय गेला. अपूर्वाच काम संपेपर्यंत साडे आठ वाजले. काम संपल्यावर तिने laptop बंद केला. बाथरूम मध्ये जाऊन चेहऱ्यावर पाण्याचे हपके मारले. थंडीत पाणी चेहर्याला लागल्यावर तिच्या अंगावर शहरा आला. समोरच्या आरशात बघत तिने केस विंचरले. एकदा आपल्या फिगर कडे पाहून खुश होत स्वतःला आरशात फ्लाईंग कीस दिला आणि बाहेर येऊन तिने श्रीरंग ला फोन लावला.

श्रीरंग- बोल अपूर्वा?

अपूर्वा- सर ऑफिसची चावी कोणाला देऊ?

श्रीरंग- विजय ला दे.

अपूर्वा- तस नाही सर. विजय गेला. मी उशिरा पर्यंत होते. सो…

श्रीरंग- विजय गेला म्हणजे? असा कसा गेला?

अपूर्वा- मीच जायला सांगितल. त्याच्या मुलाचा वाढदिवस आहे आज. सो…

श्रीरंग- अच्छा. मग ठीक आहे. गुड नाईट.

अपूर्वा- सर मी विजय गेला सांगायला फोन नाही केलेला. चावी तुम्हाला देऊ का आणि कुठे देऊ विचारायला फोन केलाय.

श्रीरंग- अरे हो…चावी ना…

त्याचा वेंधळे पणा एव्हाना माहित झालेल्या अपूर्वला हसू येत होत.

श्रीरंग- तू..तू क्लब ला ये.

अपूर्वा- कोणता क्लब सर?

श्रीरंग- आमचा क्लब…मी तुला लोकेशन पाठवतो. ये तू. रिक्षाने दहा मिनिटात येशील. उद्या रिक्षा च व्हाऊचर लाव ऑफिसला.

अपूर्वा ने फोन कट केला. श्रीरंग थोडा वेंधळा असला तरी अतिशय हुशार, तत्वाला चिकटून असलेला, सज्जन आणि सभ्य होता हे तिला लक्षात आल होत. तिची बहिण आणि मध्या कडूनही श्रीरंग ची बायको कशी गेली वगैरे तिला कळल होत. एकुणात तिला श्रीरंग हा माणूस भावाला होता. बॉस म्हणून आणि माणूस म्हणूनही.

अपूर्वा क्लबच्या बाहेर उतरली तेव्हा थंडीने कुडकुडत होती. ती क्लब मध्ये शिरली आणि तिने रंगा ला फोन लावला. त्याने तिला पूल साईड ला बोलावली. रंग तिथे एकटाच बसला होता. पुढ्यात jd चा ग्लास होता. अपूर्वा कुडकुडत तिथे आली. पूल साईड ओपन असल्याने वारा जोरात होता आणि त्यामुळे अपूर्वाला आणखी थंडी वाजू लागली. तिने थरथरत्या हाताने किल्ली पुढे केली. श्रीरंग उभा राहिला. त्याने किल्ली घेतली.

श्रीरंग- thanks. तुला उगाच वळसा पडला चावी द्यायला.

अपूर्वा- इट्स ओके सर…

ती तशीच उभी होती. एक awkward सायलेन्स होता. श्रीरंग ला आता काय बोलाव सुचत नव्हत. तिलाही काय कराव कळत नव्हत. म्हणजे जाव की क्लब मध्ये थोडा वेळ बसाव. असेच काही सेकंद गेल्यावर श्रीरंग ने formal होत तिला विचारलं-

श्रीरंग- तुला घाई नाहीये ना?

अपूर्वा- न…नाही…

श्रीरंग- मग बस ना. हवा बघ काय छान आहे.

अपूर्वा मनात म्हणाली हवा छान नाही बोचरी आहे. ह्यांना थंडी वाजत नसेल दोन पेग पोटात गेल्यावर.

श्रीरंग- तुझ्यासाठी मस्त चहा आणि बन मस्का सांगू का?

अपूर्वा न राहवून म्हणून गेली-

अपूर्वा- तुम्ही काय घेताय?

श्रीरंग- व्हिस्की आहे.

अपूर्वा- माझ्यासाठी पण एक मागवा आणि गरम पाणी प्लीज…

ते ऐकून श्रीरंग क्षणभर चमकला. तिच्याकडे बघत राहिला.

अपूर्वा- काय झाल सर?

श्रीरंग- तू व्हिस्की पिणार?

अपूर्वा- मला खर तर ओल्ड मोन्क आवडते. पण तुम्हाला कंपनी म्हणून व्हिस्की चालेल.

अपूर्वा ने दिग्या म्हणाला होता तो ठसका आणि खतरनाक पणा दाखवला होता.

अपूर्वा- सर मागवताय ना?

श्रीरंग- ह..हो मागवतो ना…

आता श्रीरंग च्या लक्षात आल ती थंडीने काकडत होती ते.

श्रीरंग- आपण आत बसुया का? इथे वारा खूप आहे. त्यात तू स्लीव्हलेस ड्रेस घातला आहेस. थंडी वाजत असेल तुला.

अपूर्वा ने तिचे उडत असलेले केस आणि ओढणी सांभाळत मानेने होकार दिला. अपूर्वा त्या अवस्थेत फार लोभस दिसत असल्याच श्रीरंग ला वाटून गेल. त्याने वेटर ला ऑर्डर दिली आणि आपला ग्लास आत टेबल वर आणायला सांगून अपूर्वा ला म्हणाला-

श्रीरंग- this way please…

ती त्याच्या मागे गेली. इन डोअर रेस्तोरांत मध्ये आल्यावर अपूर्वा ला छान उबदार वाटलं. श्रीरंग ने एक कोपऱ्यातल रिकाम टेबल पाहिलं आणि अपूर्वला त्या दिशेने बोट दाखवलं. दोघे तिथे गेले. श्रीरंग ने अदबीने खुर्ची मागे करून तिला बसायला

सांगितल आणि ती बसल्यावर तो समोर बसला.

श्रीरंग- आम्ही सगळे इथे रोज भेटतो. आज नेमके कोणी आले नाही. दिग्या आला होता पण लगेच गेला. मग मी बोअर झालो आणि इथेच ड्रिंक ऑर्डर केल. नॉर्मली मी घरी ड्रिंक घेतो. खूप कंटाळा येतो ना घरी एकट्याला.

इतक्यात वेटर दोघांचे ग्लास घेऊन आला. अपूर्वाच्या ड्रिंक मध्ये गरम पाणी ओतलं.

श्रीरंग- तुला खायला काही सांगू का?

अपूर्वा- नको. सर. घरी जाऊन जेवायचं आहे.

श्रीरंग- ते ठीक आहे ग. (वेटरला) ए एक प्लेट आपली मिक्स भजी आणि खारे काजू आण पटकन.

वेटर गेला. श्रीरंग ने आपला ग्लास उचलला आणि चियर्स म्हणत अपूर्वाच्या ग्लास वर टेकवला.

अपूर्वा- सर…तुमचा मुलगा…ओम नाव आहे ना त्याचं?

श्रीरंग- हो…तो सियाटेल ला असतो. तिथेच सेटल होणार आहे. वर्षातून एकदा येतो. एकदा मी जातो. तेवढीच भेट.

अपूर्वा- आय सी….मग घरी काय करता तुम्ही वेळ घालवायला?

श्रीरंग- म्युझिक ऐकतो.

अपूर्वा- wow. मला पण म्युझिक आवडत. काय ऐकता तुम्ही? मी फुल फिल्मी म्युझिक ऐकते. आरडी माझा फेव्हरेट आहे.

श्रीरंग- अच्छा. मी फिल्म म्युझिक फार नाही ऐकत. कुमार ऐकतो बर्याचदा.

अपूर्वा- किशोर कुमार?

श्रीरंग- नाही..

अपूर्वा- मग कुमार शानू?

श्रीरंग- नाही.. कुमार गंधर्व.

अपूर्वा- ओह…क्लासिकल…माझे बाबा ऐकायचे खूप. पण मला फार समजत नाही त्यातलं.

श्रीरंग- क्लासिकल समजायचं नसत. ते अनुभवायचं असत. एन्जोय करायचं असत.

अपूर्वा- पण सर जे समजत नाही ते एन्जोय कस करता येईल.

श्रीरंग- आपलच उदाहरण घे. तू मला वैयक्तिक फार ओळखतेस का?

अपूर्वा- नाही…फार नाही.

श्रीरंग- पण आता आपली ही भेट एन्जोय करते आहेस ना? क्लासिकल म्युझिकच पण तसंच आहे.

अपूर्वा- थोडक्यात म्युझिक असो किंवा व्यक्ती…सूर जुळले की ओळख फार नसली तरी आनंद देऊन जातात.

श्रीरंग- अरे वा. काय वाक्य आहे. कमाल.

अपूर्वा- सर हे मी नाही. ह्या ग्लासातला jack Daniel बोलतोय.

त्यावर दोघे मनसोक्त हसले. अपूर्वा हसताना फार आकर्षक दिसते हे श्रीरंगच्या लक्षात आल. श्रीरंग माणूस म्हणून सभ्य, हुशार, सज्जन असण्या बरोबरच त्याचा सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगला आहे, तो संवेदनशील आणि केअरिंग आहे आणि सर्वात महत्वाच म्हणजे तो आयुष्यात खूप एकाकी आहे हे अपूर्वाला जाणवलं.

तासभर गप्पा मारून दोघे निघाले.

श्रीरंग- मी तुला घरी सोडतो.

अपूर्वा- नको सर मी रिक्षा करते.

श्रीरंग- नको बाई. तुला इतक्या थंडीत रात्री रिक्षाने पाठवली हे तुझ्या जिजा ला कळल ना तर माझा मर्डर करेल तो त्याच्या कडल्या सर्जिकल नाईफ ने.

दोघे गाडीत बसले. गाडी मध्या च्या घराकडे निघाली. दोघे रस्त्यावरची रहदारी बघत होते. पाच मिनिटात घर आल. अपूर्वा आभार मानून उतरली. तिला गेट च्या आत गेलेली पाहून श्रीरंग ड्रायव्हरला म्हणाला-

श्रीरंग – चल रे…घरी घे…आणि जरा आरडी ची गाणी लाव.

हे ऐकून ड्रायव्हर पण चाट पडला. त्याने आरडी लावला. गाडीत श्रीरंग “तुम आ गये हो नूर आ गया है” ऐकत असताना लिफ्ट मध्ये अपूर्वा “अजुनी रुसुनी आहे” ऐकत मान डोलावत होती. कुठेतरी एक तार जोडली गेली होती. धून नवीन असली तरी सूर जुळून आल्याने मेलडी दोघांनाही आनंद देत होती.

क्रमश:व्हालेंटाईन डे…भाग ३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!