…..दोघे निघाले. तेजसची S 500 क्लबच्या गेट मधून बाहेर पडली. त्यात तेजसच्या शेजारी बसलेली मुग्धा बाहेर वाट बघत असलेल्या रोहितला दिसली. रोहितचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास नव्हता. त्याच्या डोळ्यात आश्चर्य, राग, जेलसी, हार असे भाव एकत्र दिसू लागले. मुग्धा आणि तेजस S 500 च्या थंड पोकळीत काही न बोलता शांत बसले होते. फक्त दोघांची मनं गप्पा मारत होती. रस्ता मागे पडत होता. गाडी घराच्या दिशेने निघाली होती. काही वेळातच मुग्धाची बिल्डींग आली. तेजसने गाडी काम्पौंड मध्ये पार्क केली. नेहमीचे रिकामे बघे बाल्कनीतून बघत होतेच. मुग्धा आणि तेजस बिल्डींग मध्ये शिरले. लिफ्ट मध्ये दोघच होते. मुग्धा जरा अंग चोरून उभी राहिली. मजल्यावर पोहोचल्यावर मुग्धाने घराच दार उघडल. दोघे घरात आले. तेजसने मागे दार लावल्याचा आवाज ऐकून ते दोघेच घरात असल्याच्या जाणीवेने मुग्धा जरा बावरली. म्हणाली “तुम्ही बसा. मी आलेच रुमाल घेऊन. तुम्ही चहा किंवा कॉफी घेणार का?” तेजस म्हणाला “नको फक्त पाणी चालेल.” मुग्धा आत गेली. तेजस घर बघत बसून होता.
इथे खाली त्यांचा पाठलाग करत असलेला रोहित बिल्डींगच्या गेट जवळ पोहोचला. त्याने आत पार्क असलेली तेजसची गाडी ओळखली. “ह्यांच नक्की काय सुरु आहे?” हे जाणून घ्यायला त्याने मुग्धाला फोन केला. मुग्धा तेजससाठी पाण्याचा ग्लास भरत होती. रोहितचा फोन बघून तिने फोन सायलेंट केला. ट्रे मध्ये ग्लास घेऊन ती बाहेर आली. तेजस पाणी प्यायला. तिने रुमाल त्याच्या पुढे धरला. तेजसने रुमाल घेतला. म्हणाला “खूप मिस केलं मी…..ह्या रुमालाला.” मुग्धाने एक स्माईल दिल. आता तेजस निघणार हे मुग्धाला कुठेतरी पटत नव्हत आणि आता निघायची इच्छा तेजसला अजिबात होत नव्हती. तेजस उगाच इथे तिथे बघत घुटमळत होता आणि मुग्धा जमिनीकडे बघत अशीच उभी होती. एक ओक्वर्द सायलेन्स त्यांच्यात निर्माण झाला होता. इतक्यात तिला रोहितचा फोन परत आला. तिने फोन परत सायलेंटवर टाकला. पण त्याने सायलेन्स ब्रेक करायचं काम केलं. तेजस उठला आणि म्हणाला-
तेजस- चल मी निघतो. पाणी आणि रुमालासाठी thanks.
मुग्धा- thanks काय त्यात? तुमचाच रुमाल आहे ना? उलट मी वेड्यासारखी विसरले तो आणायला आणि तुम्हाला वाकडी वाट करून इथे यावं लागलं. सो मी sorry म्हणते.
तेजस-हम्म ओके. पण मग माझा इतका अमुल्य वेळ waste केल्यावर फक्त sorry म्हणून सुटका नाही होऊ शकत.
मुग्धा- म्हणजे?
तेजस- म्हणजे ह्या चुकीची शिक्षा म्हणून मला एक डिनर पार्टी द्यावी लागेल. शक्यतो आज रात्रीच. कारण उद्यापासून तीन दिवस मी मोस्टली सिंगापूरला जाणार आहे. जमेल का आज?
हे ऐकून मुग्धा आवाक झाली. खर तर खुश पण झाली. तिला काय बोलावं सुचत नव्हत.
तेजस- आज रात्री ८.३० ला जेड गार्डनला यायला जमेल का?
मुग्धा- मी कळवते.
तेजस- मी कळवते हा नाही म्हणायचा सोबर मार्ग आहे. त्यापेक्षा नाही म्हण बिनधास्त.
मुग्धा- नाही…तसं नाहीये….
तेजस- मग कसं आहे? हे बघ जेड गार्डन खूप मोठ आणि ओपन रेस्तोरंत आहे. आजूबाजूला लोक असतील. मी काही तुला पळवून नेणार नाहीये.
मुग्धा नाही म्हणू शकली नाही. तिला नाही म्हणायचं नव्हतंच…पण हो तरी कसं म्हणायचं हे कळत नव्हत.
तेजस- जमेल ना नक्की?
मुग्धा- हम्म…येते मी.
तेजस- ओके. मी निघतो. have a good day.
तेजस निघून गेला. मुग्धा तशीच उभी होती. हे नक्की काय चाललंय? जे चाललंय ते योग्य आहे का? हे आकर्षण आहे की प्रेम? काहीही असलं तरी प्रशांतला जाऊन काही दिवसच झालेले असताना हे असे विचार आपल्या मनात येणं योग्य आहे का? असे अनेक विचार मुग्धाच्या मनात पिंगा घालत होते. तिला आपल्या मनात अश्या भावना निर्माण झाल्या ह्याचा प:श्चाताप वाटू लागला. आपण प्रशांतशी प्रतारणा करतो आहोत असे वाटून स्वतःबद्दल अचानक घृणा वाटू लागली. तेजसने ओठाला लावलेला ग्लास हातात आहे हे लक्षात येताच तिची ग्लासावरची पकड सुटली आणि ग्लास जमिनीवर पडून खळकन फुटला. त्याच्या काचा सर्वत्र विखुरल्या. इतक्यात दाराची बेल वाजली. मुग्धा भानावर आली. बेल परत वाजली आणि ह्यावेळी जोरात वाजली. आता काचा आवराव्या की दार उघडावं ह्या विवंचनेत मुग्धा असताना बेल परत वाजली. मुग्धाने दाराकडे एक पाऊल टाकल आणि काचेचा एक तुकडा तिच्या पायात शिरला. ती कळवळली. पण बेल जोरजोरात न थांबता वाजतच होती. “आले…एक मिनिट!” अस ओरडून मुग्धा लंगडत दरवाजा उघडायला गेली. दार उघडल्यावर दारात असलेला रोहित धाडकन आत शिरला आणि म्हणाला-
रोहित- मुग्धा तुला काही लाज? हे काय सुरु केलं आहेस तू?
मुग्धा- काय?
रोहित- हेच घरात कोणी नसताना श्रीमंत लोकांना इथे बोलावण.
मुग्धा- रोहित तोंड सांभाळून बोल.
रोहित- तू माझं तोंड बंद करशील ग. मी गप्प पण बसेन. पण लोकांच काय करशील? आता इथे येताना तीन लोकांनी मला सांगितल की तुझ्या घरी कोणीतरी श्रीमंत माणूस येतो हल्ली. कोण आहे तो?
मुग्धा- (नजर चोरून) ते माझ्या ओळखीचे आहेत.
रोहित- हो? कुठली ओळख आणि किती जुनी आहे? की प्रशांत गेल्यावर नवीन निर्माण झाली आहे?
मुग्धा- रोहित तू समजतो आहेस असं काहीच नाहीये. त्यांचा रुमाल इथे राहिला होता तो घ्यायला आले होते ते.
रोहित- ओह रुमाल राहिला? तो कसा काय? राहिला की ठेवला त्याने पुढल्या भेटीची संधी म्हणून? मुग्धा हे असे पैसेवाले लोक तुझ्यासारख्या बायकांना फक्त वापरतात आणि सोडून देतात. तुला प्रशांतची उणीव जाणवत असेल हे मला मान्य आहे. पण म्हणून असे अनोळखी लोक घरात आणण्यापेक्षा मला सांग. मी तुझ्यासाठी ते सर्व करेन जे प्रशांत करत असे आणि ते पण कोणतीही अपेक्षा न करता आणि पूर्ण सिक्रेट जपून. कोणालाही काही कळणार नाही आणि तू खुश राहशील.
मुग्धा- रोहित इनफ. शी हे काय बोलतो आहेस तू? तुला कळतंय तरी का?
रोहित- मुग्धा मला सगळं कळतंय म्हणूनच बोलतोय मी. मला खात्री आहे की कोणी बाहेरच्या माणसाने तुझी गरज भागवण्यापेक्षा जर मी भागवली तर प्रशांतला ते जास्त आवडेल. trust me. काय हवय सांग फक्त. पण स्वतःला असं श्रीमंत नीच लोकांच्या हवाली नको करू तू. तुला लागेल ते प्रेम मी देईन.
अस म्हणून रोहितने तिच्या दंडावरची आपली पकड घट्ट केली. मुग्धा रोहितच्या बोलण्याने प्रचंड गिल्ट मध्ये होती. तिला प्रतिकार करायची देखील शुद्ध नव्हती. काहीच प्रतिकार न झाल्याने रोहितने तिला मिठी मारली. ते करताना त्याचा पाय तिच्या पायाला लागला. काच घुसलेली जागा ठुसठुसली. मुग्धाच्या तोंडून स्स्स्स असा आवाज आला. रोहित म्हणाला “ हे काय? फक्त मिठी मारल्यावर इतकं दुखलं?” मुग्धा कळवळत म्हणाली “रोहित माझ्या पायात काच गेली आहे. प्लीज सोड मला.” अस म्हणून तिने रोहितला मागे ढकलला. ती लंगडत सोफ्याकडे जाऊ लागली. रोहितने पुढे होऊन तिला आधार दिला. ती सोफ्यावर बसल्यावर तो तिच्या समोर जमिनीवर बसला. त्याने तिचा पाय आपल्या मांडीवर धरला. तिच्या गोर्या पायाचा स्पर्श त्याला आवडला होता. त्याने हळूच तिचा ड्रेस थोडा वर केला आणि तिच्या गोर्या पोटर्या तो निरखू लागला. मुग्धा कळवळत म्हणाली “रोहित…प्लीज ती काच काढ. जाम दुखतंय.” रोहित भानावर आला. त्याने तिच्या तळव्यात घुसलेला तो काचेचा बारीक तुकडा ओढून बाहेर काढला. मुग्धा thanks म्हणून पाय धुवायला बाथरूम मध्ये गेली. रोहित सोफ्यावर बसला. मुग्धाने बाहेर येऊन झाडूने सर्व काचा भरून घेतल्या. जमीन स्वच्छ झाल्यावर तिने पायाला band aid लावली. रोहित इतका वेळ तिला न्याहाळत बसून होता. मुग्धा त्याच्या समोर येऊन बसली.
रोहित- (तिच्या शेजारी बसून) मुग्धा, तुला कळतंय ना मी काय म्हणालो ते? आय मीन….
मुग्धा- हो रोहित. सगळ कळलंय मला. तुझ्या concern बद्दल thanks. पण मला तू ऑफर केलेली ‘सोय’ नकोय. आय मीन मला त्याची गरज नाहीये. माझ्या आयुष्यातील प्रशांतच स्थान कोणीच घेऊ शकत नाही. बाकी राहिला माझा तो श्रीमंत मित्र, तर तुला आणि लोकांना जे वाटलं ते वाटणं सहाजिक आहे. चूक माझी आहे. मी काळजी घेईन आणि परत त्याला कधीच नाही भेटणार.
रोहित- अग पण मी असं कुठे म्हणालो की…
मुग्धा उठून दाराजवळ गेली आणि म्हणाली-
मुग्धा- रोहित प्लीज. जे झालं ते झालं. तुझ्या concern बद्दल, तू ऑफर केलेल्या हेल्प बद्दल मी आभारी आहे. पण आता तू निघ. मला खूप काम आहे.
हे ऐकून रोहित निघाला. मुग्धाने दार लावून घेतलं. तिला मनावरच प्रचंड ओझं उतरल्यासारखं वाटलं. ती तशीच दाराला पाठ लावून हमसून हमसून रडली. रडत उन्मळून खाली बसली. समोर प्रशांतचा फोटो दिसत होता. मुग्धाने हात जोडले आणि म्हणाली “प्रशांत मला माफ कर की माझ्या मनात ते विचार आले. मी परत कधीच तेजसला भेटणार नाही. हे…हे बघ…मी त्याला मेसेज करते आहे की आजची मिटिंग कॅन्सल आणि आपण परत कधीच नाही भेटायचं!” मुग्धाने तो मेसेज तेजसला पाठवून फोन बाजूला ठेवला. मुग्धाला खूप अगतिक वाटत होत. खूप जोरात ओरडावसं वाटत होतं. तिने आपलं मनगट दातात दाबून धरलं. ती ओक्षबोक्षी रडत होती. तेव्हाच तिच्या मोबाईल मध्ये तेजसचा एका शब्दाचा रिप्लाय आला होता “ओके!”
(© मंदार जोग) क्रमश:गुंतता हृदय….(भाग १३)

